Saturday, September 8, 2012
आशाजी तुम्ही महान आहात....
मराठी नव्हे पूर्णतः महाराष्ट्रीयन असूनही सा-या देशाचे सूर जिथे विविध भाषात एकवटले आहेत..ते एक महत्वाचे नाव म्हणजे जगप्रसिध्द सूरसंगीताच्या बादशाह..आशा भोसले.. आज त्या चक्क ८० वर्षांच्या झाल्या...काही वर्षांपूर्वी ठाणे शहरात त्यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला होती..तेव्हाही त्यांचे वय आणि त्यांची उत्साही सळसळ रंगमंचावर उठून दिसत होती...
गाण्याच्या विविध प्रकारांनी जसे त्यांनी स्वतःला मोहवून घेतले..तसेच वेगवगळ्या भाषांमधली गाणी तेवढ्याच तडफेने आणि नजाकतीने गाऊन आशाजींनी भारतीय संगीत ऐकणा-या विशेषतः हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या रसिकांना भरभरुन स्वरदान केले आहे.
स्वतःच्या कोशातून बाहेर पडून त्यांनी अनेक हादरे पचविले..परतवूनही लावले. त्यांच्या व्यक्तिमत्वातील जात्याच असणारी धडाडी त्यांच्या गीतांच्या अदाकारीत ओतप्रोत दिसते..जाणवते..त्यामुळे उडत्या चालीची गाणी त्यांच्या तोंडून ऐकणे म्हणजे एक स्वैर आनंदसोहळा असतो.
स्वतःची ओळख कायम टिकवित त्यांच्या गाण्यांनी रसिकांना दोन ओंजळीतून स्वरांची लाखो पारिजातकाची फुले अर्पण केली त्याची मोजदाद करणे... त्यांच्यावरच अन्याय केल्यासारखा होईल.
त्यांनी दिलेल्या अनेकविविध स्वरसमूहांनी समृध्द झालेले मराठी आणि हिंदी चित्रपट संगीत जेवढे अर्थपूर्ण आणि वेगळे होते..तेवढेच त्यांनी गायलेली मराठी नाट्यपदे आणि भावगीते यांनी भावसंगीताला आणि संगीत क्षेत्राला झळकता नजराणाच त्यांनी बहाल केला.
आजही त्या उत्साहात गाताहेत..दौरे काढताहेत..स्वतःची आवड आणि स्वतःची चवही इतरांना देताहेत..त्यांची आवड म्हणजे विविध खाद्यपदार्थ करणे..ती त्यांनी त्यांच्या उपहारगृहांची साखळी तयार करुन देशविदेशात त्यांच्या आवडीच्या पदार्थांची चव एक भारतीय म्हणून करुन द्यायला त्यांनी आवडते आहे...
भारताच्या समृध्द परंपरेचे संगीत क्षेत्रातले स्थान अशा दिग्गज गायकांच्या लोकप्रिय गीतांनी उच्चदर्जाचे निर्माण केले आहे...
त्यांच्या अपेक्षित त्या सर्व इच्छांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य नटराजाने आणि त्या जग जग चालविणा-या नियंत्यांने द्यावे हिच य़ा एका छोट्या चाहत्याची अपेक्षा...
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
---------------------------------------------------------
आशाजींवर लिहलेला एक लेखआशाजींवर लिहलेला एक लेख (दिवाळी २०१०) मला सापडला .तो लोकप्रभेसाठी शिरीष कणेकरांनी लिहला आहे..तो लोकप्रभेच्या सौजन्याने पुन्हा एकदा तुमच्या वाचनात आणू इच्छितोय..
रात्रीचा समय आहे. मस्त जेवणं झालीत. मित्रांचा गोतावळा गच्चीवर सुगंधी सुपारी चघळत बसलाय. हवेत सुखद गारवा आहे. मोगऱ्याचा सुगंध दरवळलाय. अशा वेळेला छेडायला, सुपारीसारखाच चघळायला, रवंथ करायला व तावातावाने वाद घालायला उत्तम विषय आहे -
‘श्रेष्ठ कोण - लता की आशा?’
पहाट होईल, पण फैसला होणार नाही. बोलणं संपूच नये असं वाटत राहील. प्रत्येकाला नुसतंच मत नसेल तर आग्रही मत असेल व दुसऱ्याचा मत असण्याचा अधिकार मान्य नसेल. इतकी उघड गोष्ट दुसऱ्याच्या खोपडीत कशी येत नाही, असा उद्वेगजनक प्रश्न उभय पक्षांच्या मनात येईल. बघता बघता सुरांच्या दुनियेत असुर घुसलेत असं वाटायला लागेल.
मुंबई विद्यापीठातून संगीतात एम.ए. केलेला एक गृहस्थ मागे एकदा लता व आशा यांचा तुलनात्मक अभ्यास करणारा भला मोठा प्रबंध घेऊन सी. रामचंद्रना भेटायला गेला. त्याला अण्णा रामचंद्रांची प्रस्तावना हवी होती.
‘‘ते बाड तूर्तास राहू द्या बाजूला,’’ अण्णा म्हणाले, ‘‘मला एवढंच सांगा की तुमचा निष्कर्ष काय आहे. तुमच्या अभ्यासपूर्ण मते लता व आशा यात कोण सरस आहे?’’
‘‘अर्थातच आशा,’’ संगीत एम.ए. म्हणाला.
‘‘गाढव आहात,’’ अण्णा गरजले, ‘‘तुम्हाला संगीतातलं ओ की ठो कळत नाही. कोणा मूर्खानं तुम्हाला संगीतात एम.ए. केलं? निघा आता.’’
निघण्यावाचून त्याला गत्यंतर नव्हतं. त्याच्या या ग्रंथाचे पुढे काय झाले कळले नाही.
याच सी. रामचंद्रनी एका मुलाखतीत, ‘लता ही एक चांगली टेपरेकॉर्डर आहे; बाकी काही नाही’ असे उद्गार काढले होते. त्यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त मी त्यांची मुलाखत घ्यायला गेलो होतो तेव्हा ते मला स्पष्टपणे म्हणाले होते, ‘‘‘ऐ मेरे वतन के लोगों’ प्रमिला दातारही लताइतकीच चांगली गाते आणि मीही तितकाच चांगला गातो. तुम्हा लोकांना काय वाटतं, लतासारखं गाणं म्हणजेच चांगलं गाणं..’’
त्या दिग्गज संगीतकारापुढे मी काय बोलणार? मला शक्य असतं तर त्यांच्या उद्गारांवर मी ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी’ असं देशवासीयांना आवाहन केलं असतं व लता, प्रमिला दातार व सी. रामचंद्र यांच्याइतकंच चांगलं मी गातो का, हे जाणून घेतलं असतं.
