Tuesday, April 16, 2013

वेळ आला तसा काळही..






आज म्हणजे २६ एप्रिलला त्या घटनेला १४ दिवस झाले..अचानक माझी बहिण सौ.माधवी विजय बोकील हिचा मृत्यू झाला..घाटावर कावळाही लगेच शिवला..आता तिचा देह अंतरिक्ष प्रवासाला गेला आहे...

पण मनाला चुटपूट लागली..आपण काहीही काहीही करु शकलो नाही याची खंत आजही डिवचत आहे..पण यातून काही घ्यायला हवे..ते काय .यासाठी हे सारे नोंद करीत आहे..इतकेच..


शनिवारी १३ एप्रिल २०१३ दुपारी मला दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात फोन आला.

 `मामा, आई बेशुध्द पडली आहे..मी काय करु..कुठे नेऊ?` भाचा माझ्याशी जरा घाबरलेल्या आवाजात बोलत होता.

मी सांगितले ,`मी आत्ता सासूबाईंच्या डोळ्याच्या ट्रिटमेंटसाठी दिनानाथ मध्येच आहे...तू इतर कुठेही न जाता इथेच ये..`

सांगितले खरे..पण ते ऐकून मनात साशंकता निर्माण झाली. काय झालं असेल..सासूबाईंना सांगून मी त्या रूग्णवाहिकेची वाट पहात होतो. ती दारात पोचल्यावर मी तातडीने ईमर्जन्सी वॉर्डमध्ये सांगीतले...`माझी बहिण बेशुध्द पडली आहे..तिला इथे आणले आहे.. त्यांना तातडीने उपचारासाठी आत घ्या...`

तात्काळ सारी धावाधाव सुरु झाली..डॉक्टर आणि त्यांचे मदतनीस झटकन आले. रुग्णवाहिकेत निपचित पडलेल्या माझ्या बहिणीला तात्काळ स्ट्रेचवर घेतले..तिथेच छाती दाबूनच तीला आत आणले..ताताडीने सारेजण धावले ..अक्षरशः काही क्षणातच सारी उपकरणे ..इंजक्शन देण्यात आली. आम्ही कुणी काही सांगायच्या आत सारेजण बहिणीच्या त्या देहात चेतना आणण्यासाठी झटत होते..

इकडे माझ्या भाच्याकडून आज सकाळपासून त्यांना काय झाले, काय खाल्ले, कोणत्या गोळ्या घेतल्या याची माहिती डॉक्टरांकडून घेण्यात येत होती. आमचे प्रयत्न सुरु आहेत...पाहू या...

तिला दवाखान्यात आणले तेव्हा एका बाजुच्या ओठातून पाढरा फेस बाहेर येताने दिसत होता..जेव्हा मी , भाचा आणि डॉक्टर रुग्णवाहिकेतून स्ट्रेचवर घत होतो..तेव्हा तिचा देह अचेतन भासत होता...अंगही बोजड झाल्यासारखे वाटत होते..

मी खरं तर मनातून खूप घाबरलो होतो..पण या क्षणी ती भिती..तो आत होणारा कोलाहाल ...सारे बाजुला ठेऊन..डॉक्टरांच्या उपचाराकडे आम्ही सारेच अपेक्षेने पहात होतो...

पंधरा मिनिटानंतर डॉक्टरांनी उपचार थांबविले आणि....सांगितले.. क्षमस्व..आम्ही नाही वाचवू शकलो...गेली माझी ६५ वर्षांची बहिण गेली...अंतिम यात्रेसाठी..अगदी अचानक...

किती दुर्बळ आहोत...आपण..होत्याचे नव्हते कधी झाले..कसे झाले..कळलेही नाही..हाच काय तो नियतीचा खेळ...

शनिवारी ९ १३ एप्रिल २०१३च्या) सकाळपासून तिला पित्ताचा त्रास बाटत होता..थोडी अस्वस्थही होती...पण अपचनासारखे जाणवत होते..पित्तासारखे वाटत होते..पण दुपारी अचानक एकदम उलटी होईल असे वाटले..पण उलटी न होताच ती परत घरीच पडून राहिली ...मात्र ती उलटी परत आत गेली आणि त्यातच चक्कर आल्यासारखे झाले.असावे...खरे म्हटले तर नेमके काय झाले ते केवळ तिच सांगू शकेल..पण आतात सारे संपलेय..काय होते हे कळायच्या आत...घरात ती बेशुध्द पडली...तेव्हाच मेहुण्यांनी भाच्याला फोन केला..त्याने तातडीने उपचारासाठी दिनानाथ गाठले.....पण अखेरीस नियतीच्या मनात वेगळेच होते...ज्या आईच्या कुशीत त्याने जन्म घेतला त्या मुलाच्या सोबत काही वेळ त्या रुग्णवाहिकेत होत्या..पण सारे अबोलपण..प्रवास...अंतिम टप्प्यावरचा सुरु होता...

सारे संपले..बहिण गेली....आज अजुनीही वाटते..तिला जर सकाळपासून बरं वाटत नव्हते तर तसे स्पष्ट सांगायचे...आम्ही सारे होतो ना.. वेळीच काही उपचाराची दिशा...आवश्यक त्या डॉक्टरांच्या सांगण्यानूसार तातडीने काही मदत योग्य वेळेला आणता आली असती....पण हाय... अखेर सारे प्रय्तन नविष्फळ ठरले..

गदिमांच्या गीतरामायणातल्या गीताची आठवण यावी..

दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...

संपूर्ण नोकरी विद्यादानाचे पुण्यकाम तिने सातारच्या कन्याशाळेच्या प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका म्हणून केले..यात निवृत्तीच्या आधीची काही वर्षे मुले पुण्यात असल्यामुळे हिंगण्याच्या महर्षा कर्वे संस्थेच्या प्राथमिक शाळेत बदली करुन घेतली...तिथेच निवृत्तही झाली. दोन्ही मुलांची लग्ने झाली..दोघांनाही मुली आहेत..पति म्हणजे माझे मेहुणे सातारला महाराष्ट्र स्कूटरच्या कारखान्यात होते..तेही रितसर निवृत्त झाले...मध्यंतरी त्यांचीही तब्येत बरी नव्हती..आता वयाच्या ७२व्या वर्षीही तेही व्यवस्थितीत  आहेत...

आता मुले-नातवंडांच्या परिवारात सारे काही सुरळीत असताना...पित्ताचा त्रास व्हावा आणि त्यातच अखेरचे क्षण मोजावे लागावे यापरिते दुःख कोणते...

यातून बोध हाच की कुणालाही काही होत आहे..तर त्याने ते घरात बोलावे..वेळप्रसंगी शेजा-यांनाही सांगावे..विषेषतः स्त्रीया..... त्यांना त्रास होईल..कसे बोलावे म्हणून आत सहन करतात...ते कृपया करु नका...बोला..सांगा..काय होते ते सांगा...नक्कीच अशी वेळ पुन्हा कुणावर येऊ नये...हिच अपेक्षा...

जे झाले ते अकस्मित होते...दुखः सांगण्यासारखे नसते..पण उरीचे शल्य कुणापाशी मोकळेपणाने मांडावे..कुणाला हे सांगावे ...म्हणून हा शब्दप्रपंच..यात कुणाला वाईट वाटले असेल..तर मी क्षमा मागतो...पण शांत राहून दुःख भोगण्यापेक्षा ..जे होते ते सांगून बाहेर पडा..मुक्त व्हा...
यातून कुणाला तरी वेळीच उपचार मिळतील..पुन्हा आयुष्याचे नवे चांदणे आनंदाने पहाता येईल...



सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com