Thursday, April 21, 2011

वेलकम इडियट्स -सचिन परब

आमच्या पत्रकार मित्राचे नेहमीच नवे विषय सारखे खुणावत असतात ...त्याचेच `माझे आभाळ` ब्लॉग वरचे हे लेखन माझ्याही माझ्या वाचकांना देत आहे ..अर्थात सचिन परब यांच्या सहकार्याने ....
गेल्या वीकेण्डला आंबाजोगाईला गेलो होतो. लातूरमधे महारुद्र मंगनाळेंच्या ‘बातमीमागची बातमी’ या साप्ताहिकाच्या बाराव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होता. तिथून अमरजींना म्हणजे अमर हबीबांना भेटण्यासाठी आंबाजोगाईला गेलो होतो. अमरजींबरोबर दोन तासदेखील घालवणं हा श्रीमंत करणारा अनुभव असतो. इथे तर अमरजी दोन दिवस सोबत होते. खूप मजा आली.



कसा काय आठवत नाही, पण चर्चेत ‘थ्री इडियट्स’चा संदर्भ आला. माझ्या डोक्यात विचार आला की समोर हा एक मोठा इडियटच उभा आहे. नोकरी न करता सामाजिक कामात आयुष्य घालवणारा हा माणूस. अनेक मोठमोठ्या लोकांसोबत मी फिरलोय. त्यांना लांबून जवळून बारकाईनं पाहणं हा कामाचाच भाग. पण अमरजींच्या तोलामोलाचा माणूस महाराष्ट्राभरात मला तरी आजघडीला माहीत नाही. यात अतिशयोक्ती बिलकूल नाही. त्यांना भेटलं की एक ओतप्रोत आनंद मिळतो. आपण स्वतःला मोठे मानणारे सगळ्याच बाबतीत किती छोटे आहोत, हे कळतं. पण त्यातून कोणताही इन्फिरॅरिटी कॉम्प्लेक्स येत नाही. उलट मोठं बनायची प्रेरणा मिळते.


अमरजींनी प्रस्थापित मोठेपणाचा वाराही चुकून लागू नये यासाठी डोळ्यात तेल टाकून दक्षता बाळगलीय. आपल्याला कुणी मोठं म्हणालं तर आभाळच कोसळेल की काय, असं ते साधेपणाने वागत राहिले. त्यांनी त्यांच्या सोबतच्या कितीतरी माणसांचं जगणं समृद्घ बनवलंय. अमरजींचं बोट पकडून विचार करायला शिकलेली माझ्यासारखी पत्रकार किंवा कार्यकर्त्यांची एक पिढीच महाराष्ट्रात आहे. त्यांना आज साठीच्या जवळ आलेलं असताना त्यांना आपण समाज म्हणून काय दिलं? अनेक खुज्यांच्या वाटेला सहजपणे जातो तो मानमराताब तरी. पण कधी त्याची अपेक्षाही केली नाही आणि न मिळाल्याचं वैषम्यही जवळपासही कधी भरकटलं नाही. निस्वार्थपणे जोडलेली माणसं मात्र जिवाला जीव देण्यासाठी सोबत आहेत. आणखी काय हवं.


‘थ्री इडियट्स’ जेव्हा कधी बघतो तेव्हा बस बघतच बसतो. दर वेळेला त्यात नव्यानं काहीतरी सापडतं. कामयाब नहीं काबिल बनना सीखों, कामयाबी तुम्हारे पीछे पीछे आयेगी, हा बाबा रणछोडदासचा मंत्र जगायलाच शिकवणारा. सिनेमा पहिल्यांदा बघितला तेव्हा भारावूनच गेलो होतो. त्याच भारावलेपणात विंडो सीटसाठी एक लेख लिहिला होता. वेलकम इडियट्स. त्याचा इण्ट्रो होता, ‘ आपल्याला २०२० पर्यंत महासत्ता बनायचंय. नव्या दशकाची पहिली दहा वर्ष तर हातची गेलीच. त्यामुळे फक्त 'थ्री इडियट्स' सिनेमाचं स्वागत करून भागणार नाही. आता तरी मुलखावेगळा विचार करणाऱ्या खऱ्याखुऱ्या 'इडियट्स'चं स्वागत करायला आपल्याकडे पर्याय नाही.’ रँचोच्याच वाटेवरून जाणारे ‘रॉकेट सिंग’ आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हे दोन सिनेमे आले होते. जितक्यांदा बघावं तितक्यांदा नवे वाटणारे आणि नव्याने कळत जाणारे.