शमशाद बेगमच्या खणखणीत आवाजाचं कौतुक करताना नौशाद माझ्यापाशी म्हणाला होता, ‘‘उसकी आवाज माइक की ‘मोहताज’ नही थी. (हा अप्रत्यक्ष लताच्या पाठीत धपाटा!) अरे भाई, उसे स्टुडिओ के बाहर खडे करके गवाओ, कोई प्रॉब्लेम नही..’’
असं जर होतं तर ‘अंदाज’पासून ‘गुड्डू’पर्यंत उत्तमोत्तम चाली नौशादने विश्वासाने लताच्या ‘माइक का मोहताज’ असलेल्या गाण्याच्या हवाली का केल्या? त्या सगळ्या शमशादच्या सुपूर्द का केल्या नाहीत? ती तर स्टुडिओच्या बाहेर उभी राहूनही गायली असती.
नौशादचं वय व संगीतकर्तृत्व विचारात घेता त्याचा अधिक्षेप करणारा हा प्रश्न त्याला विचारायला मी धजावलो नाही. आदर जिभेला लगाम लावतो.
आशा भोसलेच्या गाण्यांतील मुरक्या व हरकती यांच्याकडे माझं लक्ष वेधून घेत ओ. पी. नय्यर मला गर्वाने म्हणाला होता, ‘‘ये आशाजी नही है, ये नय्यर है!’’
असेलही पण नय्यर नीट दिसण्यासाठी त्याला आशा भोसलेचाच गळा लागत होता ना? शमशाद व गीता दत्तची साथ त्यानं का सोडली? दिलराज कौर, कृष्णा कल्ले व पुष्पा पागधरे यांच्या गळ्यातून नय्यर का दिसला नाही? हा कलाकाराचा अहंकार होता. तो डिवचून मी काय साधणार होतो? ओ. पी.ने संपूर्ण कारकीर्द आशाच्या गळ्यावर भिस्त ठेवून गाजवली व आशाच्या यशात ओ. पी.चा फार मोठा वाटा होता. बासुंदी चांदीच्या वाटीतच हवी. दोघींनी एकमेकींचं योगदान नाकारण्याला काय अर्थ आहे?
भावंडांचा संगीत मेळा : हृदयनाथ, लता, आशा, उषा.
लताचा आवाज आपल्या संगीताला ‘सूट’ होत नाही म्हणून तिला (एकही) गाणं दिलं नाही, असा दावा ओ. पी. नेहमीच करीत आला. पण त्यातील प्रामाणिकपणाविषयी मला शंका आहे. नंतरच्या काळात त्याने अनुराधा पौडवालकडून गाऊन घेतलं होतं. ‘ओरिजिनल’ लता चालत नाही आणि तिची ‘कार्बन कॉपी’ अनुराधा पौडवाल चालते? आशा निदान लतापेक्षा पूर्णपणे वेगळी होती, पण अनुराधाचं काय? ‘सभी तो लता के गुलाम है’ असं म्हणत आपलं वेगळेपण जपण्यासाठी ओ. पी. कटाक्षाने लतापासून लांब राहिला असेल तर ही भूमिका आपण समजू शकतो व ती स्वागतार्हही म्हणू शकतो, कारण त्यामुळेच ओ. पी.-आशा ही सुश्राव्य युती आपल्या वाटय़ाला आली.
सी. रामचंद्र व ओ. पी. नय्यर यांची सद्दी संपल्यानंतर व ते जवळपास निवृत्त जीवन जगत असताना एक भन्नाट कल्पना आमच्या मनात आली. त्यांना एकत्र आणायचं व जुन्या काळावर गप्पा मारायला लावायचं. मी त्यावर लिहिणार होतो.
सी. रामचंद्र ताबडतोब तयार झाले. ओ. पी. खळखळ करायला लागला, ‘‘कशाला उगीच? वो लता को गाली देगा, मैं आशा को गाली दूँगा..’’
अरे! गाली दूँगा म्हणजे कम्पल्सरी आहे? नका देऊ गाली. नुसत्या मस्त गप्पा मारा, आठवणी काढा, गाण्यांवर बोला. प्रॉब्लेम हा होता की मी संगीतकाराशी बोलत होतो व पलीकडून माणूस बोलत होता. तो मानवी विकारांच्या विळख्यातून बाहेर पडू शकत नव्हता.
मी नेहमीच असं मानत व म्हणत आलोय की संगीतकारांची मते व त्यांचं कर्तृत्व यांची कदापि गल्लत करायची नाही. त्याची मते पटली नाहीत म्हणून तो संगीतकार लहान होत नसतो व तो संगीतकार महान आहे म्हणून त्याची मते शिरोधार्य ठरत नाहीत. सज्जाद हुसेन किशोरकुमारला गायकच मानायचा नाही व अनिल विश्वास महंमद रफीला ‘भेंडीबाजारचा गायक’ म्हणाला होता. सज्जाद व अनिलदा संगीतकार म्हणून आपल्याला कितीही प्रिय असले तरी त्यांची ही अतिरेकी मते आपण स्वीकारणार आहोत काय? पुढे पत्नी झालेली मीना कपूर ही लताइतकीच चांगली गाते हे अनिल विश्वासने माझ्याजवळ ठामपणे व्यक्त केलेले मत मी मान्य करण्याची थोडी तरी शक्यता आहे का? गंमत म्हणजे अनिलदा चित्रपटसृष्टीत होता तेव्हा त्याचं हे मत नव्हतं. नाहीतर ‘वो दिन कहाँ गये बता’, ‘मन मे किसी के प्रीत बसा के’, ‘बलमा जा जा जा’, ‘खुला हुवा है दिलका ये दरवाजा रे’, ‘कहाँ तक हम उठाए गम’, ‘जाना ना दिल से दूर’, ‘तुम्हारे बुलाने को जी चाहता है’, ‘बरस बरस बदरी बिखर गयी’ व ‘सीने मे सुलगते है अरमाँ’ हे द्वंद्वगीत त्याने लताऐवजी मीना कपूरला का नाही दिली? उत्तर सोपं आहे. मीना कपूरच्या गायकीविषयी एवढं उदात्त मत त्याचं त्या काळी नव्हतं. ‘अनोखा प्यार’मध्ये नलिनी जयवंतसाठी लता व नर्गिससाठी मीना कपूर गायल्या होत्या. रेकॉर्डवर मात्र मीना कपूरची गाणी लताच्या आवाजात होती. दोन्ही गाणी ऐकलीत तर दर्जातला फरक सहज कळतो. मात्र खुद्द संगीतकाराला तो कळत नाही. आपण काय करू शकतो?
