
काव ...काव ... खारे पाटणजवळच्या नानिवड्यातील चार मुले ही हाक देऊन कावळ्याला हाकारा देत होती. घराच्या मागच्या शेतीच्या भागातच ९२ वर्षांच्या आजींचा दहावा केला जात होता. पंचक्रंशीत एकच भटजी त्याच्या वेळेनुसार सारे विधी होत होते. सर्व आप्तजन नातेवाईक यांनी पिंडाला नमस्कार केला. सुना नातवांनी आजीला जे आवडते असे वाटते ते शेजारी ठेवले. आता त्यांच्या मनासारखे सारेच झाले असावे. कोणतीही इच्छा अपुरी राहिली असे वाटत नाही. सगळे काही मिळाले. असेच आपसात कुजबूजत होते.
अखेरचे महणजे कावळ्याने पिंडाला शिवण्याचे काम अधुरे होते. कोकणातल्या परिसरातल्या त्या इतरवेळी निसर्गरम्य वातावरणाला भावनेची काळी नजर लागल्यासारखे भासत होते.
गुरूजी बाजू झाले. भाताचा तयार केलेला पिंड कावळ्याने येउन टोच मारावी व तो खावा यासाठी बाजूस ठेवला होता. तसे केले तरच आईच्या इच्छा पूर्ण झाल्या असे मानले जाणार होते.
भाताच्या शेतीच्या एका मध्यभागच्या मोकळ्या शेतात. नारळ, आंब्यांच्या उंच वाढलेल्या वृक्षातून कावळे येतील आणि पिंडाला शिवतील अशी आशा होती. आरंभी कावळ्यांची सावलीही दिसत नव्हती.आजींची ७०-६० वयाची मुले आता कावळ्यांनी यावे आणि आपल्या आईच्या पिंडाला शिवावे यासाठी हाका मारायला लागली...काव..काव.. काव.....
पण कावळे कुठेले. इतर पक्षांच्या किलबीलाटाने शेतीचा परिसर या भर दुपारी साडेबारच्या शांततेचा भंग करीत होता. पण कावळा मात्र दिसत नव्हता. आता मात्र हाका मारणा-या मुलांनी आर्ततेने कावळ्याची आराधना चालू ठेवली. इतरही सुना-मुली आईच्या इच्छेची आठवण करत हात जोडून प्रार्तना करीत होत्या. पण कुठले काय... कावळे मात्र दिसत नव्हते.
तासाच्या प्रतिक्षेनंतर यांच्या हाकामारण्याने म्हणा किंवा कसे झाडांच्या आडून तीन कावळ्य़ांचे आगमन झाले. पण ते खाली इतरून पिंडाला शिवतील असे चिन्ह नव्हते. वरून घिरट्या घालत होते पण पिंड जिथे ठेवला होता तिथे फिरकायला तयार नव्हते. तिस- चाळीस नातेवाईक मंडळी हे सारे चित्र निमूटपणे पहात होती. आलेले भटजी निवांतपणे घराच्या सावलीत कावळी शिवला की मग मला सांगा अशा स्थितीत घरात निवांत होते. वर घरातल्या बाईमाणसांशी चर्चा करण्यात ते सामिल झाले होते. या गावात ना कावळा फारसा कुणालाच शिवत नाही, काय़ समजले.पण ती वयाने ज्येष्ठ असलेली मुले जिवांच्या आकांताने कावळ्याची आर्तपणे वाट पहात होती. कावळा शिवल्याशिवाय दहाव्याचा विधी पूर्ण होऊ शकत नव्हता. तोपर्यंत कुणी मुखी काहीच टाकू शकत नव्हते. त्याही स्थितीत ज्यांना गाडी पकडायची होती ते पुन्हा एकदा पिंडाला नमस्कार करून चालते झाले.
कावळ्यांना किती महत्व आहे. ते मला तिथे जास्त जाणवले. पुण्यात ओंकारेश्वरावर कावळ्यांची फौज दहाव्याचे पिंड खायला तयारच असते. पिंड ठेवायचा अवकाश टोच मारून ते सारा भात फस्त करतानाचा अनुभव पंधरादिवसांपूर्वींच घेतला होता. आणि इथे मात्र कावळ्यांची चाहूलही नव्हती. तसे पहायला एका झाडावर कावळा दिसत होता पण तो पिंडाला शिवायला तयार खाली येतच नव्हता.
दोन तासाच्या कावळ्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेरीस दर्भाचा कावळा करून पिंडदान केले गेले. सर्वांनी तिलांजली दिली. आमच्या वडिलांच्या वेळेसही असेच झाल्याचे त्यांचा एक मुलगा म्हणाला देखील. पोटात कावळे भुकेने व्याकूळ झालेले पण प्रत्यक्षात कावळे यायला ही स्थिती. तेव्हा भूकेने कावळे ओरडतात हे काय तेव्हा प्रत्यक्षात उमजले.
खरच, तेव्हाच मी ठरवून टाकले की ... आपणही सांगून टाकायचे. माझ्या बाबतीत असे काही करू नका.
पण हे झाले माझ्यापुरते. मात्र एक नक्की श्रध्दा मग ती अंध का असेना अनेक जण आजही अधुनिक युगात ती पाळताहेत. आणि तीही डोळे उघडे ठेऊन . माणूस मेल्यानंतर काय होते... याचे संशोधन सुरू आहे. पण अधुनिक युगातला माणूस प्रत्यक्षात आपल्या घरात असे काही घडले की जनइच्छेमुळे म्हणा किंवा इतरांसाठी... सारे क्रिया-कर्म जुन्या चालीरितीप्रमाणे आजही करत आहे. मग ते देहदानाचे मृत्यूपत्र केलेला माणूस का असेना घरचे आजही पुढचे संस्कार लोक-लज्जेस्तव हे सारे विधी करत असतो.
जे पाहिले ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा कुणाच्या भावनेशी केलेला खेळ नक्कीच नाही.
मात्र यातून जे पाहिले ते सांगावे यातून काहीतरी चर्चा व्हावी आणि यावर कुणाचे काही मत असल्यास पहावे म्हणूनच हा प्रपंच.
.यातून कुणाला क्लेष झाला तर तर मी त्यांची माफी मागतो. तुमची मते मात्र अवश्य नोंदवा......
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamar@gmail.com
9552596276