Sunday, November 27, 2016

तारेवरची कसरत......पं. भालचंद्र देव




व्हायोलीन गुरू म्हणून उपाधी मिळालेले ज्येष्ठ व्हायोलीनवादक पं. भालचंद्र देव यांचा सहस्त्रचंद्रदर्शना निमित्ताने पुण्यात निवारा सभागृहात  शनिवार ३, डिसेंबर १६ ला सायंकाळी साडेपाचला गानवर्धनचे संस्थापक, अध्यक्ष कृ.ग. धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे..त्यांच्या शब्दात त्यांनीच लिहलेला हा त्यांच्या आयुष्याचा धावता आलेख इथे देत आहे..असे अनेक ज्येष्ठ कलावंत आहेत की ज्यांनी कला जोपासली, वाढविली आणि ती पुढच्या पीढीपर्य़त पोहचवली..पण काळाच्या या ओघात त्यांची नावेही समाजापर्य़त पोहचली नाहीत...त्य़ा सा-यांना वंदन करून पं. भालचंद्र देव यांचे हे छोटेखानी आत्मवृत्त इथे नोंदवत आहे..त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घ आयुष्य लाभो हिच आपणा सर्वांच्या वतीने शुभकामना देऊ या...


आपला,- सुभाष इनामदार, पुणे


सांस्कृतिक पुणे करिता


subhashinamdar@gmai.com


9552596276



माझा जन्म मुंबईचा. साल १९३६. माझे वडील दामोदर चिंतामण देव हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक कै. पंडीत अनंत मनोहर जोशी उर्फ अंतूबुवा यांचे शिष्य. ते मुंबई महापालिकेच्या गुजराथी शाळेत संगीत-शिक्षक होते. ते उत्तम गात आणि हार्मीनियमही वाजवीत असत.
बालपणापासून माझ्यावर सुरांचे आणि तालांचे संस्कार झाले. पुरंतु अंतुबुवांचे चिरंजीव पंडित गजाननबुवा जोशी यांचे व्हायोलीन वादन माझ्या वडीलांना फार आवडायचे आणि आपल्या एका तरी मुलाने व्हायोलीन शिकावे व त्यात नाव कमवावे असे त्यांच्या मनात होते. म्हणून त्यांनी कोठून तरी एक लहान आकाराचे व्हायोलीन माझ्यासाटी पैदा केले. ते माझ्या हातात देऊन सुरवातीचे स्वरपाठ मला शिकवायला सुरवात केली . आणि काय योगायोग...मला ते जमू लागले. माझ्या थोरल्या भावाला हार्मानियम आणि मला व्हायोलीन असे शिक्षण सुरु झाले.
त्यावेळी माझे वय ९ वर्षाचे होते. व्हायोलीनचे तंत्र मला जमते आहे असे पाहिल्यावर वडील स्वतः हार्मोनियम वाजवीत व मी त्यांच्या बरोबर व्हायोलीन वाजवित असे. कधी कधी थोरला भाऊ हार्मोनियम, मी व्हायोलीन आणि वडील डग्ग्यावर ठेका धरीत. त्यामुळे सुराबरोबरच तालात वाजविण्याची मला सवय झाली. कधी कधी वडील मला त्यांच्या शाळेत घेऊन जात व तिथल्या मुली व शिक्षिका यांच्यासमोर मला व्हायोलीन वाजविण्यास सांगत.
पुढे वडील सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही आमच्या गावी म्हणजे पुण्याजवळच्या चिंचवडला स्वतःच्या घरात रहायला गेलेो. परंतु मला पुण्याच्या शाळेत घातल्यामुळे मी बराच वेळ घराबाहेर असे आणि घरी आल्यावर दमून जात असे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी पटकन माडीवर जाऊन झोपून जात असे..

परंतु वडील मला खाली बोलवीत व अर्धा तास रियाज करावयास लावीत. मला त्या वेळी या गोष्टीचा राग येत असे परंतुत्याचे महत्व आता मला पटते.  गावातील निरनिराळ्या उत्सवात माझे वादन होत असे. तेव्हा चिंचवड गावात मीच एकटा व्हायोलीन वाजविणारा व तो ही वयाने लहान. त्यामुळे लोकांकडून भरपूर कोतूक होई,

चिंचवडला आम्ही तीनच वर्षे राहिलो. नंतर आमच्या शिक्षणासाठी वडीलांनी पुण्याला जायचे ठरविले. लवकरच पुण्यास कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयात आम्हाला जागा मिळाली व आम्ही पुणेकर झालो.

शाळेत जाणे-येणे सोपे झाले. त्यामुळे व्हायोलीन वादनासाठी अधिक वेळ मिळू लागला. आमच्याच वाड्यात प्रसिध्द गायक व हार्मानियम वादक पं. बबवराव कुलकर्णी रहात होते. घरातच त्यांचा क्लास होता. त्यांचीही ओळख होउन मी मार्गदर्शनासाठी त्याेच्याकडे जाऊ लागलो. ते शास्त्रीय संगीत तर गायचेच परंतु भजन, गौळणी, अभंग, अष्टपदी, ठुमरी, भावगीत असे प्रकारही फारच सुंदर गायचे.

हळू हळू त्यांच्याबरोबर कार्यक्रमातही साथ करु लागलो .असेच एकदा त्यांच्या क्लासच्या गुरुपौर्णीमेच्या कार्यक्रमात मी दुर्गा राग वाजवीत होतो. इतक्यात जवळच राहणारे प्रसिध्द संगीततज्ञ सरदार आबासाहेब मुजूमदार त्या ठिकाणी हजर झाले. माझे वादन संपल्यावर ते गुरुजींना म्हणाले, `वा! बबनराव हे रत्न तुम्ही कुठून पैदा केलेत.. ? एका थोर जाणकाराकडून मला मिळालेली ती पहिली पावती शाबासकी होती.
माझी मावसबहिण सौ. लीला इनामदार ( प्रसिध्द गायिका सौ. प्रतिभा इनामदार यांची सासू) लग्नापूर्वी आमच्या घराजवळच रहात होती. तिचा गळा अतिशय गोड होता व अनेक जुनी भावगीते तिला येत होती. वडिलांनी मला काही दिवस तिच्याकडे शिकण्यासाठी पाठविले. तिच्याकडून मीही काही गाणी वाजविण्यास शिकलो.

गजाननबुवांच्या घरी तालीम

इतक्यात एक नामी संधी चालून आली. पं. गजाननबुवा डोंबिवला रहायला आल्याचे थोरल्या भावाकडून समजले. या संधीचा फायदा घ्याचा असे वडिलांनी ठरविले. मला डोंबिवलीस भावाकडे पाठविले. गुरूबंधूचाच मी मुलगा असल्यामुळे बुवा मला शिकविण्यास आनंदाने तयार झाले. मी प्रथम त्यांच्याकडे गेलो तेव्हा मला त्यांनी थोडेसे व्हायोलीन वाजवावयास सांगितले. मी सारंग रागातील `ब्रिजमे दधी बेचन जात सखी..`ही चीज वाजवून दाखविली. मग बुवांनी व्हायोलीन काढले आणि सुमारे अर्धातास नुसते `सारेगम`...चे निरनिराळे पलटे बाजवून दाखविले. ते ऐकून मी प्रभावित झालो..घरी जाऊन तसे वाजविण्याचा प्रयत्न करु लागलो.

बुवांच्या घरी मला मुक्त प्रवेश होता. सकाळी ७ वाजता मी तिथे हजर राहून तंबोरे पुसून ठेवीत असे.  थोड्याच वेळात बुवा येऊन बसत. त्यांचा  मुलगा मधू आणि इतर चार-पाच शिष्य शिकवणीसाठी बसत. मी तंबोरा वाजवीत असे आणि ते सारे श्रवण करीत असे. त्यांचा धाकटा मुलगा नारायण नुसत्या डग्ग्यावर ठेका धरीत असे. त्यांनतर थोड्या वेळाने बुवा व्हायोलीनच्या रियाजाला बसत. कधी कधी मला ठेका धरायला सांगत ..असे दिवसभर कधी गाणे ..तर कधी व्हायोलीन वादन चालू असे. दिवसभर ऐकलेले कानात साठवून घरी आल्यावर मी आठवेल तसे लिहून काढत असे..आणि मग त्याचाच रियाज करीत असे..

रविवारी बुवांकडे दिवसभर निरनिराळे कलाकार तबला वादक येत असत. त्यामुळे भरपूर ऐकायला मिळे. मुंबईत कुठे बुवांचा कार्यक्रम असेल तर मी तंबो-याच्या साथीस जात असे. त्यामुळे मैफलीत बुवा कसे वाजवतात हे जवळून अनुभवायला मिळाले..या काळात बुवा सांगतील त्या वेळेला मी त्यांचेकडे हजर रहात असे. या माझ्या वक्तशीरपणावर आणि एकंदरीतच प्रगतीवर बुवा खूष होते. १९५६ ते १९५८ या तीन वर्षांच्या काळात मला बुवांचा दीर्घ सहवास लाभला. आणि माझ्यावर संगीताचे उत्तम संस्कार झाले.
गजाननबुवांकडे असताना ते मला मधुनच तबल्याचे बोल सांगत  आणि ते पाठ करुन  ताल देऊन म्हणायला सांगत. त्यांच्याकडून निघताना त्यांनी मला पुण्यातील प्रसिध्द तबला वादक सूर्यकांत उर्फ छोटू गोखले यांच्याकडे तबला शिकण्यास सांगितले. त्याप्रमाणे दोन वर्षे  मी त्यांच्याकडे तबला शिकलो.

१९५८ मध्ये मला टेलिफोन खात्यात नोकरीची संधी आल्यामुळे मी बुवांचा निरोप घेतला आणि पुण्याला परत आलो.  

`आकाशवाणी`चाही उपयोग 

कसबा पेठेत रहात असताना बाहेरच्या खोलीतील फडताळात एक रेडिओ होता. त्यावर दररोज सकाळी आणि दुपारी नियमितपणे शास्त्रीय गायन-वादनाचा  कार्यक्रम होत असे. त्या कार्यक्रमातील गायकाच्या वा वादकाच्या स्वरात मी माझे व्हायोलीन ट्यून करुन त्यांच्याबरोबर वाजवीत असे. त्यामुळे साथ करायची सवय झाली.
दिवाळीत रेडिओ संगीत संमेलन असे. ते रात्री सोडनऊला सुरु होत असे आणि रात्री एक पर्यंत चालत असे. त्यात अखिल भारतीय कीर्तिच्या गायक-वादकांचे कार्यक्रम होत. त्या कार्यक्रमाबरोबर सुध्दा मी हळू आवाजात साथ करीत असे. त्यामुळे अनेक रागांची व तालांची माहिती झाली. एकच राग निरनिराळे गायक- वादक कसा रंगवतात हे लक्षात आले. त्याचा मला माझे वादन सुधारण्यात खूप फायदा झाला.
भरपूर रियाज केला आणि आकाशवाणीची अॉडिशन दिली. त्यात उत्तीर्ण होऊन रेडिओवर कार्यक्रम करू लागलो.मनात एकच इच्छा होती की आपले वादन गुरूजींना कसे वाटत असेल.. पण ती हि इच्छा लवकरच पूर्ण झाली.

एकदा मी सकाळी पुणे आकाशवाणी केंद्रावरुन व्हायोलीनवर वाजविलेला राग `हिंडोल` तिकडे डोंबिवलीला गजाननबुवांनी ऐकला आणि लगेच मला त्यांचे एक पत्र भारत गायन समाजाच्या पत्त्यावर आले. त्यात त्यांनी लिहले होते.. `तुझा सकाळचा हिंडोल ऐकला. खूप आनंद झाला. आता तुझी उत्तम प्रगती झाली आहे..`... ते पत्र मी अजूनही जपून ठेवले आहे.
तसच मंगळवारच्या संगीत सभेत दिल्ली केंद्रावरुन प्रक्षेपित झालेला राग मारुबिहाग वडिलांनी ऐकला. त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांचे भरभरुन आशीर्वाद मिळाले.

टेलिफोन खात्यात लागल्यावर १९६० साली झालेल्या लखनौ येथील सांकृतिक स्पर्धत मला सुवर्णपदक मिळाले आणि पुढे ती प्रथा मी जवळजवळ २० वर्षे कायम राखली.
पुण्यात त्या वेळेस आणखी एक गायक प्रसिध्द होते. ते म्हणजे पं. नागेश उर्फ राजाभाउ खळीकर. वडील मला त्यांचेकडे घेऊन गेले आणि याला तुमच्या साथीला घ्या म्हणून विनंती केली. खळीकरबुवा थोड्या नाखुषीनेच म्हणाले, `मी साथीला व्हायोलीन आत्तापर्यंत कधीच घेतले नाही, कारण ते सुरेल वाजेलच याची मला खात्री वाटत नाही. परंतु  तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने माझ्याकडे आलात तर याला एक संधी देऊन पाहतो.`

दुसरे दिवशी सकाळी त्यांनी मला व्हायोलीन घेऊन घरी बोलावले. त्यावेळी ते रियाजाला बसले होते. सुमारे दीडतास निरनिराळे प्रकार ते गायले .रियाज संपल्यानंतर प्रफुल्लीत नजरेने ते म्हणाले, `वा. देवा.. आज तुम्ही माझी समजूत खोटी ठरविलीत. आजपासून तुम्ही माझ्या कार्यक्रमात व्हायोलीनची साथ करा. तेव्हापासून मी त्यांचीही साथ करु लागलो. 

पहिली बिदागी

१९६१च्या पानशेत पुराच्या आधी पाच-सहा दिवस खळीकरबुवांचा भारत गायन समाजात गाण्याचा कार्यक्रम ठरला. कार्यक्रम रात्री साडेनऊ वाजता होता. 
बुवा मला म्हणाले, `माझा भारत गायन समाजात कार्यक्रम आहे. तू साथीला येशील काय.. बिदागी वगैरे काही मिळणार नाही.. `
मी म्हणालो, `इतक्या चांगल्या व पवित्र वास्तूत आपल्याबरोबर मला वाजवायचा योग मिळतो आहे याहून भाग्याची गोष्ट कोणती. मला काहीही नको..`

ठरल्याप्रमाणे बुवांचा कार्यक्रम रात्री सुरु झाला. हार्मोनियच्या साथीला ज्येष्ठ हार्मोनियमवादक बंडोपंत साठे  आणि तबल्याच्या साथीला ज्येष्ठ तबलावादक दत्तोपंत राऊत होते. बुवा अगदी अटीतटीने गात होते. समोर श्रोत्यात सरदार आबासाहेब मुजुमदार, हिराबाई बडोदेकर, दत्तोपंत देशपांडे, प्रा. अरविंद मंगरुळकर, प्रा. ग. ह. रानड़े असे मान्यवर उपस्थित होते. त्या दिवशी माझी साथही हार्मोनियमच्या बरोबरीने झाली व मी श्रोत्यांची वाहवा मिऴविली. विशेष म्हणजे, बिदागी ठरलेली नसताना भारत गायन समाजाच्या प्रमुखांनी मला स्वखुशीने १५ रुपये बिदागी दिली.