माझ्या एका मित्राने वेगवेगळ्या वेळेला लता व आशा यांची स्वाक्षरी घेतली व दोन्ही बाजूंनी ‘लॅमिनेट’ करून गळ्यात लॉकेटसारखी अडकवली. एकाच नाण्याच्या दोन बाजू असं काहीतरी त्याला अभिप्रेत होतं की काय न कळे. पुढल्या भेटीत त्यानं कौतुकानं गळ्यातलं लॉकेट आशाला दाखवलं.
‘‘यातली पुढली बाजू कोणती व मागली बाजू कोणती?’’ आशाने थंडपणे विचारलं. माझा मित्र गार पडला.
यथावकाश त्याने हिंमत करून लॉकेट लताला दाखवले. तिने केवळ मंद स्मित केलं. टिपिकल लता. तिनं पुढली बाजू- मागली बाजू जाणून घ्यायचा प्रयत्त्न केला नाही. कदाचित आपणच पुढली बाजू आहोत हे गृहीत धरून चालण्याची तिची इतक्या वर्षांची सवय असू शकेल.
संगीतकारोत्तम आर. डी. बर्मन थोरली पाती व धाकटी पाती यांच्यात (सेफ) तुलना करताना मार्मिकपणे म्हणाला होता- ‘‘लता म्हणजे ब्रॅडमन आहे तर आशा म्हणजे गार्फिल्ड सोबर्स आहे, ऑलराऊंडर!’’ (चला, ब्रॅडमनही खूश व सोबर्सही खूश!)
पण आर. डी.ने पहिला चित्रपट ‘छोटे नवाब’मधील ‘घर आजा घिर आई’पासून तमाम ‘मेलडीज्’ न चुकता लताला दिल्या व ‘आजा आजा, मैं हूँ प्यार तेरा’, ‘मोनिका, ओ माय डार्लिग’, ‘ओ हसीना जुल्फोवाली’ अशी उडती, नटखट द्वंद्वगीते आशाला दिली. ‘ब्रॅडमन’ नाचऱ्या गाण्यांना न्याय देऊ शकत नव्हता की ‘सोबर्स’ मेलडीत जान ओतू शकत नव्हता? लताने ‘मैं तेरी टांग तोडू, मैं तेरे दात पाडू’ (‘मोंबासा’- ‘सरगम’) गाताना धमाल केली नव्हती की आशा ‘मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूँ’ (‘ये रात फिर ना आयेगी’) मध्ये जीव ओतून गायली नव्हती?
आशा-लताच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने आली नाही. त्यामुळे वृक्षाच्या छायेत रोपटं खुरटलं हा निसर्गनियमानुसार घडणारा प्रकार तिच्या बाबतीत घडला नाही. ती स्वतंत्र रुजली, स्वतंत्र वाढली व स्वतंत्र फोफावली. तिचा आवाज व गाण्याचा ढंग लतापेक्षा सर्वस्वी भिन्न होता. त्याचाही तिला फायदाच झाला. ती लताची ‘डमी’ नव्हती. वेगळ्या आवाजाची, वेगळ्या आडनावाची, वेगळी गायिका म्हणून रसिकांनी तिचा स्वीकार केला. तरी जवळच्या नात्यामुळे तुलना अपरिहार्य होती. इथे तिच्यावर नकळत अन्याय होत राहिला. तिची स्पर्धा साक्षात संगीतदेवतेशी होती. आशा कमी पडत नव्हती, पण वरचढही होऊ शकत नव्हती. लता हरली असती तर ती लता कशी झाली असती?
एकदा एक माणूस त्याच्या मुलीला घेऊन एस. डी. बर्मनकडे आला व म्हणाला, ‘‘माझी मुलगी डिट्टो लता मंगेशकरसारखी गाते.’’
‘‘मग नको,’’ एस. डी. ताडकन् म्हणाला, ‘‘आमच्याकडे ऑलरेडी एक लता आहे. तशीच दुसरी कशाला? वेगळी गात असेल तर ऐकवा.’’
लताशी बेबनाव झाला त्या कालखंडात एस. डी.ने वेगळ्या आवाजाच्या आशाला हाताशी धरून ‘बंबई का बाबू’, ‘कालाबाजार’, ‘अपना हाथ जगन्नाथ’, ‘नौ दो ग्यारह’, ‘लाजवंती’, ‘चलती का नाम गाडी’, ‘इन्सान जाग उठा’, ‘सुजाता’ या चित्रपटांतील संगीत गाजवलं.
आशाच्या ‘उमरावजान’मधल्या गजला गाजत होत्या तेव्हा कमाल अमरोही तिला म्हणाला, ‘‘आशा, मुझे मालूम नही था के तुम इतना अच्छा गा लेती हो.’’
आशा सर्द झाली. ‘उमराव जान’ आला नसता तर, आपण चांगले गातो हे राष्ट्रीय गुपित कमाल अमरोहीपर्यंत पोहोचलंच नसतं तर! मग अख्ख्या म्युझिक इंडस्ट्रीपर्यंत ते कसं पोहोचवायचं?
बडे गुलाम अली खान एकदा लताविषयी म्हणाले होते, ‘‘कंबख्त कभी बेसुरीही नही होती.’’ प्रत्यक्ष सप्तसुरांनीच स्वरलतेच्या रूपाने जन्म घेतल्यावर ती बेसूर गाऊच कशी शकेल? कोणा महनीय व्यक्तीने आशाच्या गाण्याविषयी असे गौरवोद्गार काढले असतील तर ते ऐकिवात नाहीत. नाही म्हणायला किशोरी आमोणकर म्हणाल्याचं वाचलं- ‘‘आशा भोसले ही अतिशय अष्टपैलू गायिका आहे. ती काहीही करू शकते. याउलट लतादीदींनी ठराविक गाणी गाण्यावर फोकस ठेवला..’’ ओ. पी. नय्यर माझ्याकडे जेवायला आला असताना मी त्याला सलग तास दीड तास लता ऐकवली होती. मदनमोहन, सी. रामचंद्र, अनिल विश्वास, नौशाद, सज्जाद, रोशन, विनोद, श्यामसुंदर, हुस्नलाल- भगतराम यांच्यासाठी लताने गायलेली गाणी ऐकता ऐकता भावनावश होत ओ. पी.ने कानाच्या पाळ्या हातात धरल्या व तो उत्स्फूर्तपणे ओरडला- ‘‘साली ऐसी आवाज तो सौ सालमें नहीं होगी.’’ या प्रसंगाला ओ. पी. व मी दोघंच साक्षीदार होतो. आता तर मी एकटाच.
‘‘साले, तुम तो ‘लतावाले’ हो.’’ ओ. पी. हसत हसत त्याच्या बसक्या आवाजात म्हणाला.
अन् लता मला एकदा गमतीदार चेहरा करून म्हणाली होती- ‘‘तुम्ही ओ. पी.वाले दिसता.’’
‘‘हो, आम्ही ओ. पी.वाले.’’ मी कबुली दिली. मला लता व ओ. पी.सह पाच-तीन-दोन हा पत्त्यांचा डाव खेळायला आवडलं असतं. आशा जॉइन झाली असती तर लॅडीस खेळता आला असता. लता- ओ. पी. एकही गाणं नाही व ओ. पी.ने आशाला ‘छम छमा छम’ (१९५२) ते ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (१९७३) या एकवीस वर्षांत ५१ चित्रपटांत १६२ ‘सोलो’ व १५४ द्वंद्वगीते दिली. बोला!
कोणी तरी मला लताच्या गाण्यांची कॅसेट करून दिली होती. त्यात नजरचुकीने आशाचं ‘दिलही तो है’मधलं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ हे गाणं आलं होतं. दोघींच्या आवाजात काहीच साम्य नसताना व ‘निगाहे मिलाने को’ एवढं प्रसिद्ध असताना ही चूक कशी झाली असावी? लताला मी ही गमतीदार चूक सांगितली असता ती पटकन म्हणाली, ‘‘रोशनचं ‘निगाहे मिलाने को’ हे माझं आशाचं सर्वात आवडतं गाणं आहे.’’ अन् ती लगेच ‘निगाहे मिलाने को’ गायला लागली.
सुकेशा आशा
माझ्या घरात कोचावर मांडी घालून लता आशाचं गाणं गात्येय हा एक विलक्षण व अविस्मरणीय अनुभव होता. मला शक्य असतं तर मी तो पेंढा भरून कायम ठेवला असता व येणाऱ्या जाणाऱ्यांना उचंबळून येऊन दाखवला असता.
एकदा मध्यरात्रीच्या सुमारास मी लताला फोन करून तिचंच ‘न तो दिन ही दिन वो मेरे रहे’ ऐकवलं होतं व विचारलं होतं, ‘‘ओळखा, संगीतकार कोण आहे?’’
‘‘अंऽऽ अनिल विश्वास?.. विनोद?.. कोण?’’ अवेळी फोन करण्याचा माझा आगाऊपणा पोटात घालत तिनं उत्सुकतेनं विचारलं.
‘‘आर. सी. बोराल.’’ मी विजयी सुरात म्हणालो. जणू मीच बोराल होतो.
वासू परांजपे बरोबर बोलतो. तो बोलतो, ‘‘लताची शंभर गाणी मला एका एका आयुष्याला पुरेशी आहेत. इतरांचीही बरीच चांगली गाणी आहेत. लताचीही आणखी पुष्कळ आहेत, पण ती सगळी मी पुढल्या जन्मीसाठी राखून ठेवलीत.’’
हिंदी चित्रपटांपुरतं बोलायचं तर एका आयुष्याला पुरतील अशी आशाची ‘सोलो’ गाणी खूपच कमी भरतील. तिच्या उत्तम गाण्यांत द्वंद्वगीतांचा भरणा आढळतो. त्यातही ओ. पी. नय्यरचा सिंहाचा वाटा आहे. बहुतेक संगीतकारांनी मेलडीसाठी आशाच्या गळ्यावर कमी विश्वास दाखवलाय हे कटू असेल, पण ऐतिहासिक सत्य आहे. लता सार्वभौम सम्राज्ञी असताना आपल्या उत्तमोत्तम रचना संगीतकारांनी दुसऱ्या कोणाला- अगदी आशालाही का द्याव्यात? अमुक एक गाणं तू संध्या मुखर्जीला दिलं होतंस का, या माझ्या मला निरुपद्रवी वाटणाऱ्या प्रश्नावर सज्जाद उसळून म्हणाला होता, ‘‘हम किसी संध्या या सुबह मुखर्जीको नहीं जानते. हम सिर्फ लतासे गवा लेते है.’’
इतर संगीतकार तोंडाने असे म्हणाले नसतील, पण कृतीने हेच सांगत राहिले. आजारपणानंतर लता विश्रांतीसाठी कोल्हापूरला जाऊन राहिली तेव्हा नौशादने सुधा मल्होत्राच्या आवाजात ‘उडन खटोला’मधील ‘मेरा सलाम ले जा’ रेकॉर्ड केलं. लता परतल्यावर आधीचं काही न सांगता नौशादने साळसूदपणे लताला ‘मेरा सलाम ले जा’ गायला पाचारण केलं. लता रेकॉर्डिगला आल्यावर नौशादचा असिस्टंट (संगीतकार गुलाम महंमदचा भाऊ) धावत आला व लताला म्हणाला, ‘‘बेटी, अच्छा हुवा तू आ गयी, उसने तो गानेका सत्यानाश किया था.’’
‘माइक का मोहताज’ असलेल्या लताच्या आवाजावाचून नौशादचं पान हलत नव्हतं. लता या आवाजाचा परीसस्पर्शच असा होता. आवाजाची कसोटी लागणाऱ्या चाली निर्माण होत होत्या व कुठल्याही अवघड चालीचं सोनं करणारा दैवी सूर आधी नाना चौक, मग वाळकेश्वर व नंतर पेडर रोडवर बसला होता. मात्र आशानं गायलेलं गाणं रद्द करून ते लताकडून पुन्हा गाऊन घेतल्याची एकही नोंद आढळत नाही. लता लता असेल पण आशाही आशा होती.
‘सावन आया आया आया रे’ (गीता रॉय, जोहराबाई, आशा व कोरस) हे आशाने गायलेले चित्रपटातील (‘चुनरिया’- संगीतकार हंसराज बहेल- साल १९४८) पहिले गीत त्यातील आशासाठी म्हणून योजलेले एक ‘सोलो’ गाणे (दिले नाशादको जीनेकी हसरत हो गयी तुमसे’?) हंसराजने शेवटी लताला दिले. आज आशा म्हणते, ‘‘मी खूप रडले. रात्रभर मी झोपू शकले नाही. मग मी मन ताळ्यावर आणून शांतपणे विचार केला. दीदीवर जळून काही उपयोग नाही. अनेकजणी जळल्या व स्वत:च जळून खाक झाल्या. जास्तीत जास्त मेहनत करायची. दीदीच्या जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करायचा. स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करायचं.’’
