Monday, October 16, 2017

वारसा भास्करबुवांचा..आजही समर्थ




शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी  दातार कुलकर्णी यांनी रंगविली सुस्वर मैफल


देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या एकशे सहा वर्षांच्या भारत गायन समाजाने आपली विरासत..एक  परंपरा आजही कशी समर्थपणे सांभाळलू आहे..याचे उत्तम उदाहरण रविवारी पुण्यात रसिकांना अनुभवता आले..त्याचा साक्षिदार बनण्याची बुध्दी आम्हाला झाली ..याचे खूप समाधान वाटते..


भास्करबुवांच्या पणती..शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी यांनी ही शास्त्रीय संगीताची  आणि नाट्यसंगीताची परंपरा आपल्या समर्थ खांद्यावर किती सार्थपणे मिरविली ते ऐकण्याचै भाग्य लाभले.. शास्त्रीय संगीत.. नाट्यसंगीत. अभंग,.भावगीत.. लावणी ..भावसंगीत याचा सुंदर आविष्कार काल पुण्यात बालशिक्षण मंदिराच्या सभागहात झाला आणि उपस्थित मायबाप प्रेक्षकांनी दोघींच्या पाठींवर शाबासकीची झूल चढविली..







भास्करबुवा बखले यांच्या मुलीच्या दोन नातींनी जी संगीताची जोपासना श्रध्देने केली..त्या परंपरेचा वारसा नुसताच जोपासला नाही..तो पुढे नेण्याचे अवघड काम यशस्वी केल्याची हा कार्यक्रम ही एक पावती होती..


सुहास दातार, सुधीर दातार आणि शैला दातार यांच्या अनुपस्थित भारत गायन समाजाचे वैभव या दोघींनी दाखविले..अनुभवले. ते शब्दात आणि स्वरात रंगमंचावरून साकारले.. किती छान.. आता भारत गायन समाजाची ही शास्त्रीय परंपरा आणखी काही वर्षे पुढे जाणार याची खात्रीच यातून झाली.



आग्रा घराण्याची गायकी..त्याच्या ताना आणि भास्करबुवा बखले यांनी बांधलेल्या भीमपलास रागातली एक बंदीश सुरवातीला सादर करून दोघींनी आपल्या पणजोबांना १४८ वर्षांच्या जयंती निमित्त स्वरांजली वाहिली.. आग्रा बंदिशीतूनच पुढे आली स्वकुलतारक सुता..हे स्वयंवर नाटकातले पद..ते सादर केले..सावनीने..


पुढे भारत गायन समाजात आलेल्या मान्यवर गायक, संगीतकार यांच्या आठवणी सांगत हा कार्यक्रम रंगत गेला..यात बालगंधर्व, मास्टर कुष्णराव,पं. राम मराठे, स्वरराज छोटा गंधर्व, माणिक वर्मा, जोत्स्ना भोळे, पं. बाळ माटे..यांच्या पदांच्या छटा आपल्या सादरीकरणासाठी निवडल्या..
 बोलू ऐसे बोले हा छोटा गंधर्व यांनी लोकप्रिय केलेला अभंग. दोघींनी रंगवत नेला. कुलवधू मधले भावगीत..हसले मनी चांदणे..सानवीच्या आवाजात..ऐकताना तोच आनंद मिळाला..  
बाळ मामा..माटे यांची गवळण त्यांची शिकविण्याची आठवण काढत सावनीने सादर केली..कुणातरी सांगा गे..कृष्ण देखिला..





जाळीमंदी पिकली करवंद ही लावणी सादर करून शिल्पाने  रसिकांची वहावा मिळविली. लावणीत कडाडलेली राजेंद्र दूरकर यांची ढोलकी तीही तेवढीच बोलकी..

पं. राम मराठे यांची आग्रा घराण्याची आम तोम ने लौकप्रिय केलेली बंदीश..यात तबला आणि मृदंगाची जुगलबंदीही उत्तम रंगते.. शिल्पा आणि सावनी यांनी ..काहे अब तुम आये..एक अप्रतिम सादरीकरणाचा नमुनाच होता..
 संगीतात सर्व मोठेच होते..पण माणूस म्हणूनही हे कलावंत कसे मोठे होते यांचे वर्णनही या मैफलीतून दोघींनी शब्दातून व्यक्त करून त्यांचेही स्मरण केले..यात वसंतराव देशपांडे यांचाही खास उल्लेख होता.. त्याचे उदाहरण म्हणून दिव्य स्वतंत्र्य रवी...या पदाचा समोवेश होता..ते शिल्पाने गाऊन दाखवून टाळ्या मिळविल्या.
आता कशाला उद्याची बातची ..गाण्याचे सादरीकरण करुन  सावनीने मा. कृष्णराव यांच्या संगीताची आठवण उजळ करून प्रभात काळ समोर आणला.



ताने स्वर रंगवावा.. समर्थ रामदासाचा अभंग शिल्पाने रंगविला. त्याची  प्रासादिक चाल बांधली ती श्रीधर फडके यांनी.





अगा  वैकुंठीच्या राया...या अभंगाने शिल्पा आणि सावनी यांनी आपली विरासत परंपरेला विराम दिला..
शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार कुलकर्णी यांनी ज्या तयारीने ही मैफल रंगविली यातून त्यांच्या गाण्यातला कस दिसला..त्यातली तयारी..मेहनत आणि साधना यांचे दर्शन होते. त्यांच्याकडून शास्त्रीय संगीतालाच नव्हे तर नाट्य आणि सुगम संगीतालाही नवे काही मिळण्याची खात्री आहे.

 या सर्व कार्यक्रमाला समिर पुणतांबेकरांचा तबला बोलत होता..नादवित होता..राजेंद्र दूरकर यांचा पखवाज.. ढोलकी रंगत होती..दर्शना जोग सिंथेसायझर.. आणि दिप्ती कुलकर्णी यांची हार्मोनियम..याची संगत रंगत वाढवित गेली. नितीन जाधव यांच्या तालवाद्याने अभंग नटविले. तर हेंमंत बर्वे यांचे निवेदनातून सारी चित्रे शब्दातून बोलकी होत होती..


यावेळी  भारत गायन समाजाने पहिल्या तीन वर्षाच्या  गाण्याच्या परिक्षेचा अभ्यासक्रमाची सीडी तयार करून ती समाजाचे उपाध्यक्ष रवींद्र जोशी यांनी राजशेखर अभ्यंकर यांना भेट म्हणून दिली.




-सुभाष इनामदार, पुणे
9552596276