Saturday, July 7, 2018

गो. नी. दाण्डेकर.. ..स्मरणदिन ८ जुलै






 राजा शिवछत्रपतीमालिकेच्या मुहूर्ताचा प्रसंग. मी आयुष्यात प्रथमच prosthetics वापरून वृद्ध जिजाऊ आईसाहेबांच्या वेषात शिरत होते. राज्याभिषेकाचा प्रसंग चित्रित व्हायचा होता. रायगडच्या नगारखान्याची जशीच्या तशी प्रतिकृती समोर उभी होती. सातशे-आठशे ज्युनियर आर्टिस्टस्, अनेक इतिहासप्रेमी हा सोहोळा अनुभवण्यासाठी कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या कर्जतच्या स्टुडियोत जमले होते. मुहूर्ताच्या त्या दिमाखदार दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी मंचावर अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते. नगारखान्यातून शिवाजीमहाराज वृद्ध जिजाऊ आईसाहेबांना हाताला धरून सिंहासनारूढ होण्यासाठी येत आहेत.. हत्ती झुलताहेत, तुताऱ्या वाजताहेत, शिंगं फुंकली जाताहेत, मंत्र उच्चारले जात आहेत, तोफगोळ्यांचे आवाज ऐकू येताहेत, 'शिवाजीमहाराजांचा विषय असो'च्या घोषणांनी वातावरण दुमदुमते आहे... अशा आनंदाच्या प्रसंगी शि‍वाजीमहाराज आणि जिजाऊंच्या डोळ्यात मात्र अश्रू आहेत... गतस्मृतींच्या हिंदोळ्यावर त्यांची मने हिंदोळत आहेत... गमावलेले शूर साथीदार, हरवून गेलेले क्षण, केलेले वैयक्तिक त्याग... जीवावर बेतलेले कित्येक प्रसंग... स्वराज्यासाठी उपसलेले अमाप कष्ट... सारं सारं दोघांच्या मनात दाटून आलंय. आईसाहेबांच्या गालावर अश्रू ओघळतात आणि शिवबा हलकेच ते अश्रू पुसतात...

मुहुर्ताचं दृश्य संपलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. मी भानावर आले तर बाबासाहेब पुरंदरे, मला आणि महाराजांच्या वेषातल्या अमोल कोल्हेला मुजरा करीत होते. आम्ही दोघेही एकदम गडबडलो... पण दुसऱ्याच क्षणी आमच्या लक्षात आलं की बाबासाहेब मनानं तो प्रसंग जगले आहेत. तो क्षण माझ्यासाठी फार फार महत्त्वाचा होता, पण त्याहूनही विलक्षण होतं त्यांचं पुढचं वाक्य. गेले अनेक दिवस माझ्या मनात नेमकं काय चाललं होतं ते त्यांनी बरोब्बर ओळखलं आणि हलकेच माझा हात दाबत ते म्हणाले - 'आज आप्पा असायला हवे होते ना' आम्हा दोघांनाही अश्रू आवरले नाहीत...

इतिहासावर आप्पांचं विलक्षण प्रेम होतंच, मात्र शिवाजीमहाराज त्यांचं दैवत होते. त्यांचं कार्यकर्तृत्व - गडकिल्ले यावर त्यांची भक्ती होती - महाराष्ट्रातल्या शेकडो किल्ल्यांची त्यांनी मनसोक्त भटकंती केली - हजारो शिवभक्तांना, इतिहासप्रेमींना गडकिल्ल्यांच्या सफरी घडवल्या, इतिहासाशी त्यांना अलगद जोडलंही - आप्पांच्या रसाळ वाणीतून महाराजांचा इतिहास ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. 'मी किल्ल्यांवर तुम्हाला नेतो खरा, पण इतिहास ध्यानी घेत नाही तोपर्यंत हा नुसता भूखंड आहे. इथल्या मातीला आपल्या शूर पूर्वजांनी सांडलेल्या रक्ताचा गंध आहे - तो जाणवला तरच तुमची ही यात्रा सफल होईल - एरवी असेल ती नुसती पायपीट!' असं आवाहन एखाद्या किल्ल्याच्या तटावर उभं राहून करणारे आप्पा आणि भारावलेले दुर्गप्रेमी मला स्पष्ट आठवतात.

खरंतर आपले आजोबा सामान्य नाहीत, याचं भान मला त्यांच्याबरोबरच्या किल्ल्यांच्या भटकंतीत आलं होतं. अगदी लहानपणीच. आप्पांची मी पहिली आणि लाडकी नात. आयुष्याची बरीच वर्षं त्यांच्याकडून लाड करून घेण्यातच गेली. तेव्हा ते माझ्यासाठी 'फक्त आजोबा' होते. आई-बाबांच्या धाकापासून वाचवणारे, पुस्तकांचे ढीगच्या ढीग रचणारे, 'गाणं शिकायचं' ठरल्याठरल्या कोरा करकरीत देखणा तंबोरा आणणारे, गडकिल्ल्यांवर मनसोक्त भटकण्यासाठी शाळा बुडवू देणारे, गीतेचे श्लोक पाठ करून घेणारे आणि बारीक-सारीक यशासाठीदेखील प्रचंड कौतुक करणारे 'फक्त आजोबा'.

थोडी मोठी झाले तेव्हा जाणवायला लागलं की हा एक अजब माणूस आहे. सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला प्रभावित करून टाकणारा - त्यांना भेटणाऱ्या माणसांच्या आयुष्यात 'आप्पा' येण्याला फार महत्त्व आणि अर्थ होता. आप्पांजवळ देण्यासारखं खूप काही होतं आणि खूप काही देण्याची उत्कट इच्छाही!

त्यांच्या लेखनाचे लाखो चाहते होते, आहेतही. ते उत्कृष्ट छायाचित्रकार होते. त्यांना प्रकाश आणि सावलीचा खेळ अतिशय आवडत असे. रत्नांची पारख होती, त्यांना सुरेल गळा होता, उत्तम संग्राहक, मनस्वी भटके, इतिहासाचे अभ्यासक...किती किती पैलू होते त्यांच्या व्यक्तित्वाला.

आज आप्पांबद्दल विचार करताना राहून राहून असंच वाटतं की ते माझ्या आयुष्यात 'फार लवकर' आणि 'फार उशिरा' आले. लहान वयात ते विलक्षण आवडायचे. ते खूप लोकप्रिय आहेत याचा नुस्ताच अभिमान वाटायचा - त्यांना रोज वाचकांची पत्रं यायची आणि हिरव्या शाईच्या पेनानं ते त्यांना रोज उत्तरंही द्यायचे, अगदी प्रत्येक पत्राला! अनेक लेखक, दिग्दर्शक, गायक-संगीतकार यांची घरी वर्दळ असे... या सगळ्यामुळे त्यांच्या 'गो. नी. दाण्डेकर' असण्याचं अप्रूप वाटायचं.

वय थोडं वाढलं, माझं विश्व विस्तारलं, मग काही वर्षं ते त्या विश्वातून अचानक नाहीसेच झाले होते. कारण माझं सगळं जग एखाद्या परीकथेप्रमाणे झालं होतं. त्यात माझी काळजी करणाऱ्या आजोबांना स्थान नव्हतं. त्यामुळे त्यांच्याशी संवादच झाला नाही. जेव्हा थोडी जाण आली, भान आलं, आजूबाजूचं जग माणसं समजावून घ्यायची उर्मी आली तेव्हा लक्षात आलं की खूप उशीर झालाय- त्यांच्यावरचं 'फक्त आजोबा'चं आवरण काढून, एक लेखक, एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघण्याची प्रगल्भता येईपर्यंत आप्पा, 'आप्पा' राहिलेच नव्हते - वृद्ध झाले होते; आणि 'यशोदा', 'शारदा', 'अंबूवहिनी', 'शितू', 'सारजा', 'मृण्मयी' - या आप्पांच्या नायिकांनी मात्र माझ्याभोवती फेर धरला होता. हजारो प्रश्न मनात गोंधळ घालत होते. त्यांच्या कादंबऱ्यांमधल्या नानाविध व्यक्तिरेखा, प्रसंग थक्क करून सोडत होते. त्यांचा शब्दसाठा, त्यांनी वापरलेल्या असंख्य बोलीभाषा, मनुष्यस्वभावाचे छोटेछोटे तपशील - त्यांचे जीवनानुभव, भाषाशैली, वाचकांना हलवून सोडणारी पण साधी, सोपी आणि उत्कट लेखणी... आप्पांच्या लिखाणानं प्रभावित झालेले लोक सतत भेटायचे. खूप बरं वाटायचं, पण गंमतही वाटायची. एरवी अगदी 'आजोबा' असलेला माणूस, याच घरात- आपल्यापासून अगदी काही फुटांवर बसून हे असलं, 'आयुष्य घडवणारं, संस्कारक्षम' लेखन करीत असे आणि आपल्याला त्याची समजच नव्हती... खंत वाटत असे याची.