या उद्दिष्टात आशा किती यशस्वी झाली याची गाती साक्ष द्यायला तिच्या गाण्यांचा खजिना पडलाय.
सर्वज्ञात व्हायला हवा असा या दोन बहिणींचा एक अल्पज्ञात किस्सा आहे. दूरदर्शनवर आशा मा. दिनानाथांची नाटय़गीते सादर करणार होती. गायकी पणाला लावणारी ती अवघड नाटय़गीते बऱ्याच दिवसांत म्हटलेली नसल्याने आशा थोडी टेन्शनमध्ये होती. ती घरून रेकॉर्डिगसाठी निघाली, थोडी घुटमळली व ‘आलेच’ असे न्यायला आलेल्यांना सांगून ‘शेजारी’ गेली, थोरल्या बहिणीचा आशीर्वाद घ्यायला.
लता आशाला म्हणाली, ‘‘आशा, वाद्यं कमी असू दे. बाबांच्या फोटोकडे पाहा आणि गा. तुला काय गं, आरामात गाऊन जाशील’’.
आशा सफाईदार ताना घेत खरोखरच आरामात गाऊन गेली, ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’..
बंधू हृदयनाथच्या ‘लेकिन’मध्ये लता नेहमीप्रमाणेच ‘छा गयी है’. आशाच्या वाटय़ाला एकच गाणं आलंय. तेही द्वंद्वगीत सत्यशील देशपांडेबरोबर - ‘झूठे नैना.’ त्या एकमेव गाण्यातही आशाचं नाणं खणखणीत वाजलंय. एका मुलाखतीत सवरेत्कृष्ट सहगायक व आवडता गायक सांगताना आशा मिस्कीलपणे म्हणाली होती- ‘‘लता मंगेशकर.’’
लता : भगवद्गीतेतील श्लोकांची एल. पी. बघताना. साल १९७०.
दीदीबरोबर द्वंद्वगीत गाणे हा आशासाठी चित्तथरारक, रोमहर्षक व टेन्शनमुक्त अनुभव असत आलाय. तो तिच्याच तोंडून ऐकण्यातली खुमारी काही और आहे. नकलाकार आशा पदर खांद्यावरून लपेटून घेतल्याचा भन्नाट अभिनय करीत लताच्या आवाजात म्हणते, ‘‘आशा, अर्धा सूर खालचा लागलाय.’’
‘‘जाऊं दे ग.’’ आशा आशाच्या आवाजात म्हणते, ‘‘म्युझिक डायरेक्टरलाही काही खटकलेलं नाही.’’
‘‘चकाकतं ते सगळं सोनं नसतं, आशा.’’ आशा-लता बनून आशाला ठेवून देते.
इथे एक थोर गायिका दुसऱ्या थोर गायिकेला शालजोडीतला देत नसते तर थोरली बहीण धाकटय़ा बहिणीला दटावत असते. मग अशी अवीट गोडीची द्वंद्वगीते जन्म घेतात- ‘ये बरखा बहार सौतनिया के द्वार’ (‘मयूरपंख’), ‘मन भावनके घर जाये गोरी’ (‘चोरी चोरी’), ‘कर गया रे, कर गया मुझपे जादू सावरिया’ (‘बसंत बहार’), ‘अजी चले आओ’ (‘हलाकू’), सखी दी सुन बोले पपीहा उस पार’ (‘मिस मेरी’), ‘वो चाँद जहाँ वो जाए’ (‘शारदा’), ‘ओ कोई आयेगा, आयेगा’ (‘प्रोफेसर’), ‘मेरे मेहबूबमें क्या नहीं’ (‘मेरे मेहबूब’), ‘मन क्यूं बहका री बहका’ (‘उत्सव’).. ‘ये रुकी-रुकी हवाए’ (‘दामन’- संगीतकार के. दत्ता- साल १९५१) या पहिल्या द्वंद्वगीतात नवथर वाटणारी आशा ‘जब जब तुम्हे भुलाया’ (‘जहाँ आरा’- संगीतकार मदन मोहन-साल १९६४) पर्यंत चांगलीच स्थिरावली व रुळावली होती. धाकटी बहीण खांद्याला लागायला लागली होती.
उत्तमोत्तम चाली दिल्या जात होत्या तेव्हा आशाचा जम बसायचा होता आणि आशा ऐन भरात आली तेव्हा ‘थोरली’चं अबाधित साम्राज्य पसरलेलं होतं. आघाडीचे संगीतकार, आघाडीचे निर्माते व आघाडीच्या नायिका यांचा पहिला ‘चॉइस’ स्पष्ट होता. मुद्दाम लताला डावलून आशाला गाणी देणं ही घटना दुर्मिळ होती. आशाच्या दाणेदार आवाजाला आव्हान देतील अशा तोलामोलाचे तालेवार संगीतकार राहिले नाहीत. ‘‘आज मी शंभर गाणी म्हटली तर त्यातली धड पाचदेखील बरी निघणार नाहीत,’’ असं आशा खंतावून म्हणते. आशाची जुळी नातवंडं भाग्यवान. त्यांना खेळवताना आजीला ‘मोहे रंग दे, मोहे रंग दे’ गाताना मी ऐकलंय.
एकदा मी लताला विचारलं, ‘‘तुमच्या फोनला काय झालंय? लागता लागत नव्हता.’’
‘‘अहो, आशाच्या नातवंडांनी फोन आपटून आपटून वाट लावून टाकल्येय.’’ लता हसत हसत म्हणाली.
आणि लताच्या ‘गुहेत’ कोणी जायला धजावत नाही असं मला उगीचच वाटत होतं.
सुरुवातीच्या पाच-सात वर्र्षांत आशाच्या वाटय़ाला फारशी गाणी आली नाहीत, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ‘रम्मन’मध्ये ‘लारालप्पा’ फेम विनोदने आशाला नऊपैकी आठ गाणी दिली होती. ‘रामजन्म’मध्ये अविनाश व्यासने सहापैकी पाच, ‘ठोकर’मध्ये सरदार मलिकने आठपैकी सहा, ‘पापी’मध्ये एस. मोहिंदरने आठपैकी सहा व ‘राजमहल’मध्ये पं. गोविंदरामने सातपैकी सहा गाणी आशाला दिली होती; पण त्याच सुमाराला शंकर-जयकिशननी अख्खा ‘पूनम’ व अख्खा ‘औरत’ लताच्या चरणी वाहिला होता. ओ. पी. वगळता अन्य सर्व संगीतकार लताच्या पर्समध्ये बंद होते व आघाडीच्या नायिका तिच्या गळ्यावर विसंबून करिअर करीत होत्या. आघाडीच्या नसलेल्या नायिकांच्या झोळीतही हे दैवी दान पडत होतं. नौशादच्या ‘दिवाना’मधलं ‘तीर खाते गायेंगे’ आजही आपल्या कानात अत्तराच्या फायाप्रमाणे बसलेलं आहे, पण ‘दिवाना’ची नायिका कोणाला माहित्येय? संगीतकारांना लता हवी होती. त्यामुळे अनेक अप्रसिद्ध नायिकांना ती आपसूक मिळत होती. ‘मनमोहना बडे झूटे’ (‘सीमा’) पडद्यावर आळवताना नूतनने केलेली अप्रतिम ‘लिप मूव्हमेंट’ लताच्या गाण्यांना नेहमीच मिळाली असं नाही. वीणा (‘अफसाना’), नसीम बानू (‘बागी’), विजयालक्ष्मी (‘फर्माइश’), अनिता गुहा (‘दुनिया गोल है’) आणि चित्रा (‘मान’) काय ‘लिप मूव्हमेंट’ देणार व काय भावदर्शन घडविणार? पण कानसेनांना व दस्तुरखुद्द लताला त्याने काही फरक पडत नव्हता. गाणं गाजण्यासाठी तिला नायिकेच्या कुबडय़ांची कधीच गरज पडली नाही. उलट नायिकांना अनेकदा तिचा आवाज तारून घेऊन गेला. नर्गिस-मधुबाला- मीनाकुमारी यांच्यासाठी ती गायली तशीच शर्मिला टागोर-माला सिन्हा- वैजयंतीमाला यांच्यासाठी गायली. रेखा- श्रीदेवी- माधुरी दीक्षित यांच्यासाठीही गायली. संगीतात ‘मेलडी’ परतली तर आज एक्याऐंशीव्या वर्षीही ती करीना- कतरिना- प्रियांका यांच्यासाठीही गाईल. ती मिस्कीलपणे म्हणते, ‘‘दिलीपकुमार माझा आवडता नट, पण मी त्याच्यासाठी कधी गाऊ शकले नाही याची मला खंत वाटते.’’ अनेक नायकांनाही लता आपल्यासाठी गाऊ शकत नाही याचं वैषम्य वाटलं असणार. दोन नायक अनुक्रमे लता व आशाच्या आवाजात द्वंद्वगीत गातायत ही कल्पना कशी वाटते? निदान गाण्याच्या दर्जाविषयी प्रश्न राहणार नाही.
माझा जनसंपर्क हा ‘सँपल सव्र्हे’ मानला तर आशाचा चाहतावर्ग लतापेक्षा काकणभर जास्तच आहे, पण कमी नाही. आशाच्या वादातीत गुणवत्तेच्या मानाने तिच्या पदरात पडणारे दान अपुरे आहे, तिला देण्यात येणारं दुसरं स्थान अन्यायकारक आहे व आपल्यावर अकारण ‘अंडरडॉग’ची लढाई लढण्याची वेळ येत्येय या भावनेतून हे ‘आशावादी’ आक्रमक भूमिका घेताना दिसतात. इतके उदंड चाहते लाभूनही स्वत: आशा त्या अनामिक कवीप्रमाणे ‘एक शल्य उरी’ घेऊन जगत आल्येय. आपण आणखी काय करायला हवं होतं म्हणजे देशाची नं. १ गायिका म्हणून ओळखले गेलो असतो, हेच तिला कळेनासं झालंय.
‘‘मी आयुष्यभर ‘ऑलसो रॅन’ राहिले हो.’’ ती मला एकदा विषादाने म्हणाली.
‘‘ऑलसो रॅन नाही म्हणायचं,’’ मी पुटपुटलो, ‘‘त्याला रनर्स अप म्हणतात.’’
महारथी कर्णाची बोचणी कर्णाला माहीत. अर्जुन आणि तो एकाच काळात झाले व परस्परांसमोर उभे ठाकले, हा कर्णाचा गुन्हा.
मेलडी काळजाला हात घालते आणि लता कायम मेलडी गात आली. परिणामी तिनं ‘दिल’ आणि ‘दिमाग’ दोन्हीवर राज्य केलं. मी तिला एकदा म्हणालो, ‘‘या जगात निर्भेळ काही असेल तर ते तुमचे गाणे.’’
‘‘तुम्हाला असं मनापासून वाटत असेलही,’’ लता म्हणाली, ‘‘पण मी तुम्हाला ट्रथ म्हणतात ना ट्रथ, ते सांगते. ‘बरसात’च्या सँपल रेकॉर्डस् मी ऐकल्या व मी ढसढसा रडले होते. वाटलं सत्यानाश केला मी गाण्यांचा. आजही मी मेहदी हसन ऐकते तेव्हा माझ्या मनात येतं, काय गातो आम्ही!..’’
लतालाही कृतकृत्य वाटत नसेल तर कोणाला वाटतं? आशाला गुलाम अलीबरोबर व लताला भीमसेन जोशींबरोबर गाताना ऐका. मी काही म्हणत नाही; तुम्ही फक्त ऐका!
आशा माझ्या एकपात्री कार्यक्रमांना तीन-चार वेळा आलीय. एकदा तर रेखाने ऐनवेळी माझी पंचाइत केल्यावर माझी लाज राखायला आशा धावून आली इतकंच नाही तर स्टेजवरून, तिनं धमाल उडवून दिली. ती भाषणात म्हणाली, ‘‘एक सांगते, शिरीष कणेकरांना माझी गाणी आवडत नाहीत. विचारा त्यांना. कार्यक्रमातदेखील ते म्हणतात- ‘आयुर्विमा, सुनील गावस्कर, लता मंगेशकर व ‘गाजरका हलवा’ यांना पर्याय नाही, ऐकालच तुम्ही आता.’’
प्रयोगात ‘आयुर्विमा, सुनील गावस्कर, लता मंगेशकर’ एवढं बोलून मी थबकलो. प्रेक्षक आधीपासूनच हसत होते, कपाळ नाटकीपणे बडवून घेत मी पुढे म्हणालो, ‘‘आशा भोसले रे बाबा आशा भोसले.’’
कोणी छेडिली तार : लता मंगेशकर
आशा टाळ्या वाजवीत खळखळून हसत खुर्चीत कोसळली होती.
एकदा गप्पांच्या ओघात ती मला म्हणाली, ‘‘मी माझ्या ‘ये है आशा’ कार्यक्रमात तुमचे ‘फिल्लमबाजी’तले दोन-तीन किस्से सांगते.’’
‘‘काही हरकत नाही,’’ मी म्हणालो, ‘‘मीही माझ्या प्रयोगात तुमची दोन-तीन निवडक गाणी गातो. लोक म्हणतात की मी तुमच्यापेक्षा जास्त चांगला गातो. लोक म्हणतात हं.’’
