Saturday, August 10, 2024

लडाखमध्ये श्योक नदीच्या पात्रात जेंव्हा गाडी बंद पडते ....!

तसा आमचा लेह लडाख मधील प्रवास व्यवस्थित चालला होता. आम्ही रोवर्स डेन ..यांनी आयोजित केलेल्या श्रीनगर..कारगिल..आर्यन व्हॅली.. तुर्तुक.. नुब्रा व्हॅली..असा त्या विरळ हवा असलेल्या वातारणाशी स्वतः ला जुळवत या अनोख्या प्रदेशात उंच पर्वत, भव्य नद्या..आणि खारदुंगला पास सारख्या उंचीवरील अनोख्या आणि बोचऱ्या हवेचा मारा झेलत आम्ही ११ ज्येष्ठ नागरिक तिथल्या निसर्गाचा आनंद घेत ट्रॅव्हल्स बसने फिरत होतो.. आणि सुमुर भागातून फिरताना वातावरणात बदल होत असल्याचे जाणवले..मन थोडे नाराजी व्यक्त करीत होते..आणि सुमुर गावातून जवळच असल्या पनामिक इथल्या गरम पाण्याच्या कुंडाचा अनुभव घेऊन उत्तम सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी वास्तव्यासाठी दाखल झालो.. रात्रीच आमच्या सर्वांच्यात सामील झालेल्या कौस्तुभ दळवी यांनी जाहीर करून टाकले.. श्योक नदीच्या पात्रात ग्लेशियरचे पाणी वाढत आहे..उद्याचा पैंगोंग लेकला जाण्यावर कदाचित ब्रेक लागू शकुन आपल्याला लेह येथे जाणे भाग पडेल. आपण लेह वरून पैंगोंगला दुसऱ्या चांगल्या मार्गाने जाऊ शकतो.. पण तरीही आपण नदीच्या जवळ जाऊन नेमकी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.. तेंव्हा आपण उद्या चहा..नाश्ता न करता सकाळी ६ वाजता सूमुर सोडून निघणार आहोत... ठरले.. आम्ही ३० जुलै..२४ रोजी ठरल्या वेळी निघालो..दीड तासाच्या प्रवासानंतर श्योक नदीच्या काठी आलो..पहातो तर नदी पात्रातून जाणारा पैंगोंगचा रस्ता कुठेच दिसत नव्हता.. नदीचे पात्र बर्फ वितळत अधिक वेगाने वाढत आहे.. आता पुढे काय...हा प्रश्न आमच्यासमोर होता. दरम्यान आमच्या वाहन चालकाने माहिती काढली की पाणी कमी होण्यासाठी तासभर वाट पाहावी लागेल. मग आम्ही या नदीच्या काठी बाजूला घेतलेल्या गाडीत पाणी कमी होऊन आपल्याला जाता येईल असे वाटून तिथेच बसून राहिलो.. हळू हळू सुमारे वीस एक प्रवासी आणि खासगी गाड्या त्याचीच वाट पाहत तिथे थांबल्या होत्या..त्यातच पंधरा ते वीस बाईक रायडर देखील ह्याच प्रतीक्षेत असलेले दिसले.
नेहमी नदीला पाणी येऊन रस्ता बंद होतो म्हणून पर्यायी रस्ता करण्याचे काम सुरू केलेले दिसले.. त्या कामासाठी उभे असलेले तीन जेसीबी होतेच.. तासाभरात त्यापात्रात दोन जेसीबी पात्रात उतरून रस्ता निर्माण व्हावा म्हणून एका कोपऱ्यातील पाण्याच्या प्रवाहात नदीतील वाळू.. गोटे यांचा भराव टाकण्यासाठी पुढे सरसावले. त्यांच्या दोन तासाच्या प्रयत्नानंतर एक काम करणारी जीप पात्रातून सुरक्षीत जाऊन परत आली देखील.. आम्ही आपापसात ठरवले होते..की या परिस्थितीत पाण्याशी खेळायचे नाही..आपण सरळ लेह येथे जाऊ.. पण अमच्या वाहनचालकाची जिद्द भारी .. त्याने नदीच्या पत्रातून जसा जेसीबीने रस्ता मोकळा करून जाण्याचे संकेत दिले ..तशी आमची टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी प्रथम नदीपात्रात घालण्याचे ठरविले.. गाडी शिरली.. नदी पात्रातील गोटे.. दगड..यातून मार्ग काढत गाडी चालुही लागली. एका बाजूने वाट काढत गाडी पुढे सरकत होती..आणि अचानक गाडी उजव्या बाजूस असलेल्या त्या गोट्यात फसली.. गाडी वेगच घेत नव्हती.. ती तिथेच अडकली.. ना पुढे..ना मागे.. जागीच ठप्प..!
अचानक गाडीच्या चालकाच्या दरवाजातून पाणी गाडीत घुसत होते..मागूनही पाणी गाडीत येत असल्याचे जाणवले.. मग मात्र आम्ही सारेच घाबरलो..पण आपल्या मनाचा निग्रह करून पुढील स्थितीवर अवलंबून राहण्यासाठी सिद्ध झालो.. तशातच चालक खाली उतरला.. शेजारी जेसीबी चालक आणि त्याचा साथीदार हे सारे पहात होता.. गाडी जशी पात्रात फसल्याचे पाहिले मात्र काठावर ते दृष्य पहात असलेले इतर चालक मदतीला धावले.. तुम चिंता मत करो..हम तुमको..सही सलामत बाहर निकलेंगे.. म्हणत धीर देत होते.. तशातच गाडीतून लोखंडी साखळी..आणि नायलॉन दोरी काढली.. चालक आणि मदतीला आलेले लोक जेसीबीच्या सहाय्याने त्यातून गाडी खेचण्याचा प्रयत्न करीत होतेच.. पण ती साखळी आणि दोरी वजन न झेपल्याने तुटून आली. त्याला वजन उचलणे शक्य झाले नाही.. मग दुसरी जाड लोखंडी चेन आणली गेली.. त्यांचा प्रयत्न सुरूच होता..
मग आम्हीच म्हटले की आम्ही पाण्यातून चालत जाऊ..जशी स्थिती असेल तशी पाहू..पण गाडीतून खाली उतरू. ..ठरले.. आम्ही सारे पुरुष आणि महिलावर्ग.. देवाचे नाव घेत .. बुट..चप्पल काढून हातातील वस्तूंसह गाडीच्या बाहेर सुमारे चारशे पावले चालत आलो.. कुणी स्तोत्र पठण..तर कुणी अथर्वशीर्ष म्हणत त्या रेती दगडातून चालत जिथे पाणी कमी होते तिथे पोचलो.. इकडे जेसीबी क्रेन गाडीला जोरदार उचलत बाहेर काढत होती.. अखेर काही वेळातच..त्यांच्या प्रयत्नाला यश आले..गाडी बाहेर आली मात्र.. गाडी पाण्यात गेल्याने गाडीचा सेन्सर काम करेनासे झाले.. गाडीचा एक पार्ट बदली केला..मग गाडीच्या अंगात प्राण आले..
आणि सारे ज्येष्ठ नागरिक पुन्हा एकदा मदतीसाठी धावलेल्या माणसांना बक्षिसी देऊन गाडीत विराजमान झाले.. जणूकाही ते आमच्यासाठी देवदूत बनून मदतीला धावल्याची यामागे भावना होती. आणि हा प्रसंग कुणावर येऊ नये असे म्हणत पुढील वाटचालीसाठी सामोरे गेलो..
वेगळा अनुभव पुढेही आहे.. नदीचे प्रवाह.. पाण्याचा खळाळणारा प्रवाह..आणि खाचखळग्याचे रस्ते पार करत गाडीने आघम चौकात आलो आणि डाव्या दिशेने गेलो..तर पैंगोंग आणि उजवीकडे गेलो तर साठ किलोमिटर दूरच्या रस्त्याने लेह १०७ किलो मिटर.. मग वाहनचालक पैंगोंग कडील रस्त्याने गाडी हाकत होता.. वाटेत. दोन गाड्या सांगत होत्या..पैंगोंग लेक साठी जाण्याचा रस्ता बंद आहे..पण चालकाने तशीच गाडी दामटली.. पुढे लडाखी प्रदेशातील गाडी दिसली..त्यांच्या आणि आमच्या चालकाचा संवाद झाला.. त्यातून कळले की किमान चार दिवस हा मार्ग मोकळा होणार नाही.. मग माग चालकाला परतण्या शिवाय पर्याय नव्हता..
मग पुन्हा त्या आघम चौकात आलो.. आणि गाडी वरीला पास वरुन शक्ती..आणि मग लेह कडे..जाण्याचे नक्की झाले.. आपल्या नशिबात पैंगोंग अनुभवणे आज नाही हे आम्ही मनाशी नक्की केले.. मग गाडीने उजव्या दिशेने लेह साठी धाव घेतली मात्र... गाडी घाटातील चढावार चढत नव्हती.. त्यासाठी चार वेळा सर्वांसह प्रयत्न झाले..पण तेच फळ.. आता तर आपण भोवऱ्यात अडकल्याचा भास होत होता. दरम्यान एक टेम्पो ट्रॅव्हल्स जी त्या चौकातील मालकाची होती..त्यांना खालच्या गावात धार्मिक कार्यासाठी जायचे होते..त्यांना चालकाने गाडी दाखविली..अमच्यासाठी ते गाडीचे डॉक्टरच होते.. त्यांनीही प्रयत्न केला.. पण गाडीच्या बॅटरी मध्ये पाणी गेल्याने गाडी वेग घेत नसल्याचे स्पष्ट झाले. ही गाडी लवकर दुरुस्त होणे शक्य नाही..संध्याकाळचे साडेसहा वाजले.. डोळ्यापुढे अंधार..ना पैंगोंग..ना लेह..मध्येच अडकलो..
शेवटी त्या गाडीच्या मालकाला विनंती केली..त्यानी ती मान्य करून आम्हाला शक्ती पर्यंत ..सुमारे ६२ किलोमिटर ..सोडण्याचे मान्य केले.. दरम्यान मोबाईल रेंज मिळून लेह मधून शक्ती साठी गाडी मागविण्यात आली.. आम्ही आघम मधून निघालो. इथे रात्र आठ नंतर होते.. बाहेर काळोख ..त्यात काचेतून वारा घोंगावतोय.. आमची ही गाडी छोटी असल्याने दाटीवाटीने प्रवास सुरू झाला.. दीड तासाच्या घाट माथ्याच्या प्रवासा नंतर त्या चालकाने सांगितले..इथे गाडी चढत नाही..गाडी चढामुळे मागे येत आहे.. तुम्हाला थोडे उतरून चालत यावे लागेल.. बाहेर वारा.. जबऱ्या थंडी..कुणाला चालायला अडचण..कुणाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता..मात्र तरीही आलिया भोगाशी..ठरवून आम्ही चालत पुढे गेलो.. सारे दमलेले..थकलेले..मनावर ओझे.. अखेरीस वरि ला पास करून शक्ती पर्यंत आलो..तर लेह मधून येणारी गाडी शक्तीच्या पुढे १५ किमी पुढे येऊन आमची वाट पहात चालक उभा होता.. मग सारेच हुश्श झाले..त्यात सामान आणि बरोबरचे सारे टाकून लेह साठी निघाली.. रात्री साडेबाराच्या सुमारास लेह येथे मुक्कामी दाखल झालो.. असा तो सारा ३० जुलै..२४ चा दिवस..आम्हाला तिथल्या आठवणी देत मागे पडला..आम्ही तो दिवस कायम स्मरणात ठेऊ.
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@ gamil.com