Monday, May 27, 2024
अलौकिक शांताबाई...
अलौकिक शांताबाई... यातून अपर्णा संत यांनी त्यांच्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..!
शांता ज. शेळके... पाठ्यपुस्तकातून आपल्या कवितेतून ह्या सहीसह भेटलेल्या .. आणि नंतर गीतकार म्हणून लोकप्रिय झालेल्या शांताबाई..यांच्या आयुष्यातील लहानपण आणि पुढे मोठेपणी भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटातील गाण्यातून लक्षात राहिलेल्या अलौकिक प्रतिभेच्या शांताबाई सुगम संगीतात अभ्यासपूर्वक कार्यक्रमातून दिसणाऱ्या अपर्णा संत यांनी रविवारी पुण्यात सादर केलेल्या ..कार्यक्रमातून रसिकांच्या मनावर त्या अधिराज्य गाजवणाऱ्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..आणि शब्द..स्वर यांच्या माध्यमातून अनेकांच्या मनात कायम कोरल्या गेल्या..
कवितेच्या शब्दात दडलेला आशय आणि संगीतकाराने शब्दातून तो अर्थ कसा बाहेर आणला याचे प्रात्यक्षिक आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून ठळकपणे समोर आणला.
प्रतिभा मग ती कवीची वा गीतकाराची असो..कशी फुलत जाते आणि संगीत देताना संगीतकाराने त्याला कसे फुलवून बाहेर आणले आहे याचे उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम होता.
खरे तर अपर्णा संत या उत्तम गायिका म्हणून आपल्याला दिसल्या..पण इथे त्या दिसतात कविता..आणि गाणी यांच्यातील दडलेले नाते सांधणारी आशयाला आपल्या विश्लेषणातून बाहेर आणणारी विचारवंत म्हणून..
अनेक कवितेतील अर्थ..आणि संगीतकाराने त्याला स्वरातुन दिलेला योग्य न्याय याची अपर्णा संत यांनी अनेक उदाहरणातून रसिकांना दाखले देत समजावून सांगितले आहे..
शांता शेळके यांच्या अनेक कवितांना त्यानी आपल्या निवेदनातून प्रगट केले..पण पैठणी या कवितेला ज्या तन्मयतेने सादर केले ..ते एक उत्तम उदाहरण सांगता येईल.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे आपल्या लहानपणी शांताबाई ..आणि अरुणा ढेरे कशा भेटल्या आणि त्यानी कसे गाणे ऐकले आणि पुण्यात हृदयनाथ मंगेशकर यांची कशी भेट घडवून आणली..आणि आयुष्याला कशी योग्य दिशा दिली ते अपर्णा संत आपल्या शब्दातून व्यक्त करतात.
अलौकिक शांताबाई... मध्ये अपर्णा संत स्वतः न गाता आपल्या किरण भिडे नायर ( मागे उभा मंगेश, ही वाट दूर जाते, हे श्यामसुंदर राजसा ), श्रुती देवस्थळी (माझी न मी राहिले, निळ्या आभाळी कातरवेळी, पहा टाकले पुसूनी डोळे , आणि अखेरचे जिवलगा राहिले दूर घर माझे ), पूर्वा जठार ( विकल मन आज..हे नाट्यगीत, ऋतू हिरवा) , चिन्मयी तांबे (हे एक झाड आहे, कळले तुला काही) या शिष्यांना गाणी सादर करायला लावून .. ती उत्तम तयारीने करायला लावून त्यांना नवा आत्मविश्वास दिला..
तर शुर आम्ही सरदार, तोच चंद्रमा नभात, रुपास भाळलो मी..श्रुती देवस्थळी सह, आणि अजब सोहळा..ही लोकप्रिय गाणी गाण्यासाठी जितेंद्र अभ्यंकर यांना आमंत्रित करून ती गाणी तयारीने सादर केली.
याशिवाय शांताबाईंच्या बालगीतांसाठी.. इरा वेदपाठक आणि स्वरा बंकापुरे या छोट्या मुलींना तयार करून त्यांचेकडून दोन गाणी रसिकांना
ऐकवली. त्यातले किलबिल किलबिल रसिकांनी डोक्यावर घेतले.
अपर्णा संत आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी राजा सारंगा..ह्या कोळी गीतातल्या सुंदर हार्मनी मधून रसिकांना मंत्रमुग्ध केले.. गाण्याला स्वराने आणि शब्दाने ती धून पुन्हा पुन्हा आळविणाऱ्या गीताने वातावरण भारावून गेले होते.
या पाठीमागे असलेल्या उत्तम संगीत संयोजक मिलिंद गुणे यांनाही दाद द्यायला पाहिजे..हे गाणे जून मध्ये शांताबाई शेळके यांच्या स्मृतीला भावपूर्ण वंदन म्हणून सादर करण्यासाठी तयार केले होते.
संपूर्ण कार्यक्रमाची साथ केदार परांजपे, राजेंद्र दूरकर, निलेश देशपांडे, अजय अत्रे आणि प्रसन्न बाम यांनी उत्तम संगत करून तो रंगतदार केला. त्यांचीही यांच्या यशामागे मेहनत दिसली.
अलौकिक शांताबाई... याची संकल्पना, संहिता आणि निवेदन करून अपर्णा संत यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले..खरोखर असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूपच मेहनत आणि तयारी करून तो सादर करावा लागतो..त्याचे सारे श्रेय गायक..गुरू..आणि संगीत अभ्यासक अपर्णा संत यांना मनापासून द्यायला हवे.. यासाठी डॉ. अरुणा ढेरे मुद्दाम उपस्थित होत्या..आणि सुजाण रसिक सभागृहात दाद देत होता.
अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना रसिक तिकीट काढून गर्दी करतात ही आगळी गोष्ट आहे..
- सुभाष इनामदार, पुणे
Subscribe to:
Posts (Atom)