Saturday, March 1, 2008

नवे संगीत नाटक- संगीत चैती

नवे संगीत नाटक करणे हेच आज शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. कलापिनी संस्थेने ते उचलेलेच नाही तर ते पेललेही. योगिनी जोगळेकरांच्या "चैती' या कादंबरीचे शरद जोशी यांनी केलेले हे नाट्यरूपांतर. संगीत कलेचे चाहते आणि संगीताला राजाश्रय देणाऱ्या बिंदापूर संस्थानात घडलेली ही कथा. संगीत नाटक आवर्जून पाहणाऱ्या रसिकांना "चैती' नक्कीच आनंद देईल. कलावंतांत व्यावसायिक सफाई नसली तरी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने ते नाटक रंगमंचावर सादर करतात. संगीत नाटकांची परंपरा जपणाऱ्या कलापिनीचे खास आभिनंदन.
संगीततज्ज्ञ रघुनाथबुवा अवचट, त्यांची मुलगी चैती यांच्या संगीतमय आयुष्यावरची ही कथा. बिंदापूर संस्थानचे राजगायकपद भूषविलेल्या राजगायकाच्या जिद्दीची ही संगीतमय कहाणी. जिद्दी, तापट आणि अहंकारी गायकाच्या जीवनाची फरफट जोगळेकरांच्या कादंबरीत आहे. अवचटबुवांची मुलगी भर दरबारात चैती गाऊन राजेसाहेबांच्या मर्जीत बसते. तिचे गाणे वाढावे यासाठी ते संस्थानात तिला आश्रय देतात. तिचे गाणे बहरते. मात्र राजांच्या दरबारी आलेल्या पाहुण्यांच्या संगीतातल्या खोट्या फुशारकीने अवचटबुवा संतापतात आणि राजगायकपदाला लाथाडून निघून जातात. या प्रसंगानंतर चैती आणि अवचटबुवांची होणारी ताटातूट आणि चित्राने गायलेल्या "आयी ऋत बसंत' या गायनामधून सांधली गेलेली नाती यांचा संगीतमय अनुभव नाटकात सजवला गेला आहे.
कादंबरीतला विषय नाटकात आणताना संगीताकडे आधिक प्राधान्य दिले गेले आहे. त्यातले नाट्य यामुळे झाकोळले जाते आणि हे नाटक म्हणजे संगीताची रंगमंचीय मैफलच होऊन जाते. अर्थात ती श्रवणीय आहेच; तितकी देखणीही आहे. दरबारात घडलेल्या अपमानाचा प्रसंग. बुवांचे स्मशानातले वावरणे आणि चित्राची प्रेक्षकातून एंट्री या ठळक प्रसंगांची नोंद करावी लागेल. आजकाल विसरत चाललेल्या संगीत नाटकाला पुन्हा एकदा रंगमंचावर विराजमान करताना काळानुरूप बदल न करता रंगावृत्ती तयार केली आहे. शरद जोशी यांनी त्यातल्या संगीताच्या जागा नेमक्‍या निवडल्या आहेत आणि उपलब्ध कलावंतांकडून त्या नटविण्याचा प्रयत्न केला आहे.
दिग्दर्शक मकरंद जोशी यांनी नाटकाची जातकुळी आणि संगीत नाटकाला योग्य असा नटसंच तयार करून नाटकातले प्रसंग खुलविले आहेत. नेपथ्य-प्रकाशाच्या साहाय्याने प्रयोग खुलविला आहे.
मात्र संगीताचा थोडा भाग कमी करून नाट्य खुलविणाऱ्या प्रसंगावर भर दिला तर नाटकाचा बॅलन्स साधेल. अन्यथा संगीतात नाटक असल्याचा भास कायम राहील.
संपदा थिटे यांच्या भूमिकेत संयमी आभिनेत्री सतत डोके वर काढते. मात्र तिचे संगीतातले यश वादातीत आहे. भूमिकेला साजेसा अभिनय करून "चित्रा'च्या पदांना त्या सहजगत्या खुलवतात. उच्चार आणि संगीतातला सच्चा सूर मनाची पकड घेतो. सर्वच पदे लक्षात राहतात, पण उल्लेख करावा "आयी ऋतू बसंत' या पदाचा. अवचटबुवांच्या भूमिकेत रवींद्र कुलकर्णी शोभतात. पदांना आणि ख्यालगायकीला ते न्याय देतात. भूमिकेतल्या संवादाला ते न्याय देण्यास कमी पडतात. नाटकात नाट्य फुलविणारे अनेक प्रसंग आहेत, मात्र त्याचा पुरेसा लाभ प्रेक्षकांना घेता येत नाही. विनायक लिमयेंचा नागनाथ प्रभावहीन वाटतो. संगीताची जाण हीच त्यांची ताकद आहे. राजीव कुमठेकर, विनायक भालेराव, केदार तापीकर, डॉ.सुहास कानिटकर, शरद जोशी आणि मकरंद जोशी यांच्याही भूमिका उल्लेखनीय झाल्या आहेत.
डॉ. अ. शं. परांजपे यांची नाटकात भूमिका आहे, पण कलापिनीकडून हे नाटक रंगमंचावर आणण्याची खरी ताकद त्यांची आहे. प्रयोग अजून सफाईदार होण्याकडे लक्ष देऊन संगीताच्या भागाकडे नाटक म्हणून पाहिल्यास "संगीत चैती' संगीतरसिकांना अधिक भावेल, असे जाणवते.


सुभाष इनामदार,
subhashinamdar@esakal.com

(या नाटकाची ध्वनिचित्रफीत दोन भागांत www.esakal.com वर पाहता येईल.)

Thursday, February 28, 2008

अडीच तास हसण्याची हमी

दिवसा तू, रात्री मी
---------------

अडीच तास हसण्याची हमी

रंगमंचावर कलाकारांच्या उत्स्फूर्त आविष्काराने सजलेले नाटक म्हणजे संतोष पवारांचे "दिवसा तू-रात्री मी'. "सुयोग'निर्मित "रसिकरंजन' प्रकाशित या नाटकाचा प्रयोग लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण या तिन्ही दृष्टीने रंगतदार होतो.
मूळ संकल्पना हरिकिशन दवे याची. नाटकाचे कथासूत्र तसे छोटे. मुंबईतल्या 1993च्या बॉंबस्फोटात "प्लाझा'त चित्रपट पाहायला गेलेल्या कुटुंबातील पत्नी जागीच मरण पावते. पण स्फोटाच्या आवाजाने पतीची स्मरणशक्ती जाते. मुलीला आंधळेपणा येतो. (रात्री सातनंतर दिसते!) मोठ्या मुलाला बहिरेपणा येतो. धाकट्याची बोलती आई गेल्याच्या धक्‍क्‍यानेच बंद झालेली. आंधळ्या मुलीला पाहायला मुलगा येतो आणि सारे कुटुंबच आपले व्यंग झाकण्यासाठी एक एक क्‍लृप्त्या करून मुलाच्या आई-वडलांना समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यातही गंमत म्हणजे बघायला येणाऱ्या मुलाला सकाळी दिसत असते रात्री आंधळेपणा.संतोष पवार गंभीर कथेला विनोदाच्या अंगाने इतके छान मढविले आहे की ते शब्दात सांगणेही अवघड आहे.वास्तविक लिखीत नाटक अर्ध्या तासाचे होते संतोष पवारांनी त्यात पात्रांकडून उर्स्फूत आविष्कार करत ते नाटक घडविले.थोड्याफार फरकाने ऑल दि बेस्टची आठवण यावी.
प्रदीप पाटलांच्या नेपथातून नाटक वेगवेगळ्या पातळीवर घडते.साधा पण प्रसंगाला आवश्‍यक अशा सेटींगमुळे रंगत खुलत जाते.संतोष पवारांच्या स्टाईलची आणि विनोदाची उणीव भासणार नाही याची खात्री देत किशोर रावराणेंनी बाजा सादर केलाय.सहजपणा अणि शारीरीक आविष्करातून भाषेविना साधलेला संवाद नाटक सळसळत ठेवते.शलाका पवारांची वहिनीही तेवढीच बाजी मारून जाते.खरे तर समीर चौघूले(दादा)स्मिता तांबे(नयना)संदेश उपशाम(बाबा)मंगेश साळवी(त्रिलोचन)दिगंबर नाईक(मुकेश)सर्वांचा वेगळा उल्लेख करण्याती गरज नाही. त्रिलोचनचे माता-पिता भरत सावले आणि वर्षा पांडे यांच्या भुमिकाही नाटकालची गती कायम ठेवायला मदतच करतात.नयना अणि त्रिलोचन यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग खास उल्लेख करावा असा घडतो.
पात्रांच्या व्यंगातून नाटक फुलत जाते..प्रेक्षकही घडणाऱ्या प्रत्येक क्षणांची इतका छान आनंद घेतात की प्रेक्षक आणि कलावंत यांची गट्टीच जमते.
संतोष पवारने नाटक इतके गतीमान ठेवले आहे तुम्ही पात्रांगणीक आणि प्रसंग-प्रसंगातू नवीन धक्के खातच प्रयोगात रंगून जाता.प्रत्येक कलावंताला स्वतःच्या इतक्‍या लकबी दिल्या आहेत की पहाताना त्यातील उस्फूर्तता टाळ्या मिळविते. थोड्या हिंदी लोकप्रिय गाण्यांचा आधार घेऊन नाटकात पात्रे नाचतात पण तो रसभंग वाटत नाही.प्रकाश आणि संगीत दोन्हीमुळेही नाटकाच्या रंगतदारपणात वाढच होते
नाटकाच्या नावाचे अर्थ वेगवेगळे होत असले तरीही नाटकातली थिम नावाचा नेमका अर्थ बाहेर आणते.विनोदी नाटकाच्या परंपरेत संतोष पवार लिखित-दिग्दर्शित नाटकाला नक्कीच स्थान मिळे.