आशा मनमुराद हसली.
या बहिणींना गाण्याप्रमाणेच विनोदाची उपजत देणगी व सांगण्याची हातोटी आहे.
‘‘एकदा शंकर-जयकिशनकडे एक नवोदित गायक आला,’’ लता सांगते.
‘‘आव असा की तुमचा व हिंदी चित्रपटसंगीताचा उद्धार करायला आलोय.’’
‘‘बोला, कोणत्या पट्टीत गाता?’’ जयकिशनने पेटीवर सूर धरत विचारले.
‘‘सैगल गायचा त्याच,’’ तो बेफिकीरपणे म्हणाला.
‘‘सैगल कोणत्या पट्टीत गायचा?’’ जयकिशनने हबकून विचारले. थेट सैगलचा वारसा सांगणारा गायक आपल्या पुढय़ात बसलाय या विचाराने तो बावचळला होता.
‘‘मी गातो त्याच,’’ गायक आढय़तेनं म्हणाला.
जयकिशनने त्याची बोळवण केली.
आशाने ‘माधुरी’ या सिनेपाक्षिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘‘आमच्या दीदीने कधी कोणाला काही भेटवस्तू दिली तर ती कधीही विसरत नाही.’’
त्यानंतर एकदा लताने दिलेली साडी आशा नेसली होती. लताने चष्म्याच्या वरून आशाकडे एकवार पाहिले पण ती काही बोलली नाही.
‘‘दीदी, तूच दिलेली साडी आहे,’’ आशा आपणहून म्हणाली.
‘‘मी विचारणारच होते पण म्हटलं नको, तू मुलाखतीत सांगतेस,’’ लता म्हणाली.
‘‘ही माधुरी दीक्षित माझ्याशी हिंदीतून का बोलते हो?’’ लताने एकदा मला विचारले, ‘‘मी मराठीतून बोलत्येय आणि ही हिंदीतून बोलत्येय. आम्ही इतर कोणाही इतकचं चांगलं हिंदी बोलतो. हयात घालवल्येय या फिल्म इंडस्ट्रीत पण म्हणून मी उद्या घरी आल्यावर माईला म्हणाले, ‘क्यौं माई, कैसी हो?’ तर ते तिला खटकणार नाही का?’’
मी आशाच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. (लता व आशाचे ‘प्रभू कुंज’मधील फ्लॅटस् आतून जोडलेले आहेत असं ऐकतो.) कोण बसलंय हे माहीत नसल्यामुळे उषा मागून दबल्या पायांनी आली.
‘‘ये-ये उषा. शिरीष कणेकर बसलेत. त्यांच्यापासून मंगेशकरांना काही भीती नाही,’’ आशा म्हणाली.
आशाचा हा जमालगोटा टोला मी हसतहसत झेलला. (नाहीतर काय करणार होतो?) ‘मंगेशकरांनाच काय भोसल्यांनाही काही भीती नाही,’ असं मी म्हणून शकलो असतो पण आशाच्या टोल्याला दाद देणं मी पसंत केलं.
काळाची पावलं ओळखून आशा ‘परफॉर्मर’ही झाली. एक तर तिच्यात ते होतं आणि लता या वाटेला फिरकली नव्हती. आशाचा हा थिरकता रंगमचाविष्कार तरुण पिढीला भावला. लताला आशाचे हे आधुनिक रूप रुचत नसावे. पण ती बोलणार नाही; कदापि बोलणार नाही. फार क्वचित तिच्या तोंडून तिचं मत निसटून जातं. ते तसं जावं अशी तिची इच्छाही असू शकेल.
मी तिला एकदा फोनवर म्हणालो, ‘‘मध्यंतरी अनिल विश्वास मुंबईत आला होता.’’
‘‘काय विशेष?’’
‘‘मीना कपूरच्या आवाजात त्यानं काही भजनं रेकॉर्ड केली,’’ मी माहिती पुरवली.
‘‘अरे देवा!’’ लता उद्गारली व विषय संपला.
‘‘xxxx बाईंचं मध्ये ब्लडप्रेशर वाढलं होतं,’’ आता तिनं मला माहिती पुरवली.
‘‘काय झालं?’’
‘‘अवघड-अवघड गाणी म्हणावी लागतात ना, म्हणून,’’ ही ‘लता स्पेशल’ चपराक होती.
हिंदीपुरतं बोलायचं तर आशाची उत्तम ‘सोलो’ गाणी खूपच कमी भरतात. मी खुद्द आशाला तिनं गायलेली तिची दहा आवडती गाणी निवडायला सांगितलं होतं. या दहा ‘बेस्ट ऑफ आशा’त चार द्वंद्वगीते होती. द्वंद्वगीते कितीही सुश्राव्य असू द्यात दहा गाण्यांत त्यांचा समावेश करावंसं आशाला का वाटलं? आशाला स्वत:ला ‘रातोंको चोरी चोरी’ (‘मुहोब्बत जिंदगी है’- ओ. पी. नय्यर), ‘जादुगर सावरिया’ (‘ढाके की मलमल’ ओ. पी. नय्यर), ‘मदिरा झलके तेरे नैनोसे’ (‘सेनापती’- मदनमोहन), ‘काली घटा छाये’ (‘सुजाता’- एस. डी. बर्मन), ‘ये क्या जगह है दोस्तो’ (‘उमरावजान’- खय्याम) ही तिची ‘सोलो’ गाणी प्यारी आहेत. मला स्वत:ला तिची खालील दहा गाणी आवडतात. (मुंडे मुंडे मतीर्भिन्न:) ती अशी : ‘हाय सावन बन गये नैन’ (‘करोडपती’- शंकर- जयकिशन), ‘मेरे मनके मानस सरोवरमे’ (‘भगवान परशुराम’- बाळ पार्टे), ‘चैनसे हम को कभी’ (‘प्राण जाये पर वचन न जाये’- ओ. पी. नय्यर), ‘ढलकी जाये हमारी चुनरिया’ (‘नौ दो ग्यारह’- एस. डी. बर्मन), ‘सबासे ये कह दो’ (‘बँक मॅनेजर’- मदनमोहन), ‘छोटासा बालमा’ (‘रागिनी’- ओ. पी. नय्यर), ‘काली घटा छाये’ (‘सुजाता’- एस. डी. बर्मन), ठंडी ठंडी सावनकी फुहार’ (‘जागते रहो’- सलील चौधरी), ‘इन आँखोंकी मस्तीके’ (उमरावजान’- खय्याम) व ‘मेरा कुछ सामान’ (‘इजाजत’- आर. डी. बर्मन)
लताची अशी निवडक गाणी काढणे अशक्यप्राय आहे. मागे माझं काम सोपं करण्यासाठी मी एकेका संगीतकाराकडे लताने गायलेली दहा सवरेत्कृष्ट गाणी निवडण्याचा प्रयत्न केला व हार मानून सोडून दिला. ‘बाहेर’ राहिलेली गाणी मला छळू लागली. त्या संगीतकारांवर व लतावरही आपण अन्याय करतोय या अपराधी भावनेनं मला ग्रासलं. लतानं आपल्या कर्तृत्वावर थोडय़ा मर्यादा घालायला हव्या होत्या.
