Thursday, April 6, 2017

शब्द स्वरांचा सुरेल गोफ म्हणजे..शब्द सूर बरवे

मालती पांडे आणि पद्माकर बर्वे यांच्या समृध्द सुरांचा वारसा अनुभवण्याची बहार
 

ख्यातनाम गायक आणि संगीतकार पं. पद्माकर बर्वे यांच्या शेकडो बंदिशीतल्या काही सुंदर बंदिशी आणि मराठी संगीतकाराला आपल्या चित्रपटात किंवा ध्वनीमुद्रीकात आवश्यक वाटणारे नाव म्हणजे मालती पांडे...यांच्या एकेकाळच्या जुन्या गीतांना पुन्हा उजळा देणारा कार्यक्रम म्हणून रसिकांना आपलासा वाटेल
 
शब्द सूर बरवे...अर्थात दोघांचा मुलगा राजीव , सून डॉ. संगीता आणि प्रियंका प्रांजली या बर्वे घराणाच्या पुढच्या पिढीने सादर केलेला हा कार्यक्रम बुधवारी पाच एप्रिलला पुण्यातल्या सद्गुरू श्री जंगली महाराज यांच्या एकशे सत्तावीसाव्या पुण्यतिथी निमित्ताने रसिकांना अनुभवता आला...
 
एका अर्थाने पद्माकर बर्वे आणि मालती पांडे यांच्या सांगेतिक जिवनाचा तो स्वरात गुंफलेला उत्तम पट रसिकांनी तृप्तपणे अनुभवला आणि ते जुने स्वर आळवित आणि आठवणीत ठेवत ते दाद देत घरी परतले..
सगळ्या कार्यक्रमाची सूत्रे संवादक म्हणून डॉ. संगीता बर्वे यांनी जुन्या घटनांचा आठवणींचा मागोवा घेत गंभीरपणे आपल्या घराण्याचा वारसा ..ती परंपरा रसिकांपर्य़त पोहोचविली..


राजीव बर्वे यांनी पद्माकर बर्वे यांच्या विविध रागातल्या बंदिशी आणि त्यांच्या हिंदी रचना सादर केल्या...तर प्रियंका आणि प्रांजली या दोन नातींनी आपल्या आजीच्या म्हणजे मालती पांडे यांच्या सुगम गीतांना आपल्या मधूर आवाजात ते भाव समर्थपणे उपस्थित रसिकांपर्यत पोहोचविले..

देव म्हणता म्हणता..विठ्टलाचे भेटी आणि ध्यान करू जाता हे गायकी अंगाने सादर केलेले अभंग आणि त्याला धनंजय वसवे यांनी दिलेली पखवाजची सुरेख साथ आणि नितिन जाधव यांनी टाळाचा केलेला यथायोग्य गजर ...भक्तांच्या मनात पुरेपुर रुजला.


लपविलास तू हिरवा चाफा आणि कुणी पाय नका वाजवू ही प्रियंकाने गायलेली भावगीते अतिशय तरल आणि समर्पक स्वरात सादर होऊन..श्रोत्यांच्या मनात ती पुन्हा ऐकाविसी वाटते होती. याशिवाय खेड्यामधले घर कौलारू, त्या कातरवेळी..कशी रे तुला भेटू त्या तिथे पलिकडे....ही प्रियंकाने गायलेली आपल्या आजीची गीते मंदिरातल्या पवित्रतेला त्या जुन्या परंपरेच्या सास्कृतिक वारशायची आठवण करू देत होती..आजही जुन्या गीतांची सफर ऐकायला रसिकांना आवडते इतकेच नव्हे त्या गीतांना दादही दिली जाते हे यावरून सिध्द होते.अंगणात खेळे राजा, उठ जानकी आणि पहिले भांडण असा निवडक सुगम गीतांना प्रांजलीने स्वर दिला..राजीव बर्वे यांचा शास्त्रीय बैठक असलेला आवाज आणि लगाव यांचा उपयोग उत्तम अभंगाच्या नादातून अधिक निनादत घुमून गेला..तर प्रांजली आणि प्रियांका यांच्या आवाजाला आजीच्या सुरेलतेची जोड मिळत त्यांच्या गीतातून हा कार्यक्रमाचा मनोरा  उंचावत गेला..

संगीता बर्वे यांच्या निवेदनात आपल्या सासू आणि सासरे यांच्याविषयीचा आदरयुक्त प्रेमही व्यक्त झाले..आणि मधुनच आपल्या काव्यविष्कारीचा झलकही रसिकांना चाखायला मिळाली..

 


मुकुंद पेठकर  (हार्मानियम),  दर्शना जोग  (सिंथेसायझर), आणि  अरविंद काडगावकर ( तबला) यांची साथसंगत त्या सुरांना चेतना देत गेली  आणि कार्यक्रम रंगतदार बनला.  

-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com 9552596276

No comments: