गिरीश ओक आणि संजय मोने या जोडीने पौर्णिमा तळवलकर यांच्या सोबत रंगभूमीवर दिलेला धमाल अनुभव दिला..स्थळ आले धावून..!
बरेच दिवसांनी उभयतां भरपूर हसलो..मार्मिक .. विनोद..निखळ मनोरंजन..आणि नाटकातील सहज घडणारी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवून खूप समाधान वाटले..
निवृत्त झालेल्या शिक्षकाला ( संजय मोने )जोडीदार हवा असतो..तो मिळावा यासाठी त्याने आपले नाव एका विवाह संस्थेत नोंदवितो.. लांबून पाहिलेली एका कीर्तनकार बाई ( पौर्णिमा तळवलकर )आपली व्हावी याचा ध्यास घेतो..तिच्याशी मनातून प्रामाणिकपणे प्रेम करतो..तिच्याशी लग्न करण्याची स्वप्ने पहात असतो..
त्यासाठी ती विवाह संस्थेत नाव नोंदवितो.. पण विवाह संस्थेचा चालक ( गिरीश ओक )हे बंध जुळविण्याच्या प्रयत्नात तोच तिच्या प्रेमात पडतो...यातून एकाची निवड करण्यासाठी विविध मार्गातून नेमका निर्णय काय होतो..आणि अखेरीस ही रेस कोण जिंकतो..ह्याची उत्तरे नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला मिळतील.
एका अर्थाने हा प्रेमाचा त्रिकोण.. यात मात्र ज्याला जे हवे असते तेच अखेरीस प्राप्त होते हे विशेष. एकाकी असलेल्या दोन ज्येष्ठ स्त्री..पुरुषांना..आपल्या एकाकी जीवनात जोडीदार हवा असतो..मग ती सहसुलभ भावना तरुण पणी जशी जपावी तशी तयार होणे स्वाभाविक ..ही प्रेमकहाणी पाहताना तुम्ही त्यात सहज गुंगून जात त्याचा मनमुराद आस्वाद घेता.
डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांनी आपल्या सहसुलभ ..खुसखुशीत संवादातून आणि त्यांच्या परिपक्व देहबोलीतून असे काही बेमालूमपणे नटवितात की त्यातून ते रसिकांना दोन तास हास्यरसाचा आनंद देतात. शरदचंद्र रामचंद्र चंद्रात्रे.. झकपक..स्मार्ट आणि बेरक्या..मिश्किल..तर दुसरा सुभाष शांताराम फडतरे.. आदर्श शिक्षक..सत्यावर विश्वास ठेवणारा, वरवर गबाळा.. पैशापेक्षा प्रेमाशी प्रामाणिक असलेला माणूस.
आणि शेवटी श्रीकृष्णाच्या मंदिरात श्रावणी कुणाच्या गळ्यात वरमाला घालणार ..ती उत्सुकता वाढविणारा प्रसंग ज्या काही पद्धतीने रांगवितात त्याला दाद द्यायला हवी.
पूर्णिमा तळवलकर यांनी तेव्हढीच तयारीने उभी केलेली श्रावणी मेहेंदळे यांची ..व्यक्तिरेखा तुम्हाला सहज सुंदर भासेल. किर्तनकाराच्या भूमिकेत त्या शोभतात.. ठसका..प्रेम.. आणि उत्सुकता सारेच त्यांच्या अभिनयातून व्यक्त होते.
उत्तम नेपथ्य ( तिसऱ्या आंकातील भव्य आणि देखणे कृष्ण मंदिर ), परिणामकारक प्रकाशयोजना, साजेसे पार्श्वसंगित..साऱ्यातून नाटक मनात घर करते..
हेमंत एदलाबादकर यांनी पहिल्या अंकात हास्य फुलविले..तर दुसरा अंक थोडा गंभीर करून.. नाटकातली रहस्य..आणि पुढे काय होईल ही उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवली आहे.
समाजातील एका वेगळा विषय.. ज्येष्ठ असलेल्या..पण लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांचा प्रश्न नाटकाच्यमाध्यमातून हळुवार प्रेमकहाणीतून नाटकातून अधोरिखित केला आहे.
ते जेव्हढे लेखक म्हणून मनात ठसतात तसे ते दिग्दर्शक म्हणूनही आपली कमाल दाखवितात..
रंगभूमीवर नाटक कसे दिसावे आणि ते सतत हालते राहून ते रसिकांच्या मनात कसे उतरेल याची काळजी त्यानी घेतली आहे.
मंगल विजय केंकरे यांची ही निर्मिती पाहताना उत्तम विनोदी नाटक रंगभूमीवर पाहिल्याचे समाधान मिळते.
स्थळ आले धावून..हे नाटक पाहण्यासाठी रसिकांनी आवर्जून जावे..आणि सहज विनोद..आणि कलावंतांनी साकारलेल्या भूमिका..पाहून दाद द्यावी..!
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com