१९६२ साली माझे लग्न झाले. पत्नी सौ. निलाला गाण्याची आवड होती. तीही माझ्या वडिलांकडे हार्मोनियम शिकू लागली होती. परंतु लग्न झाल्यावर तीन महन्यातच माझी आई अर्धांगवायूने आजारी प़डली आणि सौ. चे हार्मोनियम शिकणे बंद झाले ते कायमचेच.


पुणे विद्यापीठाची डिप्लोमा इन म्युझिक परिक्षा प्रथम श्रेणीत पास झालो. तसेच भारत गायन समाजाची संगीत विशारद परिक्षाही प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झालो.


हिराबाईंची साथ 

एकदा माझा मित्र रमेश सामंत संध्याकाळी माझ्याकडे आला व मला व्हायोलीन बरोबर घेण्यास सांगून त्याने मला सरदार आबासाहेब मुजुमदार यांचेकडे नेले. तिथे त्यांच्या दिवाणखान्यात हिराबाई बडोदेकरांचे गाणे होते. रमेश तबल्याच्या साथीला होता व मला त्याने व्हायोलीनच्या साथीला बसवले. या अचानक प्रकाराने मी गांगरुन गेलो. परंतु लगेच मी स्वतःला सावरले आणि जमेल तशी साथ करु लागलो. हिराबाई गाताना अत्यंत शांत व तेजोमय वाटत होत्या. गाणं संपल्यावर रमेशने मला साथ चांगली झाल्याचे सांगितले. हा एक माझ्या आयुष्यातील अत्युच्य आनंदाचा क्षण होता. 

कालातरांने भारत गायन समाजात मला व्हायोलीन शिक्षक म्हणून पार्टटाईम नोकरी मिळाली. नोकरी सांभाळून संध्याकाळी मी तिथे शिकवित होतो. 

माझी कन्या चारुशीला आता ९ वर्षांची झाली होती. तिच्या हातात मी माझे व्हायोलीन दिले आणि शिकविण्यास सुरवात केली. लहानपणापासून ती व्हायोलीन ऐकत असल्यामुळे तिनेही ते लवकरच आत्मसात केले. शाळा-कॉलेजाजीतील कार्यक्रमातही ती भाग घेत आसे. भारत गायन समाजाची संगीत विशारद आणि एस.एन.डी.टी.ची एम.ए.(संगीत) परिक्षा ती प्रथम श्रेणीत पास झाली. 

`स्वरांनद`चा हिस्सा

एकदा मला स्वरानंद संस्थेचे संस्थापक प्रा. प्रकाश भोंडे यांचा निरोप आला की, त्यांच्या संस्थेत यावे. त्यावेळी `स्वरांनद`, हा मराठी गाण्यांचा महाराष्ट्रात एक अग्रगण्य वाद्यवृंद होता. त्यात वाजविण्याची संधी मिळते आहे.म्हटल्यावर मी लगेच तिथे दाखल झालो. संस्थेचे महाराष्ट्राबाहेरही बरेच कार्यंक्रम होत.
वाद्यवृंदात वाजविल्यामुळे नोटेशन लिहिण्याची आणि वाजविण्याची सवय झाली. अनेक प्रतिथयश गायक, गायिका आणि वादक ह्या वाद्यवृंदात होते. थोड्याच दिवसात प्रा. भोंडेंनी चारूलाही बोलावले. अशा  त-हेने आम्ही दोघेही स्वरानंदचा अविभाज्य घटक झालो. 

सुप्रसिध्द संगीतकार व गायक गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, अरूण दाते, यशवंत देव यांच्या बरोबरही वाजविण्याचा योग आला. आनंद माडगूळकर यांचेबरोबर गीतरामायणाचे अनेक कार्यक्रम वाजविले. सुप्रसिध्द तबलावादक आणि आयोजक अजित गोसावी यांनी आयोजित केलेल्या  अनेक कार्यक्रमातही साथ केली. 
सुप्रसिध्द नकलाकार वि.र. गोडे यांच्या ``अंतरीच्या नाना कळा ``,या कार्यक्रमातही अनेक वर्षं साथ केली. शिवाय आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील निरनिराळ्या कार्यक्रमात साथ केली.

