वाद्य, नृत्य आणि कंठसंगीताने पुणेकरांना भीमसोन जोशी यांच्या स्मृतीचा वावर असावा असा तो मंच बहरत गेला..विविध कलावंतांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपापली ताकद पणाला लावून शास्त्रीय संगीताचे हे व्यासपीठ नादवून सोडले. श्रोत्यांना तल्ली केले आणि सारा सूरांचा बहर थंडीच्या या मोसमात स्वरांच्या मखमली शालीने पाघरून टाकला..इतका की बाहेरचा गारठा इथे केव्हाच स्वरमय होऊन वातावरण संगीतमय करुन गेला होता.. वाढलेल्या गर्दीमुळे यातील अनेकांना उबदार कपडे घालून स्वरमांडवाबाहेर उभे राहत या सोहळ्याचा आनंद घ्यावा लागला.तो रंगत गेला..पहिले दोन दिवस रात्री १० पर्यत आणि नंतर ११ शेवटी मध्यरात्रीपर्यंत हा सोहळा सुरु राहिला.
अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने रंगत अधिक वाढत गेली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा केवळ संगीत महोत्सव नाही तर हे संगीताचे तीर्थस्थान असल्याची भावना ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. पं. भीमसेन जोशी यांनी तीन तपे माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या आशीर्वादामुळे कोलकाता येथे मी १,२०० मुलांना संगीताचे शिक्षण देत आहे. माझी कन्या आणि शिष्या कौशिकी हिला पुणेकरांनी आशीर्वाद दिला. माझे १०-१२ विद्यार्थी आता स्वतंत्र मैफली करू लागले आहेत. त्यामुळे हे स्थान माझ्यासाठी तीर्थस्थानच आहे, असेही पं. चक्रवर्ती यांनी सांगितले.
तर शेवटच्या सत्रात कौशिकी चक्रवर्ती यांचे ढंगदार गायन रसिकांना अनुभवता आले. "सवाईच्या मंचावरून इतक्या रसिकांसमोर गाताना दडपण आले आहे,' असे सांगून त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने रसिकांची मने जिंकली. "याद पियाकी...', "ना करे चिंता' या रचनांना रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत अन् "वन्समोअर' म्हणत खास दाद दिली.
एकाच महोत्सवात पिता आणि कन्येचे गायन होण्याचा दुर्मिळ योग साधला गेला आणि गुरू-शिष्या यांच्या गायनाने रसिकांना जणू अनोखी पर्वणी लाभली.
खरं म्हणजे आनंदादायी अशा या स्वरयज्ञाची सांगता कोण करते यावर बरेच काही अवलंबून असते..ते नाव आधीच जाहिर झाल्यामुळे ते आकर्षण नव्हते..पण त्यांच्या गायनाला कीती वेळ मिळतोय हे महत्वाचे होते पण शेवटच्या दिवसासाठी उशीराची परवानगी मिळाल्यामुळे डॉ. प्रभा अत्रे यां स्वरमंचावर रात्री १०च्या सुमारास आल्या तरी त्यांना गायनासाठी आणि रसिकांना एकण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला हे नक्की.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी मारूबिहाग रागातील ' कल नही आए सावरे ' या बडा ख्यालाने गायनास सुरुवात केली. त्यांना माधव मोडक (तबला) , सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) , अतींद्र सरवडीकर (स्वरमंडल) , आरती ठाकूर , चेतना बनावत आणि अश्विनी मोडक (तानपुरा) यांनी साथ केली. अत्रे यांच्या स्वरांनी भारलेल्या वातावरणात ६१व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची पुरेपुर छाप असलेल्या या महोत्वसाला तोड नाही..हेच यातून सिध्द होते..मात्र त्यासाठी आता यापुढे का होईना संगीत रसिकांची पसंती मिळविलेले भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर अाजही अधाराज्या गाजविणारे कलावं आणि त्यांना पुरेसा वेळ देणे ही महत्वाची जबाबदारी अधिक कठीण आहे. ती विश्वस्त मंडळी लक्षात ठेवतील असा विश्वास वाटतो.
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com