Saturday, March 30, 2013

अभिवाचनातून केले छत्रपतींचे स्मरण



शिवजयंतीचे गजर शनिवारी आज महाराष्ट्रभर होत आहेत. कुठे शिवाजीचे पोवाडे. तर कुठे शिवाजीमहाराजांची महती सांगणारी व्याख्याने...सरकारी नसली तरी लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनापासून साजरी करीत आहेत. कारण ही जन्मतारीख त्यांच्या लेखी महत्वाची...त्यांच्या दृष्टीने जन्मदिनांक महत्वाचे नाही..त्यांचे स्मरण महत्वाचे.

पुण्याच्या एस.एम जोशी सभागृहात गो.नी. दांडेकरांच्या हे तो श्रींची इच्छा या कादंबरीचे अभिवाचन सकाळी १० वाजता होत होते. विराजस कुलकर्णी,  रुचिर कुलकर्णी, विजय देव आणि विणा देव शिवराज्याभिषेकाचा प्रसंग वाचत असताना श्रोते तन्मय झाले होते..

छत्रपतींना गागाभट्ट मंत्रोच्चारातून सिंहासनावर बसलेल्या त्या महाराष्ट्राच्या महानायकाला अभिषक करित होते. इकडे कवीभूषण शिवाजीराजांच्या कर्तृत्वाचे कवीत्व आपल्या वाणीतून पाझरीत होते. ..सारा सोहळा घडत होता तो केवळ शब्दातून ..संवादातून...आणि अखेरीस सारे प्रजानन आणि जमलेला सारा महनीय समुदाय जयजयकार करीत होता....सिंहासनाधिश्वर झालेल्या आपल्या महारांचा एकच जयघोष करीत होते...छत्रपती शिवाजी महाराज की जय..... आणि इथे जमलेला सारा वाचक-रसिक त्यात जयजयकारात आपला आवाज मिसळीत होते.... 


शेवटी जिजाऊमाता शिवाजीराजांना मुजरा करीत असल्याचा प्रसंग आहे....तेव्हा त्यांनी लिहलेले संवाद असे..( आमच्या ध्यानी बसले ते असे)..

शिवबा आजपर्यंत तुम्ही आमचे पुत्र होता...आता तुम्हा छत्रपती झालात. आता तुम्ही या प्रजेचे पालनकर्ते झालात...आता आम्हाला राजा मिळाला..त्या छत्रपतींना हा मुजरा....आम्ही मुलगा गमावला..पण प्रजेचे कल्याण करणारा समर्थ राजा राज्याला लाभला...याचा आनंद अधिक..


रसिक श्रोत्यांमध्ये ज्येष्ठ लेखक द.मा मिरासदार बसले होते...अभिवाचनानंतर त्यांनी सर्वींना संबोधून सांगितले की, या कलावंतांनी राज्याभिषेक सोहळा असा काही सादर केला की तो जणू आपण प्रत्यक्ष अनुभवत असल्यासारखे भासले...त्यांचे मी कौतूक करतो....


द.मांच्या उपस्थितीने वीणा देवही आनंदी झाल्या होत्या...`आज तुमच्यासमोर आम्ही वाचन केले..अगदी गो,नीं.दांसमोर वाचल्याचा भास झाला..त्या बोलून गेल्या...

मृण्मयी प्रकाशनाच्या वतीने आज याच अभिवाचनाचे दोन कार्यक्रम होत आहेत...एक कसदार नाट्यमय वाचनातून साक्षात त्या घटना समोर याव्यात इतका त्यात जींवंतपणा होता. बाहरचे सारेच पहाता आले नाही .. पण हा अभिवाचनाचा आविष्कार ऐकता आला..आमच्या सारखे अनेक शिवप्रमी आज धन्य जाहले.


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Friday, March 29, 2013

वक्ता होणे हे सोपे नाही- द.मा.मिरासदार


ऐसी कळवळ्याची जाती.....या प्रा. मिलिंद जोशी यांनी लिहलेल्या आणि कॉन्टिनेंटलकडून प्रकाशित झालेल्या आणि अक्षरधाराने आयोजिलेल्या समारंभाची ऐट काही निराळीच होती. वीणा देव, आंतर्नादचे संपादक भानू काळे आणि स्वतः प्रा. मिलिंद जोशी यांचे शब्दांना खुलवित समर्थपणे केलेले भाषण..सारेच....  खरे तर मिलिंद जोशी यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या शैलीबाज दर्शनाने ..मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आणि भारती विद्यापिठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम या तिन शिवाजीरावांमुळे आपण कसे घडतो गेलो..ते ऐकणेही तेवढे रंजक आणि भावपूर्ण होते.
वडील गोंविदराव जोशी समारंभाला हजर होते..त्यांनी आपल्या मुलाचे गुण पाहून त्यांला जे घडविले त्यांचे थोडक्यात वर्णनही इथे करता येईल. पण हा आमचा विषय नाही त्यासाठी तुम्ही हे पुस्तकच वाटायला हवे...असे घडविणारे आई-बाप प्रत्येकमुलाला मिळायला हवेत..असे सतत सांगितले जात होते.. खरे आहे...
स्थापत्य इंजिनियर असेलेले मिलिंद जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षपदी विराजमान आहेत.  आणि त्यांच्या या १२ वर्षातल्या व्याख्यानांची संख्या आहे केवळ. ७५० इतकी....
त्यांचे वक्तृत्व . त्यातून बाहेर पडणारे चिंतनशिल विचार सा-यांचे दर्शन एस एम जोशी सभागृहातल्या पुणेकरांनी अनुभवले खरे....पण...