हा लेख लिहिला तेव्हा मीही मटाचा राजीनामा दिला होता. सगळं नीट चालत असताना मी केलेलं कृत्य म्हणजे सगळ्यांच्या मते मूर्खपणाच होता. पण आज वर्षभरात त्या मूर्खपणाचं एकदाही वाईट वाटलेलं नाही. खरेखुरे इडियट सोबत असताना तसं वाटेल तरी कसं? लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट.

या लेखाची एक गोष्ट लिहायची राहिली होती. ती आता नव्याने जोडतोय. हा लेख मटात छापून आल्यानंतर मला एका आईचा मेल आला होता. तिचा मुलगा इंजिनिअरिंग करत होता. पण त्याला इंग्रजीत लेखक म्हणून करियर करायचं होतं. त्यात आता आम्ही करावं, असा सल्ला विचारला होता. मी कळवलं, मी काय सांगणार. मी स्वतःच इंजिनीयर आहे आणि आता पत्रकारिता करतोय.


बोमन इराणी पहिल्या मुन्नाभाईमध्ये मेडिकल कॉलेजचा डीन होता. आता 'थ्री इडियट्स'मध्ये तो आयआयटीचा डायरेक्टर आहे. पहिल्याच दिवशी पिंजारलेल्या केसांनी तो होस्टेलमधल्या मुलांना ग्यान द्यायला पोचतो. कोणत्याही गुरुत्वाकर्षणात म्हणजे अवकाशातही वापरता येणारं पेन तो सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवतो. लाखो रुपये खर्च करून बनवलेलं हे पेन त्याला बुद्धिमत्तेचं प्रतीक वाटत असतं. त्याला त्याच्या प्रोफेसरने ३० वर्षांपूर्वी दिलेलं हे पेन तो त्याचा वारस ठरू शकेल अशा हुशार विद्यार्थ्याला देण्याची घोषणा करतो. यंदाच्या बॅचमध्ये तो हुशार विद्यार्थी बनण्याची क्षमता कोणात आहे का, असं तो विचारतो. भारावलेली सगळी मुलं हात वर करतात.


फक्त रँचो म्हणजे अमीर खान नंतर हात उंच करतो. शंका विचारतो. अंतराळवीरांसाठी वेगळं पेन बनवायची गरजच काय, साधी पेन्सिल वापरली असती तर लाखो रुपये वाचले असते. तो 'इडियट' ठरतो. कुणीही 'पुंडलिका वरदे' म्हणाल्यावर 'हारि विठ्ठल' म्हणणारे आपण सगळे. डोकं असतंच सगळ्यांना. पण ते वापरायची तकलीफ आपण शहाणे करून घेत नाही. डोकं वापरायचं ते फक्त मार्क मिळवायला आणि त्यानंतर जास्तीत जास्त पैसे मिळवायला. त्याच्यापुढे आपल्याला फारसं माहीत नसतं. कारण त्या झापडापलीकडे फिरण्याचा मूर्खपणा ना कुठली शाळा शिकवत. ना कुठले आईबाप. मग जो कुणी घोकून घेतलेल्या चौकशीच्या बाहेर विचार करतो त्या इडियटला अतिरेकी ठरवून ठार केलं जातं किंवा खच्चीकरण करून व्यवस्थेचा नांगर खांद्यावर ठेवला जातो. एखादा यालाही बधला नाही तर इडियटचा महात्मा बनवून देव्हा-यात बसवण्याचा पर्याय असतोच असतो.


तरीही या सगळ्याला न जुमानता व्यवस्थेला आव्हान देणारे इडियट जन्माला येत असतात, हे आपलं नशीब. नशीबच म्हणायचं, कारण असे इडियट जन्माला येण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून काहीच कर्तृत्व करत नसतो. तरीही सतत छोटीमोठी बंड होतंच राहतात. त्या बंड करणाऱ्या इडियटचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळेच आपण माणूस म्हणून जगतो आहोत. प्रगतीच्या दिशेने धावतो आहोत. नाहीतर आपल्याला त्याच त्या नेमून दिलेल्या चाकोरीच्या बाहेर जाता आलं नसतं. आपण पुढे जातोय, असं आपलंच आपल्याला वाटत राहिलं असतं आणि आपण मात्र त्याच चाकोरीत फिरत राहिलो असतो.


