Sunday, March 9, 2025

माय लेकरं.. नात्यांची वीण उलगडून दाखविणारी कलाकृती..!


आई आणि मुलाचे नाते
वर्णावे तेव्हढे कमीच
महती याची मोठी
संस्कृती त्यातून झिरपते
त्यागाचे प्रतीक यातून होते सिद्ध
कलांगण निर्मित माय लेकरं..या कार्यक्रमातून ही या नात्यातली वीण कथा..कविता आणि गाणी यातून रसिकांच्या मनात कायम लक्षात राहील ..!
डॉ. अरुणा ढेरे यांनी यासाठी अभ्यासपूर्ण माहिती एकत्र करून माय लेकरं..यात ती अशी काही मांडली की त्यातून हे नातं किती उत्कट..किती निर्मळ आणि सुंदर आहे याची साक्ष अधिक दृढ होते.
निवेदन..निवड ..आणि गुंफण हा त्यासाठी अगदी यथार्थ शब्द त्यांनी संहितेत नोंदला आहे.
आई उन्हाची सावली
आई सुखाचे नगर
निळ्या आभाळा एव्हढा
तिचा मायेचा पदर
आई कुणाचीही असो
तिचा सन्मान करावा
तिने टाकलेला शब्द
फुलासारखा झेलावा..
कवी.. म.भा. चव्हाण
आईचं उदात्त रूप एक प्रतिमा म्हणून आपल्या सर्वांच्या मनात आहेच..पण माय लेकरांने नाते तेव्हढेच वत्सल धाग्यांचे नसते..या नात्यातले कितीतरी रंग..गहिरेपण या कार्यक्रमातून बाहेर येतात..आणि तुमच्या आमच्या डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्याशिवाय रहात नाहीत..
बहिणाबाई ते अगदी इंटरनेटच्या नव्या युगात देखील अनेक साहित्यिक ... कवींनी ह्या नात्याविषयी केलेलं टिपण इथे तुम्ही ऐकता..



आणि माय लेकरं... हे चिरंतन नाते बरोबर घेऊन तुम्ही सभागृह सोडता..
कलांगण संस्थेच्या वतीने चैत्राली अभ्यंकर यांनी काही कारणाने थांबलेल्या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा जगातील महिला दिनाच्या पूर्व संध्येला सादरीकरण करून..त्याचे रंगमंचीय रूप जनतेसमोर आणले.. त्यासाठी त्यांच्या सोबत अमित अभ्यंकर यांनी लाभलेली मदत खूपच मोलाची आहे.
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, जयंत भावे आणि खास करून लेखिका आणि संहिता बांधणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे यांच्या उपस्थितीत पुण्यात शुक्रवारी ७ मार्च २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माय लेकरं..शुभारंभ केला.
त्याला प्रकाशयोजना.. पार्श्वसंगीत..आणि आधुनिक ध्वनी यंत्रणा बहाल करून तीच उत्तम संहिता मंचावर सादर केली..हे धाडस केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन..



यामुळे मराठी भाषेतील त्या संस्कारक्षम कथा..त्या पारंपारिक कविता नव्या पिढी समोर आल्या.
डॉ. गिरीश ओक..मृणाल कुलकर्णी यांच्यासारख्या जाणकार कलाकारांनी यात सहभागी होऊन आपल्या अभ्यासपूर्ण आणि समर्थ वाचिक अभिनयातून हा फुलोरा नटविला..अधिक समृद्ध केला.
आजी चैत्राली अभ्यंकर यांनी यातल्या लोकप्रिय..उत्तम गाण्यांना सादर करून शब्द..स्वरांची मेजवानी दिली..



चांगले ऐकणे ज्यांना आजही आवडते आणि भाषेतील उत्तमता ज्यांना आपलेसे करते ती ही संहिता प्रत्यक्ष मंचावर अनुभवताना ऐकणे यासारखे समाधान नाही..



माय लेकरं..सारखे प्रयोग अधिकाधिक प्रयोग तुम्हीही तुमच्या सोसायटीत..गावातल्या ग्रंथालयात आयोजित करू शकता..
त्यासाठी तयार केलेले माफक पण आकर्षक नेपथ्य सुटसुटीत आहे..
मराठी साहित्यात लिहिलेल्या असंख्य आई आणि मुलांच्या नात्यातले पदर उलगडून सांगून त्यांना आविष्कृत करणारी ही निर्मिती अवश्य अनुभवावी अशीच आहे..





- Subhash Inamdar
Pune
subhashinamdar@gmail.com