Thursday, December 8, 2016

व्हायोलीन आजही सुमधूर आहे..आनंद देशमुख


पं. भालचंद्र देव यांचा सहस्त्रचंदर्दर्शन सौहळा

व्हायोलीनला चार तारा असतात. नानांचं म्हणजे. पं. भालचंद्र देवांचे आयुष्य देखील एखाद्या व्हायोलीनसारखच आहे. कलेप्रती असलेली असीम निष्ठा, अत्यंत साधी रहाणी संतुलीत आहार आणि संतुलीत जीवन. सर्वांच्या दृष्टीने एक आदर्श गुरू..अशा त्यांच्या आयुष्याच्या व्हायोलीनच्या चार तारा आहेतया चार तारा अतिशय संतुलीत करणारा जो `बो `आहे..तौ त्यांच्या आयुष्यातली शिस्त आहे . त्या `बो` नी या सर्व तारांना तोलून धरले आहे. त्यांना एकमेकांच्यामध्ये कुठेही हालण्याची परवानगी नाही. म्हणूनच त्यांचं व्हायोलीन आजही सुमधूर आहे .उत्तरोत्तर तो सूर अधिकाधिक श्रीमंत होत चाललेला आहे`, असे उद्गार लोकप्रिय निवेदक आनंद देशमुख यांनी पं. भालचंद्र देव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्ताने झालेल्या सत्कार समारंभात काढले.


ज्येष्ठ व्हायोलीनवादक पं. भालचंद्र देव यांचे सहस्त्रचंद्रदर्शन आणि त्यांची पत्नी सौ. नीला देव यांचा अमृतमहोत्व या निमित्ताने  पुण्यात निवारा सभागृहात ` स्वरबहार` आणि `सांस्कृतिक पुणे` यांच्यावतीने  शनिवारी ( डिसेंबर,१६)  संगीताची मेजवानी पुणेकर रसिकांना प्राप्त झाली.


पं. देव यांना याप्रसंगी त्यांच्या आयुष्याचा आलेख सांगणारे मानपत्र गानवर्धनचे संस्थापक, अध्यक्ष श्री. कृ.गो.धर्माधिकारी यांच्या हस्ते देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

`सकाळी नाना झांडांची फुले तोडताना मी पाहतो..खरं तर ते स्वतः आडनावाने देव असून ते काणत्या देवांना फुले वाहतात ते पाहण्याची मला उत्सुकता आहे. देवत्व हे त्यांच्या वादनात आहे. संस्कारामध्ये आहे, त्यांच्या विचारामध्ये आहे, असे दांपत्य आमच्या सोसायटीत राहते हे आमचे भाग्य `, असे देशमुख यांना वाटते.
गायकाच्या घराण्यातली परंपरा सांगितली जाते..तशीच ती नानांबाबतीतही सांगावी लागेल. त्यांचे वडील उत्तम गायचे.  थोरला भाऊ हार्मानियम वादक. वडीलांनी व्हायोलीन नानांच्या हाती दिले. गेली अनेक वर्षे ते व्हायोलीन वादन अव्याहतपणे करताहेत. कुंटुंबात कला ही परंपरा तेव्हापासून रूजली असल्याचे देशमुख सांगतात.

ती परंपरा आत्ताही सुरू आहे..नाना व्हायोलीनला..मुलगी चारूशीला व्हायोलीनच्या सहवादनाला साथ द्यायला. नातू तबल्याला आणि आमच्यासारख्या निवेदकाला आजिबात थारा नको म्हणून जावई- राजय गोसावी निवेदनाला. संगीतावर प्रेम करणारे हे कुटुंब आहे हा आम्हाला  अभिमानाचा भाग वाटतो , असे देशमुख गौरवपूर्वक सांगतात.

`गायकी पध्दतीने एखादे वाद्य वाजविणे ही प्रचंड मेहनत घेऊन आत्मसात केलेली कला आहे. वादानातले प्रभुत्व इतके असते की ते शब्द आपणाला सहजपणे आठवतात..तसे शब्द देवांच्या व्हायोलीनमधून सहजपणे दिसतात..म्हणजेच ते वाद्य बोलू लागते. गायकी अंगाने वाद्य बोलू लागते`.





