
गायक आपले गाणे खुलवित होता. उपस्थित वर्ग त्याच्या त्या शास्त्रीय गाण्यात तल्लीन होऊन माना डोलावित होता. अस्वादकाचे विविध अनुभव घेत मीही मधुनच त्यांच्या चिजेच्या समेवर तालात सम पकडण्याचा प्रयत्न माझ्या देहबोलीतून करीत होतो. एकूणच एक गायक स्वरांची विविध आंदोलने विविध अंगाने नटवित होता. स्वरांचे आविष्कार किती पध्दतीने होऊ शकतात.. दाद देणारा जाणकार तारीफ करून वाहवाची पसंती अगदी खुल्या मनाने देत तल्लीन होऊन स्वरांचा आस्वाद घेत होता.
किती विलोभनिय गोष्ट. इथे शांतता भंग करणारा एक आणि त्याला तालाची आणि स्वरांची संगत करणारा पेटीवादक बस्स..एवढेच..बाकी सारा वर्ग ते सारे निशःब्दपणे साठवून ठेवीत....
भारतीय परंपरेचा हा थाट..भारतीय संस्कृतीतही आहे. मग गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक ठिकाणी....केवळ प्रकाशात शांतपणे विराजमान झालेली गणेशमूर्ती तुम्हालाही आकर्षित करते ना...
गोंगाटाच्या आणि स्पीकरच्या भिंतीतून ह्दय भेदून टाकणारा आवाज तुमच्या कानी ठसत जातो.. तेव्हा कुठेतरी असा मनोहारी आणि नयनमनोहर मंडळाच्या पावित्र्याचे आणि मांगल्याचे तुम्ही कौतूक कराल ना...मला खात्री आहे..तुम्हालाही ते आवडते....
पण.... हा पण भारी खट्याळ...कधी मध्ये येईल काही सांगता येत नाही...
आज आपण सारेजण या गोंगाटाच्या अधिन झाले आहोत. नव्हे...तो सहन केल्याशिवाय पर्याय नाही... तोंड बाधून बुक्क्यांचा मारच जणू.
म्हणून अशा शांत..निवांत आणि तरीही प्रसन्न अशा गणपती मंडळांची माहिती करून द्यायला मला आवडेल.
आजच पुण्याच्या टिळक रस्त्य़ावरच्या सदाशिवपेठेचा भाग असलेल्या चिमणबाग गणेशोत्सव मंडळात डोकावले. इथली मूर्ती..शोभिवंत. प्रकाश..मूर्तीला उठाव आणेल एवढा.. मंडपात मूर्ती..एक कार्यकर्ता आणि तिचे सुंदर रूप..
कुठे स्पीकरवर गाणी नाहीत की, कुठलाही संदेश देणारी सजावट नाही. इथे आवाज येतो..आणि स्पीकर तोंड उघडतो तो फक्त आरतीच्यावेळी..
बाकी सारी प्रसन्न तरीही भारून राहिलेली शांतता. वर्गणी मागतानाही कुणी कितीही देवो..ती स्विकारली जाते. हुज्जत घातली जात नाही. सारा खर्च तेवढ्याच वर्गणीतून होतो...
तुम्हालाही असे मंडळ दिसले..तर मला मेल करा.. जमेल तर माहिती कळवा..शांततेतही सुख आणि मन रमते..फुलते आणि क्वचित नादावतेही...
सुभाष इनामदार,पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com