मी 'स्वामी' मालिकेत ‌'रमा' साकारणार हे त्यांना अमेरिकेत कळलं. लगेच त्यांनी मला माझी जबाबदारी समजावून देणारं एक सुंदर पत्र लिहिलं. मात्र त्यांना airportवर आणायला गेलो तेव्हा कितीतरी लोकांच्या देखत 'श्रीमंत रमाबाई साहेबांना नम्र सेवकाचा मुजरा' - असं म्हणत मुजराही ठोकला. मी 'रमेचा आजोबा' हे अतिशय कौतुकानं ते ज्याला त्याला सांगत. त्यांचा 'तो' आवाज आजही माझ्या कानात आहे... त्यानंतर मी त्यांच्या आवडत्या 'शरदबाबूं'च्या 'श्रीकान्त'मध्ये भूमिका केली. त्यांना फार बरं वाटलं. माझ्या कारकिर्दीत मी पुढेही अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्या. तशा साहित्यावर आधारित असलेल्या कलाकृतींमध्ये अभिनयही केला, निर्मिती केली आणि नुकताच 'रमा-माधव'सारखा ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शितही केला. अशा अनेक वेळा आल्या की माझे आप्पा मी हरवून बसले आहे, याची जाणीव झाली.

कलावंत हा एका आयुष्यात कितीतरी आयुष्यं जगतो. त्यानं उभ्या केलेल्या पात्रांची सुखदुःखं प्रत्यक्ष अनुभवतो. अशी अनेकानेक आयुष्यं जगून समृद्ध झालेला एक संपन्न कलावंत माझ्या अगदी निकट होता. माझ्या कुवतीप्रमाणे मी त्याला निरखलं. वेगवेगळ्या वयातल्या कुतूहलानं त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. कळतनकळत त्यांच्यातलं काही घेतलं. काही निसर्गनियमानुसार आलंही, अगदी आपोआप, हे जाणवून मी थक्क होते.

आप्पांच्या सहवासामुळे अनेक माणसं मला जवळून निरखता आली आणि दिसलं, आप्पांनी गिळून टाकलेलं अनेक लहान-मोठ्या माणसांचं 'छोटेपण'ही. 'असं आहे - माणसातलं चांगलं तेवढंच घ्यावं, वाईट असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. सोडून द्यावं' हे तत्त्व आप्पांनी निष्ठेने पाळलं. त्यांनी कधीही कुणाबद्दल वाईट शब्द काढले नाहीत. आजच्या जगात हे वारंवार आठवतं आणि सतत जाणवतं की हा आप्पांनी माझ्यावर केलेला सगळ्यात मोठा संस्कार आहे.

खरंच आप्पा माझ्या आयुष्यात खूप लवकर आले आणि फार उशिरा. ही सल आयुष्यभर राहणार... पण आजही जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले त्यांच्या 'असण्याचे' त्यांच्या लेखनाचे चाहते - प्रत्यक्ष, पत्रांतून अगदी फेसबुकवरसुद्धा भेटतात, तेव्हा वाटतं कुणाकुणात विखुरलेलं त्यांचं अस्तित्व मला सदैव अनुभवायला मिळणार आहे. असा एक लोकविलक्षण माणूस माझा आजा होता - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हे त्याचं नाव!







-मृणाल कुलकर्णी.

1 comment: