Thursday, July 16, 2015

हे आकाशात विहणा-या पावसाच्या ढगांनो..



हे आकाशात विहरणा-या पावसाच्या ढगांनो
तुझ्या थोड्याश्या पृथ्वीवरच्या बरसण्याने
उल्हसित झालेली ही प्राणीमात्रे..तुझी आभारी आहेत..
खरयं, आम्ही तझ्या आगमनाकडे डोळे लख्ख उघडे ठेऊन वाट पहातो
पण तो बरसावा यासाठी पर्यावरणाचे नियम पाळत नाही
झाडे तोडून उंच सिमेटच्या इमारती बांधतो
त्यावर आपली स्वप्ने साकारावी म्हणून कुंड्यातून छोटी रोपे लावतो
पण तुझा निसर्ग नष्ट करत..स्वतःचे महत्व सिध्द करतो..
खेड्यातही काहीसे असेच चित्र तुला दिसेल..
शेतीची जमीन कमी होत चालली आहे..
पिढ्या-पिढ्यांची जमीन राखण्यापेक्षा त्यातून पैसा अधिक येईल
लौकिक अर्थाने सुख अधिक कसे मिळेल
कमी श्रमात अधिक दाम
हेच आमचे सूत्र बनले आहे...
डोंगरही नष्ट होऊन तिथे वाहनांसाठी रस्ते बनताहेत
तुकडे करुन त्यावर आपली छपरे उभारण्याचे बळ वाढते आहे
तू दिलेले निसर्गाचे वरदान नष्ट होत चालले पाहून तू रुसला असशील
कदाचित शहरांकडे वाढणारी प्रचंड गर्दीही तुला सतत दिसत असेल
पण अधिच मेटाकुटीला आलेला हा देह क्षमविण्यासाठी आम्हालाही दुसरा मार्ग नाही
पण तू मात्र सारे पहातो आहेस..
आमच्या शहरी भागाकडे..थोडे दुर्लक्ष केलेस तरी चालेल
जिथे शेती आहे..आणि जे तुझ्या प्रतिक्षेत बीजरोपण करून तुझ्या आगमनाची
डोळ्यात प्राण आणून वाट पहात आहेत
तिथे मात्र आवश्य बरस
तुझा आर्शीर्वाद त्या बिचा-या लेकरांवर नक्की असू देत..
आता थोडा तू दिसतोसस.भासतोस..अस्तित्वाच्या खूणा धरतीवर दाखवितोस
म्हणून तर अस्तित्वाच्या आनंदाने ..तुझे स्वागत करतानाही मन भरून येते
थोडा सूर्य झाकला गेला तरी चालेल..
आभाळ भरलेले हवे
नवे अंकूर फुललेली नवी बीजे जमीनीतून वर डोकवायलाच हवीत..
हे आकाशस्थ ढगांने तुझी महती महान आहे
तुझ्या छायेत राहण्यातही आनंद समाधान आहे
पुन्हा एकदा तुझी प्रार्थना करतो
तुला साकडे घालतो
तू ये..आणि आमच्यावर वर्षाव कर


- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com





Wednesday, July 15, 2015

ओळख रविंद्र गुर्जर यांची...

उभट चेहरा. मानेवर रुळणारे पांढरे केस. अंगात नेहरु शर्ट. एका हातात शबनम आणि झपाझप पावले टाकत येणारे ते मवाळ व्यक्तिमत्व.....नमस्कारातही मृदुता आणि हसण्यात खळाळता..सारे कांही एकाच ठिकाणी आढळणारे ते व्यक्तिमत्व म्हणजे पॅपिलॉनचे अनुवादक रविंद्र वसंत गुर्जर...


कुठल्याही गोष्टीला वेळ यावी लागते..ती काल आली..स.प.महाविद्यालयाच्या शताब्दीनिमित्ताने साहित्यातरुची असणा-या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या अनुवादकाचा सत्कार केला आणि त्यांना बोलते केलल..खरं म्हटले तर त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख पटवली..
वयाची सत्तरी गाठलेला हा उत्साही तरूण ..आपल्या जुन्या आठवांना उजाळा देत या नवीन साहित्याची रुची असणा-या मुलांशी आपले मन मोकळे करत दिलखुलासपणे बोलत होता..नव्हे त्यांच्याशी गप्पाच मारत होता...एकूणात रवींद्र गुर्जर यांचा सारा आविर्भाव आपण काहीच फार वेगळे केले नाही..केवळ शब्दांना योग्य रित्या एकमेकांसमोर ऊभे करत इंग्रजीतले आपल्याला आवडलेले पुस्तक मराठी वाचकांपर्यत पोहोचविण्याचा यथाशक्ति प्रयत्न केला इतकेच....