मी आणि कन्या चारुशीला गोसावी यांनी मिळून `स्वरबहार` नावाचा जुगलबंदीचा कार्यक्रम सुरु केला आणि एकाच बैठकीत शास्त्रीय व सुगम संगीत ऐकविण्याचा नवा पायंडा पाडला. हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला. काही वर्षांपूर्वी आमची दोघांची जुगलबंदीची `हेरिटेज` नावाची सीडीही निघाली. 

१९९४ मध्ये मी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर टेलिफोन खात्यातून सेवानिवृत्त झालो. परंतु सेवानिवृत्तीनंतर येणारे रिकामपण मला माझ्या व्हायोलीनने कधीच जाणवू दिले नाही. आजही वयाच्या ८१ व्या वर्षीही मी पूर्णपणे माझ्या कलेत मग्न आहे. 

भारत गायन समाजास ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक समारंभ आयोजित केला होता. त्यात संगीतकार नौशाद आलि यांच्या हस्ते माझा `आदर्श शिक्षक` म्हणून गौरव करण्यात आला. माझ्या आकाशवाणीवरील शास्त्रीय वादनाच्या कार्यक्रमाला १९१६ मध्ये ५३ वर्षं पूरी झाली ही  आयुष्यातील मोठी आनंदादायी घटना आहे. 
पाच वर्षापूर्वी पं. गजाननबुवांच्यावर एक माहितीपट निघाला. त्यात बुवा व्हायोलिनचा रियाज करीत आहेत असा एक प्रसंग होता. त्यासाठी माझी निवड करण्यात आली. तसेच बुवा लहानपणी औंधला महाराजांच्या कीर्तनात व्हायोलीनची साथ करीत. बाल गजाननबुवांच्या जागी एका १०-१२ वर्षाच्या मुलाची निवड झाली आणि त्या प्रसंगीही मी व्हायोलीनवर ``जय जय राम कृष्ण हरी,`` वाजविले.
मी २०१४ साली भारत गायन समाजातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. कारण उतारवयामुळे मला तिथे जाणे-येणे त्रासदायक वाटू लागले. भारत गायन समाजातील ४६ वर्षांची प्रदीर्घ सेवा हा माझ्या आयुष्यातील ऐक आनंदाचा काळ होता.


याच वर्षा मला मुंबईच्या  `रायकर व्हायोलीन अॅकॅडमी `कडून सत्कार स्वीकारण्यासंबंधी विचारणा झाली आणि ती मी मान्य केली. पं. डी.के.दातार यांच्या उपस्थितीत पुण्याचे प्रख्यात व्हायोलीनवादक उस्ताद फैय्याज हुसेन खॉसाहेब यांचे हस्ते मला `व्हायोलीन गुरू `ही उपाधी देण्यात आली.

आता मी वयाची ८० वर्षे पार केली आहेत. अजूनसुध्दा मी घरी काही विद्यार्थ्य़ांना विद्यादान करीत आहे.
आजपर्य़तच्या या माझ्या सांगितिक वाटचालीचे श्रेय प्रथम मी माझे पिता कै. दामोदर चिंतामण देव यांना देतो. कारण लहानपणीच त्यांनी माझ्यातील कलागुण हेरून मला व्हायोलीन शिकविण्यास उद्युक्त केले आणि पुढेही सतत प्रोत्साहन देत राहिले.

तसेच माझ्या सौभाग्यवतीने ( सौ. नीला देव) मला उत्तम साथ दिली.
शेवटी सर्व गुरूजनानांना आणि परमेश्वराला वंदन करून माझे हे मनोगत संपवितो.






















-भालचंद्र देव, पुणे