Tuesday, April 11, 2017

नाट्यसंगीत अभ्याक्रमाची तपपूर्ती..रंगतदार





विद्याधर गोखले प्रतिष्ठान चा उपक्रम


विद्याधर गोखले प्रतिष्ठानच्यावतीने गेली तेरा वर्ष सुरु असलेल्या नाट्यसंगीताच्या अभ्यासक्रमातील पुण्यातले सुमारे तीस गायक जेव्हा आपापली पदे अगदी नमना पासून ते भैरवी पर्यत रविवारी कोथरूडच्या हॅपी कॉलनीतल्या सभागृहात ( नऊ एप्रिल)  जेव्हा सादर करतात तेव्हा सभागृहाचे वातावरणच संगीत नाटकमय होते. आणि पुन्हा एकदा त्या जुन्या संगीत नाटकाच्या आठवणी त्या पदापुरत्या का असेनात उपस्थित नाटय्रसिक प्रेक्षकांच्या समोर उलगडल्या जातात...


या नाट्यसंगीत अभ्यासक्रमाला बारा वर्षे पुरी झाली म्हणून महाराष्टातल्या बारा शहरात विद्याधर गोखले प्रतिष्ठान नाट्यसंगीताचा हा जलसा मनोभावे सादर करून पुन्हा एकदा ते वैभव..अप्रत्यक्षपणे शब्दातून साकार करणार आहे..हा नाट्यसंगीताचा जागर या निमित्ताने पुन्हा एकदा मायबाप रसिकांसमोर होईल . कदाचित त्यातूनच ती जुनी संगीत नाटके पहावित असा रसिकांचा आग्रह असेल..तेही सादर करण्याची ताकद या कलावंत मंडळीत आहेत..हे तुम्हाला मुद्दाम सांगतो..







यात सोळा ते एकसष्ट वर्षाचे गायक रंगमेचावर दिसतात..य़ात नांदी पासून भरतवाक्यांपर्यतचा प्रवास अनुभवता येतो..तुमच्या शहरात हा कार्यक्रम झाला तर खरच तुम्ही इतरांना घेऊन तिथे जा आणि अनुभवा तो नाट्यसंगीताचा नजराणा..







नाटककार विद्याधर गोखले यांची नाटककार म्हणून स्मृती जपताना संगीत नाटक पुढे जोपासले जावे आणि त्यातही नाट्यसंगीत हे मराठी रसिकांचे भूषण ..ती किर्लोस्कर, देवल, गडकरी या नाटककारांची ..तर बालगंधर्व, मा. कृष्णराव, भास्करबुवा बखले, राम मराठी ते अगदी जितेंद्र अभिषेकी पर्य़तचे संगीत देणारे आणि ते रंगमंचावर साकारणारे श्रेष्ठ गायक यांचा हा समृध्द वारसा जपण्याचे व्रत हाती घेऊन श्रीकांत आणि शुभदा दादरकर यांनी ख्यातनाम संगीत अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांच्या मदतीने नाट्यसंगीताचा हा अभ्यासक्रम सुरू केला..तो दोन वर्षांचा आहे..शेवटी या विद्यार्थी झालेल्या कलावंतांनी आपली कला रसिकांसमोर सादर करायची..हे गृहित धरून चालविला..




दादर, बोरीवली, गोरेगाव, ठाणे, पुणे आणि नाशिक असा शहरात तो काही वर्ष सुरू राहिला..पण पुढे काळानी आपली पावले दाखवायला सुरवात केली..तसा ठाणे आणि नाशिकताला अभ्यासक्रम बंद करून आता तो उपक्रम दादर आणि पुणे या दोन शहरांपुरता मर्यादित राहिला..हे ही नमूद करावयास हवे..
यंदा पुण्यातल्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी मिळाली..आणि या नवोदित कलावंताचे कौतूक करण्यासाठी त्यावर काही लिहावे असे मनाने घेतले..





आपल्या प्रास्तविकात शुभदा दादरकर यांनी नाट्यसंगीताच्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिलीच..आणि हा कसा सुरू आहे याचे वर्णन केले. पुढच्या सत्रासाठी तेवीस एप्रिलला..रविवारी पुण्यात नविन अभ्याक्रमात सहभागी व्हायच्या कलावंताची निवड परिक्षा घेतली जाणार आहे, ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांचे स्वागतही केले.


