कविवर्य ग्रेस आणि संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकरांनी पुणेकरांना आपापल्या राज्याची सफर करून आणली, त्या कार्यक्रमाचे नाव होते- "ताऱ्यांच्या प्रहरापाशी'. यात दुर्बोध वाटणाऱ्या काव्याचे भाष्यकार नागपूरचे कवी ग्रेस यांनी शब्दांच्या भावविश्वात रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या वेगळ्या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफित पाहण्यासाठी इथे क्लिक करा......ग्रेस याच्या भाषेत अबोधता असली तरी भावनेत बहर सामावलेला होता. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांच्या हिंदोळ्यावर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातला प्रेक्षक झुलत होता.
शिरीष थिएटर्सच्या शिरीष रायरीकर यांनी "ताऱ्यांच्या प्रहरापाशी' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संत ज्ञानेश्वर, मीराबाईंच्या रचनांबरोबरच ग्रेस यांच्या रचनांचे इथे सादरीकरण झाले.
कवीच्या प्रतिभेची ताकद आणि संगीतामुळे येणारी नादमयता याचे मिश्रण होऊन हे स्वरमय अमृत रसिकांच्या कानी पडते. त्याचे वर्णन शब्दात करणे अवघड. मृदंग-तबला आणि एकतारीच्या साथीने संगीताला श्रीमंती प्राप्ती झाली होती. कवीच्या शब्दांतली ताकद आणि संगीतकाराने दिलेली चाल यात कधी संगीतकार प्रभावी होतो, तर कधी काव्याला अधिक साद मिळते. शब्द-सूरांचा हा प्रवास आपण प्रत्यक्ष ऐकलेलाच बरा.
ही दोन प्रतिभेची लेणी जेव्हा समोरा-समोर येतात तेव्हाच रसिकांच्या मनावर स्वरसत्ता आणि काव्यसत्ता एकाचवेळी कोसळते. स्वरांच्या जादूचा आनंद घेताना आता काव्यशिल्पातून ग्रेस काय बोलणार, याची उत्सुकता रसिकतेला पडते. मधूनच राधा मंगेशकरही काही गीते सादर करतात.
एखाद्या मंद हळव्या बोलामध्ये आयुष्याला स्पर्शून जाण्याची जर ताकद येत असेल आणि ती ताकद कोणत्या पद्धतीने येते, ते सांगताना ग्रेस काव्यात सांगतात-
"सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघव शेला...'
दुःख आणि निर्मितीच्या क्षेत्रातले सगळे ऐवज बायकांच्या स्वाधीन आहेत हे खरे आहेत, हे सांगताना स्त्रियांच्या शापाविषयी सांगताना ते बोलून जातात-
निर्मिती आणि सौंदर्याची अधिसत्ता यांच्या अमृताचे आणि जहराचे सगळे बेमालून घटक स्त्रीच्या आत्म्यात अणि व्यक्तिमत्त्वात नियंत्याने इतके सैरभैर करून मिसळून दिलेले आहेत की तिच्या प्रत्येक ग्लोरीला ग्लॅमरचा शाप भोगतो.
कवितेच्या सुबोधतेविषयी ग्रेस बोलतात... ज्या डंखदार पद्धतीने आपण सुबोधतेची अपेक्षा करता अशी कुठलीही सुबोधता जगाच्या पाठीवर उपलब्ध नाही,
ग्रेस यांचे गूढ बोलणे आणि हृदयनाथांच्या भावस्पर्शी चालींतून दोन वेगवेगळ्या झऱ्यांचे पाणी रसिकांची तहान भागवते, यात शंका नाही.
अशा पद्धतीचे प्रतिभेला बोलते करण्याचे कार्यक्रम अधिकाधिक होणे, यातच मराठी रसिकांच्या रसिकतेची साक्ष पटते.
No comments:
Post a Comment