
काळाची पावले ओळखून अभिनयाने जिवंत केलेले नाटक
काळ बदलला. तरूण वर्ग स्वतंत्र झाला. मुली स्वतःच्या मताने निर्णय घेऊ लागल्या. घर आपले...राजा-राणीचे हवे. दोघेही नोकरी करणारे. पैसा बक्कळ.. कपड्यात बदल झाला. सारे कसे मोकळे-ढाकळे आले.
जमाना इंटरनेट, लॅपटॉपचा आला. घरात स्वयंपाकापेक्षा बाहेरून पार्सल मागविले की झाले...
घराची सजावट बदलली ..तरी घराला भिंती हव्यातच. प्रायव्हसी म्हणतात ती.
लग्ना आधीचे सारे लग्नानंतर चालत नाही. पतीला मैत्रीण चालते ..
पण पत्नीला मित्र असणे हे बरे नव्हे.... ते न शोभणारे....
सांगायचे तात्पर्य....हे गडी नवे पण राज्य तेच जुने... पण नव्या कोंदणात सजविलेले....
तसे सांगायचे म्हणजे संशयकल्लोळ हो...
नवा गडी नवे राज्य....ह्या नाटकाने आपला शतकमहोत्सवही साजरा केलाय. उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या भुमिकांनी नाटकाला जिवंतपणा येतो... खरं म्हटले तर हे आजच्या काळाचे नाटक आहे.. जुनी पल्लेदार वाक्य नाहीत. स्वगते नाहीत. एकाच वेळी बराच काळ चालणारे प्रसंग नाहीत. वाक्यांना मराठी भाषेची पारंपारिक चौकट नाही..नवे शब्द आहेत. वाक्यांची गरज फक्त सांगण्यापुरती त्याला भाषेची झालर हवी कशाला?
एकूणच मालिकांमध्ये जसे तुकड्यांनी घटना पुढे जाच रहातात तसेच काहीसे छोटे प्रसंग. कांही बेडरूम प्रसंग. तसे बोल्ड. पण नाटकाला आवश्यक. आणि स्पष्ट सांगायचे झाले तर या नाटकाने तरूणाईचा वर्ग रंगमंदिराकडे खेचला गेला आहे. नाटकाला बुकींग चांगले होते. आणि दुसरे म्हणजे उमेश कामत, प्रिया बापट यांचा इस्टंट अभिनय पहायला मिळतो. दोघांचेही चेहरे बोलतात. भावना दिसतात. त्याला प्रेमाचा स्पर्श होतो. नाते अधिक फुलून येते.
एकदंत क्रिएशन्सने रंगमंचावर आणलेले नाटक समीर विध्वंस यांनी ज्या नेमक्या रितीने ते दिग्दर्शित केले आहे. नाटकाला गती दिली. गेयता आणली. प्रसंगाला सतत हलते ठेवले. कलावंतांना पुरेसे मोकळे सोडले. आणि परिणामकारक प्रयोग सादर करण्यात ते यशस्वी झालेत.
क्षितीज पटवर्धन यांनी हृषीकेश (उमेश कामत) आणि अमृता( प्रिया बापट) ह्या नवीन लग्न झालेल्या तरूण जोडप्यात उद्भभवलेल्या संसारातली ही मित्र कहाणी लिहली आहे ती संवादात कागदावर उतरवली आहे..क्षितीज पटवर्धन यांनी. चटकदार संवाद. त्याक्षणी चपखल वाटतील अशी वाक्ये. अधुनिक जोडप्यांना काळजात नेमकी घुसतील अशी शब्दरचना...यामुळे नाटक तुमच्यासमोर खिदळत रहाते.
पुरूषवर्गाला प्राधान्यक्रम देणारी आणि शेवटी ही सारी संशयाची धार शुल्लक करणारी ही घटनाक्रमाने सांगणारी काहीशी नाटकी कृत्रिमता नाटकाला सिनंमातल्या पटकथेचे रूप देते. एकमेकांना लग्नापूर्वीपासून ओळखणारे हे आधिचे प्रेमिक जेव्हा पती-पत्नी बनतात..तेव्हा पहिले काही दिवस सोडले तर संशयवाढविणारे जातात. अमृताचा मित्र हिम्मतराव जेव्हापासून घरी येतो..तेव्हापासून त्या दोघांची मैत्री तशीच खुल्ली..तीच खटकचे...नाटकाला तीथेच सुरवात होते. संशयाने सारा खेळ..पालटतो. वातावरण गंङीर बनत जाते...आणि शेवटी हे सारे संशयाचे बळी ठरतात..हे सिध्द झाल्यावर सुखांताने शेवट होतो.
त्यातच पुरूषाची जुनी मेत्रीण घरी आल्यावर तिने केलेले दावे ऐकल्यावर संसारातील दोघांनीही संयम सोडल्याचे नाटकलेखक दाखवितो. पुरूषी अहंकाराला सांभाळताना स्त्रीच्या दुख-या मनालाही तो फुंकर घालतो. कहाणी रंगवताना त्याला भावनेचा तात्पुरता मुलामा दिल्यासारखे वाटते. इथे हे नाटक काही सांगते म्हणून पहायाला जावू नका... ते तुमची करमणूक फुल्ल टाईमपास करणारे आहे... जुनाच विशय नवीन बाटतील भरून पुन्हा ताज्या दमाच्या कलाकारांकडून तुमच्यापर्यत आणलाय एवढेच.
मोकळेपणानी वावरणारी ही पात्रे तुम्हाला खुशीत ठेवतात. भावनेला हात घालून प्रसंगी तुमच्या डोळ्यात पाणीही आणतील... पण हे कसब आहे ते कलावंताचे. उमेश कामत, प्रिया बापट यांची जोडी रंगभुमिवर नवे राज्य गाजविणार हे सांगण्यासारखी मस्त दिसतात.. छान दिसतात. मोकळी वावरतात. त्यांच्या अबिनयात सहजपणा आहे. संवादात विलक्षण साधेपणा आहे. सफाई आहे. चेह-यावर बोलके भाव आहेत. चटका लावणारी मुद्रभिनयाची ताकद दोघांकडेहगी आई. म्हणूनच तेच या नाटकाचे खरे आकर्षण आहे.
हेमंत ढोणेंचा हिम्मतराव विलक्षण वेगळा..ग्रामिण मातीचा गंध घेऊन आलेला. रसरशीत , तरतरीत आणि गंमत सहजपणे कशी करावी ते सांगणारा वठलाय.त्यामानाने प्राजक्ता दातार थोड्या डाव्या वाटतात. त्याकेवळ भूमिका करतात.. त्या अंगावर येत नाहीत.
प्रसाद वालावरकारांच्या नेपथ्यातून आजचे मुंबईतले श्रीमंती घर , त्यातले महागडे रुप..सारेच दिसते. भासते. रंगसंगती उत्तम आहे. जसे पडद्यावर साकारणे गीत कथेला पूरक असते तसे ऋषीकेश कामेरकरांचे संगीत आणि त्यांनी तयार केलेले गीत नाटकाला मोहकता देते.
शितल तळपदे यांची पूरक प्रकाश योजना प्रसंगाना अदिक उठाव देते.
चंद्रकांत लोहकरे यांनी निर्मित केलेल्या या नाटकाने अजच्या काळाला पटेल. रुचेल आणि आवडेल असे नाटक देऊन नाटक हलकेफुलके आणि योग्य विषयावरचे आणले तर ते पेक्षक नक्कीच आपले मानतात याचे दर्शन घडविले आहे...
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com