 हा व्यवसायिक दृष्टी ठेऊन केलेला उपक्रम नाही..तर ही संगीत नाटकाविषयी आवड असणारे सारे एक कुटुंबासारखे वावरतात..असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.




मूकनायक नाटकातल्या हे प्रभो विभो या नांदीने कार्यक्रमाची सुरवात झाली..ती गायली विद्या अचलारे, कांचन काकडे, पल्लवी नारखेडकर, सुलभा तेळकर आणि किर्ती वैद्य यांनी..पहिल्या वर्गाच्या या कलावंतानी एकदा सुरवात करून दिली..मग वैयक्तिक रित्या पदे रसिकांसमोर सादर केली गेली..




यात वंदना रावळलू ( राधाधर मधुमिलिंद ), सुचित्रा पठाडे ( रमारमण श्रीरंग),  

दृष्टीहिन असलेल्या अद्वैत मराठेचे ( शूरा मी वंदिले), आसावरी असेरकर ( नयने लाजवित), तर अद्वैता मराठे याचे मधुकर वनवन फिरत सखी..हे मधुर पद, स्नेहल कुलकर्मी ( सुरसुखखनी) आणि निलिमा मराठे ( क्षण आला भाग्याचा).. आपली किती तयारी झाली आहे याचा हा एक सुंस्वर नमुनाच होता.



प्रणाली काळे, आदिती पोटे, मनाली गुजराथी आणि ज्येोति असनीकर यांनी एकत्रीतपणे सादर केलेले ऋतुराज आज वनी आला..हे नाट्यपद विशेष लक्षात रहाते..


केदार केळकर याने श्रीरंगा कमलाकांता ने मात्र निराशा केली..





 
मयूर कोळेकर यांचे पहा रे परमेशाची हे नाट्यपद  खूपच रंगदार झाले. पूर्णा दांडेकर ( तारिणी नववसन), अंजली जोसींचे स्वयंवर मधले एकला नयनाला..तर वैशाली विधाते यांचे लेऊ कशी वल्कले..ही राजा बढे यांची कविता..चाल दिली ता जिंतेंद्र अभिषेकी.. अवघड पण त्यानी ते पेलून सजविले. सुनिता कुलकर्णी( सूर गंगी मंगला) आणि संगीता चौधरी कुलकर्णी यांनी सादर केलेले जोहार मायबाप हा अभंगही रसिकांनी ऐकला..





कार्यक्रमाचा शेवट मेधा वांकर, मेघना जोशी, कीर्ति धारप आणि सई पारखी यांच्या अगा वैकुंठीच्या राणा..ह्या पदानी.


 एकूणच इथे पुरुष वर्ग नगण्य आणि महिलांची खूप अधिक जाणवण्याइतकी संख्या होती.. इतेही महिला अधिक तयारीच्या आहेत हेही सिध्द झाले..



 केदार तळणीकर, अक्षय पाटणकर यांनी तबला संगत सांभाळली..तर रंगमंचावरून भक्ति भंडारे यांनी हार्मीनियमची बाजू भक्कम उभी केली.. 



ऑर्गन वादक शंतनु जोशी यांनी पडद्याआड राहून केलेली साथ अतिशय मोहक आणि गायकांच्या स्वरांना अधिक बळकटी आणणारी होती. मुख्य म्हणजे टाळाची साथ करायला  मधुवंती दांडेकर जातीने बसल्या. सारी रंगमंचावरची सूत्रे शुभदा दादरकर ..तर रंगमंचामागिल सूत्रे श्रीकांत दादरकर यांनी हाताळली..


अशा कार्यक्रमाने नाट्यसंगीताची सेवा होते..जुनी नाटके रसिकांना पदांच्या स्वरूपात का होईना माहित होतात..तसे निवेदनातून शुभदा दादरकर यांनी रंगतदार ओघवत्या भाषेत रसिकांनी मोहित केले.

आपली परंपरा जतन करण्याची ओढ नवीन तरूण पिढीत आहे हे पाहून मन भरून येते..आपली संस्कृती, कला पुढच्य़ा पिढीपर्यंत पोहचणार याची यातूनच खात्री पटते.





-सुभाष इनामदार, पुणे
9552596276

No comments: