Wednesday, November 11, 2015

सण आला दिवाळीचा..उजळू दिवा अंतरीचा



दिवाळीच्या आठवणी अजून ताज्या आहेत मनात ! पहाटेची शांतता, पेंगलेल्या डोळ्याना जागं करणारा थंडीचा सुखद गारवा.. अंगणातल्या चुलीवर उकळणारा पाण्याचा हंडा..आसमंतातल्या फुलांचा उटण्याच्या सुगंधात मिसळून गेलेला तो दर्वळ..उष्णोद्काच्या अभ्यन्ग स्नानाची शरीराला वेढून राहिलेली ऊब.. तुळशीपुढे पणत्यांची रांगोळी आणि आकाशात झगमगणारी चांदण्याच्या दिव्यांची आरास! मग तुळशीसमोर बसून नमस्कार करायचा आणि म्हणायचं ,

दिवा लावला तुळशीपाशी | उजेड पडला विष्णूपाशी ||

वसुवारस म्हणजे दानाचा दिवस.. नरक चतुर्दशी म्हणजे अभ्यंग स्नानाचा दिवस. लक्ष्मीपूजन म्हणजे आल्या लक्ष्मीला नमस्कार करून दाखवण्याच्या कृतज्ञतेचा दिवस.. बलिप्रतिपदा हा घरच्या लक्ष्मीचा म्हणजे पतीने पत्नीचा सत्कार करण्याचा दिवस.. भाऊबीज हा भावाबहिणीच्या प्रेमळ बंधाचा दिवस ! घरच्या गाईगुरांपासून आप्तेष्ट आणि सगेसोयरे अशा सर्वांचे ऋणानुबंध जपणारी, सर्वाना एकत्र गुंफून रांगोळी बनवणारी दिवाळी! ‘अस्तु दीपावली तुष्टये पुष्टये |’ म्हणजे ‘ही दीपावली सर्वाना सुखसमृद्धीची जावो’ अश्या शुभेच्छांचे प्रसन्न रंग भरणारी दिवाळी!वर्षे सरली . दिवाळी बदलली. जुने अंघोळ, उटणे,उब शब्द गेले. त्यांचे संदर्भ हरवले. त्या जागी फटके, फराळ ,फन आले. आता ईफन आणि ईफराळ ईफोन वरून बागडू लागले. जगाच्या एका टोकाच्या ईफोनवर दिवा लावला की त्याचा उजेडच नव्हे तर तो दिवा दुसऱ्या टोकाच्या ईफोनवर उमटू लागला. दिव्यांच्या झगमगाटी दुनियेत पणतीचा प्रकाश लोपून गेला... सगळं जग आता एकाच आकाशाखालचं अंगण झालं आहे....

.........सगळं जग आता एकाच आकाशाखालचं अंगण झालं आहे! येईल का त्याचा फायदा घेता? येईल का लावता परंपरेचा नवा अर्थ आता ? जुने संदर्भ नव्या कल्पनांशी येतील का जोडता ? आपले सगे सोयरे आणि मित्र यांच्या पलीकडे जाऊन आणखी चार जणांच्या घरात सुखसमृद्धीचा दिवा येईल का लावता?....
त्यासाठी आपल्या अंतरातला दिवा उजळावा.. स्नेहाचा आणि समवेदनेचा !

वसुवारसाच्या दिवशी दानाचे संकल्प सोडावेत. दान पैशांचं, वेळाचं, बुद्धीचं! आपल्याला जमेल आणि सुचेल तसं काही तरी काम हाती घ्यावं.
धनत्रयोदशी हा धन्वंतरीपूजेचा दिवस. आपले आरोग्य हे आपले सर्वात मोठे धन. ‘आरोग्य सलामत तो पगडी पचास!’ तेव्हा मिळालेल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. ते कसे टिकवावे याचा विचार करावा.
नरक चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराच्या तावडील्या स्त्रियांची मुक्तता केली. त्यांची आठवण म्हणून आपण अडलेल्या, गांजलेल्या महिलांसाठी काही कामाचे संकल्प करावे.
लक्ष्मीपूजन करावे दीपलक्ष्मींचे ! कोण या दीपलक्ष्मी ? मला भेटल्या काही महाराष्ट्रात! ‘नाही मी एकटी मला मिळाल्या सख्या’ अशा प्रकारचे महिलाना एकत्र आणणारे महिला बचत गट महाराष्ट्रात अनेक आहेत. त्यांच्यासाठी काही काम करणे हे लक्ष्मीपूजन !

बलिप्रतिपदा ही बळीराजाची.. येईल का काही करता आपल्याला महाराष्ट्रातल्या बळीराजा शेतकरी लोकांसाठी ?..

भाऊबीजेला आमच्या लहानपणी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची भाऊबीज फंडाची पेटी फिरत असे. ती संस्था अजूनही काम करत आहे. अशा आणखी पुष्कळ संस्था आहेत. आपल्या मुलाना आपण नको तितकी वाढदिवस आणि नाताळची ‘गिफ्ट्स’ देत असतो. त्यातले एखादे कमी करून भाऊबीज भेट पाठवण्यासाठी आपण त्याना समजून सांगावे..त्याने नवे मैत्र मिळते.. समृद्धी नुसती पैशाची नसते. ती मनाची, समाधानाची, आणि मैत्राचीही असते.

तर असा दिवाळीचा महोत्सव करावा. मजा करावी.. आनंद लुटावा. दानाचाही आनंद घ्यावा. समृद्धीच्या शुभेचछा द्याव्या घ्याव्यात. अंतरीचा दिवा उजळावा आणि कोणतीही अपेक्षा न करता इतराना प्रकाश देण्याचा प्रयत्न करावा.

सर्वाना दिवाळीच्या शुभेछा ! ....











- विद्या हर्डीकर-सप्रे.