`लहानपणापासून मी बघतोय..नाना तसेच आहेत.. काळ्याचे पांढरे झालेत फक्त..बाकी तोच उत्साह, तोच तरतरीतपणा, तिच शिस्त. तोच नियमितपणा आणि संगीतावरची तिच निष्ठा.. त्यांचे वादन त्यांच्या रहाणीमानाइतकच परफेक्ट आहे.. सूर, लय आणि आणि ताल यांच्यावर त्याचे अमाप प्रभुत्व आहे`,.पं. देव यांचा नातू तबलावादक रविराज गोसावी आपले मनोगत व्यक्त करीत होता.


`योग्य गुरूची निवड हा कलाकाराच्या आयुष्यातला कळीचा मुद्दा असतो, त्या बाबतीत भालचंद्र देव खरेच भाग्यवान ठरले.पं. गजाननराव जोशी, पं. बबनराव कुलकर्णा,पं. नागेश खळीकर..तबला वादनासाठी छोटू गोखले असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरू त्यांना लाभले. गुरूंकडे शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या व्हयोलीन वादनाची नवी शैली आत्मसात केली. अव्याहत संगीत साधना. जीव ओतून केलेले सादरीकरण. शिष्यांना आप्तेष्ट समजून केलेले अध्यापन. सकारात्मक व्यक्तिमत्व. वागण्यातील साधेपणा,सात्विकता. वादनातील सच्चाई आणि रियाजातील एकाग्रता. हे त्याच्या व्यक्तिमत्वातील तेजस्वी पैलू आहेत. त्यातच त्यांचा परमानंद एकवटलेला आहे`, असे सांगून गानवर्धनचे कृ. गो. धर्माधिकारी यांनी पं. देव यांचे त्यांच्या पत्नी सौ. नीला देव यांचे अभिष्टचिंतन केले आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी परमेश्वराजवळ  प्रार्थना केली.

`माझ्या नातीने दोन गाणी निवडली. माझी कन्या व्हायोलीन वादन करेल आणि मी शेवटी  वाजविणार आहे..अशा आमच्या तिन्ही पिढ्या आपल्यासमोर येणार आहेत. यापलीकडे काय बोलू.. आम्ही सारे सुरातूनच  बोलणार ..तेव्हा आपणा सर्वांचा लोभ असावा..एवढीच अपेक्षा.`.असे दोन शब्द पं. भालचंद्र देव यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
पं. देव यांच्या सत्कारप्रसंगी सौ. कुमूद धर्माधिकारी यांच्या हस्ते सौ. नीला देव यांचा अमृतमहोत्वानिमित्ताने सत्कार केला गेला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला पंदेव यांची नात सौमधुरा गोसावी- तळेगावकर यांनी अमृताहुनी गोड हा अभंग आणि दान दिल्याने हे गीत सादर करून स्वरातून भावभक्तीची आराधना केली.







सत्कार सोहळ्यानंतर पं. देव यांची कन्या शिष्या सौ. चारूशीला देव यांनी आपले व्हायोलीन वादनातले श्रेष्ठत्व सिध्द केले..आरंभी मियामल्हार..नंतर याद पियाकी आये ही ठुमरी आणि नंतर  हे सूरांनो चंद्र व्हा..हे नाट्यपद वाजवून रसिकांची दाद मिळविली.

शेवटी पं. भालचंद्र देव यांनी आपली मैफल सजविली. आरंभी सोहनी राग.नंतर

तेजोनिधी लोहगोस

आणि धीर धरी ही दोन नाट्यपदे सादर केली..

आपल्या व्हायोलीन वादनाचा शेवट सुरावट आणि नादमयता यांची पाहोच रसिकांच्या मनात सुरेल असा भैरवी राग नटवून दिली.

सर्वच कार्यक्रमातील गीतांना आणि वादनाला संगत केली ती त्यांचा नातू रविराज गोसावी यांनी.



सा-या कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन पं. देव यांचे जावई राजय गोसावी यांनी केले होते.







- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
http://culturalpune.blogspot.in/
http://subhashinamdar.blogspot.in/
9552596276

Wednesday, December 7, 2016

माझे कलावंत आजोबा- पं. भालचंद्र देव



पं. भालचंद्र देव हे नाव पुण्यातल्या व्हायोलिन प्रेमींसाठी नवीन नाही. विद्यादानाचं काम अव्याहतपणे करणारे, कलेप्रती निष्ठवान असणाऱ्या पंडितजींनी नुकतीच त्यांनी वयाची ८० वर्ष पूर्ण केली.

३ डिसेंबरला त्यांचा सत्कार सोहळाही अनेकविध रसिक पुणेकरांच्या साक्षीने संपन्न झाला..कदाचित तुम्हीही त्याचे साक्षीदार असालही.  नानांविषयी काही...


■ खरं म्हणजे नानांबद्दल लिहिण्याची माझी कधी वेळ आलीच नाही, कारण त्यांच्याबद्दल नेहमी वाचलं गेलं. कधी आईनं लिहिलेलं, कधी पेपरमध्ये छापून आलेलं. पण आज त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शनाच्या निमित्तानं त्यांच्यासाठी काही लिहावंसं वाटतंय.
मला माझ्या लहानपणापासून आठवतात, नाना अजूनही तसेच आहेत. मध्यम उंच बांधा, लांबसडक बोटं, एका बाजूला वळवले केस, जुन्या पद्धतीची टेरीकॉटची पॅन्ट, साधाच पण नीटनेटका इस्त्री केलेला स्वच्छ शर्ट, आणि हातात त्यांची ती नेहमीची पट्टेरी पट्टेरी शबनम. साधारण अशाच ठरलेल्या वेशात मी त्यांना बरीच वर्षे पाहतोय. अगदीच त्यांचा स्वतःचा कार्यक्रम असेल तरच एखादा साधा सलवार कुर्ता दिसेल त्यांच्या अंगावर. तो सुद्धा जास्त काही शोभा न करता.


मला आठवते ती गोखले नगरची चाळ. दोन खोल्यांचं घर. मग बरेच वर्षांनी मागची एक खोली वाढवून त्या नावाला दोनाच्या तीन झाल्या एवढंच. पण त्या आधी दोनच खोल्या, पुढे आणि मागे छोटं अंगण. तिकडे आमच्या आजीची दुपारी मॉन्टेसरीची शाळा चालायची. साधारण तीस-बत्तीस वर्ष ही शाळा चालवत असताना 'देव -
देशपांडेबाईंची शाळा' अशी गोखले नगरची खूण झाली होती. आजीची ती चिल्ल्या पिल्ल्यांची शाळा, नानांची पी अँड टी (आताचं BSNL)ची नोकरी, भारत गायन समाजात चालणारी व्हायोलिनची शिकवणी आणि हे सांभाळून पुण्यात-पुण्याबाहेर अनेक कार्यक्रमांमध्ये वादन हे सगळं नाना-आजींचं सुरु होतं.

नाना व्हायोलिन घेऊन सारखे इकडे तिकडे का जातात? आजी रोज दुपारी एवढ्या लहान मुलांना घरात बसवून का शिकवते? नानांची शिकवणी, कार्यक्रम म्हणजे काय हे मला कळायचं नाही तेव्हा. या सगळ्यांच्या जोरावर त्या दोघांनी घर कसं चालवलं असेल याची कल्पना तेव्हा येणं कठीण होतं. आता येतेय...



नानांची दिनचर्या अगदी त्यांच्या वेषभूषे इतकीच साधी सरळ नीटनेटकी. अगदी सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं नेमानं. कधीही ते अगदी जड होईल इतकं जेवले नाही आणि अर्धपोटी राहायची वेळ कधी स्वतःवर येऊ दिली नाही. 'संतुलित आहार, संतुलित जीवन' हेच त्यांच्या निरोगी आणि पौष्टिक दिनचर्येचं रहस्य आहे असं वाटतं. कधी आजारी आहेत म्हणून पडून राहिले नाहीत का कधी एका जागी बसून राहिले नाहीत. नोकरीत होते तेव्हा त्यांच्या व्यस्त दिनमानामुळे वेळ मिळाला नाही तर, रात्री सगळे झोपल्यानंतर हेडफोन लाऊन गाण्यांची नोटेशन्स, तुकडे काढायचं काम करायचे. तेव्हा सुद्धा 'हे आत्ता गाणी का ऐकतायत' हा अगम्य प्रश्न मला पडायचाच, उत्तर काही वर्षांनी मिळालं.



