Wednesday, June 15, 2011

सांस्कृतिक वाटाड्या- विजय मागिकर साठीत


आमचा सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारा...कलावंताचा चाहता असणारा..
स्वरानंदात कार्यकुशलतेने कार्यरत असलेला विजय मागिकर साठीचा झाला..
त्यानिमित्ताने त्याच्या खासगी आयुष्यासह त्याच्या कलाजिवनाचा घेतलेला हा धावता आढावा...


प्रिय विजय,


परवा विनयाचा फोन आला तेव्हा जाणवले....तू साठीचा झालास.
आपण पीडीएत भेटलो. अभिनय येतो असा समज होता. पण भालबा केळकरांच्या दुस-या फळीत रमलो. पडद्यामागचे कलावंत झालो. पडेल ते काम करून नाटक किंवा प्रसंग नाट्य दर्शनात कधीतरी नगण्य भूमिकेत वावरलो. पण यामुळे व्याक्तिमत्व विकासाचा पाया घातला गेला. नट म्हणून कधीतरी दिसू.. एखादी तरी छोटी भूमिका मिळेल अशी आशा बाळगून तीन-चार वर्ष पीडीएत रमलो. चर्चा ऐकत गेलो. कानावर पडेल ते साठवत राहिलो. यातून एक नक्की झाले. आपण नाटकाच्या पडद्याआडचे वारकरी. कधी ज्योती मेंहेंदळे..तर कधी राणी पारसनीस, तर कधी चंद्रकांत दिघे, अजित सातभाई, दिलिप वेंगुर्लेकर यांच्या तालमी पहात गेलो. नट म्हणजे काय... त्याभूमिकेत वावरणे...कसे ते पहात गेलो.. त्यातच रमत गेलो.
यातूनच निराशेचे..अपयशाचे ढग पदरी पडत गेले... सोबत राहिलो. आज काहीतरी नवे शिकायला मिळेल या जिद्दीने डेक्कनवरच्या महिलाश्रमाच्या तळघरात त्यानाटकाच्या...भालबांच्या सहवासात दिवस कसे गेले कळालेही नाही.
मात्र एक झाले. तुझी मैत्री मिळाली. एकटाच कॉट बेसिसवर रहात असल्याने तुझ्या रेव्हेन्यू कॉलिनतल्या घराने आयुष्यातले आनंदाचे क्षण दिले. तात्या आणि आईंचा प्रेमाचा सहवास मिळाला. पुण्यातला एकटेपणा नाहीसा झाला. पुढे विनयासारखी सखी तुझ्या आयुष्याच्या संसारात दाखल झाली. आणि तुमचे घर अधिक परिचयाचे झाले. अर्थात याला तुझी प्रेमळ विचारपूस...क्वचित मैत्रीची घट्ट विण... आणि मोठ्या भावासारखा दिलासा...सारेच मिळाले....
तुझ्या संसारावर वरूणरुपी नवे पर्व दाखल झाले. घराला घरपण झाले. तात्यांचे आणि आईंच्या मायेची सोबत लाभली. तुझ्या घरच्या मोकळ्या वातावरणातून मैत्रीचा धागा जुळत गेला...गुंफत गेला... मने मोकळी झाली. विजय मागीकर हे नाव पुढे माझ्या आयुष्यात कायमचे जोडले गेले.
विजय, शिक्षणाच्या फारशा फंदात न पडता तुझ्या तरतरीत स्वभावाने आणि हजरजबाबीपणाने गरवारे कंपनीत आबासाहेब गरवारेंचा पी ए म्हणून तु नोकरी पत्करली. चार-पाच वर्षे केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे मनी घेतलेस. लिक्विड साबणाचा पुरवठा करण्याचे नवे तंत्र आत्मसात केलेस. रेव्हेन्यू कॉलनीतल्या घरात मागच्या बाजूला शेडमध्ये हा व्यवसाय दमदारपणे चालविलास. थोडिथोडकी नव्हे तर तीस-बत्ती, वर्षें. मात्र तसे तुझे घर पाहिले की याला नोकरी-व्यवसाय करायची काय गरज असा प्रश्न मला नेहमीच पडे. आजही घरात विद्यार्थ्य़ींसाठी खोल्या भाड्य़ाने देऊन तुझे छान चाललेय. मात्र स्वतःच्या जागेचा प्रश्न .भाडकरूंच्या कटकटी . कोर्टाचे खेटे. यातून घर अगदी स्वतःचे बनविलेस.आताही तुझ्या घराची ओढ लागावी अशी ती वास्तू आम्हा मित्रांना सारखी खुणावते आहे.
दिवसाचे काम संपले की तु कलेच्या प्रांतात रमलास.दिग्दनर्शनाच्या आवडीतून शापीत आणि पुढचे पाऊल मध्ये तेही साध्य केलेस. शापितच्या वेळी तूझे असिस्टंट डायरेक्टरपद तुझी चित्रपटाबाबतची जाणीव जागृत करून नवे क्षेत्रात पाऊल पडले. राजदत्तांच्या मार्गदर्शनाचा लाभ गोट्या या सिरियलमुळे तुला झाला.
पुढचे पाऊल मध्ये मानसीनेही (विनया) छान काम केले. यातून चित्रपट माध्यमात स्थायिक झाल्यसारखे वाटले. हिंदीतही पद्मनाभ यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली शिकण्याचा योग तुला आला. खरे तर तू त्यातच करियर करायचा..पण नाही. तुझी भूक कलेची आणि कलावंतांच्या सहवासाचा अधिक होती.

