Saturday, July 31, 2010

नाते मैत्रीचे


नाते मैत्रीचे

उभ्या जन्माचे

जरी झाकोळले मन

अंधारल्या दिशा

होई साठवण मैत्रीची


कधी दुरावा झोलेला

पसरी क्षणात ओलावा

मनी असेल विसावा

मैत्रीचा


जीवा भावाचे नाते

राहे अखंडीत आता ते

स्मरू आठवांना येथे

आता सार्थकी


जवा कधी साद

येईल तवा रे

घालीन आर्तता

तुझ्या मनी.




सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

(माझ्या असंख्य मित्रांना समर्पण)

कट्यारचे सूर आता राहूलच्या गळ्यातून


कै. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या श्रेष्ठ गायकीची याद तर येतेच पण त्यांच्या 'कट्यार' ने मराठी संगीत रंगभूमिला जे वैभव, प्रतिष्ठा मिळवून दिली त्याला तोड नाही. आजही त्याच कट्यारचे सूर साठवून संगीत रसिक श्रोता राहूल देशपांडे यांनी साकारलेला प्रयोग पहायला आवर्जून येतात आणि दाद देतात. तेव्हाच वाटते. की ही खरी रसिकतेची दाद. त्याच कट्यारच्या पहिल्या प्रयोगाचा साक्षिदार म्हणून लिहलेले हे टिपण तुमच्यासमोर उघड करतोय......

तो गातो तेव्हा डोळे मिटून ऐकले की जणू वसंतराव देशपांडेच गातात. त्याच गायकीची नजाकत राहूल देशपांडेंच्या गळ्यातून निघते. पण..आज आजोबांनी गाजविलेल्या कट्यार मधल्या खॉंसाहेव आफताफ हुसेन यांच्या भूमिकेत तो कसा दिसतो हे पाहण्यासाठी पुणेकरांची नजर एकवटली होती.

रंगमंचावर एंट्री झाली आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी या नव्या रुपातल्या खॉंसाहेबांच्या प्रवेशाचे स्वागत केले. राजस्थानी हवेलीचे दर्शन देणारा जयपूरच्या फिकट तपकीरी रंगाचा भव्य सेट नांदी नंतर डोळ्यांना सुखावतो. आणि कट्यार नाटकाच्या जुन्या आठवणी दूर निघून जातात.

कै. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर करुन ठेवलेल्या नाटकाला तब्बल 28 वर्षानंतर साकारण्याचे
राहूल देशपांडे यांनी मनात आणले आणि ते सिध्दीस नेले. याचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. आजोबांचा वारसा नातवाने अशा पध्दतीने पुढे न्यावा ही खरी संस्कृतीची ओळख आहे.

साकारताना आजोबांच्या भूमिकेत राहूल बसले पण ती साकारली आपल्या स्वतःच्या गायकी ढंगाने.
अगदी टेचात. या निमित्ताने कट्यारच्या रुपाने गेले कांही वर्षे अस्तंगत पावत असलेल्या अभिजात संगीत नाटकाला नवसंजीवनी मिळाली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

'वंसतराव देशपांडे संगीत सभा' निर्मित 'वंसतराव देशपांडे प्रतिष्ठान' प्रकाशित 'संगीत कट्यार काळजात घुसली' या संगीत नाटकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळेच चार फेब्रुवारीची गुरुवार संध्याकाऴ संगीत रसिकांसाठी एक आनंददायी पर्वणीच होती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हाऊसफूल्लची पाटी झळकत होती.

नाट्यसंपदेचे प्रभाकर पणशीकर ज्यांनी वसंतराव देशपांडे यांचे कट्यार आपल्या संस्थेमार्फत सादर केले ते ही प्रयोगाला हजर होते. विद्याताई अभिषेकी, पं. हृदयनाथ मंगेशकर, रघुनंदन पणशीकर असे संगीत
आणि नाटक अनुभवलेले अनेक रसिक सारेच नाटक पाहण्यासाठी अधिर झाले होते. नाटकाला पारंपारिक संगीत नाटकापेक्षा वेगळी ट्रीटमेंट देताना दिग्दर्शक सुबोध भावे यांनी मूळ संहितेला धक्का न देता वेगळ्या पध्दतीने रंगमंचावर मांडले आहे. पं. भानुशंकराचे पात्र नाटकात केवळ संवादातून प्रकटते.


काही वेळा वेगळे संवादही अभिराम भडकमकरांनी दारव्हेकरांच्या संवादाला साजेसे लिहिले आहेत. घराणेदार गायकीची परंपरा आणि त्यातल्या अनिष्ट वृत्तीवरही नाटकात अखेरीस टीका करुन संगीत साधकांना दिशा देण्यासाठी नवा संवाद शेवटी नाटकातून भरत वाक्य या न्यायाने दिला आहे.
तेही वेगळपण. हेच वेगऴेपण काय आणि नाटक कसे उभे केलेय हे पाहण्यासाठी कट्यारचा प्रयोग पहायला हवा. रसिकांच्या चेहर्‍यावर याबद्दची उत्सुकता दिसत होती.

पुरुषोत्तम दारव्हेकरांचे दर्जेदार लेखन आणि पं. जितेंद्र अभिषेकींनी संगीत दिग्दर्शनाच्या रुपाने चढविलेली रुपेरी झालर या दोन्हींचा मिलाफ या नव्या नाटकातून कसा होतो आहे ते पाहण्यासाठी
पुणेकर मोकळ्या मनाने आले होते. एकेकाळी शंकर घाणेकरांनी गाजविलेल्या कविराजाच्या भूमिकेत सुबोध भावे कसा शोभतो तेही पाहणे आकर्षणाचा भाग होता.

अखेरीस खॉंसाहेबांच्या रुपात राहूल देशपांडे यांची एंट्री झाली आणि..... उत्स्फूर्त टाऴ्यांनी प्रेक्षागृह
निनादून गेले. 'कट्यार...' मधल्या संवादाची पकड आणि स्वरांचे मधाळ पण धारदार घुसळत जाणारे स्वर प्रेक्षागृहात घुमू लागले. तेव्हाच ही कट्यार रसिकांच्या काळजापर्यंत थेट पोचल्याची पावती मिळाली.

'घेई छंद मकरंद'नंतर टाळ्यांनी दिलेली दाद अणि राहूलच्या रुपात नटलेल्या खॉंसाहेबांची उर्दू मिश्रीत भाषा सारेच ऐकण्यासाठी आतूर झालेले रसिक तृप्त होत गेले. तोच पण नवा पेहराव. वाक्यातली ती खास शैली. संयमीत पण संवादातले वेगळेपण टिपत रंगमंचावर फिरलेली व्यक्तिरेखा पाहताना मन मोहरुन जात होते. यातली नाट्यपदे तो इतरही वेळा गाजवत असे पण आज भूमिकेच्या आकृतीबंधात राहून इतरांना बरोबर घेऊन साकारली जाणारी व्यक्तिरेखा पाहण्यात नाविन्य होते.

राहूल देशपांडे भूमिकेत दिसले छान आणि रंगलेही उत्तम. संगीत रंगमंचावर अशी ताकदीची तीही आजोबांनी गाजविलेली साकारण्याचे शिवधनुष्य त्यांनी सहजी पेलले. तो सूर त्यांनी नेमका पकडून ठेवला होता. नाटक चढत जाताना दारव्हेकरांच्या संवादातली ताकद पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने बाहेर येत होती.

राहूलच्या दमदार गायकीचा अनुभव घेतानाच महेश काळे यांनी सदाशिवाच्या रुपाने साकारलेली भुमिका ठसत गेली ती त्याच्या संथ पण तळपत्या गायन शैलीने. दुसर्‍या अंकात शेवटी 'सूतर पियाकी' नाट्यपदातून दोन गायकींची सुरेल मैफल ऐकताना येणारा आनंद शब्दापलिकडचा होता.


कविराजाच्या भुमिकेत संयमी आणि मोकळ्या संवादाची किनार सुबोध भावेंच्या सहजी अभिनयातून उलगडत गेली. वाक्यांचा तोल संवादातला पोत सांभाळत ते वावरले. दिप्ती माटे( राहूलची बहिण) अणि सौरभ काडगावकर, अमेय वाघ यांनी नटविले चांद-उस्मान हवेलीतल्या सूरांना सांभाळत रसिकांना आपल्याबरोबर घेउन जातात. वेदश्री ओक (उमा) यांच्या लडीवाळ सुरेल पदांनी नाटकाची उंची गाठली.

दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे यांनी नाटकात जिवंतपणा आणला. नेपथ्य, प्रकाशातून साकारलेले चार तासांचे हे नाटक कविराच्या रागमालिकेत गुरफटत नाही. स्वतःच्या रागांची मैफल मांडताना प्रकाशाच्या आणि हालचालीच्या सहाय्याने रागमालिका वेगळीच संगीत अनुभूती देते.

संगीताचा तोच बाज, नाटकाची गती अणि संवादफेकीतली गंमत यातून कट्यारचा प्रयोग एक नवा आनंद देउन जातो यात शंका नाही. महेश काळेया अमेरिकास्थित अभिषेकींच्या शिष्याने गायनात सादर केलेले कौशल्य पाहण्यासाठी ही नवी कट्यार आपल्या काळजात घुसवून घ्यायलाच हवी.
संगीत नाटकाचे हे वैभव, ती भव्यता, ते देखणेपण आणि नाट्यपदातली करामत पाहताना चार तास कसे जातात ते कळतच नाही.

सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, July 29, 2010

ताळेबंद पाहताना..


ताळेबंद मांडताना

कधी शिल्लक पहायची नसते

जगतानाही आयुष्यात

मागे काय उरले पहायचे नसते


जाणीवा जागृत होताना

काय घडून गेले पहायचे नसते

आयुष्य मोजताना

काय राहून गेले पहायचे नसते


वाटेवरचे काटे पहाताना

किती काढले मोजायचे नसतात

पुढचा रुतू नये म्हणून

अनुभवाचा काटा निरखून पहायचा असतो


झाले ते विसरुन
पुढचे धेय्य साधायचे असते

किती उरले

किती राहिले

बाकी न करता

पावले टाकत ,
वळणे घेत

जगायचे कसे शिकायचे असते



सुभाष इनामदार, पुणे


subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, July 27, 2010

व्हायोलिन गाते तेव्हा....


व्हायोलिन गाते तेव्हा....

आपण फक्त ऐकत रहायचे.
गाण्याला ठेका धरायचा. जमले तर ते गाणे गुणगुणत रहायचे.

असाच काहीचा प्रसंग माझ्यावर आला. गाणे आवडते पण ते ऐकायला.

थोडी झलक दाखवा म्हटले की आमचे बिंग उघडलेच म्ङणून समजा.


सांगायचे काय तर परवा स्वरबहार या संस्थेच्या कार्यक्रमाला गेलो.

वा काय एकेक गाणी. गुणगुणावीत अशीच.

पण ती फक्त व्हायोलिनवर.

पुण्याच्या सौ. चारूशिला गोसावी यांच्या

व्हायोलिन गाते तेव्हा...


या गाण्यातल्या कांही कार्यक्रमांची ही एका झलक..

आणि सांगा ती तुम्हालाही आवडलीत ना?


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


बैठकीची लावणी- काहो धरीला मजवरी राग



हिंदी चित्रपट संगीत- बैया ना धरो



मराठी चित्रपट गीत- भावगीत- लेक लाडकी या घरची- चित्रपट- कन्यादान



नाट्यगीत -या भवनातील गीत पूराणे- नाटक - कट्यार




चित्रपट-जगाच्या पाठीवर- तुला पाहते रे तुला पाहते



राग- यमन- जिया ले गयो- अदालत -हिंदी चित्रपट