पुण्याच्या 'भारत गायन समाज' या जुन्या आणि प्रसिद्ध संगीत विद्यालयामध्ये त्यांनी संगीत शिक्षकाचं काम केलं. व्हायोलिन जेवढं वाजवायला अवघड त्याहून जास्त ते शिकवायला अवघड आहे असं म्हणतात. यामुळेच फारसं कोणी व्हायोलिनच्या वाट्याला जात नाही. शिकायला जात नाही आणि शिकवायला त्याहून जात नाही. भारतीय शास्त्राप्रमाणे व्हायोलिन शिकवणारे हल्ली खूपच कमी आहेत. जे आहेत ते सगळे जुने लोकच. या अशा परिस्थितीमुळे या संगीत विद्यालयात व्हायोलिनचे शिक्षक टिकत नव्हते त्या परिस्थितीत नानांनी पाच-दहा नाही तर तब्बल सेहेचाळीस वर्षे या संस्थेत विद्यादानाचं काम केलं. संगीत संस्कार केले, अनेक विद्यार्थी घडवले तेही अगदी कमी मोबदल्यात. केवळ संगीताची आवड आणि कलेवरच्या प्रेमाखातर.

आता एखाद्या माणसाचा जसा स्वभाव असतो तोच स्वभाव त्याच्या प्रत्येक गोष्टीत व्यक्त होत असतो नाही का? नानांचं सुद्धा असंच. स्वभावानं प्रेमळ, पण शिस्त म्हणजे शिस्त! चुकीची गोष्ट स्वतः करणार नाहीत आणि कोणाची खपवूनही घेणार नाहीत. मग त्यासाठी कधी कोणाला कडवे बोल सूनवायला लागले तरी मग पुढचा मागचा विचार करणार नाहीत. कातडीबचावू, भिडस्त दृष्टिकोन कधी ठेवला नाही. जे काय आहे ते बोलून मोकळे! मनात काही नाही.


आता नानाच्या वादनाबद्दल मी काय बोलावं? माझी पत नाही तेवढी.पण नानांच्या वादनात त्यांचा स्वभावच झळकतो. शिस्तबद्ध वादन, पक्की लय, न हलणारा स्वर, ही त्यांच्या वादनाची मला जाणवलेली वैशिष्ट्य. मी आईच्या गर्भात असल्यापासून व्हायोलिन खूप जवळनं ऐकत आलोय. त्यामुळेच आईच्या व्हायोलिन सुरांशी माझी तार जन्मापासूनच जुळलीये खरी. रेडिओवर किंवा अजून कुठे व्हायोलिनचे स्वर ऐकू आले की ते आईचे आहेत की नाही हे लगेच ओळखता येतं, जसं आईचं आपल्या मुलाबद्दल होतं तसंच. पण अनेकदा असं होतं की आई आणि नाना यांच्या स्वरातला फरक लक्ष देऊनही कळत नाही. दोघांची जुगलबंदी ऐकताना तर एकच व्हायोलिन ऐकतो आहोत असं वाटतं. आठ ऐवजी चारच तारा ऐकू येतात. हेच नानांमधल्या गुरुचं यश आहे. स्वतःइतकंच तयारीचं शिष्येला तयार करणं यातच गुरुचं कसब असतं आणि ते नानांनी केलंय.


आईकडून बरेच वेळेला मी त्यांच्या शिस्तीचं वर्णन ऐकलंय. तिच्या बोटांतून निघणारे स्वर हे नानांच्याच शिस्तीचं देणं असल्यामुळे तिने मला हे नेहमी अभिमानानंच सांगितलंय. तिनं लहानपणी मांडीवर 'बो'नी खाल्लेल्या फटाक्यांची आठवण तिला आजही आहे. आठवणीपेक्षा त्याचे ऋण अजूनही तिला आहेत असं म्हणावं लागेल. हेच ऋण फेडणं अशक्यच पण ती तिच्या परीनं त्याचा थोडासा प्रयत्न करत असते याचा मला खूप अभिमान वाटतो. 