मराठीत लतानं खूप काही व खूप चांगलं गाऊन ठेवलं असलं तरी मराठी आशाचा बालेकिल्ला आहे. तिथं तिनं काही करायचं बाकी ठेवलेलं नाही. भावगीत (‘रिमझिम पाऊस पडे सारखा’), चित्रपटगीत (‘मलमली तारुण्य माझे’- ‘घरकुल’), लावणी (‘बुगडी माझी सांडली ग’- ‘सांगत्ये ऐका’), अभंग (‘कानडा विठ्ठलू’), बालगीत (‘नाच रे मोरा’- ‘देवबाप्पा’), भूपाळी (‘उठा उठा सकलजन’) व हृदयनाथने दिलेली ‘अवघड गीते’, (‘‘तो इतरांना सोपी गाणी देतो व आम्हाला अवघड गाणी देतो’’ इति आशा). या सर्व गानप्रकारात आशाने भन्नाट मुशाफिरी केल्येय. तिने गायलेल्या वडिलांच्या नाटय़गीतात तर आशाने तिच्या ‘गलेबाजी’ची अफलातून करामत पेश केल्येय. या नाटय़गीतांच्या बळावर आशाने रसिकांचे कान फितवले व तृप्त केले. उद्या आशाचं सगळं संगीत बुडवलंत (ते कशासाठी पण?) तरी तिनं गायलेलं नाटय़संगीत तुकारामाच्या गाथेसारखं तरून वर येईल.
कॅबेरे गाणी गाऊन आशाने कारकीर्द केली व लताने सबंध कारकीर्दीत ‘इंतकाम’मधील ‘आ जाने जाँ’ हे एकमेव कॅबेरे गीत गायलं. आपापल्या मार्गानी दोघी अत्युच्चपदी पोहोचल्या. दोघींपैकी कोणी एकच आवडून घ्यायची असं बंधन रसिकांनी स्वत:वर का घालून घेतलं कोण जाणे. तुम्ही लतावाले असता किंवा आशावाले. लता-आशावाले का असू शकत नाही?
लताच्या किंवा आशाच्या गाण्यांचे व गायकीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण, विच्छेदन, विवेचन व काटेकोर मूल्यमापन करण्याची माझी योग्यता नाही, पण दोघीही हयातभर आम्हा अज्ञ कानसेनांसाठी गात आल्यात. आमचे कान हे आमचे दूत आहेत. ते आमच्याशी खोटं बोलत नाहीत, ते आम्हाला कधीच फसवत नाहीत. पेडर रोडवरच्या महाराण्या गायला लागल्या की आम्ही डोलायला लागतो. (‘‘क्या कहती है, पेडर रोडकी दो महारानीयाँ?’’ असं ओ. पी. भेटला की छद्मीपणे विचारायचा.)
मी शेवटच्या घटका मोजत असताना कोणी तरी माझ्याकडची लताची कॅसेट लावावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. त्यामध्ये ‘निगाहे मिलाने को’ झालं तर चांगलंच आहे की.
माझा अमेरिकेत राहणारा मुलगा चित्रपट- संगीतातला फारच दर्दी आहे. ‘लता की आशा?’ हे माझ्या लेखाचे शीर्षक मी त्याला सांगितले. त्यावर तो म्हणाला, ‘‘लता की आशा हा प्रश्नच मला कधी पडलेला नाही.’’
यावर मी काही तरी बोलणार होतो, पण काही न बोलणं शहाणपणाचं आहे हे कधी नाही ते माझ्या लक्षात आल्याने मी गप्प बसलो.
मग तोच म्हणाला, ‘‘पपा, मी यू टय़ूबवर लताचं रोशननं दिलेलं ‘आ के अब आता नही दिलको करार, राह तके थक गया है इंतजार’ पाहिलं आणि ऐकलं. अल्टिमेट. सिंपली अल्टिमेट..’’
-शिरीष कणेकर,मुंबई
shireeshkanekar@hotmail.com
http://www.lokprabha.com/diwali2010/diwali13.htm
Wednesday, September 5, 2012
सुखासाठी सा-याकडे पाठ..
तसे माणसाचे आयुष्य दुःखाने भरलेले..
कळत-नकळत अनेक चिंतेने भरलेले..
वाटाही किती वाकड्या रेषांना विखुरलेल्या..
जबाबदारीने व्यापलेले..
काळजीने ग्रासलेले..
तरीही सारे बाजुला ठेऊन आनंदाने बहरलेले..
दुखाःची जाणीव होताना आनंद निसटलेला..
संसाराचे ओझे घेऊन फरफटत चाललेला..
आपल्याच नादात ठेचकळत चाललेला...
बिनदिक्कत तुडवित वाट..
सुखासाठी सा-याकडे पाठ..
-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Monday, September 3, 2012
मनात येतं
सहजपणे अलगद ढग बनावे
नक्षत्रांच्या देशात घडतय तरी काय
ते जवळून अनुभवावं..
आकाशात मजेत
हवा बनून रहावं..
सारखं कुणालाही अलगद बिलगावं..
देहाची ती गोडी
सोडी ती साधी
होऊनी आकाशी
भरारी घ्यावी..
धुक्यातून फिरावं..
आसमंतात विहरावं.
स्वच्छंद जगावं
मुक्तपणे...
वारा हुंगावा..
पावसाच्या ढगातूनच पाणी चाटावं.
दुरवर बसून..
पृथ्वीवर काय होतयं
सहजपणे बघावं.
मीपण विसरुन सारे झाले भासमय
नात्यातली दरी
तुटलेली दोरी.
पतंगाला ढील
गतीला वेग
इंद्रधनुष्यातच बसावं.
रंग झेलावे..
ओढून घ्यावे..
सारे वाटले काय झालं.
सुखाची सवय दुखाःची झालर
इकडून गेली तिकडे ओढली..
सारी पृथ्वी तेव्हाही हळहळली...
सुभाष इनामदार,पुणे
Subscribe to:
Posts (Atom)