Monday, December 19, 2022

सवाई गंधर्व ६८ वा.असा झाला

सवाईच्या पहिल्या दिवसाची निरीक्षणे..!
करोनाच्या कालावधीनंतर पुण्यातील संगीत रसिकांसाठी ६८ वा सवाई भीमसेन महोत्सव बुधवारी मुकुंदनगर भागातील महाराष्ट्रीय मंडळाच्या शामियानात पुन्हा सुरू झाला.. यंदा प्रथमच संपूर्ण महोत्सवासाठी एकच तिकिटाचा पर्याय आर्य संगीत मंडळाने ठेवला आहे.. त्यामुळे म्हणा किंवा बदललेल्या काळाची दखल म्हणा पहिल्या दिवशी बऱ्याच खुर्च्या आणि भारतीय मंच रीता दिसत होता.. रसिक होते पण भरपूर आस्वादक गैरहजर होते.. मंडपात लांबवर मंचावर बसलेल्या आणि खुर्च्यातून आस्वाद घेणाऱ्या रसिकांना मंचावरील गाणे ऐकायला येत होते..पण कलाकार जवळून पहाता येत नव्हते.. चार स्क्रीन होते पण ते लांब होते.. बाहेर अनेक विक्री मंडप रीते दिसत होते.. नाही म्हणता खाद्य पदार्थांना अधिक मागणी होती.. उपेंद्र भट, शाश्वती मंडल, रतन मोहन शर्मा आणि उस्ताद अमजद अली खाँ.. हे चार कलावंत पहिल्या दिवसाचे आपले सादरीकरण उत्तमोत्तम करीत होते. पण रात्री दहाला कार्यक्रम संपविण्यासाठी सादरीकरणात मर्यादा दिसत होती.. अमजद अली खाँ यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांना हे वेळेचे बंधन शिथिल करण्याचे जाहीर आवाहनही केले.. त्यामुळे कलावंत मनसोक्त कला सादर करू शकत नाही याची खंत व्यक्त केली. असो.. पहिला दिवस.. वत्सलाबाई भीमसेन जोशी यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांना प्रदान करण्यात आला.. त्यांच्या गायनातील रंगत रसिकांनी अनुभवली.. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल यांचे तयारीचे रसिकांनी अनुभवले. रतन मोहन यांची भक्तीमय शैली आणि स्वरातला भाव आवडला..त्याला दाद मिळाली.. सादरीकरणात उस्ताद असलेले सरोवादक अमजद अली खाँ..यांची संवाद साधत रसिकांना आपलेसे केलेले वाद्यवादन..ही खरी मौज संगीत रसिकांनी दिलखुलापणे अनुभवली.. निवेदक आनंद देशमुख यांची नेमकी टिपणे आणि आवश्यक तेव्हढेच बोलणे आणि सतीश पाकणीकर यांची भीमसेन शक्ती याची खास नोंद घ्यावी वाटते. सवाई महोत्सवातील संगीत वातावरण असेच भारलेले असते..ते शब्दात सामावू शकत नाही..ती अनुभूती. प्रत्यक्ष घ्यावी अशीच असते.. यंदा पाच दिवस हा स्वरयज्ञ सुरू रहाणार आहे.. पाहू या गुरुवारी कशी निरीक्षणे नोंदता येतील ते.. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ..दुसरा दिवस.. अविनाश कुमार या तरुण गायकाने आरंभ केला.. पण उपस्थित रसिक इथे अभावानेच इथे दिसत होते.. त्यांच्या गाण्याचा परिणाम फारसा दिसला नाही.. पहिले दोन तास अगदी आलम खाँ यांच्या सरोद वादना पर्यंत रसिक तुरळक दिसले.. मैहर सेनी घराण्याचे सुप्रसिद्ध सरोदवादक आलम खाँ यांचे सरोदवादन झाले. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यासाठी साथ केली. माहौल बहरला तो पंडित साजन मिश्रा आणि करोना काळात गमावलेले ज्येष्ठ गायक राजन मिश्रा यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा यांचे स्वरमंचावर आगमन झाले आणि रसिकात वाढ झाली.. विस्कळीत झालेले रसिक मुख्य मंडपात गायनाचा आस्वाद घेण्यासाठी एकत्र आले आणि दादही तशी मिळाली.. शताब्दी स्मरण या सतीश पाकणीकर यांच्या भातरत्न भीमसेन जोशी यांच्या विविध मुद्रा आणि मागील सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचेसोबत विविध जागतिक कीर्तीच्या गायकांबरोबर काढलेल्या स्मृती असलेल्या सुमारे ७५ छायाचित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक रसिक इथल्या खास दालनात येत होते.. चित्र काढू नका हे लिहूनही अनेकजण ते चित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपताना दिसत होते. आनंद देशमुख भीमसेन जोशी यांच्यावरील काही निवडक ठळक गोष्टी लोकांसमोर आणत होते.. साजन मिश्रा यांना साथ करणारे हार्मोनियम वादक उशिरा आल्याने भीमसेन जोशी यांच्या आठवणी रसिकांच्या मनात रुजविण्यासाठी या वेळेचा सदुपयोग केला गेला.. आज पुण्याचे पालकमंत्री येणार असल्याने इथे सुरक्षा अधिक सतर्क झाल्याचे दिसले. इथल्या भव्य मंडपात रसिकांना कलावंताचा आवाज सर्व दूर नीट ऐकू यावा यासाठी स्वरांजलीचे प्रदीप माळी यांचा सतत प्रयत्न दिसत होता. या महोत्सवात 'राजहंस प्रकाशन'तर्फे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे लिखित 'गान गुणगान - एक सांगीतिक यात्रा' या पुस्तकाचे प्रकाशन श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाशक दिलीप माजगावकर उपस्थित होते. छायाचित्रकार लोकप्रिय कलावंतांची छबी मिळविण्यासाठी रसिकांमध्ये मिसळून प्रयत्न करताना दिसत होते.. विशेषतः विदुषी डॉ. एम राजन, संगीता शंकर ,रागिणी व नंदिनी यांचे एकत्रित चित्र मिळावे यासाठी चाललेली धावपळ दिसत होती.. दुसरा दिवस रसिकांच्या मनात रुजविला तो साजन आणि स्वरांश मिश्रा यांनी..तर यावर कळस केला तो डॉ. एम राजन आणि त्यांच्या कन्या आणि नातींच्या उत्तम वादनाने.. चार व्हायोलिनची एकत्रित सुरावट मनात साठवीत आज भारलेल्या तृप्ततेने घरोघरी गेला.. आणि रसिकांची आठवण काढत एम राजमही भारावल्याचे जाणवले.. सवाईचा तिसरा दिवस..लक्षणीय! ६८ वास सवाई गंधर्व संगीत महोत्सव रंगतदार होत जाणार हे आता नक्की झाले.. पुण्यात, महाराष्ट्रात,देशात आणि परदेशातही कीर्ती पोचलेला हा स्वरमंच अनेकविध घटनांनी आणि कलाकारांच्या हजेरीतून लक्षात रहात आहे.. बाहेर उन्हाचे सावट असताना उपस्थित रसिकांना आपल्या उत्तम ,कोमल आणि तयारीच्या सुरावटितून गुंतवून ठेवण्यात मनाली बोस या कलाकार यशस्वी झाल्याचे दिसले.कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांनी राग मारवामध्ये एकतालात हळूवार सादरीकरणाने आपल्या गायनाची सुरवात केली. त्यानंतर 'अब काहे सतावो जावो...' हा गारा व पिलू रागातील मिश्र दादरा व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे लोकप्रिय भजन 'बाजे रे मुरलिया बाजे' सादर केले. त्यांना अभिनय रवांदे (हार्मोनियम) पांडुरंग पवार (तबला) यांची संगत लाभली. संध्याकाळचा हंसध्वनी रागाने मेजवानी दिली ती तरुण आणि उत्तम संतूर वादक राहुल शर्मा यांनी.. पुणेकरांचे कौतुक करून त्यांनी आपल्या वादनातले सौंदर्य रसिकांच्या हृदयात उतरविले.. आलाप, जोड, झाला आणि दृत तीनताल त्यांनी सादर केला. मिश्र खमाज धूनमध्ये दादरा आणि तीनताल सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना ओजस अढीया (तबला) यांनी अतिशय समर्पक साथ केली. मध्यंतरात रसिकांचे पाय आजूबाजूचे वातावरण टिपत टिपत.. चहा.. कॉफी आणि खाद्यपदार्थ दालनाकडे वळताना दिसत होते.. बाहेर उभे केलेले भीमसेन जोशी यांच्या भव्य फलकाकडे आकर्षित होऊन त्यासोबत आपली छायाचित्र काढण्यात काही धन्यता मानत होते.. इकडे मंडपात भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि या महोत्सवाचे प्रमुख श्रीनिवास जोशी यांचे स्वरमंचावर आगमन झाले.. त्यांनी बिहाग रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. संत कबीर यांची रचना असलेला आणि जोशी यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या 'गुरुविण कौन बतावे बाट' या भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. अविनाश दिघे (हार्मोनियम), पं.रवींद्र यावगल (तबला),गंभीर महाजन (पखावज) आणि माऊली टाकळकर (टाळ) यांनी त्यांना साथ केली. मंचावरून झाली उतरलेल्या अवघ्या ९६ वर्षांच्या माऊली टाकळकर यांच्यावर प्रेमाचा वर्षाव त्यांचा सत्कार करून केला गेला. रसिकही त्यामुळे भारावून गेले होते.. आपल्या निवेदनाची तिशी पूर्ण करणारे आनंद देशमुख यांच्या आवाजाची जशी रसिकांना सवय झाली आहे तशी गायकांच्या पिढ्याही त्यांच्या निवेदनाने कशा इथल्या स्वरमंचावर अवतरल्या याची एक यादीच देशमुख यांनी इथे सादर करून.. ही महान शास्त्रीय संगीत परंपरा इथे जपली जात आहे याचे उदाहरण त्यांनी प्रस्तुत केले. उपस्थित रसिकांमध्ये आज पुण्याच्या विकासात ज्यांचा वाटा आहे असे माजी खासदार सुरेश कलमाडी सौ. मीरा कलमाडी यांच्यासह ठळकपणे दिसले.. तर काही काळासाठी शिवसेनेच्या नेता आणि उपसभापती निलमताई गोरे हजर होत्या. आजच्या दिवसाची सांगता अभ्यासू आणि कलावंत घडविणारे श्रेष्ठ गुरू पं. अजय चक्रवर्ती यांच्या भारदस्त गाण्याने झाली.. उपस्थित तरुण कलावंत यांना मार्गदर्शन करून ह्या महोत्सवात येण्याचा बहुमान मिळायला भाग्य लाभते ते लाभल्याने..ह्या भिमतिर्थाला त्यांनी वंदन केले. सादरीकरण करताना वेळेचे गणित आखून त्यांनी बरोबर दहा वाजता आपली सेवा थांबविली.. त्यांनी राग बागेश्रीने गायनाला सुरुवात केली. सुरेल गायकी अन् त्याला साजेसे वादन यामुळे चक्रवर्ती यांची मैफिल उत्तरोत्तर रंगली. त्यानंतर चक्रबर्ती यांनी पहाडी राग सादर केला. अजय जोगळेकर (हार्मोनियम), ईशान घोष ( तबला), मेहेर परळीकर आणि सौरभ काडगावकर यांनी त्यांना साथसंगत केली. वेळेची मर्यादा आता घालू नये अशी विनंती करायला ते विसरले नाहीत.. धीरगंभीर स्वराचे वलय निर्माण करत त्यांनी आपले गायन संपविले. सवाईचा चौथा दिवस.. रसिक भारावलेले...! दुपारी तीन ते रात्री बारा अशी मोठी पर्वणीच सवाईच्या रसिकांना शनिवारी लाभली.. सुरवातीपासूनच इथे रंग भरत गेला.. यशस्वी सरपोतदार यांचे आक्रमक आणि तेजस्वी स्वरांनी लपेटलेले गायनाने श्रोता खुश झाला.. उत्तम स्वरलगाव आणि मनाला आनंद देणारे गायन सादर करून त्यांनी स्वरमंचाला मोहित करून टाकले. हरकती आणि लयकारी यांचा सुंदर मेळ त्यांच्या सादरीकरणात पाहायला मिळाला. या महोत्सवात पहिल्यांदाच या व्यासपीठावर कला सादर संधीचा उत्तम फायदा त्यांनी करून घेतला.‘रंग डारूंगी नंद के लालन पे...’ या होरीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप करून रसिकांची मने जिंकली. त्यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), पं. रामदास पळसुले (तबला) यांची उत्तम साथ मिळाली. भोपाळच्या मातीत आपली ध्रुपद गायकी विकसित करणारे पं. उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंडेचा ह्या काका पुतण्याच्या जोडीने सवाईत आलेल्या प्रत्येक श्रोत्यांच्या मनात आपला ठसा कायम केला.. ओम तोम ची या गायनातील परंपरा त्यांनी आपल्या शैलीतून उत्तम सादर केली. धीरगंभीर आणि आक्रमक हे एकाच गायनातले कौशल्य त्यांनी सहज साध्य केले आहे.. उमाकांत गुंदेचा सांगतात..धृपद हा गायनाचा प्राचीन प्रकार असून, सामवेदातून त्याची निर्मिती झाली असल्याचे मानले जाते. २००४ साली भोपाळ येथील आमच्या धृपद संस्थान या गुरुकुलचे उद्घाटन पंडित भीमसेन जोशी यांनी केले होते. गुंदेचा यांनी राग चारुकेशीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी पारंपरिक आलाप, विलंबित, मध्यलय अर्थात आलाप जोड झाला यांचे दमदार सादरीकरण केले. यानंतर त्यांनी चौदा मात्रेतील धृपद धमार प्रस्तुत केला. राग अडाणामधील ‘शिव शिव शिव शंकराधिदेव...’ या शिवस्तुतीने अधिक समाधान दिले. त्यांना बंधू पं. अखिलेश गुंदेचा व ज्ञानेश्वर देशमुख यांनी पखवाजवर कमाल केली. आज आठ कलावंतांनी महोत्सवाची रंगत अधिकाधिक वाढविली.. आजूबाजूचा परिसर आणि मंडपातील रसिकांची गर्दी त्याची साक्ष देत होती.. आग्रा घराण्याच्या गायिका भारती प्रताप यांनी राग श्री ने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी ‘सांज भई...’ ही विलंबित एकतालातील रचना प्रस्तुत केली. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या पुरंदरदास यांच्या कानडी अभंगाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना अभिनय रवांदे (संवादिनी), रविंद्र यावगल (तबला) यांची साथ लाभली. विराज यांच्या गायनाने विराट दर्शन! भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यांनी सवाई मध्ये जमलेल्या तरुण कलाकारांना प्रेरणा देणारे तयारीचे गायन सादर करून आपलेसे केले.. रसिकांना त्यांनी आजोबांच्या गायनाची झलक दाखविली. किराणा घराण्याचे उदयोन्मुख गायक असलेल्या विराज जोशी यांनी राग मारुबिहागने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. पं. भीमसेन जोशी यांच्या ‘संतवाणी’ या कार्यक्रमाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचेच औचित्य साधत त्यांनी अजरामर केलेल्या भक्तीसंगीताची झलक विराज यांच्या गायनाने रसिकांनी अनुभविली. अविनाश दिघे (संवादिनी), पांडुरंग पवार (तबला), सुखद मुंडे (पखावज) व माऊली टाकळकर (टाळ), अपूर्व द्रविड (तालवाद्य) तर राहुल गोळे (ऑर्गन) यांनी साथसंगत केली. पुन्हा एकदा माऊली टाकळकर यांच्याविषयीच्या प्रेमाला उधाण आल्याचे पहायला मिळाले. गायक सिड श्रीराम यांनी कर्नाटक शैलीतील संगीताची सुरेल अनुभूती उपस्थितांना दिली. श्रीवल्ली या अलीकडेच गाजलेल्या गीताने सीड श्रीराम तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्या कर्नाटक संगीताच्या प्रस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भाषा न कळूनही सवाईतील रसिकांनी त्यांचे गायन अनुभवण्याचा प्रयत्न केला. त्यांना राजीव मुकुंदम (व्हायोलिन), जे. वैद्यनाथन (मृदंगम्), डॉ. एस. कार्तिक (घटम्) यांची उत्तम साथ मिळाली. आज मंडपात आणि बाहेरही रसिक या संगीत वातावरणाचा आस्वाद मनसोक्तपणे घेत असल्याचे चित्र होते.. मुकुंद संगोराम लिखित ‘सूरश्रेष्ठ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी व सुरेश एजन्सीचे शैलेंद्र कारले यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक असलेल्या गिरीश संझगिरी यांनी पंडित फिरोज दस्तूर यांच्या जीवनावर लिहिलेला चरित्रग्रंथ ‘घट घट में संगीत समाये’ याचे व ‘चंद्रमुखी’ या संझगिरी यांच्या स्वरचित बंदिशीचे पुस्तक यांचे प्रकाशनदेखील यावेळी करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक उस्ताद राशीद खान व सतारवादक उस्ताद शाहीद परवेज या दोन सुप्रसिद्ध कलाकारांच्या जुगलबंदीने महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रंगतदार बनत गेला. ‘याद पियां की आयें...’ ह्या जुगलबंदीत सादर झालेल्या ठुमरीने रसिक अधिक तृप्त झाले. त्याआधी उस्ताद राशिद खान यांनी मालकंस रागाने आपल्या गायनाला सुरूवात केली. मालकंस रागात त्यांनी 'जिनके मन राम बिराजे.. ' ही विलंबित बंदिश आणि 'याद न आवत मोरी प्रीत..' व 'आज मोरे घर आये न बलमा..' या द्रुत बंदिशी सादर केल्या. त्यांना ओजस अढीया (तबला), साबीर खान (सारंगी), नागेश अडगावकर, निखील जोशी व राशीद खान यांचे सुपुत्र अरमान खान (गायन व तानपुरा) यांनी साथसंगत केली. शाहीद परवेज यांनी राग झिंझोटीमध्ये आलाप, जोड, झालाचे सादरीकरण केले. त्यांना ओजस अढीया यांनी समर्पक तबला साथ केली. शनिवार हा सर्वार्थाने सवाई मधील अधिक स्वरांनी भारावलेला दिवस ठरला. संगीत रसिकांच्या सवाईची सांगता..पाचवा दिवस स्वर, नाद आणि तालमय..! आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा रविवारी शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच मंडप पुरता रसिकांनी भरून गेला होता.. सकाळी दहा पासूनच आपापल्या जागा आरक्षित करणारे रसिक इथे हजर होते.. ही गर्दी पुढे पुढे वाढत गेली.. आणि कलाकार आणि आयोजकांना यामुळेच बळ मिळाले. राग वृंदावनी सारंगने पं. आनंद भाटे यांनी आपल्या गायनाची सुरूवात केली. पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली 'मन राम रंगी रंगले' ही भक्तीरचना त्यांनी खास शैलीत सादर केली. पंडितजी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायलेल्या अतिशय लोकप्रिय अशा 'बाजे मुरलिया बाजे' या गीताच्या तडफदार सादरीकरणातून त्यांनी या दोन्ही दिग्गजांना आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्या या प्रस्तुतीला रसिकांनी उभे राहून टाळ्यांची उस्फूर्त दाद दिली. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली. बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन रसिकांना आवडले. त्यांनी राग अलया बिलावलद्वारे आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यानंतर पहाडी धून सादर करत, बनारसी दादराच्या प्रस्तुतीने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना रवींद्र यावगल (तबला), राजेश व ऋषभ प्रसन्ना (बासरी साथ) यांनी त्यांना संगत केली. पं. भीमसेन जोशी यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले राजेंद्र कंदलगावकर यांनी भीमपलास रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. पंडित भीमसेन जोशी यांच्या 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..' या लोकप्रिय भजन सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्यांना उमेश पुरोहित (हार्मोनियम), पं. रामदास पळसुले (तबला), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली. महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण यांची हिंदुस्थानी- कर्नाटक संगीताची जुगलबंदी रसिकांनीअधिक पसंत केली. जन्मशताब्दी वर्षानिमित्त सवाईमध्ये गाण्याची संधी मिळत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. असे महेश काळे म्हणाले.. संदीप आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत मात्र आज तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र गात आहोत, असे सांगत त्यांनी धानी रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. यामध्ये 'देवी ब्रोवा समयमी दे...' ही कर्नाटक संगीतातील बंदिश, 'लंगरवा छंड मोरी बैया...' ही हिंदुस्थानी संगीतातील बंदिश जलद लयीत, 'मोरे सर से सरक गई गगरी...' ही मिश्र बंदिश आणि तराणा सादर केला. त्यांनतर 'कृष्णानी बेगडी बारू' हे कर्नाटकी संगीतातील उपशास्त्रीय गीत सादर केले. त्यांनी सादर केलेल्या 'कानडा राजा पंढरीचा' या अभंगास रसिकांनी टाळ्यांचा गजर करत दाद दिली. यावेळी महेश काळे यांना राजीव तांबे (हार्मोनियम), विभव खांडोलकर (तबला), ओंकार दळवी (पखवाज), अपूर्व द्रविड (साइड रिदम), प्रल्हाद जाधव, अमृत छ्नेवार, मनाली जोशी (तानपुरा आणि गायन) यांनी साथसंगत केली. तर संदीप नारायण यांना व्हीव्हीएस मुरारी (व्हायोलिन), साई गिरीधर (मृदंग), चंद्रशेकर शर्मा (घटम) यांनी साथसंगत केली. अर्चना जोगळेकर यांच्या नृत्याला पसंती..! प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी सादर केलेल्या 'श्रीराम स्तुती'ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथक सादरीकरणासोबतच त्यांची ऊर्जा, हावभाव यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर रूपक तालात सात मात्रा, धमार तालमध्ये १४ मात्रा, २ स्वरचित रचना, चक्रधार पढंत त्यांनी सादर केल्या. धीरगंभीर अशा 'श्रीराम कथा' सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला. त्यांना झुबेर शेख (सतार) , पं. कालिदास मिश्रा (तबला) वैभव मानकर (हार्मोनियम व गायन), वैभव कृष्ण (पढंत) , भुवन (बासरी) यांनी साथ केली. त्यांचे दर्शन आणि त्यांची सौंदर्य प्रस्तुती अतिशय देखणी होती. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या समारोपाच्या सत्रात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वर योगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी स्वरमंचावरून श्रोत्यांशी संवाद साधला. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे मोठे योगदान आहे, असेही त्यांनी सांगत त्यांनी राग भैरवीने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये तराणा व 'जागी मै सारी रैन', 'जगत जननी भवतारी मोहिनी तू नवदुर्गा...' ठुमरी सादर केली. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), माधव मोडक (तबला), आरती ठाकूर - कुंडलकर, आश्र्विनी मोडक (तानपुरा), डॉ.चेतना बनावट व अतींद्र तरवडीकर (गायन) यांनी साथ केली. महोत्सवाच्या परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या 'बिन देखे पडे नही चैन' या भैरवीचे रेकॉर्डींग ऐकून ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता करण्यात आली. कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि सारे पदाधिकारी यांनी पाच दिवस सुरू ठेवलेला स्वरयज्ञ उत्तम रित्या रसिक आणि कलावंतांच्या सहभागाने उत्तम साजरा झाला. - सुभाष इनामदार. पुणे subhashinamdar@gmail.com

Saturday, November 26, 2022

अभिनयाचा स्वामी हरपला!

विक्रम गोखले हे नाव व्यावसायिक रंगमंचावर प्रथम झळकले ते चंद्रलेखेच्या स्वामी या नाटकातून.. उत्तम शरीरयष्टी, गोल भाऊक चेहरा, उत्तम वाणी आणि सहज अभिनय यामुळे विक्रम गोखले रंगभूमीवर रसिकांच्या नजरेत भरत असत. माधवराव पेशवे यांच्या वेषात त्या भूमिकेचा रुबाब खरोखरच गोखले यांच्यात रसिकांचे डोळे आणि मन सुखावणारा होता.. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य होते त्यात त्यांचेसोबत सहकलाकार होत्या वृषाली सुळे.. त्यांची रमाची भूमिका केली होती.नंतर मात्र त्या विक्रम गोखले यांच्या आयुष्यात पत्नी वृषाली गोखले म्हणून प्रवेशित झाल्या.. या नाटकाने इतिहास घडविला. याचा शंभरावा प्रयोग शनिवारवाड्यात दिमाखात झाला होता.. त्याआधीही बाळ कोल्हटकर यांच्या वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातून त्यांचे नाट्यक्षेत्रात पाऊल पडले होतेच..पण स्वामी नाटकाने त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मग आले बॅरिस्टर! स्वामी नाटकाचा विक्रम होतो ना होतो तोच गोवा हिंदू असोसिएशकडून विजया मेहता यांचे दिग्दर्शन लाभलेले नाटक विक्रम गोखले यांना लाभले. त्यांनी या नाटकाचे सोने केले.. सुहास जोशी आणि विक्रम गोखले यांच्या यातल्या भूमिका अंगावर काटा आणीत असत..त्यात विजया मेहता आणि चंद्रकांत गोखले यांचाही अभिनय रसिक विसरू शकणार नाहीत. नाट्यसृष्टीत रमता रमता त्यांनी राजदत्त यांनी वऱ्हाडी आणि वाजंत्री चित्रपटात प्रथम विक्रम गोखले यांना नायकाची भूमिका दिली. पुढे जोतिबाचा नवस या चित्रपटासाठी कमलाकर तोरणे यांनी त्यांना या क्षेत्रात अधिक उमदा रोल दिला.
पुढे तिथेच ते अनेक चित्रपटांमधून स्थिर झाले..मला आठवते ते गोविंद घाणेकर यांच्या कैवारी चित्रपटात त्यांची वेगळी भूमिका गाजली. हळूहळू हिंदी चित्रपटातून ते वावरू लागले. मला त्यांची छोटी भूमिका होती आजही आठवते ती श्रीकृष्णाची. चित्रपट होता स्वर्ग नरक.. गाजली . पुढे संकेत मिलनाचा नाटकाने वेगळी ओळख करून दिली..स्वाती चिटणीस आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाने हे नाटक गाजले. वऱ्हाडी आणि वाजंत्री पासून कळत नकळत, महानंदा कितीतरी मराठी चित्रपटातून विक्रम गोखले प्रेक्षकांच्या नजरेत भारून गेले होते. कलाक्षेत्रात असताना त्यांनी कधीही राष्ट्रभक्तीशी दुरावा केला नाही..सामाजिक भान जपता जपता प्रसंगी राग आला तरी त्यांनी आपले वेगळे मत ठामपणे मांडले. कला आणि सामाजिक भान दोन वेगळी ठेवली..
कणखर वृत्ती आणि देशभक्तीची आस ते नेहमीच जपत असत. स्पष्ट बोलणे हा तर त्यांचा स्थायीभाव होता. आजी कमलाबाई गोखले, वडील चांद्रकांत गोखले यांच्या नंतर अभिनयाचा वारसा त्यांनी कायम ठेवला. विक्रम गोखले मोठ्या अभिमानाने आणि तेजस्विपणे ते अखेरर्यंत जगले..असा राष्ट्रप्रेमी माणूस आणि एकनिष्ठ कलावंत पुन्हा होणे नाही.. आमच्यासारख्या रसिक, प्रेक्षकांची विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com
*'अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) *विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५) *‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार *हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार (४-८-२०१७) *पुलोत्सव सन्मान (डिसेंबर २०१८) *चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

Wednesday, November 16, 2022

विजयनगर साम्राज्य इतिहास आणि वास्तव...

हम्पी या विजयनगरच्या खुणा दाखविणारे पुरातन मंदिरे, जुन्या शिल्पकला आणि त्या वैभवी परंपरेचे अवशेष पाहताना त्याविषयी अनुभव तर्फे लोकेश या आमच्या मार्गदर्शक व्यक्तीने तो सारा इतिहास असा समोर उभा केला.. आम्ही सारे अनुभवचे सुमारे ३६ प्रवासी यात सामील होऊन या भौगोलिक इतिहासाचे साक्षीदार बनलो.. तरुणाई इथे एकत्र होतो.. उत्तम व्यवस्था, जातीने लक्ष, भरपूर खुराक, छान भोजन आणि सुखकर १२ सिटर चार गाड्या होस्पेट, हम्पी, बदामी आणि अखेरीचा टप्पा विजापूर येथे आमच्या गाड्या जोडीने कर्नाटकात फिरत होत्या..जाहिरात न करता अनुभवचे सुरक्षित कवच आमच्या पाठी उभे होते.. आठवडाभर आम्ही विविध क्षेत्रातील तरुणाई इथे एकत्र होतो....

Monday, November 14, 2022

यात नवे ते काय?

जर काही मला नवे वाटले तर ते तुम्हाला सांगावेसे वाटते.. मला त्याचीच तर आवड आहे. जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन! बरोबर ना!

Saturday, January 15, 2022

तारेवरची कसरत...भालचंद्र देव

ज्येष्ठ व्हायोलिनवादक आणि गुरू पं. भालचंद्र देव यांचे ११ जानेवारी २०२२ ला तीव्र हृदयविकाराने पुण्यात निधन झाले..त्यांनी ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःच्या आयुष्याचा धावता आढावा लिहून माझेकडे दिला..तोच त्यांचा जीवनप्रवास मी इथे देत आहे.. -सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे
माझा जन्म मुंबईचा. साल १९३६. माझे वडील दामोदर चिंतामण देव हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक कै. पंडीत अनंत मनोहर जोशी उर्फ अंतूबुवा यांचे शिष्य. ते मुंबई महापालिकेच्या गुजराथी शाळेत संगीत-शिक्षक होते. ते उत्तम गात आणि हार्मीनियमही वाजवीत असत. बालपणापासून माझ्यावर सुरांचे आणि तालांचे संस्कार झाले. पुरंतु अंतुबुवांचे चिरंजीव पंडित गजाननबुवा जोशी यांचे व्हायोलीन वादन माझ्या वडीलांना फार आवडायचे आणि आपल्या एका तरी मुलाने व्हायोलीन शिकावे व त्यात नाव कमवावे असे त्यांच्या मनात होते. म्हणून त्यांनी कोठून तरी एक लहान आकाराचे व्हायोलीन माझ्यासाटी पैदा केले. ते माझ्या हातात देऊन सुरवातीचे स्वरपाठ मला शिकवायला सुरवात केली . आणि काय योगायोग...मला ते जमू लागले. माझ्या थोरल्या भावाला हार्मानियम आणि मला व्हायोलीन असे शिक्षण सुरु झाले. त्यावेळी माझे वय ९ वर्षाचे होते. व्हायोलीनचे तंत्र मला जमते आहे असे पाहिल्यावर वडील स्वतः हार्मोनियम वाजवीत व मी त्यांच्या बरोबर व्हायोलीन वाजवित असे. कधी कधी थोरला भाऊ हार्मोनियम, मी व्हायोलीन आणि वडील डग्ग्यावर ठेका धरीत. त्यामुळे सुराबरोबरच तालात वाजविण्याची मला सवय झाली. कधी कधी वडील मला त्यांच्या शाळेत घेऊन जात व तिथल्या मुली व शिक्षिका यांच्यासमोर मला व्हायोलीन वाजविण्यास सांगत. पुढे वडील सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही आमच्या गावी म्हणजे पुण्याजवळच्या चिंचवडला स्वतःच्या घरात रहायला गेलेो. परंतु मला पुण्याच्या शाळेत घातल्यामुळे मी बराच वेळ घराबाहेर असे आणि घरी आल्यावर दमून जात असे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी पटकन माडीवर जाऊन झोपून जात असे.. परंतु वडील मला खाली बोलवीत व अर्धा तास रियाज करावयास लावीत. मला त्या वेळी या गोष्टीचा राग येत असे परंतुत्याचे महत्व आता मला पटते. गावातील निरनिराळ्या उत्सवात माझे वादन होत असे. तेव्हा चिंचवड गावात मीच एकटा व्हायोलीन वाजविणारा व तो ही वयाने लहान. त्यामुळे लोकांकडून भरपूर कोतूक होई. चिंचवडला आम्ही तीनच वर्षे राहिलो. नंतर आमच्या शिक्षणासाठी वडीलांनी पुण्याला जायचे ठरविले. लवकरच पुण्यास कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयात आम्हाला जागा मिळाली व आम्ही पुणेकर झालो. शाळेत जाणे-येणे सोपे झाले. त्यामुळे व्हायोलीन वादनासाठी अधिक वेळ मिळू लागला. आमच्याच वाड्यात प्रसिध्द गायक व हार्मानियम वादक पं. बबवराव कुलकर्णी रहात होते. घरातच त्यांचा क्लास होता. त्यांचीही ओळख होउन मी मार्गदर्शनासाठी त्याेच्याकडे जाऊ लागलो. ते शास्त्रीय संगीत तर गायचेच परंतु भजन, गौळणी, अभंग, अष्टपदी, ठुमरी, भावगीत असे प्रकारही फारच सुंदर गायचे. हळू हळू त्यांच्याबरोबर कार्यक्रमातही साथ करु लागलो .असेच एकदा त्यांच्या क्लासच्या गुरुपौर्णीमेच्या कार्यक्रमात मी दुर्गा राग वाजवीत होतो. इतक्यात जवळच राहणारे प्रसिध्द संगीततज्ञ सरदार आबासाहेब मुजूमदार त्या ठिकाणी हजर झाले. माझे वादन संपल्यावर ते गुरुजींना म्हणाले, `वा! बबनराव हे रत्न तुम्ही कुठून पैदा केलेत.. ? एका थोर जाणकाराकडून मला मिळालेली ती पहिली पावती शाबासकी होती. माझी मावसबहिण सौ. लीला इनामदार ( प्रसिध्द गायिका सौ. प्रतिभा इनामदार यांची सासू) लग्नापूर्वी आमच्या घराजवळच रहात होती. तिचा गळा अतिशय गोड होता व अनेक जुनी भावगीते तिला येत होती. वडिलांनी मला काही दिवस तिच्याकडे शिकण्यासाठी पाठविले. तिच्याकडून मीही काही गाणी वाजविण्यास शिकलो. गजाननबुवांच्या घरी तालीम इतक्यात एक नामी संधी चालून आली. पं. गजाननबुवा डोंबिवला रहायला आल्याचे थोरल्या भावाकडून समजले. या संधीचा फायदा घ्याचा असे वडिलांनी ठरविले. मला डोंबिवलीस भावाकडे पाठविले. गुरूबंधूचाच मी मुलगा असल्यामुळे बुवा मला शिकविण्यास आनंदाने तयार झाले. मी प्रथम त्यांच्याकडे गेलो तेव्हा मला त्यांनी थोडेसे व्हायोलीन वाजवावयास सांगितले. मी सारंग रागातील `ब्रिजमे दधी बेचन जात सखी..`ही चीज वाजवून दाखविली. मग बुवांनी व्हायोलीन काढले आणि सुमारे अर्धातास नुसते `सारेगम`...चे निरनिराळे पलटे बाजवून दाखविले. ते ऐकून मी प्रभावित झालो..घरी जाऊन तसे वाजविण्याचा प्रयत्न करु लागलो. बुवांच्या घरी मला मुक्त प्रवेश होता. सकाळी ७ वाजता मी तिथे हजर राहून तंबोरे पुसून ठेवीत असे. थोड्याच वेळात बुवा येऊन बसत. त्यांचा मुलगा मधू आणि इतर चार-पाच शिष्य शिकवणीसाठी बसत. मी तंबोरा वाजवीत असे आणि ते सारे श्रवण करीत असे. त्यांचा धाकटा मुलगा नारायण नुसत्या डग्ग्यावर ठेका धरीत असे. त्यांनतर थोड्या वेळाने बुवा व्हायोलीनच्या रियाजाला बसत. कधी कधी मला ठेका धरायला सांगत ..असे दिवसभर कधी गाणे ..तर कधी व्हायोलीन वादन चालू असे. दिवसभर ऐकलेले कानात साठवून घरी आल्यावर मी आठवेल तसे लिहून काढत असे..आणि मग त्याचाच रियाज करीत असे.. रविवारी बुवांकडे दिवसभर निरनिराळे कलाकार तबला वादक येत असत. त्यामुळे भरपूर ऐकायला मिळे. मुंबईत कुठे बुवांचा कार्यक्रम असेल तर मी तंबो-याच्या साथीस जात असे. त्यामुळे मैफलीत बुवा कसे वाजवतात हे जवळून अनुभवायला मिळाले..या काळात बुवा सांगतील त्या वेळेला मी त्यांचेकडे हजर रहात असे. या माझ्या वक्तशीरपणावर आणि एकंदरीतच प्रगतीवर बुवा खूष होते. १९५६ ते १९५८ या तीन वर्षांच्या काळात मला बुवांचा दीर्घ सहवास लाभला. आणि माझ्यावर संगीताचे उत्तम संस्कार झाले. गजाननबुवांकडे असताना ते मला मधुनच तबल्याचे बोल सांगत आणि ते पाठ करुन ताल देऊन म्हणायला सांगत. त्यांच्याकडून निघताना त्यांनी मला पुण्यातील प्रसिध्द तबला वादक सूर्यकांत उर्फ छोटू गोखले यांच्याकडे तबला शिकण्यास सांगितले. त्याप्रमाणे दोन वर्षे मी त्यांच्याकडे तबला शिकलो. १९५८ मध्ये मला टेलिफोन खात्यात नोकरीची संधी आल्यामुळे मी बुवांचा निरोप घेतला आणि पुण्याला परत आलो. `आकाशवाणी`चाही उपयोग कसबा पेठेत रहात असताना बाहेरच्या खोलीतील फडताळात एक रेडिओ होता. त्यावर दररोज सकाळी आणि दुपारी नियमितपणे शास्त्रीय गायन-वादनाचा कार्यक्रम होत असे. त्या कार्यक्रमातील गायकाच्या वा वादकाच्या स्वरात मी माझे व्हायोलीन ट्यून करुन त्यांच्याबरोबर वाजवीत असे. त्यामुळे साथ करायची सवय झाली. दिवाळीत रेडिओ संगीत संमेलन असे. ते रात्री सोडनऊला सुरु होत असे आणि रात्री एक पर्यंत चालत असे. त्यात अखिल भारतीय कीर्तिच्या गायक-वादकांचे कार्यक्रम होत. त्या कार्यक्रमाबरोबर सुध्दा मी हळू आवाजात साथ करीत असे. त्यामुळे अनेक रागांची व तालांची माहिती झाली. एकच राग निरनिराळे गायक- वादक कसा रंगवतात हे लक्षात आले. त्याचा मला माझे वादन सुधारण्यात खूप फायदा झाला. भरपूर रियाज केला आणि आकाशवाणीची अॉडिशन दिली. त्यात उत्तीर्ण होऊन रेडिओवर कार्यक्रम करू लागलो.मनात एकच इच्छा होती की आपले वादन गुरूजींना कसे वाटत असेल.. पण ती हि इच्छा लवकरच पूर्ण झाली. एकदा मी सकाळी पुणे आकाशवाणी केंद्रावरुन व्हायोलीनवर वाजविलेला राग `हिंडोल` तिकडे डोंबिवलीला गजाननबुवांनी ऐकला आणि लगेच मला त्यांचे एक पत्र भारत गायन समाजाच्या पत्त्यावर आले. त्यात त्यांनी लिहले होते.. `तुझा सकाळचा हिंडोल ऐकला. खूप आनंद झाला. आता तुझी उत्तम प्रगती झाली आहे..`... ते पत्र मी अजूनही जपून ठेवले आहे. तसच मंगळवारच्या संगीत सभेत दिल्ली केंद्रावरुन प्रक्षेपित झालेला राग मारुबिहाग वडिलांनी ऐकला. त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांचे भरभरुन आशीर्वाद मिळाले. टेलिफोन खात्यात लागल्यावर १९६० साली झालेल्या लखनौ येथील सांकृतिक स्पर्धत मला सुवर्णपदक मिळाले आणि पुढे ती प्रथा मी जवळजवळ २० वर्षे कायम राखली. पुण्यात त्या वेळेस आणखी एक गायक प्रसिध्द होते. ते म्हणजे पं. नागेश उर्फ राजाभाउ खळीकर. वडील मला त्यांचेकडे घेऊन गेले आणि याला तुमच्या साथीला घ्या म्हणून विनंती केली. खळीकरबुवा थोड्या नाखुषीनेच म्हणाले, `मी साथीला व्हायोलीन आत्तापर्यंत कधीच घेतले नाही, कारण ते सुरेल वाजेलच याची मला खात्री वाटत नाही. परंतु तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने माझ्याकडे आलात तर याला एक संधी देऊन पाहतो.` दुसरे दिवशी सकाळी त्यांनी मला व्हायोलीन घेऊन घरी बोलावले. त्यावेळी ते रियाजाला बसले होते. सुमारे दीडतास निरनिराळे प्रकार ते गायले .रियाज संपल्यानंतर प्रफुल्लीत नजरेने ते म्हणाले, `वा. देवा.. आज तुम्ही माझी समजूत खोटी ठरविलीत. आजपासून तुम्ही माझ्या कार्यक्रमात व्हायोलीनची साथ करा. तेव्हापासून मी त्यांचीही साथ करु लागलो. पहिली बिदागी १९६१च्या पानशेत पुराच्या आधी पाच-सहा दिवस खळीकरबुवांचा भारत गायन समाजात गाण्याचा कार्यक्रम ठरला. कार्यक्रम रात्री साडेनऊ वाजता होता. बुवा मला म्हणाले, `माझा भारत गायन समाजात कार्यक्रम आहे. तू साथीला येशील काय.. बिदागी वगैरे काही मिळणार नाही.. ` मी म्हणालो, `इतक्या चांगल्या व पवित्र वास्तूत आपल्याबरोबर मला वाजवायचा योग मिळतो आहे याहून भाग्याची गोष्ट कोणती. मला काहीही नको..` ठरल्याप्रमाणे बुवांचा कार्यक्रम रात्री सुरु झाला. हार्मोनियच्या साथीला ज्येष्ठ हार्मोनियमवादक बंडोपंत साठे आणि तबल्याच्या साथीला ज्येष्ठ तबलावादक दत्तोपंत राऊत होते. बुवा अगदी अटीतटीने गात होते. समोर श्रोत्यात सरदार आबासाहेब मुजुमदार, हिराबाई बडोदेकर, दत्तोपंत देशपांडे, प्रा. अरविंद मंगरुळकर, प्रा. ग. ह. रानड़े असे मान्यवर उपस्थित होते. त्या दिवशी माझी साथही हार्मोनियमच्या बरोबरीने झाली व मी श्रोत्यांची वाहवा मिऴविली. विशेष म्हणजे, बिदागी ठरलेली नसताना भारत गायन समाजाच्या प्रमुखांनी मला स्वखुशीने १५ रुपये बिदागी दिली. १९६२ साली माझे लग्न झाले. पत्नी सौ. निलाला गाण्याची आवड होती. तीही माझ्या वडिलांकडे हार्मोनियम शिकू लागली होती. परंतु लग्न झाल्यावर तीन महन्यातच माझी आई अर्धांगवायूने आजारी प़डली आणि सौ. चे हार्मोनियम शिकणे बंद झाले ते कायमचेच. पुणे विद्यापीठाची डिप्लोमा इन म्युझिक परिक्षा प्रथम श्रेणीत पास झालो. तसेच भारत गायन समाजाची संगीत विशारद परिक्षाही प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झालो. हिराबाईंची साथ एकदा माझा मित्र रमेश सामंत संध्याकाळी माझ्याकडे आला व मला व्हायोलीन बरोबर घेण्यास सांगून त्याने मला सरदार आबासाहेब मुजुमदार यांचेकडे नेले. तिथे त्यांच्या दिवाणखान्यात हिराबाई बडोदेकरांचे गाणे होते. रमेश तबल्याच्या साथीला होता व मला त्याने व्हायोलीनच्या साथीला बसवले. या अचानक प्रकाराने मी गांगरुन गेलो. परंतु लगेच मी स्वतःला सावरले आणि जमेल तशी साथ करु लागलो. हिराबाई गाताना अत्यंत शांत व तेजोमय वाटत होत्या. गाणं संपल्यावर रमेशने मला साथ चांगली झाल्याचे सांगितले. हा एक माझ्या आयुष्यातील अत्युच्य आनंदाचा क्षण होता. कालातरांने भारत गायन समाजात मला व्हायोलीन शिक्षक म्हणून पार्टटाईम नोकरी मिळाली. नोकरी सांभाळून संध्याकाळी मी तिथे शिकवित होतो. माझी कन्या चारुशीला आता ९ वर्षांची झाली होती. तिच्या हातात मी माझे व्हायोलीन दिले आणि शिकविण्यास सुरवात केली. लहानपणापासून ती व्हायोलीन ऐकत असल्यामुळे तिनेही ते लवकरच आत्मसात केले. शाळा-कॉलेजाजीतील कार्यक्रमातही ती भाग घेत आसे. भारत गायन समाजाची संगीत विशारद आणि एस.एन.डी.टी.ची एम.ए.(संगीत) परिक्षा ती प्रथम श्रेणीत पास झाली. `स्वरांनद`चा हिस्सा एकदा मला स्वरानंद संस्थेचे संस्थापक प्रा. प्रकाश भोंडे यांचा निरोप आला की, त्यांच्या संस्थेत यावे. त्यावेळी `स्वरांनद`, हा मराठी गाण्यांचा महाराष्ट्रात एक अग्रगण्य वाद्यवृंद होता. त्यात वाजविण्याची संधी मिळते आहे.म्हटल्यावर मी लगेच तिथे दाखल झालो. संस्थेचे महाराष्ट्राबाहेरही बरेच कार्यंक्रम होत. वाद्यवृंदात वाजविल्यामुळे नोटेशन लिहिण्याची आणि वाजविण्याची सवय झाली. अनेक प्रतिथयश गायक, गायिका आणि वादक ह्या वाद्यवृंदात होते. थोड्याच दिवसात प्रा. भोंडेंनी चारूलाही बोलावले. अशा त-हेने आम्ही दोघेही स्वरानंदचा अविभाज्य घटक झालो. सुप्रसिध्द संगीतकार व गायक गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, अरूण दाते, यशवंत देव यांच्या बरोबरही वाजविण्याचा योग आला. आनंद माडगूळकर यांचेबरोबर गीतरामायणाचे अनेक कार्यक्रम वाजविले. सुप्रसिध्द तबलावादक आणि आयोजक अजित गोसावी यांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमातही साथ केली. सुप्रसिध्द नकलाकार वि.र. गोडे यांच्या ``अंतरीच्या नाना कळा ``,या कार्यक्रमातही अनेक वर्षं साथ केली. शिवाय आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील निरनिराळ्या कार्यक्रमात साथ केली.
मी आणि कन्या चारुशीला गोसावी यांनी मिळून `स्वरबहार` नावाचा जुगलबंदीचा कार्यक्रम सुरु केला आणि एकाच बैठकीत शास्त्रीय व सुगम संगीत ऐकविण्याचा नवा पायंडा पाडला. हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला. काही वर्षांपूर्वी आमची दोघांची जुगलबंदीची `हेरिटेज` नावाची सीडीही निघाली.
१९९४ मध्ये मी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर टेलिफोन खात्यातून सेवानिवृत्त झालो. परंतु सेवानिवृत्तीनंतर येणारे रिकामपण मला माझ्या व्हायोलीनने कधीच जाणवू दिले नाही. आजही वयाच्या ८१ व्या वर्षीही मी पूर्णपणे माझ्या कलेत मग्न आहे. भारत गायन समाजास ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक समारंभ आयोजित केला होता. त्यात संगीतकार नौशाद आलि यांच्या हस्ते माझा `आदर्श शिक्षक` म्हणून गौरव करण्यात आला. माझ्या आकाशवाणीवरील शास्त्रीय वादनाच्या कार्यक्रमाला १९१६ मध्ये ५३ वर्षं पूरी झाली ही आयुष्यातील मोठी आनंदादायी घटना आहे. पाच वर्षापूर्वी पं. गजाननबुवांच्यावर एक माहितीपट निघाला. त्यात बुवा व्हायोलिनचा रियाज करीत आहेत असा एक प्रसंग होता. त्यासाठी माझी निवड करण्यात आली. तसेच बुवा लहानपणी औंधला महाराजांच्या कीर्तनात व्हायोलीनची साथ करीत. बाल गजाननबुवांच्या जागी एका १०-१२ वर्षाच्या मुलाची निवड झाली आणि त्या प्रसंगीही मी व्हायोलीनवर ``जय जय राम कृष्ण हरी,`` वाजविले. मी २०१४ साली भारत गायन समाजातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. कारण उतारवयामुळे मला तिथे जाणे-येणे त्रासदायक वाटू लागले. भारत गायन समाजातील ४६ वर्षांची प्रदीर्घ सेवा हा माझ्या आयुष्यातील ऐक आनंदाचा काळ होता.
याच वर्षा मला मुंबईच्या `रायकर व्हायोलीन अॅकॅडमी `कडून सत्कार स्वीकारण्यासंबंधी विचारणा झाली आणि ती मी मान्य केली. पं. डी.के.दातार यांच्या उपस्थितीत पुण्याचे प्रख्यात व्हायोलीनवादक उस्ताद फैय्याज हुसेन खॉसाहेब यांचे हस्ते मला `व्हायोलीन गुरू `ही उपाधी देण्यात आली. आता मी वयाची ८० वर्षे पार केली आहेत. अजूनसुध्दा मी घरी काही विद्यार्थ्य़ांना विद्यादान करीत आहे. आजपर्य़तच्या या माझ्या सांगितिक वाटचालीचे श्रेय प्रथम मी माझे पिता कै. दामोदर चिंतामण देव यांना देतो. कारण लहानपणीच त्यांनी माझ्यातील कलागुण हेरून मला व्हायोलीन शिकविण्यास उद्युक्त केले आणि पुढेही सतत प्रोत्साहन देत राहिले. तसेच माझ्या सौभाग्यवतीने ( सौ. नीला देव) मला उत्तम साथ दिली. शेवटी सर्व गुरूजनानांना आणि परमेश्वराला वंदन करून माझे हे मनोगत संपवितो. -भालचंद्र देव, पुणे