नानांचे गुरु 'पं.गजाननबुवा जोशी' यांच्या स्मृतीनिमित्त आवर्जून कार्यक्रम करणं, गुरुपौणिमा नियमित साजरी करणं. नानांची एकसष्टी, एकाहत्तरी आणि आता सहस्त्र चंद्रदर्शन आणि त्यानिमित्त कार्यक्रम हा एक एक छोटासा प्रयत्न.



नानांबरोबर तबला साथ करणं ही काही वेगळीच मजा असते. आता माझ्या सुदैवानं मी त्यांचा नातू आहे म्हणून मला ही संधी वारंवार मिळत असते. मग ती मिळाली की मी सोडत नाही. त्यांच्याबरोबर ख्याल वाजवताना मला जरी सूर, राग, ताना, बंदिश, चीज हे फारसं काळात नसलं तरी सुद्धा मी त्यात रंगत जातो. मधल्या जागा आपोआप माझ्याकडून भरल्या जातात, मात्रा वाजत जातात आणि समेवर येत जातात. त्यांचा ताल इतका पक्का आहे की माझ्यासारखे तबलजी त्यांच्यासाठी ताल धरतात का ते तबलजीसाठी ख्याल धरतात हा प्रश्न आहे. सात, बारा, सोळा या मात्रा त्यांच्या डोक्यात इतक्या पक्क्या बसल्या आहेत की त्यांना तबला साथ फक्त ठेक्यासाठी गरजेची असते, मात्रांसाठी नाही! आत्ता वयाच्या एक्यांशीव्या वर्षी सुद्धा व्हायोलिनवर त्यांचा जो स्थिर हात, सलग सूर, आणि शुद्ध स्वरनिकास आहे तो तर दैवी देणगी, पं गजाननबुवांची कृपा, त्यांनी घेतलेली अपार मेहेनत आणि कलेबद्दल असणारी नितांत निष्ठा यांचा सुरेल मिलापच म्हणावा लागेल.



...रविराज गोसावी.

Sunday, December 4, 2016

मानपत्र.. पं. भालचंद्र दामोदर देव उर्फ नाना.

ज्येष्ठ व्हायोलीन गुरू पं. भालचंद्र देव यांना त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनानिमित्ताने शनिवारी ३ डिसेंबर १६ ला गानवर्धनचे संस्थापक, अध्यक्ष श्री. कृ.गो. धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी सौ. नीला देव यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने  सौ. कुमुद धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांचाही सन्मान करण्यात आला..तो क्षण