खंत एवढीच की या अनुवादकाची..त्याच्या या खटाटोपाची दखल म्हणावी तशी घेतली गेली नाही..त्याला योग्य तो मान मिळाला नाही...आता मात्र ती उणीव स.प.मधल्या या सत्कारातून ....या मुलांशी...बोलून...काही अंशीतरी कमी झाली...याचे समाधान त्यांनी उघडपणे बोलून...त्याबद्दल आनंद व्यक्त केला...अनेक महाराष्टातल्या ग्रंथालयांची माहिती गोळा करण्यासाठी धावपळ करून मिळविलेल्या संख्यावारीतून पॅपिलॉनचे वाचक दहा लाखांहुन अधिक असतानाही..त्यांच्यापर्यत आपणास पोहोचता आले याचे समाधान त्यांच्या बोलण्यात येत होते..
विज्ञानाकडे वळलेला हा विद्यार्थी पुढे बीए..मग एम ए करून पत्रकारिता पदी घेऊन विशाल सह्याद्रि या देनिकांत रविवारच्या आवृत्तीकेडे पहात साहित्यांच्या विविध अंगांचा अभ्यास करीत होता. लहानपणापासूनच चित्रपटाचे वेड विलक्षण...अगदी त्यावेळच्या अकरावीच्या मॅट्रिकच्या वर्षीही १५ चित्रपट पाहून हा छंद जोपासत ठेवला..वाचन ,चित्रपट पहाणे आणि प्रवास या आवडीच्या गोष्टीतून पॅपिलॉन पुस्तक वाचून प्रभावित झाले..मग झपाटून त्या कादंबरीचा अनुवाद करुन राजहंसला दाखविला..इंग्रजी भाषेतल्या कथा..प्रसंगाला..साजेशी मराठी भाषा सहजपणे कागदावर उतरत गेली आणि ती वाचकांना आवडत गेली. त्यातूनच अनुवाद करण्याचा उद्योग सुरु झाला...

गेल्या चाळीस वर्षात उणीपुरी चाळीस पुस्तके म्हणजे काही फार नाही...पण विजय देवधर, वि. ग. कानिटकर. वि. स. वाळींबे असे मोजके अनुवादक मराठी भाषेत इंग्रजी साहित्य आणत होते...आज मात्र प्रतिथयश लेखक बोटावर मोजण्याइतके आहेत...पण अनुवादक भरपूर आहेत...कथा कादंबरी मागे पडून त्याची जागा जीवनात रोजच्या जगण्यात आवश्यक अशी माहिती देणा-या ..आणि चिकन सूप सारख्या पुस्तकांना मराठी भाषेत स्थान मिळून..विषय आणि जगण्याची नवी प्रेरणा देणारे साहित्य या अनुवादातून मराठीत येत आहे..याचा विषेश आनंद गुर्जर यांना होत आहे..


आता स्वतःचे अनुभव लिहण्याचे काम सुरु आहे...अनुवाद करण्यापेक्षा स्वतःचे लेखन करत पुढचा काळ घालविण्याचा त्यांचा मानस आहे....काही वर्षे ..म्हणजे आठ वर्ष नोकरी केली पण बाकी वर्ष केवळ लेखनावर  उदरनिर्वाह केला...पत्नी डॉ. सौ. आशा गुर्जर यांची मोलाची साथ मिळाली..त्या संस्कृत पंडीत..तर मी असा साहित्यात स्वतःला बिलगुन गेलेला..त्यातूनच गायत्री प्रकाशन  सुरु केले..साहित्याची निर्मिती..त्याचे वितरण आणि वसुली..याचा अनुभव गाठीशी आला..


आता अनुवादक म्हणून पुस्तके येताहेत..पण वय थोडेच थांबणार आहे..राहिलेल्या काळा. काही नवे संकल्प पुरे करायचे आहेत...त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे...अजुनही घरच्यांच्या नकळत चित्रपट पहातो...जवळ जवळ सगळेच...सध्याच्या मालिका पाहिल्या की त्यातला फोलपणा अधिक लक्षात येतो..आता चित्रपटाची कथा..पटकथा..संबाद  लिहावेत असे मनात आहे..एखादी मालिकाही लिहिन असे वाटते...पण वेळ थोडी सोंगे फार  अशी अवस्था झाल्यासारखे त्यांना जाणविते आहे...

स्वतःमधला साधेपणा या संवादातही डोकावत होता...एक वाचक आणि उत्तम अनुवादक..आपली मते सांगत होता..आपल्या प्रश्नांच्या उत्तरातून काही मोजके पण बोचरी उत्तरे  देत आजच्या काळावरही आपली मते बिनधास्तपणे   मांडत होता...एकूणातच परकीय भाषेतले उत्तम साहित्य मराठी यावे यासाठी वेगळे विषय कसे सुचतात याची माहिती देताना सिंगापूरमधल्या कॅन्सर झालेल्या महिलेला पुन्हा मिळालेले जगण्याचे बळ..आणि त्यांच्या अचेतन देहाला पुन्हा चेतना कशी मिळाली..यासारखी कथा कशी मिळाली यांचे सोदाहरण स्पष्टीकरण त्यांच्या या संवादातून कळत गेले..

पॅपिलॉन, गॉडफादर आणि सत्तर दिवस या पुस्तकातील मूळ इंग्रजी उतारे आणि त्याचा समर्थ असा अनुवाद विद्यार्थ्यांनी याप्रसंगी अभिवाचनातून सादर केला..स.प.चे प्राचार्य डॉ. दिलिप शोठ यांनी आरंभी रवींद्र आणि डॉ. आशा गुर्जर यांचा सत्कार करुन या संवादाची सुरवात करुन दिली...फारा दिवसांनी का असेन एका अनुवादकाची...एका साहित्यिकाची अशी दखल घेतली गेली याचे समाधान मानत जमलेले पुस्तकप्रेमी टिळक रस्त्यावरच्या महाविद्यालयातल्या ऐतिहासिक वास्तुतून बाहेर पडले..





-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276