Sunday, July 21, 2013

स्मरण गुरूंचे - पं. भीमसेन जोशी


मला पंडितजींच्याकडे १९७८च्या चैत्री पाडव्यापासून गाण्याचे शिक्षण घेण्याचा सुवर्णयोग प्राप्त झाला. नंतर केवळ आठ दिवसातच त्यांच्या बरोबर गाण्याच्या निमित्ताने परगावी प्रवास करण्याचे योग सुरु झाले.

कुठेही प्रवासाला निघताना अत्यंत शिस्तबध्द पध्तीने उदा. प्रवासाला निघताना बॅग भरणे, प्रवासात लागणा-या सर्व वस्तू (स्वच्छ इस्त्री केलेले कपडे, लुंगी,दाढीचे सामान, पेस्ट, ब्रश इ.) व्यवस्थित बॅगेमध्ये आहेत का, हे पहाणे. वेळेच्या आधी किमान अर्धातास तरी इच्छित स्थळावर पोहोचणे याबबाबत पंजितजींचा कटाक्ष असे. अत्यंत शिस्तप्रिय हा एक त्यांच्या स्वभावाचा पैलू होता. 

मी पंडितजींना बाबा म्हणत असे. ते अत्यंत प्रेमळ होते. ब-याच वेळी गाणे शिकण्याच्या निमित्ताने माझा मुक्काम त्यांच्याकडेच असे. दररोज पहाटे चार वाजता ते उठायचे . स्वतः चहा करायचे. एखाद्या वेळेस मला जाग आली नाही तर ते स्वतः मला उठवत असत.  `उठा दात घासा...  तु चहा घे व मलाही दे ...`, असे सांगायचे.  चहा घेऊन झाल्यावर रियाजाला बसायची वेळ असायची. रियाजाला बसताना व गाण्याच्या मैफलीत बसताना मांडीवर तंबोरा घेऊन बसणे त्यांना अजिबात आवडत नसे. तंबोरा उभा घेऊन -अर्थवीरासनात ( मारूती बैठक ) बसायला लावत. सूर्योदय होईपर्यत फक्त खर्जाचा रियाज करायला लावायचे. एकदा असाच रियाज चालू असताना मी मध्य षडजावर चुकून एक स्वर लावला तर बाबांनी खिडकीकडे पहात `अजून सूर्योदय झाला नाही ., एवढे एकच वाक्य बोलले  व `खर्जाचे स्वर लावा `,असे सांगितले.

एकदा असेच गाण्याच्या मैफलीमध्ये त्यांच्या बरोबर गाण्याची साथ करत असताना सुंदरसा `कान्होबा तुझी घोंगडी चांगली `हा अभंग चालू होता. त्यामध्ये अनेक विविध ताना म्हणायला सांगीतले आणि मी मूळ चालीतली ओळ गायली ....त्यावेळी माझ्याकडे बाबांनी कटाक्ष टाकून मी म्हणलेल्या मूळ ओळीतून त्यांच्या चालू असलेल्या विविध ताना घेण्याच्या प्रक्रियेमध्ये नेउन परत गाणे चालू केले. ती गाण्याची मैफल संपल्यानंतर मी अस्वस्थ झालो व आपण गाण्यात एवढी मोठी चूक केली या विचाराने मला रात्रभर झोप आली नाही. दुस-या दिवशी पहाटे गुरूजांच्याकडे रियाजाला गेलो तेव्हा मी त्यांचे पाय धरले आणि त्यांना म्हणालो.. `काल गाणे म्हणत असताना मी फार मोठी चूक केली.. `यावर ते मला म्हणाले..`अरे राजा..आपण केलेली चूक लक्षात येणे हे अत्यंत महत्वाचे आहे व आपण केलेली चूक मान्य करणे हा प्रामाणिकपणा व मोठेपणा आहे...अशा व्यक्तिलाच गाणं म्हणता येतं. आता अशी चूक परत तुझ्याकडून कधी घडणार नाही..`

माझ्या गुरुजींना गाडी चालविण्याची खूप आवड होती. असेच एकदा बेळगावला गाण्यासाठी त्यांच्या आवडत्या मर्सिडीज गाडीतून निघालो असताना गाडी सूरू केल्यानंतर मला म्हणाले..`आज काय गाडीचे तंबोरे जुळलेले दिसत नाहीत, जरा बेसूरच बोलती आहे..जरा पंडीत ओटोमोटीव्हमध्ये फोन लाव व बावडेकरांना  सांग की मी बोलावलं म्हणून..``.  श्री. बावडेकर आल्यानंतर त्यांनी गाडीची चाचणी केली व म्हणाले, `गाडी गॅरेजला न्यावी लागेल ..पण मी तुम्हाला एका तासाभरात गाडी आणून देतो` . गाडी परत आल्यानंतर बाबांनी बावडेकरांना विचारले  ,`काय झालं होतं.. `.बावडेकर म्हणाले ,`पंडितजी गाडीचा एक सिलेंडर बंद होता, आता दुरुस्त केला आहे. तुम्ही आता कुठेही घेऊन जावू शकता.. मग आम्ही  पुढील प्रवासाला निघालो..अशा पध्दतीने त्यांच्या रोमारोमात स्वर भिनलेला आहे.

 पंडितजींच्या अनेक अविस्मरणीय मैफलींमध्ये त्यांना मी तानपु-यावर गायन साथ केली. ते नेहमी मला सांगत....`तुम्हाला जेवढं गाणं येतं तेवढं प्रामाणिकपणे मांडा..   मैफलीत रियाज करु नका. प्रत्येक मैफल ही एक महापरीक्षा आहे आणि त्या परिक्षेत आपाल्याला उत्तम गुण मिळवून पास झालं पाहिजे. नक्कल करण्यापेक्षा स्वतःच्या आवाजाला काय झेपेल तेवढे नेमकेच घेऊन आपल्या गाण्यातले सैंदर्य वाढविता येते. त्यासाठी रियाज करणे आवश्यक आहे. आपल्या गाण्यानी जर आपल्याला आनंद वाटला तरच ऐकणा-यालाही आनंद मिळतो.`

 हे स्वरसंगतीचे सुवर्णाचे क्षण मला माझ्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आता माझे मार्गदर्शक झाले आहेत. माझ्या गाण्याची प्रत्येक मैफल माझ्या गुरीजींना समर्पित आहे. 




 राजेंद्र दिक्षित,पुणे