Saturday, August 30, 2014

कलोपासनेकडे ध्येय्यवादाने पहायला हवे

डॉक्टर श्रीराम लागू...

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांच्या कुशलमार्गदर्शनाखाली १९७८ साली मुंबईत रविंद्र नाटय् मंदिरात नाट्य प्रशिक्षण शिबीरासाठी गेलो असताना..प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती केली.. एका रविवारी डॉ. श्रीराम लागूं सोबत शुटिंगलाही गेलो.
..ते विचार लेख स्वरुपात पुण्याच्या दैनिक तरुण भारत मध्ये जून १९७८ मध्ये प्रसिध्द झाले होते...या जुन्या मुलाखतीचे हे दर्शन या इथे देत आहे..अगदी तेच शब्द...यातून डॉक्टरांचे विचारदर्शन उलगडत जाईल..एवढीच अपेक्षा..ही आठवण आयुष्याची साठवण ठरली आहे..

------------------------------------------------------------------------------------------------------------------------


चला आपण चांदिवलीच्या स्टुडिओत जाऊ, तिथे निवांत गप्पा मारता येतील, पांढरा शुभ्र लेंगा, तांबडा गुरु शर्ट, डोळ्यावर चष्मा अशा वेशातले हे तरतरीत व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. श्रीराम लागू. ते मला सांगत होते. वरळीच्या हिंगोरानी हाऊसच्या डॉक्टरांच्या फ्लॅटवर मी त्यांची मुलाखत घेण्य़ास गेलो होतो..पण डॉक्टर साहेब निघाले होते `दोस्त दुश्मन`च्या सेटवर.
एका जंगलाप्रमाणे भासणा-या आवारात फाटकातून गाडी बैठ्या घरापाशी थांबते. हीच आमची मुलाखतीची जागा आणि इथेच आज राज कोहलींच्या दिग्दर्शनाखाली रॉय फिल्मच्या `दोस्त दुश्मन` सेटवर डॉक्टरांचे आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे शॉटस् घेतले जाणार होते. शत्रुसाब अजुन आले नव्हते.
प्रत्यक्ष प्रमाणाचा फायदा घेऊन मी विचारतो, हे श्रेष्ठ समजले जाणारे नट वेळ पाळण्याबाबत असे गहाळ का ?
“ तुम्ही आम्ही प्रेक्षक मंडळी त्यांना डोक्यावर चढवून ठेवतो. त्यामुळे हे लोक स्वतःविषयी मोठेपणाच्या काही कल्पना करून बसतात. लहरीपणा,वेळ न पाळता इतरांना ताटकळात लावणं यातच ते मोठेपणा मानतात”, बोलण्याच्या ओघात एक अजबच बात समजला. डॉक्टरसाहेबांना चष्म्याशिवाय़ जवळचेही फारसे नीट दिसत नाही आणि डॉक्टर स्टेजवर तर या अवस्थेत काही नाटकात त्यांचे काम अप्रतिम झालेले आपण पाहिले आहे..मग हे कसे काय?  मी विचारले.
“त्यांचं असे आहे मी तालमी मी चष्मा लावूनच करतो. सरावाने सारे काही पक्के होते. मग प्रत्यक्ष स्टेजवर चष्मा न लावता काहीच अडचण वाटत नाही.”
पण प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून नटाला हुरुप येतो. त्यांच्या अभिनय कौशल्याला उत्तेजन मिळते ..असे म्हणतात ना? मी आपली शंका प्रदर्शित केली.

“माझ्या बाबतीत नेमके उलटे आहे. प्रेक्षकांना मी पाहूच शकत नाही त्यामुळे त्यांच्या भल्याबु-या नजरांचा माझ्यावर परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. उलट प्रेक्षक चार असले काय किंवा चार हजार असले काय. माझा अभिनय तोच रहातो. नूर पालटण्याची वेळ येत नाही कधी!”
दृष्टीदोष हा कधीकधी वरदान ठरू शकतो, त्याचेच हे बोलके प्रतीक.
असेच काही विषय चर्चमध्य़े य़ेतात. दरम्यान शत्रू साब हाजीर झालेले. शॉटस,सुरु, ओ.के. अनपेक्षित असा तोही आनंद मिळून गेल्याने मन उल्हसित झालेलं.
याच ओघात बोलताना डॉक्टरांनी जी मोलाची माहिती दिली त्यावरुन.. १८८५ ते १९२० हा मराठी रंगभूमिचा सुवर्णकाळ असे त्यांचे मत दिसले. त्याआधी रामलीला, भारूड, लळीत यातूनच नाट्याविष्कार होत होता, उसनवारीच्या आरोपाचा परामर्श घेताना त्यांनी म्हटले की, इंग्रज, मुस्लीम यांच्या संपर्काने परकीयांचे अनुकरण अपरिहार्य होते. भाषा, विचार, रहाणी, सवयी यांचा परिणाम घडणे स्वाभाविकच होते. पण विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमिला कलाटणी दिली. विशिष्ष्ट वळण दिले आणि नवी शक्तीही दिली. जे चांगले आहे ते परकीयांचे असले तरीही स्वीकारायस हरकत नाही.
आजच्या मराठी रंगभूमिचा विचार करताना अन्यभाषिक रंगभूमिचे रंगरूप विचारात घेणे योग्य वाटते.. त्यासंदर्भात लागू म्हणाले, मुंबईत सादर होणारी गजराथी नाटके मराठी नाटकांची भाषांतरेच असतात. मूळ गुजराथी नाटके येत नाहीत. मराठीइतका प्रेक्षकवर्ग गुजराथी रंगभूमीशी निगडीत नाही. मराठी प्रेक्षकांपेक्षा बंगाली लोकांची नाटकांची आवड जास्त असावी. तसेच आपल्या आत्ताच्या प्रायोगिक नाटकांपेक्षा उडीया रंगभूमीवर धाडसी प्रयोग होत आहेत. लेखन, दिग्दर्शन, कलावंत व तांत्रिक या सर्वच बाबतीत मराठी रंगभूमी आघाडीवर आहे. जाणकार प्रेक्षक ही मराठी रंगभूमीवर असलेली कायम ठेव असल्याचे ते अभिमानाने सांगतात.

रंगभूमीवर आपण अनुकरण करतो व ते दिसते शिस्तीचे. काळानुसार समस्या बदलत असतात. नाटक, कविता, कादंब-या, ललित लेखन यांचेही असेच. जे वरवरचे होते ते टिकून राहणार नाही. काळाबरोबर वाहून जाईल व जे चांगले आहे ते टिकून आहे व राहीलेही , हे गडकरी देवल यांच्याक़डे पाहता लक्षात येईल. एखादे नाटक वाईट अथवा चांगले हे काळच ठरवितो. आपल्यापुरता आपण विचार करावा. मात्र उत्तेजन देऊन जे त्यातले चांगले आहे ते वाढविले पाहिजे. थांबवता किंवा आडवता कामा नये..असा विचार पूर्वीची व आत्ताची नाटके या संदर्भात बोलताना त्यांनी मांडला.
याच अनुषंगाने आजच्या प्रायोगिक रंगभूमीकडे चर्चेचा ओघ वळला. १९३२ सालापासून या प्रायोगिक या प्रकाराला सुरवात झाली. `आंधळ्यांची शाळा` पहिला यशस्वी प्रयत्न होता. `घाशीराम कोतवाल` व `अजब न्याय वर्तुळाचा` ही नाटके मला जास्त प्रिय वाटतात.
आजची प्रायोगिक म्हणविणारी नाटके एकमेकांचे अनुकरण करणारी आहेत. ते नविन प्रयोग नाहीत. असेच जर पुढे चालू राहिले तर नाटक त्याच अजब वर्तुळात फिरून मरून जाईल अशी भिती डॉक्टरांनी व्यक्त केली.
ठराविक साचा मोडून केलेले ते सर्व प्रायोगिक अशी सुटसुटीत व योग्य व्याख्या त्यांच्या मते हवी. अमूक तेच प्रायोगिक समजले पाहिजे. असे लेबल आपण लावू शकत नाही. प्रत्येक काळात प्रायगिक ची व्याख्य़ा बदलत जाईल. कालचे चे प्रायोगिक ते आजचे व्यावसायिक असले तरी आजचे व्यावसायिक उद्याचे प्रायोगिक राहणार नाही, असे विचार त्यांनी मांडले.

नाटकाचा आशय व तो सादर करण्याची पध्दत या दोन्हीबद्दल त्यानी चिंता दर्शविली. १९६० ते १९७० च्या दरम्यान हा प्रवाह मंदावला,. तेंडूलकर, कानिटकर यांच्यासारखे विशिष्ट वळणाचे लेखक आहेत. खानोलकरांप्रमाणे गूढ लेखन करणारेही आहेत. पण सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यासारखे लेखक आज निर्माण व्हायला पाहिजेत. तसे झाले नाही तर ह्या प्रायोगिकतेला खिळे बसेल.
आजच्या संगीत रंगभूमीवर नवीन प्रयोग होत नाहीत याबद्दल खेद व्यक्त करुन ते म्हणाले, गाण्याकरीता गाणे हाच प्रकार आजच्या संगीत नाटकात पहायला लागतो. `घाशीराम कोतवाल`ची जात संगीत नाटकाची आहे. संगीत हा यातील अविभाज्य भाग आहे. सबंध समाजावर संगीत नाटकांचा परिणाम घडवायला गाणारे नटच राहिलेले नाहीत. संगीत नाटकाची परंपरा टिकविणे हा संगीत नाटककारांचा उद्देश असावा. केवळ नाटक संगीत असावे म्हणूनच गाणी त्यात टाकायची अशा स्वरुपाच्या विद्याधर गोखले यांच्या मंदारमाला, सुवर्णतुला इत्यदि नाटकांवरुन दिसून येते, असे परखड मत डॉक्टरांनी मांडले. संगीत नटांची उणीव निर्माण झाल्यामुळे जे आत्ता आहे तेच चांगले होत आहे असे मानावे लागते, याचा खेद त्यांच्या बोलण्यात आढळला.

दिग्दर्शक हा नाटकात भूमिका करणारा नसेल तर नाटकाचा पहिला प्रयोग हाच केवळ दिग्दर्शकाचा असतो. नाटकात दिग्दर्शक काम करत असेल तरच व नाटक दिग्दर्शकाचे मानले जावे..नाटक अयशस्वी झाले तर  दिग्दर्शकाच्या माथ्यावरच  याचे खापर फोडले जाते व त्याला जबाबदार धरले जाते..याबद्दल त्यांना खेद वाटतो.
संस्था-संस्थामध्ये सामंजस्याची भावना हवी. त्यामुळे नटावर एकाच प्रकारचे संस्कार न होता निरनिराळे चांगले संस्कार होतील, अशीही एक मार्मिक सूचना त्यांनी केली. प्रत्येक कलाकाराला स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्यात पूर्ण स्वातंत्र्य कुठल्याही संस्थेत आवश्यक असते, अशी भुमिका त्यांनी मांडली.

स्वतः डॉक्टर असूनही आपल्याला कलेसाठी पूर्ण वेळ द्यायला हवा म्हणून डॉक्टरांनी तो व्यवसाय सोडून ते नाट्य-चित्रपटाच्या क्षेत्रात आले. तिथे ते अभ्यासू वृत्तीने सर्वस्व ओतत आहेत. कुठलीही कला पूर्णवेळ देऊनच केल्यास तिचा खरा आविष्कार होतो व भूमिकेला योग्य न्य़ाय मिळतो. केवळ हौस म्हणून या कलेकडे पहाणारेही आहेत. पण ही अभ्यासाची कला आहे,असे त्यांचे प्रांजल मत आहे.
आजच्या नाट्य व्यवसायातील ९५ टक्के कलाकार अन्य ठिकाणी नोकरी करणारे आहेत. अन्य व्यवसायिकांच्या खांद्यावर उभी राहिलेली आजची व्यावसायिक रंगभूमी आहे . हे डॉक्टरांचे निरिक्षण आहे.
अस्सल कलावंताना उतेजन मिळत नाही. कलोपासनेकडे धेय्यवादाने कोणी पहात नाही याची कारणमिमांसा करताना डॉ. श्रीराम लागूंनी एक वेगळीच भूमिका मांडली. ते म्हणाले, `सिनेमा व नाटक  यामध्ये  सिनेमाकडे आज जास्त प्रेक्षकवर्ग ओढला गेलेला आहे. हा प्रेक्षक कलेकडे कला या दृष्टीकोनातून पहात नाही. करमणूक व आनंद इतक्या मर्यादित हेतूनेच आजचा प्रेक्षक अभिनयाकडे पहातो. आणि त्यातूनच सिनेमाकडे त्याचा ओढा वाढतो आहे. यामुळे आवश्यक तेवढ्या गांभिर्याने कलोपासनेकडे पाहिले जात नाही, त्याला उत्तेजन मिळत नाही.

स्वतः इंग्रजी दुसरीत असताना स्टेजवर पहिला अभिनय करमारे आणि आजवर अनेकविध नाटकातून आणि असंख्य चित्रपटातून आपल्या अंगच्या अभिनय कोशल्याने विविधपैलू चमकदारपणे दाखविणारे डॉक्टर श्रीराम लागू यांचे वरील विचार `आधी केले आणि मग सांगितले` या उक्तिप्रमाणे अधिकारवाणीने बोलले गेलेल आहेत म्हणूनच त्यांना तपश्चर्येचे आणि कर्तृत्वाचे नैतिक पाठबळ आहे.


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276