Friday, February 7, 2025

आनंदवन. ७५ पूर्ण..वाटचाल अजूनही बाकीच








 शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही....

 

ह्या काव्यपंक्ती ज्यांनी रचल्या व प्रत्यक्षात तसे जगून दाखविले ते बाबा आमटे आणि गृहिणी-सखी-सचिव या तिन्ही भूमिका व्रतस्थपणे जगत त्यांना तहहयात साथ देणाऱ्या साधनाताई आमटे, या उभयतांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात महारोगी सेवा समिती, वरोरा या स्वयंसेवी संस्थेच्या रूपाने सुरू केलेल्या कार्ययज्ञास नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली!


या साडेसात दशकांच्या या लोकविलक्षण सेवाकार्याचे सिंहावलोकन आणि पुढील २५ वर्षांत योजित कार्याच्या दिशेची सुहृदांपुढे मांडणी या उद्देशाने “आनंदवन” इथे ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी“योगदानाचा–कृतज्ञतेचा–सद्भावनेचा–मित्रमेळावा” आयोजित केला होता.

त्यानिमित्त आनंदवन विषयीचे हे टिपण..!

 



समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे आनंदवन..!



आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ १९४८ साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प, आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरीत झाला आहे.  आज आनंदवन ही स्वतंत्र ग्रामपंचायत उभी आहे. या प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा मार्फत बघितली जाते.

आज ही महारोगी यांची रचनात्मक घडण करणारी जगातील एकमेव संस्था.. ७५ वर्षे पूर्ण करून आपला आदर्श निर्माण करीत आहे.


शरीराचा कुष्ठरोग मी बरा केला..पण मनाचा कुष्ठरोग मी बरा करू शकलो नाही..

सुदृढ मनाला जडलेला कुष्ठरोग अजून बरा झालेला नाही.. ज्या दिवशी तो बरा होईल त्या दिवशी आनंदवन सारखी चालविण्याची गरज पडणार नाही..

बाबा आमटे..


इतर आजाराप्रमाणे तुम्ही कुष्ठरोगी बरा झालेला असेल तर तुम्ही त्याला सन्मानाने, वाजत गाजत घरी घेऊन जा.. आणि समाजाला सांगा हा बरा झाला..मी आणतो..तुमच्यात वाढवा..पण ते होत नाही.. ही स्थिती बदलण्याची गरज आहे..असे डॉ. विकास आमटे सांगतात.



आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात. सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद.


आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास ‘माणूस’ घडविणाऱ्यांचा आहे.


हाथ लगे निर्माण मे 

नहीं मारणे

नहीं मांगने..

बाबा आमटे यांच्या सांगण्यानुसार

त्याला असे उभे करा की तो मागू नाही शकला पाहिजे कुणाकडे..

असे आनंदवन  कुष्ठरोग्यांनी उभे केले..



आनंदवन इथे कुष्ठरोगी यांच्या निरनिराळ्या सहा वसाहती आहेत..त्यांच्यासाठी या मेगा किचनमध्ये स्वयंपाक होतो..तोही हेच लोक..स्त्रिया करतात.

इथे महाविद्यालय..शाळा आहेत त्यानाही इथे भोजनासाठी व्यवस्था इथे  करण्यात आली आहे..

त्यासाठी इंधन म्हणून पुण्याच्या किर्लोस्कर  यांच्या तंत्रज्ञान घेऊन बायो गॅसची निर्मिती  केली.  सोलर पॅनल द्वारे वीज निर्मिती करून त्यातून इथे ऊर्जा आणली गेली.

प्रत्यक्ष कुष्ठरोग्यांची वसाहत स्नेहसावली अनुभवताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आणि त्यानी नमस्कार..करून मलाही तुमचा माना..ही  डोळ्यातून केलेली विनवणी मन गलबलून सोडते..जे एकदा आले ते शेवटच्या श्वासापर्यंत..आनंदवनाच्या प्रवासाला येतात..हेच घर..हेच आयुष्य..!


 आज ५५ बेडचे हे हॉस्पिटल डॉ. पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली  इथे काम करीत आहे.

 डॉ. हृषीकेश गावंडे .. डॉ. कपिलदेव कदम हे इथे कसे काम चालते ते सांगतात..

आधुनिक उपचार पद्धती कुष्ठरोगी बांधवांसाठी इथे आहेत..

इथे केवळ कुष्ठरोगी नसून अपंग, मुक - बधीर मंडळींची संख्या असून कुष्ठरोगी बांधव कमी आहेत पण जे आहेत त्यांना त्यांचेकडे असलेले कौशल्य वाढवून त्या ज्या सेवा देतात त्याला मोबदला देऊन त्यास ताठपणे समाजात जगण्याचे बळ आनंदवन देत आहे..हे सर्वात महत्वाचे आहे..

डॉ. विकास तसेच डॉ. भारती..कौस्तुभ आमटे..डॉ. प्रकाश आणि डॉ . मंदाकिनी आमटे तसेच सारे आमटे कुटुंबीय..आपले विश्वस्त आणि निष्ठावान  कार्यकर्ते यांच्या बळावर इथली विकास स्वप्ने डोळस पणे पहात आहेत..

आनंदवन .. कुष्ठरोगी बांधवांसाठी जागतिक पातळीवर काम करणारी सर्वात संस्था आहे..समाजातील दानशूर आणि सामान्य माणूस त्यांच्या परीने संस्थे सोबत जोडला गेला आहे..पण शासनाचे याकडे पुरेसे लक्ष नाही..यानिमित्ताने का होईना..आनंदवन अधिक नव्या दिशेने कार्य करीत असल्याचे शासन पाहिल आणि आपली नजर इकडे वळवून त्यांना मदतीचा हात पुढे करतील अशी अपेक्षा आहे..


- सुभाष इनामदार,

पुणे