Wednesday, January 17, 2024
ओ.पी.नय्यर..आठवणी आणि गाणी
ओंकार प्रसाद नय्यर..अर्थात ओ.पी. नय्यर.. यांच्या गाण्यांनी आणि आठवणीने भारलेली मंगळवार संध्याकाळ..!
आपल्या मेलोडियस आणि उडत्या चाली..यातून हिंदी चित्रपटसृष्टीतील या महान संगीतकाराची अनेक गाणी आजही मनावर. आणि ओठावर आहेत.. त्यातलीच काही निवडक गाणी पुण्यात व्हायोलीन मधून अभय आगाशे यांनी तन्मयतेने सादर केली आणि त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाना अधिक हळुवार बनवून शब्दातून तसेच चित्रातून रसिकांच्या मनात ओ.पी. नय्यर यांचा स्वभाव, त्यांची शिस्त त्यांची शैली आणि त्यांच्या आठवणी प्रकाशचित्रकार आणि उत्तम लेखक सतीश पाकणीकर यांनी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमातून ओ.पी. प्रेमी रसिकांच्या मनात रुजविण्याचे उत्तम कार्य करून नवीन पिढीला या संगीतकाराची ओळख करून दिली.
चित्रपट संगीताच्या अभ्यासिका सुलभा तेरणीकर सतीश पाकणीकर यांच्याविषयी माहिती देत त्यांचे नय्यरप्रेम किती आहे याविषयी बोलून त्यांना शुभेच्छा दिल्या.
ओपिंचे संगीत म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा हॅपिनेस इंडेक्स..असा उल्लेख करून सतीश पाकणीकर सांगतात.. बसल्या जागी तुम्हाला उड्या मारायला लावेल असे ते संगीत आहे..मेलोडीयस आणि रिदमकिंग असलेले ओ.पी. हे त्यांना त्यांच्या बरोबर काम केलेले संतूरवादक शिवकुमार शर्मा त्यांचे वर्णन करीत.
ओ.पी. नय्यर यांच्या कॉफी टेबल पुस्तकाच्या निमित्ताने सतीश पाकणीकर यांना त्यांचा सहवास लाभला त्यातून ते व्यक्ती म्हणून आणि संगीतकार म्हणून कसे आहेत हे जवळून अनुभवण्याची संधी मिळाली..नय्यर यांच्या जन्मदिवसाच्या निमीत्त विवेक पाध्ये यांच्या सहकार्यातून कार्यक्रम करताना त्या साऱ्या आठवणी त्यानी रसिकांच्या हृदयात कोरल्या. इथे आठवणी आणि गाणी असा अनुभव टिपण्या सारखा होता..म्हणूनच याची दखल घेणे अत्यावश्यक होते .
संगीतकार..एक व्यक्ती म्हणून आणि कलकार म्हणून इतर वादकांना आणि गायकांना कसा मान देतो त्याची उदाहरणे इथे अधिक बोलकी झाली..
पाकणीकर बोलत होते..आठवणी विस्तृत सांगत होते.. गाणी अभय आगाशे आपल्या व्हायोलीनमधून सादर करून शब्द शब्द ..मनात .. स्वरातून बोलते करत होते..
अतुलकुमार उपाध्ये यांचेकडे व्हायोलीनची तालीम घेतलेल्या अभय आगाशे यांनी आपल्या वादनाने गाण्याना अधिक नेटकेपणाने शब्द नसताना बोलके केले..
त्यांना अनुजा आगाशे, प्रसाद जोशी, दिलीप व्यास आणि रोहित साने या सहवादकांच्या उत्तम साथीने गाणे एकाग्रतेने खुलवत होते..
प्रत्येक गाण्याचे सादरीकरण पुनःप्रत्ययाचा
आनंद देत होता..
गाणी सादर होताना पडद्यावर ओ.पी. ..चित्रपट, त्यातील कलाकार, आणि गाण्यात वादन केलेले कलावंत खास करून सतीश पाकणीकर यांनी दाखवून त्याचे महत्व अधिक ठळक केले.
आइये मेहरबाँ, बाबूजी धीरे चलना, आखों ही आखोमें इशारा हो गया... आवो हुजुर तुमको,छोटासा बालमा, सून सून सून जालिमा, इशोरो इशारोमे.. तुमसा नहीं देखा. पासून दिवाना हुआ बादल पर्यंत सोळा गाण्यांचा नजराणा इथे पेश झाला..
व्हायोलीन या वाद्याची उत्तम पकड ..गाण्यातील नेमकेपणा आणि त्यातले बारकावे अभय आगाशे यांच्या सादरीकरणात स्पष्ट दिसले..
रेकॉर्डिंग साठी आलेल्या वादकांना लगेच पेमेंट करणारे..वेळ पाळणारे..त्यातही देलेला शब्द पाळणारे..पण आयुष्याच्या उत्तरार्धात अधिक खडतर आयुष्य भोगणारे..तरीही आपला आब आणि रुबाब सांभाळत , हिंदी न येताही उर्दू भाषेतून का करणारे उत्तम काव्याची जाण असणारे तसेच कधीही कुणापुढे न झुकणारे ..आपल्या मस्तीत हिंदी चित्रपटसृष्टीत राज्य करणारे महान संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे उदाहरण आदर्श म्हणून कसे होते..ते या आठवणीतून आणि व्हायोलीन मधून सादर झालेल्या अनुभवातून सिध्द झाले.
कार्यक्रमासाठी हेमंत पाकणीकर आणि रवी केळकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
केवळ ओ.पी. प्रेमींना नव्हे तर हिंदी संगीताचे जाणकार असणाऱ्या रसिकांना असे कार्यक्रम हे आनंद आणि समाधान देतात..
अतिशय अभ्यासपूर्ण असलेल्या या कार्यक्रमाचे पुन्हा विविध गावात सादरीकरण व्हायला हवे आहे.
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)