आपल्या सगळ्या शहाण्यांना एका वर्तुळात चालवण्यासाठीच आपली शिक्षणव्यवस्था उभी राहिली. त्याचा पाया घालणा-या मेकॉले सायबाला काळ्या कातड्याचे इंग्रजांचे क्लोन उभे करायचे होते. आकडेमोड करत जगणारे आणि मरणारे बाबू तयार करायचे होते. ते काम त्यानं बरोबर केलं. पण विवेकानंदांपासून रवींदनाथांपर्यंत आणि टिळकांपासून गांधीजींपर्यंत अनेकांनी त्याला हादरे दिले. त्यामुळे काहीकाळ बहिष्कारापासून आश्रमांपर्यंत प्रयोग होत राहिले. पण स्वातंत्र्य मिळालं आणि बाबू बनवायच्या कारखान्यातलं प्रॉडक्शन पुन्हा निरंकुश सुरू झालं. त्यामुळे मेकॉलेला नाव ठेवायचं कारण उरलं नव्हतं. नवे मेकॉले दर दहा वर्षांनी नवे सिलॅबस काढत होते. नवी कॉलेजं सुरू करत होते. त्यांनी या शिक्षणव्यवसायाला आव्हान देणा-या प्रयोगांना कधीच व्यवसायाचा भाग बनवले. आम्हाला मेरिटहोल्डर बनवायचे नाहीत, माणूस घडवायचा आहे, असं म्हणणारेही मेरिट लिस्टमध्ये मुलं आणण्याच्या नादाला लागले. या स्पर्धेत इडियट्सना जागा नव्हतीच.


वर पहिल्या पॅऱेग्राफमधे आलेलं 'पुंडलिका वरदे' वाक्य पुलंचं. त्यांचं आणखी एक वाक्य आहे. फणसातले गरे फेकून द्यायचे आणि चारखंड चघळायला शिकवते ती आजची शिक्षणव्यवस्था. खरंच, आपण थोडा विचार केला तर आपण शिकताना हेच करत असतो. नवनवी बोर्ड आलीत. पण तेच चारखंड फक्त थोडं छान चांदीचा वर्ख लावून चघळायला दिला जातोय, तेवढंच. हे आपण सगळेच अनुभवत असतो. १५-१७ वर्षं शिकूनही आपल्या पदरात काहीच पडलेलं नसतं. तरीही आपल्या पोरापोरींना त्याच चौकटीत अडकवण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो.


साधा विचार कसा करायचा, बोलायचं कसं, ऐकायचं कसं, वाचायचं कसं आणि शिकायचं कसं, हेही आपण शिकलेलो नसतो. मग कुठल्या तरी बाबाच्या मागे जगण्याची कला शिकत आपण फिरत राहतो. जगायचे जे फण्डे लहानपणीच स्पष्ट व्हायला पाहिजेत ते मरेपर्यंतही कळत नाहीत. प्रत्येक शहाणा आपले कपडे किती सुंदर तेच सांगतो. बाकीचेही शहाणे मग आपापले कपडे किती सुंदर ते सांगत बसतात. एकेमकांच्या सुंदर कपड्यांविषयी कौतुकाचे रकानेच्या रकाने भरले जातात. अशा वेळेस हे सगळे राजे नागडे आहेत. हे सांगणरे इडियटस नसतील, तर सगळं संपलंय.


आंधळ्यांच्या घरात डोळस जन्माला आला, तर घरातले आंधळे त्याला इडियट ठरवणारच. त्याचे डोळे फोडणारच. पण तरीही आंधळ्यांच्या घरातच डोळसांची गरज सर्वात जास्त असते. महाराष्ट्र नावाचं असंच एक घर आहे, आंधळ्यांचं. कधीकाळी डोळसांची गर्दी होती इथे, यावर विश्वास बसत नाही आता. आता डोळसांना इंडियट ठरवण्याचे प्रयत्न ठायीठायी सुरू आहेत. महाराष्ट्राच्या निमिर्तीनंतरच्या पन्नासात एखादा सचिन तेंडुलकर, एखाद्या लता मंगेशकर, एखादे बाबा आमटे आणि एखादे पांडुरंगशास्त्री आठवले. याच्यापुढे आपली यादी जात नाही. विनय हर्डिकरांनी 'सुमारांची सद्दी' या नेमक्या शब्दांमध्ये या परिस्थितीचं वर्णन केलंय. यातून बाहेर पडायचं तर महाराष्ट्राने आपली मध्यमवर्गीय चाकोरी सोडून थोडं इडियटस बनायला हवं. छोट्या मोठ्या इडियटसच्या मूर्खपणाला थोडा वाव मिळायला हवा. 'थ्री इडियटस' बघताना इडियटसचं स्वागत करायचं आपण शकायला हवं. किमान तसा विचार जरी आपण केला तरी खूप.



-सचिन परब
-http://parabsachin.blogspot.com/2011/04/blog-post_21.html