Friday, January 24, 2020

साज आवाज..गायन वादनाचा आनंद देणारी मैफल



साज आवाज.. एक धुंद मैफल

शास्त्रीय गायन आणि वादनाचा आनंद देणारी संध्याकाळ पुणेकर रसिकांनी अनुभवली ती जयश्री कुलकर्णी आणि चारुशीला गोसावी या दोन रसिकप्रिय कलावंतांकडून.. आणि ती मैफल आपल्या शब्दातून रंगवीत होत्या विनया देसाई..

रागांच्या बंदिशी. त्यावर रचलेली गीते. कधी मोहरून यावी असे सुगम गीत तर कधी धुंद ऐकत रहावे असे नाट्यपद.. चारुशीला गोसावी यांचा व्हायोलिन वरील मनाला भिडणारा सुरेल आविष्कार. आणि त्यांना गायनातून प्रतिसाद घालणारा जयश्री कुलकर्णी यांचा कमालीचा तयार आवाज.


साज आवाज हे वेगळे नाव घेऊन रंगलेल्या या शुभारंभाच्या कार्यक्रमातील मधुवंती, पटदिप, यमन, चारुकेशी, रागेश्री, मियामल्हार..अशा रागांची कधी व्हायोलिनवरची सुरावट. तर कधी गायनातून रंगत गेलेली बंदिश.. 
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना स्मरून कार्यक्रमातील विविध राग आणि त्यावर आधारलेली गाणी तेवढ्याच मेहनतीने हे दोन कलावंत जेंव्हा तल्लीन होऊन सादर करतात तेंव्हा ती स्वर नादमधुर होऊन रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेतो..आज गायन आणि वादनातून पुरेपूर उतरले असे म्हणावेसे वाटते.


कधी गळा डोलवत होता तर कधी व्हायोलीन ताल धरायला लावत होते.
मधुवंतीचे स्वर चारुशीला गोसावी ह्यांच्या व्हायोलिनमधून मनाचा ठाव घेत होते तर गीतरामायणातील निरोप कसला माझा घेता..जेथे राघव तेथे सीता.. ह्या जयश्री कुलकर्णी यांच्या गीताने वेगळीच स्वर ताल आणि रागाची पकड घेतली होती..

शिवरंजनीतल्या निसर्गराजा.. या गाण्याच्या व्हायोलिन आणि गाण्याच्या अनोख्या जुगलबंदीने रसिकही भाराऊन गेले आणि टाळया बरोबर वन्स मोअर चा नारा बुलंद झाला..अनेक गाणी पुन्हा सादर करावी लागली.
विनया देसाई यांनी केलेल्या निवेदनातून तो फुलत गेला..आणि या कार्यक्रमाची पसंती रसिकांनी तेव्हाच दिली..ह्या वेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाला परदेशातही पसंत पडेल.. आम्ही तो तिथेही करून साज आवाजला प्रतिसाद दिला..

मराठी ,हिंदी अशा दोन्ही भाषेतील रसिकांना हा मोहिनी घालेल याची खात्री आहे.. मुख्य म्हणजे मर्यादित साथीदारांच्या संगतीने रंगणारा हा कार्यक्रम प्रसन्न बाम ( हार्मोनियम) वसंत देव( तालवाद्ये) आणि अभिजीत जायदे (तबला) यांच्या साथीने हा अधिक भारावून टाकणारा होता..

साज आवाज या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ गायक पं. मुकुंदराज गोडबोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले..त्यावेळी इतर प्रमुख कलावंत.. 
पुणेकर रसिकांच्या पसंतीला तो उतरण्यासाठी रवींद्र मेघावत याची ध्वनिव्यवस्था तवेढीच कारणीभूत ठरते..
गाण्यांची यादी देण्यापेक्षा तो पुन्हा आपणच अनुभवा असे माझे मत आहे..
- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com


No comments: