भावगीताला स्वतःच्या स्वतंत्र प्रतीभेची ओळख करून देणारा शांत निर्मळ स्वर आज त्या दूर देशा निधून गेला. गजाननराव वाटवे या व्यक्तिमत्वाची आठवणच उरली.
सोपी आणि सुबोध चालीतून कवीतेतल्या शब्दांना रसिकांच्या ऱ्हदयी घालणाऱ्या या महान संगीतकाराला अखेरचा सलाम.भावगीतात स्वतःचे युग निर्माण करताना नविन कवींना आणि त्यांच्या कवीतांना निवडून त्यांना चाली देण्याचे मोठे काम वाटव्यांनी केले.
व्यक्तिमत्वातला साधेपणा त्यांच्या चालीतूनही बाहेर येत होता. निगर्वी आणि अतिशय साधा कलावंत म्हणून त्यांची ओळख कायम मनात ठसली.गाण्याच्या नवीन कार्यक्रमाला वाटवे नेहमीच हजर असत. तरूण कलावंताला सतत सल्ला देताना त्यांनी कधीही आळस केला नाही.
काळी पॅंट . खोचलेला पांढरा शर्ट आणि काळा कोट घातलेले वाटव्यांचे व्यक्तिमत्व सदा प्रसन्न असे. छाप पडावी असे व्यक्तिमत्व नसले तरी रसिकांच्या प्रेमाने त्यांना नेहमीच उत्साह वाटे.
एके काळी मेळ्यातून गाणी म्हणणारे वाटवे गाजले ते गणपती उत्सवातल्या भावगीतांच्या कार्यक्रमातून. "कसा ग बाई केला, कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल आंबडा" म्हणताना ती लडीवाळता त्यांच्या सूरातून रसिकांना मोहवीत गेली. "गगनी उगवला सायंतारा" सारखी काव्ये वाटव्यांच्या स्वरांनी अजरामर झाली. त्यांच्या आवाजाचा पोत तरल, साधा आणि शांत स्वरांची बरसात करणारा होता.
त्यांच्या गायकीत तो आवेश नव्हता. मात्र गाताना तल्लीनता इतकी जे गातील त्यात वाटव्यांचा टच जाणवत होता.गेले कांही दिवस तब्येतीमुळे सार्वजनिक कार्यक्रमाला ते येत नसत. पण जे भेटायला जात त्यांच्या कडे नवीन काय चालू आहे याची विचारणा नक्कीच व्हायची. मध्यंतरी एच एम व्ही ने वाटव्यांच्या दुर्मिळ भावगीतांची सीडी काढली तेव्हाचा तो शेवटचा जाहिर समारंभ असावा. त्यांच्या बोलण्यात गहिवर होता. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाने भारून गेल्याचे समाधान होते. आयुष्याचे सार्थक झाल्याची जाणीव होती. एकूणच ते तृप्त होते.
मध्यंतरी त्यांना बोलता येत नव्हते. मात्र कागदावरचा संवादातून ते प्रकट होत होते.समईतल्या मंद प्रकाशा सारखा त्यांचा स्वर भावगीतांना उजळून गेला. नवकवींना प्रसिध्द करवून गेला.
नवीन गायकांना आदराचे स्थान असणारे गजानन वाटवे आज अखेरच्या प्रवासाला निघालेत. त्यांच्या सोज्वळ स्वरांना. भारावलेल्या सूरांना आणि कायमच रसिकांच्या मनात घर केलेल्या थोर व्यक्तिमत्वाला ही शब्दरूप भावांजली!
सुभाष इनामदार, पुणे
email- subhashinamdar@gmail.com