



मराठीतला धाडसी प्रयत्न
-----------------
"काळेशार पाणी' या ह. मो. मराठेंच्या सत्तरीच्या दशकात वादग्रस्त ठरलेल्या कादंबरीला "डोह'मधून स्वतःच्या प्रतिभेचा स्पर्श देत पुष्कराज परांजपेंनी धाडसी विषय मराठी चित्रपटात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्यवसायासाठी तडजोड न कराता दर्जेदार निर्मिर्तीमूल्ये असलेला चित्रपट निर्माण करून अमराठी असूनही साईराम अय्यर यांनी हा प्रयत्न केला, यातच त्यांचे वेगळेपण सिद्ध होते.
"डोह' ग्रामीण भयावह वास्तवाचे भान देणारा, कथेला पूर्ण न्याय देणारा, आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे तांत्रिक बळ उभारून चित्रित झालेला परिणामकारक चित्रपट आहे. खेड्यातल्या वातावरणात घडणाऱ्या वास्तवाचे सत्य दर्शन भिकी आणि तिची मुलगी कमळी यांच्या भूमिकांमधून अंगावर येते. "ठेवलेल्या' बाईला भोगाव्या लागणाऱ्या यातना आणि कराव्या लागणाऱ्या तडजोडीला ठळकपणे चित्रित केले आहे. शारीरिक भूक भागविण्यासाठी विष्णूने ठेवलेले संबंध आणि प्रेमातून उत्पन्न झालेली वासना यांचे विदारक चित्रण इथे आहे. कमळीतले गुण, तिच्यातला भाबडेपणा आणि जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, सारेच वास्तव. तेवढेच प्रामाणिक.
कथेत बदल करून अंधश्रद्धेवरही आसूड ओढले आहेत. विषण्ण करणारा हा प्रवास दिग्दर्शक पुष्कराज परांजपे यांनी संयतपणे उलगडला आहे. देखण्या, हुशार अजयला स्वतःच्या जाळ्यात ओढण्यासाठी भिकीने कमळीकरवी केलेले प्रयत्न, पोटासाठी विष्णूच्या धाकात वावरणारी भिकी, अजयची कमळीशी जवळीक, डोहातल्या पाण्यात पाय टाकून कमळीने घेतलेला आनंद, त्याच डोहात अजय आणि कमळीच्या भावनिक-शारीरिक जवळिकीतून केलेली आत्महत्या, सारेच भेदकपणे समोर येते.
छायालेखक अमलेंदु चौधरी आणि संकलक अभिजित देशपांडे या दोघांनीही "डोह'ला आकार आणला आहे. वातावरणात भारावणारा अनाहत नाद आनंद मोडक यांच्या संगीतातून उमटला आहे. तेही एक पात्रच बनले आहे.
हर्षदा ताम्हणकर, अभय महाजन यांच्यासारख्या नव्या कलाकारांचा जिवंत अभिनय, लीना भागवत यांची दाहक भिकी, तर सुहास पळशीकरांचा विष्णू, सारेच उठावदार. अमेय वाघ, सुनील गोडबोले, मेघना वैद्य, ऋता पंडित यांच्या भूमिकाही लक्षात राहण्याजोग्या.
मराठीतही वेगळा ठसा उमटविणारा हा चित्रपट जाणकार प्रेक्षकांना आनंद देणारा आहे.
(चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या कलाकार-तंत्रज्ञ आणि काही निवडकांच्या प्रतिक्रिया www.esakal.com वर पाहता येतील.)
सुभाष इनामदार
subhashinamdar@esakal.com