पं. भालचंद्र दामोदर देव उर्फ नाना. आपल्या कलासंपन्न आयुष्याच्या या टप्प्यावर वयाची ८१ वर्षे पूर्ण करून आपण ८२व्या वर्षात पदार्पण केले आहे. तुमच्या या कलासाधनेचा गौरव करून तुम्हाला पुढील काळात दीर्घायुष्य लाभावे यासाठी स्वरबहार, सांस्कृतिक पुणे आणि तमाम पुणेकर रसिकांच्या साक्षीने गानवर्धनचे संस्थापक, अध्यक्ष श्री. कृ..धर्माधिकारी यांच्या हस्ते हे मानपत्र देताना खूप आनंद होत आहे.
आपला  जन्म मुंबईचा. साल १९३६. आपले वडील दामोदर चिंतामण देव हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक कै. पंडीत अनंत मनोहर जोशी उर्फ अंतूबुवा यांचे शिष्य. वडिलांना . गजाननबुवा जोशी यांचे व्हायोलीन आवडायचे..आपल्या एका तरी मुलाने व्हायोलीन शिकावे अशी त्यांची इच्छा. यासाठी वडिलांनीच एक छोटे व्हायोलीन आणून त्यांनीच आपल्याला प्रारंभीचे स्वर-तालाचे ज्ञान दिले..
त्यावेळी आपले वय वर्षाचे होते. वडील महापालिकेच्या शाळेत संगीत शिक्षक असल्याने कधी कधी वडील आपल्याला शाळेत व्हायोलीन वाजविण्यास सांगत.
पुण्यात गायक हार्मानियम वादक पं. बबवराव कुलकर्णी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जावू लागलात. त्यांच्याबरोबर साथही करु लागलात
काही काळ आपली मावसबहीण सौ. लीला इनामदार हिच्याकडून काही गाणी वाजविण्यास शिकलात.
डोंबिवलीस पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडे व्हायोलीन शिकण्याची नामी संधी आपणास प्राप्त झाली. मुंबईत कुठे बुवांचा कार्यक्रम असेल तर आपणच तंबो-याच्या साथीस असत. त्यामुळे मैफलीत बुवा कसे वाजवतात हे आपणास जवळून अनुभवायला मिळाले. १९५६ ते १९५८ या तीन वर्षांच्या काळात आपल्यावर बुवांच्या संगीताचे उत्तम संस्कार झाले.
पुण्यात प्रसिध्द तबला वादक सूर्यकांत उर्फ छोटू गोखले यांच्याकडून आपण तबलाही आत्मसात केलात.
रेडिओवर लागणारे वादन, गायन ऐकून स्वतःच त्यांना साथ करण्याचा रियाज करून व्हायोलीन वादनाचे स्वतःच धडे गिरविलेत. त्यातूनच आपली वाद्यावरची पकड मजवूत झाली.
आकाशवाणीवरील शास्त्रीय वादनाच्या कार्यक्रमाला आपणाला ५३ वर्षं पूर्ण  झाली . आपल्याला खुद्द पं. गजाननबुवा जोशी यांनी उत्तम व्हायोलिन वादनाबद्दल शाबासकी दिली .
टेलिफोन खात्यात तुम्ही ३६ वर्षे सेवा करून २० वर्षे सुवर्णपदकाचे मानकरीही ठरलात.
सरदार आबासाहेब मुजुमदार, हिराबाई बडोदेकर, दत्तोपंत देशपांडे, प्रा. अरविंद मंगरुळकर, प्रा. . . रानड़े अशा मान्यवरांकडून आपल्या वादनाला दाद मिळाली.
ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर पं. नागेश उर्फ राजाभाउ खळीकर ,सुप्रसिध्द संगीतकार , गायक गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, अरूण दाते, यशवंत देव , आनंद माडगूळकर, नकलाकार वि.. गोडे यांच्या बरोबर साथ करण्याचा आपणाला योग आला. `स्वरानंद` संस्थेत अनेक वर्षे साथ कऱण्याची संधी आपणास मिळाली.
पुण्याच्या भारत गायन समाजात सलग ४६ वर्षे व्हायोलीन वादनाचे शिक्षण देण्याचे काम अतिशय निष्ठेने केल्याने संगीतकार नौशाद आलि यांच्या हस्ते  `आदर्श शिक्षक` म्हणून आपला गौरव करण्यात आला.
आपली व्हायोलीन वादनाची कलापरंपरा कन्येला ..सौ. चारूशीला गोसावी यांना दिलीत..त्याही व्हायोलीन वादनात पारंगत असून रसिकांची वाहवा मिळवित आहेत.
आपला नातू रविराज गोसावी उत्तम तबलापटू आहे. नात सौ. मधुरा तळेगावकर यांच्यात स्वर-तालाचे संस्कार मुळातच आहेत.
आपली पत्नी सौ. नीला देव यांनाही गाण्याची आवड..पण संसारातली शिस्त, परंपरा आणि घरची जबाबदारी यामुळे त्यांना आपली आवड जोपासता आली नाही..पण आपणाला त्यांनी पुरेपुर साथ दिली.
सेवानिवृत्तीनंतर येणारे रिकामपण आपल्याला  व्हायोलीनने कधीच जाणवू दिले नाही. वयाच्या ८१ व्या वर्षीही आपण येणा-या साधकांना व्हायोलीन वादनाचे धडे देत आहात. मुंबईच्या  `रायकर व्हायोलीन अॅकॅडमी `कडून आपणाला `व्हायोलीन गुरू `ही उपाधाही दिली गेली.
जगण्यातली शिस्त आणि संगीतातला अचूकपणा  आपल्यात आजही आहे. म्हणूनच आजही आपण तेवढेच कार्य़रत असता.
आपल्या ला यापुढील आयुष्यातही असेच आयुरारोग्य लाभो. संगीत कलेची सेवा करण्याची अधिकाधिक संधी आपणास मिळो हीच नटेश्वरचरणी प्रार्थना .




 पुणे, शनिवार डिसेंबर ,२०१६