Tuesday, April 27, 2010
काटकोन त्रिकोण- जरूर पहावे असे नाटक
दोन पीढीतल्या फरकाने घर पहाता पहाता कसे दुभंगत जाते याचे नाट्यमय चित्र रंगभूमिवरून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न महाराष्ट्र कल्चरकल सेंटरच्या नव्या नाटकात 'काटकोन त्रिकोण' मध्ये केलाय नव्हे तर त्याचा रहस्यभेद पटवून दिलाय. डॉ. विवेक बेळे यांचे लेखन आणि गिरीश जोशींचे दिग्दर्शन याला डॉ. मोहन आगाशेंसारखा कसलेला अभिनेता एकत्र आला तर काय सुंदर कलाकृती तयार होते ते पाहण्यासाठी हे नाटक पहायलाच हवे.
खरे तर आज रंगभूमिवर नाटके येतात कमी. जी येतात त्यातली पाहण्यासारखी कीती हा प्रश्न असतो. म्हणूनच यानाटकावर लिहण्याचा आनंद घेताना ते नाटक पाहण्याचाही आग्रह धरावासा वाटतो.
घरातले पती-पत्नी दोघेही कमावते. बायकोच्या निधनानंतर वडील घरातच. सून गणीताची प्रध्यापिका . नव-यापेक्षा उशीरा येणारी. घरात स्वयंपाकाला बाई. आलेला पैसा हा खर्च करण्यासाठीच अशीच विचारसरणी. कर्ज काढून थाटात रहाणारे आनंदी कुटुंब. सतत सूनेवर लक्ष ठेऊन किरकोळ वाटणा-या गोष्टींवर कटकटी करणारा साठीच्या पुढचा सासरा. मुलगा वडील आणि बायको यांच्यापैकी एकाकडे न झुकणारा. समतोल सांभाळण्याचा प्रयत्न करणारा . वेळ न जाणार सासरा आणि कामात वेळ नसलेले सून आणि मुलगा असा विरोधाभास यात आहे.घरातले प्रश्न गणितीपध्दतीच्या सहाय्याने साडविण्याचा मनोरंजक भाग प्रथम खूप आनंद देतो. पण हाच गणिती प्रकार रहस्यभेद करणारा गंभीर केव्हा बनत जातो ते न कळणे हाही या नाटकाचा यशस्वी भाग.
बायको-नवरा-सासरा असा काटकोनी कुटंबाचा हा प्रश्न. वास्तविक आजच्या परिस्थितीतला एक आदर्श काैटुंबिक प्रश्न डॉ. विवेक बेळेंनी नेटक्या संवादातून उलघडत नेला आहे. त्रिकोणाच्या भाषेत सांगायचे झाले तर कधी समभूज तर कधी त्रिकोणाचा कर्ण बदलून घरच्या प्रश्नांना सोडवत नाटक रहस्याचा आधार घेत पोलिसी थाटाटत्या बापटांच्या धारदार संवादातून आशय बाहेर आणत आबांसारख्या एकाकी बापाची कैफीयत मांडत रहाते.
आबांच्या वृध्दत्वाला चिंतेची धार चढते आणि संवादाला विसंवादाचे ठिगळ जोडले जाते. लेखनातून विविध प्रकारचे कंगोरे मांडताना त्याने आजकाल एकाकी पडलेल्या वृध्दांचे प्रश्न प्रक्षकांना समाजायला लागतात. समाजातील वृध्दांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने विचार करणारा आजचा तरूण घरात आपल्या आई-वडलांशी कसा वागतो हे नाटकात सांगून प्रेक्षकांना डोळस बनविण्याच प्रयत्न केला आहे.
तीन पात्रातून चार भूमिकांना न्याय मिळालाय. आबा आणि बापट दोघेही नेमके वेगळ्या प्रकृतिचे लोक मोहन आगाशेंच्या रूपात सहजपणे वावतात. नव्हे ते रमवतात. परस्पर भिन्न अशा दोहोंच्या जीवनातील भिन्नता ते सहजी दाखवतात.अंगयष्टी, बोलण्यातला बदल आणि चालण्यातल्या बदलाने ते नाटकाचे नायक केव्हा बनतात ते कळतच नाही.
पेशाने डॉक्टर असणा-या बेळे यांनी नाटकातील रहस्यभेद इतका सही केला आहे की त्यांच्या संवाद मांडणीची दाद द्यावीशी वाटते. पती आणि मुलगा दोन्ही जबाबदारीत ते आपल्याला सहज भासतात. अभिनय करतात हे जाणवतच नाही.केतकी थत्ते यांनी हल्लीच्या अधुनिक युगातली सून उभी केलीय. संवादात चलाखी आणि कामात हुशारी.
नाटक सुदर्शनच्या छोट्या मंचावर आदी बहरत गेले मात्र मोठ्या रंगमंचावरचे माप वाढले तरी नेपथ्य मात्र तोकडेच बेतले गेलेय. दिग्दर्शकाच्या रुपात दिसलेली गिरीश जोशीचे विश्व नाटकातला आशय नेमका बाहेर आणते. तांत्रींक अंगाच्या रूपाने नाटकाला नेटके मांडण्यात सारेच सारेख जबाबदार आहेत.
सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)