या निमित्ताने आपल्या मिश्किल शैलीत द.मा मिरासदारांनी चांगला वक्ता होणे किती अवघड याचे जे सुंदर वर्णन केले ते पुन्हा पुन्हा आठवावेसे वाटते...तेच तुम्हाला सांगावेसे वाटते...या पुस्तकात माझ्याविषयी लिहलेच आहे  म्हणून मी त्यापुस्तकाविषयी बोलणे योग्य होणार नाही .असे सांगून मिरासदार सांगतात
प्रा. मिलिंद जोशी उत्तम वक्ते आहेत..याची प्रचिती आपण घेतली आहेच..उत्तम बोलणे आणि संमारंभात बोलणे किती अवघड ते मी सांगतो..असे म्हणून ते सांगतात.... खरं तर त्यांचे शब्दरुप देणे अवघड ..त्यांच्या स्वाभाविक आर्वीभावातुन ते ज्यांनी एकले ते स्वतः खरंच धन्य झाले..तरीही हा छोटासा प्रयत्न करतो...

चार चौघांसमोर बोलायला उभे राहिले मी मी म्हणणा-याचे पाय बोलायला उभे राहिल्यावर लटपटायला लागतात. अगदी पाठ केलेल्या दोन ओळीही नीट तोंडातून फुटत नाहीत. उदाहरण म्हणून ..एका समारंभात एका हा तुम्ही समारंभाला आलात याबद्दल आभार मानून पुष्प गुच्छ द्यायला सांगितले...त त प प करत गुच्छ पुष्ष...पुच्छ गुच्छ...असे काहीतरी बोलत अखेरीस वेळ मारुन नेली..
सगळ्यात मोठी अडचण वक्त्याची होते..की या दोन हातांचे काय करायचे.. मग कुणी आपले हात माईकला धरुन ठेवतात.. कुणी हाताचे वेगवेगळे चाळे करतात.. एक जण मी असे पाहिले की हार घेऊन त्यातल्या एकेक फुलाच्या पाकळ्या काढत आपले भाषण करत होते... अखेरीस तो हार संपला..पुढे काय...मग एका श्रोत्याने त्यांच्यासमोरचा हुसरा हार दिला  आणि फुले काढत  भाषण  पुढे सुरु झाले.
एकांना तर धोतराच्या नि-या वर करुन वळकटी करत मुद्दे मांडायची सवय होती...शेवटी एका बाजुचे धोतर वर झाले मुद्दे काही संपले नाहीत....यांचे अजुन भाषण सुरुच....आता काय....
कांही जण व्याख्यानाच्या सुरवातीला...मला या निमित्ताने काही मुद्दे मांडायचे आहेत...ते मी थोडक्यात मांडतो म्हणून सुरवात  करतात..आणि मारुतीच्या शेपटीसारखे मुद्दे वाढतच रहातात...भाषण संपता संपत नाही...श्रोतेही तयार असतात...ते नेमकी जागा पकडून जिथून लवकर जाता येईल अशा ठिकाणी बसतात...एकेक करुन निघून जातात...

तेव्हा वक्ता होणे हे सोपे नाही..त्यासाठी हवी साधना..जी मिलिंद जोशी यांचेकडे आहेत. त्यांनी लेखनही करावे आणि व्याख्यानेही सुरु ठेवावीत असा सल्लाही मिरासदार देतात.



लाभाविण प्रिती करणारे अनेक जण मिलिंद जोशी यांच्या आयुष्य़ात आले..त्यातल्या १७ व्यक्तिंविषयी ऐसी कळवळ्याची जाती..... या पुस्तकात मांडले आहे...छोट्याशा खेड्यातून आपल्याला या पुण्याने मोठे केले ते ऋणही जोशी मान्य करतात...

वाचक आणि रसिक यांना तृप्त करणारा हा समारंभ ...लक्षात राहिला...कायमचा...प्रा. मिलिंद जोशी यांना योग्य वयात नोकरी सोडून व्यांख्याने आणि लेखनाच्या जोरावर  आत्ताच कर्तृत्व फुलविण्याची संधी आहे...अशी कोपरखळी भानू काळे यांनी दिलीच आहे....आता मात्र त्यांच्याकडून किती कार्य घडते ते सारे पाहणार आहोत...तूर्त.पुढच्या सा-या वाटचालीला आमच्यासारख्यांकडून उदंड शुभेच्छा...




- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276