जागतिक व्हायोलिन दिनानिमित्ताने पुण्यात गुरूवारी २२ व्हायोलिनवादक एकाच रंगमंचावर आल्यामुळे व्हायोलिनच्या सुरेल सादरीकरणाचा एक आगळा वेगळा नमुनाच पुणेकर रसिकांना अनुभवता आला.
गेली सात वर्षे पुण्यातले चार व्हायोलिनवादक संजय चांदेकर, चारूशिला गोसावी, निलिमा राडकर आणि अभय आगाशे हे आंतरराष्ट्रीय व्हायोलिन दिनानिमित्ताने वेगवेगळ्या रचनातून या वाद्याची विविध सुरेल रूपे या दिवशी वादनाच्या विविध रचनांमधून साकार करतात.भरत नाट्य मंदिरात संगीतातल्या विविध रागांवर आधारलेल्या रचना सादर केल्या गेल्या.
'रसिकप्रिया व्हिओलिना'तून कांही हिंदी गाणी आणि वविध वाद्यातूमधून सादर होणारा वाद्यमेळ( फ्यूजन) सादर करून रसिकांना मोहवून टाकले. व्हायोलिनचा प्रसार आणि प्रचार करण्याबरोबरच या वाद्याला स्वतःचे असलेले स्थान बळकट करून प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा या चार व्हायोलिन वादकांचा प्रयत्न दाद देण्याजोगा आहे.
त्यांच्या प्रत्येक रचनेला टाळ्या तर मिळत होत्याच पण वन्समोअरची दादही रसिकातून दिली जात होती.संगीताच्या कार्यक्रमातून स्वतंत्रपणे साथ करणारे हे कलावंत या वाद्याविषयीचे प्रेम दरवर्षी स्वतंत्र रचना सादर करून व्यक्त करतात. व्हायोलिनवर प्रेम करणारे पुणेकर चाहतेही या दिवसाची वाट पहात असतात.
उपाध्ये व्हायेलिन विद्यालयाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने विद्यालयाने ' रसिकप्रिया व्हिओलिना'हा कार्यक्रम करणा-या कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून दिला होता. उपाध्ये विद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांनी मिश्र शिवरंजनी रागातली रचना व्हायोलिनवर सादर करून पुढच्या वादनातली उत्सुकता कायम ठेवली.
व्हायोलिन दिनाच्या या कर्यक्रमात यंदा प्रथमच सतारीची साथ घेण्यात आली होती. गिरीश कांबळे यांची तयारीही लाजवाब अशीच होती.वाद्यातली आर्तता आणि मार्दव दोन्हीतून वाद्याचा उठाव अनुभवताना चारही वादकांची व्हायोलिनवर असललेली कमांड क्षणोक्षणी जाणवत होती.कार्यक्रमाला मनोज चांदेकर, रविराज गोसावी यांची तबला साथ तेवढीच तयारीची मिळाली
होती. पखवाज वादनातली कारागिरी विनित तिकोणकर यांची होती. दशर्ना जोग यांनी स्वरांचा भरणा करून कार्यक्रमाला उठाव आणला . वैशाली जुंदरे यांच्या मोजक्या शब्दांच्या निवेदनाने कार्यक्रम फुलत गेला.
संगीतकार आणि व्हायोलिनवादक प्रभाकर जोग, भालचंद्र देव, डॉ. अनिल अवचट, विजय कोपरकर यांच्यासारखे मान्यवर हजर राहिल्याने कार्यक्रमाला स्वतंत्र दर्जाही प्राप्त झाला होता.
सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com
www.globalmarathi.org
9552596276