विजय, तुझ्यामुळे विनय नेवाळकर (शापित), राजदत्त (दत्ता मायाळू), संजय ऊपाध्ये, श्रीकांत पारगावकर, विठ्ठल वाघ, हिमांशू कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी, गोविंदराव बेडेकर, ...असे कितीतरी माझ्या परिचयाचे झाले.
राजन-साजन मिश्रांसारख्या बुजुर्ग गायकांनाही तुझा सहवास हवासा वाटतो.. ते मी पाहिले आहे..यापेक्षा काय हवे?
तुझ्या ओळखींतून पुण्याचे सांस्कृतिक क्षेत्र जवळून अनुभवता आले. जाणीव वाढली. संगीत, साहित्य, नृत्य, आणि चित्रपट क्षेत्रात तुझा दबदबा हेवा वाटण्यासारखा वाढत राहिला.

मला आठवते पं. भिमसेन जोशींना भारतरत्न जाहिर झाला. तेव्हा तू मला त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले राघवेंद्र आणि आनंद ..जी दोघेही पुण्यात धायरीत रहातात..त्यांची संगीत क्षेत्राला माहिती व्हावी म्हणून ई-सकाळच्या माझ्या कार्यालयात आलास. आपण राघवेंद्र आणि आनंदयांच्यावर व्हिडीओ स्टोरी केली..

पुढे स्वरानंदच्या कार्यकारीणीला तुझ्या सारखा नवा कार्ककर्ता मिळाला. आमच्या सारख्या परिचितांना तुझी हक्काची साथ मिळाली.
तुला साद घातली की सारी गोष्ट पूर्ण होणार याची खात्री कित्येक मित्रांना आजही आहे. म्हणून तर तुला तर बरोबर घेऊन जातात.. आजही...
तुही तेवढाच दिलदार पैशाच्या विचार न करता मित्रत्वाचे सारे बंध एकवटून तू मदतीचा हात देतोस. केव्हाही बोलवा..विजय येणार याची खात्री असते . अगदी पुलंच्या नारायणा सारखा.
आज पुण्याच्या कलाक्षेत्रात तुझा दबदबा आहे. कार्यक्रमाची व्यवस्थापनाची काटेकोर बाधणी करणारा सूत्रधार तुझ्या रूपात मिळाला आहे. श्रीधर फडकेंपासून मंजूषा कुलकर्णींपर्यत सारेच कलावंत तुझे बनले. नव्हे तुझ्या स्वभावाने ते आपलेसे बनविलेस. मायग्रेनचा त्रास सोसूनही तू बेंगलोर, हुबळी, धारवाड, कुठेही गेलास. अगदी प्रसंगी मारही खाल्लास...पण कुणाला न सांगता हे व्रत कायम ठेवलेस...
नेटाने सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या बनलास.. नवख्या कलावंतांचा मार्गदर्शक झालास......ध्यास एकच...चांगली मंडळी उत्तम कार्यक्रम करणा-यांना आधार बनलास.

तुझे मी पण हरविले गेले
नेमके करायचे ते राहूनच गेले
इतरांसाठी आयुष्य वेचताना
स्वतःसाठी जगणे राहूनच गेले


विजय, आता तु साठीत आलास. स्थिर राहून आनंद घे. तुझ्या मार्गदर्शनातून इतरांना उभारी दे. स्वतःसाठी.. कुंटुंबासाठी वेळ दे. वरूणला समजावून घे. मानसीच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न कर. निवारा मिळालाय. आता कालानंद घे.
आतातरी तुला हवे तसे...स्वानंदी वागत रहा... बंधनांची नको करू तमा..
आनंद तर देशीलच.. पण स्वतःतला कलावंत ...संघटक, कुशल मार्गदर्शक बाहेर येवू देत..
तुझ्यात बरेच कांही आहे. बोलण्याचे भान आहे. सांगण्याचे तंत्र आहे. व्यवस्थापनातला मंत्र तुझ्यात आहे. कलावंतांची फळी तुझ्यामागे उभी आहे. तु नवनिर्मितीचा भार उचल. सांस्कृतिक क्षेत्राला स्वतःचे भान दे.
तुझ्या साठीच्या प्रवासाचा पस्तीस वर्षाचा साक्षीदार असलेला,

तुझाच,
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

Tuesday, June 14, 2011

झाकोळलेले आभाळ


झाकोळलेले आभाळ
दुरावलेला प्रकाश
उदास मन
थबकलेली कोकिला
कुंद वातावरण
एक दिवस
असाही ......
-----------------------

नवी नेसून दुलाई
आली वर्षा गे दारी
तिच्या स्वागता उघडू
दारे पुरती सावरू
.....
ओली राने, ओली धरणी
ओले रस्ते ,ओले नाले
तहानलेल्या बालकाला
तृप्त कराले गे देवते
-------------------------
सारी सुखे येतात
नाही
आणली जातात
आणि मग तीच
तुमची गरज बनत जाते