Thursday, October 10, 2019

प्रेमाने मने जिंकणारी बहिण गेली..






कर्करोगासारख्या आजाराचे निदान झाल्यापासून ते चिरशांती मिळेपर्य़त तिने आपला लढा जिद्दीने लढला.. निकराने आणि कमालीच्या सहनशिलतेने . आपले आतले दुखणे आतच गिळून आक्टोबरच्या चार तारखेला सकाळी आपला प्रवास संपविला. शिक्षण नसुनही सर्वांना आपलेसे करून  मिनाक्षी विश्वनाथ इनामदार ...ह्या नावाने आपली ओळख निर्माण करून आपले कार्य अनेकांच्या स्मृतित कोरले..

आज त्याचे स्मरण होते..कारण. ती बत्तीस वर्षे आण्णांच्या म्हणजे महषी कर्वे यांच्या संस्थेत स्वयंपाकघरात मदतनिस स्हणून पडेल ते काम केले.. भांडी उचलणे. एडली पीठ तयार करणे. आजींना डबे पोचविणे. गिरणीत दळण दळणे... एक ना अनेक.



बुध्दीची कुवत समी असल्याने तीला केवळ सही करणे..काही अक्षरांची ओळख होणे.. इथपर्य़ंत जाता आले. पण आयुष्याच्या व्यवहारी जगात मात्र तीने आपला ठसा कायमचा उमटविला तो आपल्या मनमिळावू स्वभावाने आणि प्रेमळ बोलण्या-वागण्यातून. आजही संस्थेत मला मीनाचा भाऊ म्हणूनच ओळख लाभली..याचे श्रेय तिच्या तिथल्या कामावरील निष्ठेला जाते.




वयोमानाप्रमाणे निवृत्त झाल्यावर तिने आपण वृध्धाश्रमात राहू असा निर्णय मान्य केला..आणि तिथेही तिने आनेक आजींना लळा लावला.. एकूण चाळीस वर्षांचा हा संस्थेत रहाण्याचा कालखंड आमच्या परिवारास केवळ आनंद देत गेला..त्याचे कारण तिचे तिथले उत्तम वास्तव्य..आपल्यापासून कुणालाही त्रास होऊ नये..तरीही आमच्या घरी तिचे जाणे येणे कायमच पुढच्या पिढीला हवेहवेसे वाटत राहिले..आजही तिच्या आठवणीने सारेच निराश होऊन जातो..कष्ट करून तिच्या नशीबी देवाने असा दुर्धर आजार का दिला याचे कोडे पडते..


ती गेल्यानंतर तिथल्या आनंदनिवास मधील खोलीत आवराआवर करण्यास उभयता गेलो असता..समोरच्या खोलीतील लेखिका आणि सहनिवासी जयश्री शंकरन यांनी तिच्यावर लिहलेला एक लेखच माझ्या स्वाधीन गेली..मीना गेली हे त्याना खरेच वाटत नव्हते.
तोच लेख त्यांच्या शब्दात देत आहे..



माझी एक सुंदर अबोल मैत्री..

होय, मला माझ्या जवळजवळ शेजारीच रहाणारी ही माझी अबोल मैत्रीण मनापासून आवडते. ही माझी मैत्रीण माझ्याच इमारतीत सहा वर्षापासून रहाते आहे. ही माझी मैत्रीण अत्यंत मितभाषी आहे. आणि माझ्या निरिक्षणानुसार ही माझी मैत्रीण संपूर्ण दिवसभरात दहा संपूर्ण वाक्येच जेमतेम बोलते. तिला मी किती वाजले हे सांगितले की बरे वाटते. आणि मीही तिला उत्साहाने आजचा वार , तारीख , महिना ..सांगत असते. मी तिला निक्षून सांगितले आहे की बाकी कुणालाच ही माहिती विचारायची नाही. तिने माझ्या प्रस्तावास आजवर होकार दिला आहे.
माणसाचे ओठ खोटे बोलू शकतात पण डोळे.. कधीही केव्हाही नाही.. याप्रमाणे या मैत्रीणीच्या डोळ्यातील माझ्याबदद्लची प्रेमभावना माझ्या ह्दयाला स्पर्श करते . मी तिला कधी माझी मैत्रीण ..तू का ..मी तुझी मैत्रीण असे म्हटले की तिला फारच आवडते..



या मैत्रीणीला काही वर्षीपूर्वी बाराखडीची प्राथमिक पुस्तके दिली होती आणि तिने शिकण्याचा प्रयत्नही केला होता. पण ते तेवढेच राहिले. काही वेळ संस्थेत कार्यक्रम असला की ही मैत्रीण प्रेमास्वरूप आई.. वात्सल्यसिंधू आई..ही कविता बिनचूक म्हणते ..काही वेळा दोन वाक्ये माईक हातात धरून आत्मविश्वासाने बोलते..हे हे आठवते.

ही मैत्रीण सध्या मोठ्या आजारपणातून उठली आहे.. घरातल्या घरात आणि जवळच चालत असते. अथवा ही संस्थेच्या आवारात देवाकरीता फुले गोळा करताना दिसतेथोडी जपमाळ घेऊन जप करताना पहातेमी पेटी वाजवित असले किंवा काही वाचन, लेखन करीत असले तर अगदी थोडी वेळ माझ्या खोलीत खुर्चिवर येऊन बसते.,
या मैत्रीणीचे माझ्या खाण्याकडे कधीही आजिबात लक्ष नसते.
चार पाच वर्षीपासून डॉ. शैल्यकुमारांकडे, पोड रोडला मी जाते. मला त्यावेळी खोकला झाला होता. तेव्हा तिची सोबत मला आठवते.
आमच्याच संस्थेतील माजी सचिव मुकुंद जोशी यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी दोघी एकाच रिक्षातून जाऊन आलो. दुस-या दिवशी या मैत्रीणाने आपली पेटी उघडून , “ जयश्री , मी तुला रिक्षाचे किती पैसे द्यायचे आहेत.. “असे विचारले.  तेव्हा मी तिला म्हणाले , “मला तुझ्याकडून रिक्षाचे पैसे नकोत ..पण मला तू पैशासंबंधी विचारावे असे वाटले हे म्हणणे मला खूप आवडले ”.
आता ही मैत्रीण मला ,... जय़श्री, तुला ताक पाहिजे.. गोड आहे.. असे विचारण्याची वाट पहात आहे..

ही मैत्रीण.. अगं तुगं म्हणते म्हणते तेव्हा ते ऐकण्यात मला खूप समाधान लाभत होत. पण मी तिला मीना.. तुला रेडिओवरची गाणी आहेत का असं विचारत असे..

माझ्या दोन वर्षांपूर्वीच्या डाव्या हाताच्या दुखण्याच्या वेळी आणि आता चार महिन्यापूज्र्वी उजव्या हाताच्या वेळी या मैत्रीणीने मला कितीतरी गोष्टींसाठी आपणहून सहकार्य केले.
कुकरचे झाकण लावणे, कात्रीने कापून दूध पिशवी उघढणे, परकरची नाडी बांधणे..अशा. कित्येक.
मला या माझ्य़ा सुंदर , अबोल मैत्रीणीचा अभिमान वाटत आहे. या माझ्या मैत्रिणीचे नाव आहे मिनाक्षी उर्फ मीना इनामदार..

शुक्रवार, चार आक्टोबर दोन हजार एकोणिस मीनाच्या पवित्र स्मृतिस हा लेख समर्पित करीत आहे..


-जयश्री शंकरन्,
आनंद निवास, वृध्दाश्रम
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था,
कर्वेनगर, पुणे.


No comments: