Saturday, November 26, 2022
अभिनयाचा स्वामी हरपला!
विक्रम गोखले हे नाव व्यावसायिक रंगमंचावर प्रथम झळकले ते चंद्रलेखेच्या स्वामी या नाटकातून..
उत्तम शरीरयष्टी, गोल भाऊक चेहरा, उत्तम वाणी आणि सहज अभिनय यामुळे विक्रम गोखले रंगभूमीवर रसिकांच्या नजरेत भरत असत.
माधवराव पेशवे यांच्या वेषात त्या भूमिकेचा रुबाब खरोखरच गोखले यांच्यात रसिकांचे डोळे आणि मन सुखावणारा होता..
या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य होते त्यात त्यांचेसोबत सहकलाकार होत्या वृषाली सुळे.. त्यांची रमाची भूमिका केली होती.नंतर मात्र त्या विक्रम गोखले यांच्या आयुष्यात पत्नी वृषाली गोखले म्हणून प्रवेशित झाल्या..
या नाटकाने इतिहास घडविला. याचा शंभरावा प्रयोग शनिवारवाड्यात दिमाखात झाला होता..
त्याआधीही बाळ कोल्हटकर यांच्या वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातून त्यांचे नाट्यक्षेत्रात पाऊल पडले होतेच..पण स्वामी नाटकाने त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
मग आले बॅरिस्टर!
स्वामी नाटकाचा विक्रम होतो ना होतो तोच गोवा हिंदू असोसिएशकडून विजया मेहता यांचे दिग्दर्शन लाभलेले नाटक विक्रम गोखले यांना लाभले. त्यांनी या नाटकाचे सोने केले..
सुहास जोशी आणि विक्रम गोखले यांच्या यातल्या भूमिका अंगावर काटा आणीत असत..त्यात विजया मेहता आणि चंद्रकांत गोखले यांचाही अभिनय रसिक विसरू शकणार नाहीत.
नाट्यसृष्टीत रमता रमता त्यांनी राजदत्त यांनी वऱ्हाडी आणि वाजंत्री चित्रपटात प्रथम विक्रम गोखले यांना नायकाची भूमिका दिली. पुढे जोतिबाचा नवस या चित्रपटासाठी कमलाकर तोरणे यांनी त्यांना या क्षेत्रात अधिक उमदा रोल दिला.
पुढे तिथेच ते अनेक चित्रपटांमधून स्थिर झाले..मला आठवते ते गोविंद घाणेकर यांच्या कैवारी चित्रपटात त्यांची वेगळी भूमिका गाजली.
हळूहळू हिंदी चित्रपटातून ते वावरू लागले.
मला त्यांची छोटी भूमिका होती आजही आठवते ती श्रीकृष्णाची. चित्रपट होता स्वर्ग नरक.. गाजली .
पुढे संकेत मिलनाचा नाटकाने वेगळी ओळख करून दिली..स्वाती चिटणीस आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाने हे नाटक गाजले.
वऱ्हाडी आणि वाजंत्री पासून कळत नकळत, महानंदा कितीतरी मराठी चित्रपटातून विक्रम गोखले प्रेक्षकांच्या नजरेत भारून गेले होते.
कलाक्षेत्रात असताना त्यांनी कधीही राष्ट्रभक्तीशी दुरावा केला नाही..सामाजिक भान जपता जपता प्रसंगी राग आला तरी त्यांनी आपले वेगळे मत ठामपणे मांडले. कला आणि सामाजिक भान दोन वेगळी ठेवली..
कणखर वृत्ती आणि देशभक्तीची आस ते नेहमीच जपत असत. स्पष्ट बोलणे हा तर त्यांचा स्थायीभाव होता.
आजी कमलाबाई गोखले, वडील चांद्रकांत गोखले यांच्या नंतर अभिनयाचा वारसा त्यांनी कायम
ठेवला.
विक्रम गोखले मोठ्या अभिमानाने आणि तेजस्विपणे ते अखेरर्यंत जगले..असा राष्ट्रप्रेमी माणूस आणि एकनिष्ठ कलावंत पुन्हा होणे नाही..
आमच्यासारख्या रसिक, प्रेक्षकांची विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
*'अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)
*विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
*‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार
*हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार (४-८-२०१७)
*पुलोत्सव सन्मान (डिसेंबर २०१८)
*चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार
Subscribe to:
Posts (Atom)