फक्त गाणंच नव्हे तर खाणं, फिरणं, उत्तम निटनेटक रहाण,खरेदी करणं, लोकांना भेटणं, प्रेमानं खिलवणं या सगळ्यात रस घेत, आयुष्य कसं जगावं, कधीही जुन्या आठवणींमध्ये न रमता, नवीन पिढीबरोबर जात विरघळणं असलेल्या आशाताई आम्हाला आणि आपल्याला सतत भेटत राहील्या.
- केतन गाडगीळ
“सुहास्य तुझे मनासी मोही’ म्हणत वयाच्या नव्वदीतही तितक्याच उत्साहात, हजारो प्रेक्षकांच्या समोर कार्यक्रम करत आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या, स्वतःच्या आयुष्यात अनेक चढउतार झाले तरी रसिकांच्या समोर मात्र कायमच प्रसन्न मुद्रेने उभ्या राहणाऱ्या,
‘आमच्या आशाताई’
आशाताईंचं गाणं कायमच मला खूप जवळच वाटत गेलं आणि त्यांच्याविषयीची ‘भक्तीच’ म्हणता येईल, ती वाढत गेली. खरंतर कळत नकळत मी आशाताईंशी जोडला गेलो ते अर्थातच त्यांच्या सुरातून.
‘झुक झुक झुक अगिन गाडी’, ‘गोरी गोरी पान’, फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण’ किंवा ‘मामाच्या गावाला जाऊया’ पासूनच्या बालगीतांनी आपला पिसारा फुलवत अनेकांचं बालपण आनंददायी केलं, त्या ‘नाच रे मोरा नाच’ या आशाताईंच्या बालगीतांतून त्या आवाजाची ओळख झाली.
ही गाणी ऐकत असताना ‘आशा भोसले’ कोण आहेत हे कळण्याचं माझं वयच नव्हतं पण तो आवाज मात्र पक्का जवळचा झाला होता.
माझे वडील श्री. सुधीर गाडगीळ यांचा आशाताईंशी चांगला स्नेह होता. त्यामुळे आशा भोसले हे नाव घरात सतत कानावर पडत असे. त्यामुळे ही व्यक्ती कोणीतरी आपल्या घरातील, अगदी आत्या, काकू, मावशी असावी असं वाटत असे.
आशाताईंना मी प्रत्यक्ष पहिल्यांदा पाहिल्याचं आठवतं ते आमच्या सदाशिव पेठेतल्या वाड्यात आल्याचं. आशाताई आणि आर. डी. बर्मन यांचा तेव्हा नेहरू स्टेडियमला कार्यक्रम होता. तेव्हा आशाताई आमच्या घरी येणार म्हणून घरातच खूप उत्साह होता. आमच्या घरातल्या झोपाळयाच्या खोलीच्या खिडकीतून मी माझ्या आजोबांबरोबर त्यांची वाट पाहत बराच वेळ उभा होतो. इतक्यात एक पांढरी अँबेसिडर गाडी वाड्याच्या दरवाज्यात थांबली आणि गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या, प्रसन्नपणे हसत गाडीतून उतरलेल्या आशाताईंची छबी आजही पक्की लक्षात आहे.
माझ्या आईनं त्यांच्यासाठी स्वतः हातांनी एक फुलांची परडी तयार केली होती. आजी सांगायची की, वाड्यातल्या सगळ्या बायकांनी त्यांचं औक्षण केलं होतं आणि माझ्या आईनं रितीनं ओटी भरून त्यांचं स्वागत केलं होतं.
आमच्या घरी दुचाकी वाहन येण्याच्या आधी टीव्ही आणि फोन आला होता. कारण बाबांचे त्यावेळी दूरदर्शनवर कार्यक्रम असायचे. त्यावेळी बाबांनी आशाताईंची घेतलेली मुलाखत खूप गाजली. त्यांच्या Recording च्या आधी आशाताईंनी बाबांना फोन आला होता. त्यांनी विचारलं की, “मी गुलाबी रंगाची साडी नेसणार आहे. तुझ्या शर्टचा रंग कुठला?” यावर बाबा म्हणाले, “मी गुरूशर्ट घालणार आहे.” त्यावर आशाताईंनी म्हटलं की “यावेळी शर्ट घाल आणि तोही मी सांगते त्या रंगाचा.” आशाताईंनी बाबांना Amarson’s मध्ये घेऊन गेल्या आणि Dark brown रंगाचा शर्ट त्यांना घेऊन दिला. तो शर्ट पुढे कितीतरी वर्ष आम्ही देवाचा प्रसाद मिळावा असा जपून ठेवला होता.
त्यावेळी मी शाळेत होतो, पण त्या Recording ला जाण्याचा काही योग आला नाही. पण ती मुलाखत इतकी गाजली की आशाताईंच्या गाण्याबरोबर प्रत्येक गाण्यात बदललेली साडी, त्यावरील लखलखणारे हिऱ्यांचे दागिनेही अनेकांच्या स्मरणात राहिले. आशाताईंनी Recording साठी गायलेलं ‘जीवलगा कधी रे येशील तू’ हे गाणं पुन्हा Record करताना प्रत्यक्ष बाबूजी हजर होते आणि ते गाणं ऐकताना बाबूजींच्या डोळ्यांत आलेल्या पाण्याची आठवण कार्यक्रमाचे निर्माते अरुण काकतकर काकांनी घरी सांगितल्याचं आठवतं.
बाबांच्या ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या बाबूजी गदिमांच्या कार्यक्रमाच्या शतकमहोत्सवासाठी आशाताई आणि बाबूजी उपस्थित होते. मला कळायला लागल्यावर आशाताईंना प्रत्यक्ष बघण्याचा आणि ऐकण्याचा माझा पहिलाच प्रसंग.
टिळक स्मारक मंदिराच्या विंगेतून मी आशाताईंना जवळून पाहिलं. बाबूजींनी पेटी वाजवायची बाबांनी फर्माईश केली. त्यावेळी “आशाताई साथ देणार असतील तर दोन ओळी ऐकवतो” म्हणताच, “नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे
नंदलाला.’ म्हणत खट्याळपणे बाबुजींची केलेली नक्कल आणि सादर केलेलं गाणं माझ्या पक्कं स्मरणात राहिलेलं आहे.
पुण्यात कुठेही आशाताईंचा कार्यक्रम असेल तर बाबांबरोबर जायचंच असा माझा हट्ट असायचा आणि बाबा ही मला घेऊन जायचे.
बाबांनी दीनानाथ पुण्यतिथीचा कार्यक्रम रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानावर केला होता. लतादीदींबरोबर सर्व मंगेशकर कार्यक्रमाला उपस्थित होते. समोर प्रेक्षकांत आशाताईही होत्या. कार्यक्रमातलं शेवटचं ‘उषःकाल होता होता...’ हे गाणं उषाताई आणि हृदयनाथ मंगेशकरांनी सुरू केलं आणि समोर बसलेल्या आशाताईंना न राहवता त्यांनी मी स्टेजवर येतेच म्हणून करत, स्टेजवर येऊन सादर केलेलं गाणं आजही आठवतं, आणि लक्षात राहिली ती त्यांच्यातील उत्स्फूर्त कलावंत.
घरात बाबांमुळे कलाकारांचं येणं-जाणं असायचं. पाचही मंगेशकरांच्या मुलाखती घेण्याचा आणि त्यांच्याबरोबर कार्यक्रम करण्याचा बाबांना योग आला. त्यामुळे अर्थातच ‘मंगेशकर’ या नावाशी एक वेगळं नातं होतं. बाबांच्या शब्दात सांगायचं झालं तर ‘लता मंगेशकर’ नावाविषयी एक आदर होता आणि ‘आशा भोसले’ यांच्याविषयी जिव्हाळा.
त्यामुळे आशा भोसले रजनी असो किंवा नक्षत्रांचे देणे असो. प्रत्येक कार्यक्रमाला माझी हजेरी असलेली. पण आजच्यासारखं फोटो काढणं सोपं नव्हतं, किंवा तो फोटो काढून लगेच Social Media वर टाकायचं फॅड पण नव्हतं. फक्त होतं ते त्यांना प्रत्यक्ष गाताना ऐकतानांचं समाधान.
Architecture College ला असताना रात्रभर Submission करताना आशाताईंचे सूर मला रात्रभर सोबत करायचे. कॅसेटची एक बाजू झाली की पुन्हा दुसरी, परत पहिली, असं करत दहा-दहा तास आशाताईंच्या गाण्यांची मी पारायण केली आहेत.
मला त्यावेळी अनेक वेळा Design करताना असं जाणवायचं की, ‘तरुण आहे रात अजुनी’ या गाण्यातील, ‘बघ तुला पुसतो आहे पश्चिमेचा गार वारा’ म्हणत वर जाणारी आशाताईंची लकेर ऐकताना एखादी नवीन संकल्पना सुचवून जायची.
मराठी गाण्यांबरोबर अनेक हिंदी गाणीही ऐकताना आशाताईंच्या सुरातली जादू आहे की, ती तुम्हाला सगळं मरगळ झटकून, नवीन उमेदीनं काम करायला लावणारी आहे.
ठाण्याच्या इंद्रधनू संस्थेत बाबांनी आशाताईंची प्रगट मुलाखत घेतली होती. अर्थात मीही गेलो होतो. त्यावेळी कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना भेटायला आत गेलो होतो. मला थोडं दडपणही आलं होतं. पण याचा आनंद होता की त्यांना प्रत्यक्ष भेटत आहे. मी त्यांना नमस्कार करून बाहेर निघणार इतक्यात त्यांनीच म्हणाल्या की, “बस इथे.” मी जरा संकोचून त्यांच्या शेजारी बसलो. इतक्यात ठाण्यातल्या एका पत्रकार फोटोग्राफरनी आशाताईंबरोबर माझा फोटो काढला. पण तो काढताना “मागची पाण्याची बाटली फोटोत येत तर नाही ना.” असं आशाताईंनी विचारलं आणि जरा थोडं जवळ सरकून बसायला सांगितलं. फोटो झाला म्हणून मी खूष होतो. खुशीत पुण्याला आलो. पण मी त्या फोटोग्राफरचं नाव नंबर घ्यायचं विसरलो होतो. त्यामुळे इतका छान योग आला होता पण आता काही फोटो मिळणार नाही असं समजून मी निराश झालो होतो.
पण काही दिवसांनी ठाण्याच्या वर्दे काकांनी पाठवलेलं एक पार्सल घरी आलं. उघडून बघतो तर काय, माझा आणि आशाताईंचा त्या फोटोची फ्रेम त्यांनी पाठवली होती. तो माझा आशाताईंबरोबरचा पहिला फोटो.
आशाताईंच्या प्रत्येक गोष्टींचं कायमच मला अप्रूप वाटत आलं आहे. मागे आशाताईंनी माझ्या आईला एक मोत्याची माळ भेट म्हणून दिली होती. आणि त्यांनी दिली म्हणून आमच्यासाठी खासच. पण त्याचं खरं मोल कळलं ते लेखिका मीना प्रभू यांच्या मुळे. मीनाताईंना मोती हिर्यांची विशेष पारख. एकदा त्या आमच्या घरी आल्या असताना विषय झाला म्हणून आईने ती सहज त्यांना दाखवली, त्यावेळी ती बाजारातली किती ‘मोल्यवान’ आहे याची जाणीव आम्हाला मीनाताईंनी करून दिली.
आशाताईंना खरेदीची आणि प्रेमानं अनेकांना भेट देण्याची विशेष आवड आणि खासियत अशी की, त्या आठवणीने त्या व्यक्तीच्या आवडीनुसार आवर्जून आठवण ठेवून भेट आणणार. त्यांना स्वतःला फिकट रंगाच्या निळ्या गुलाबी, अबोली रंगाची साडीही विशेष आवडायची. त्यामुळे आम्ही कधी तशी आणली तर त्या आवर्जून नेसायच्याही आणि कधीतरी कधी रंग नाही आवडला तर “कुठून आणली साडी, आपण रंग बदलून आणूया का, म्हणजे मी नक्की नेसेन” असं सांगण्याचा मोकळेपणाही त्यांच्यात होता.
पुढे ‘मंतरलेल्या चैत्रबनाची नवी पालवी’ या कार्यक्रमाचं निवेदन करताना, आशाताईंच्या गाण्यांचं वैविध्य बघून मी भारावून जायचो.
माझ्या लग्नाला आशाताईंना काही कारणाने येता आले नव्हते. अचानक एक दिवस सकाळी फोन आला की “मी पुण्याला आले आहे. मला केतनच्या ऑफिसचा पत्ता पाठवा. मला यायचं आहे.” आशाताई ऑफिसला येणार म्हटल्यावर मला थोडं दडपण आलं. मी ऑफिसला पोहोचलो. त्यावेळी माझं ऑफिस सदाशिव पेठेत होतं. थोड्याच वेळात एक ‘इटालियन flower pot’ घेऊन आशाताई हजर. तो हातात घेऊन पूर्ण ऑफिसमध्ये कुठे ठेवता येईल हे बघत त्या फिरत होत्या. शेवटी, “तू ठरव कुठे ठेवायचं, तुझ्यासाठी आणलाय” म्हणून माझ्या हातात दिला. तो flower pot मी ‘विश्वकरंडक’ जिंकल्याप्रमाणे अजूनही माझ्याकडे जपून ठेवला आहे.
त्यावेळी आशाताई अचानक आल्यामुळे खायला काय आणायचं मला सुचलं नाही. मी आपलं विचारलं की “आशाताई, ‘इडली’ आणू का?”, त्यावर त्या पटकन म्हणाल्या, “इडली, काय खायचा पदार्थ आहे का? आजारी असल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा थालीपीठ आणि चहा मागव.” उत्तम सुगरण असलेल्या, खाण्याची आणि खिलवायची आवड असणाऱ्या आशाताईंनी एका क्षणात सुचवलं.
खाणं, स्वयंपाक, त्याची भांडी, मंडईतून ताजी भाजी घेण्याची आशाताईंना विशेष आवड.
माझ्या मुलावर ‘नील’ वर त्यांचं विशेष प्रेम. कायमच त्याच्या निळ्या डोळ्यांची आठवण काढणार आणि न चुकता विचारणार की “कसा आहे आपला निळ्या?”
आम्ही राहत होतो त्या बिल्डिंगमध्ये आम्ही सोडलं तर कुणाला गाण्याची आवड नव्हतीच. त्यामुळे आमच्या बिल्डिंगमधून गाण्याचे सूर ऐकू यायची वेळ क्वचितच.
एका दुपारी आमच्या मजल्यावर Lift चं दार वाजलं. कुणीतरी अप्रतिम आवाजात काहीतरी गुणगुणतय असं ऐकू आलं. घरातल्या वक्तींसारख
सवयीचं असल्याप्रमाणे बेल न वाजवता, ग्रीलच्या फटीतून बोट आत घालून आतली कडी काढावी आणि दर उघडावं तसं करत साक्षात ‘आशाताई’ आमच्या नीलला भेटायला घरी आल्या होत्या.
यशवंतराव चव्हाण सभागृहात बाबांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी आलेल्या आशाताईंनी स्टेजवरून “आमचा ‘निळूभाऊ’आला आहे का?” असं आवर्जून विचारल्याची आठवण आजही अनेकांच्या लक्षात आहे.
मी आणि मुक्ता..... माझी बायको, कधीच विसरणार नाही अशी आशाताईंची भेट म्हणजे माझी मुलगी ‘सारा’ लहान असताना घरी आल्याची.
आमचा घराचं नुकतच नूतनीकरण झालेलं. ओपन किचनमध्ये, आपण केलेली फोडणी बाहेर जाते अशी आशाताईंची तक्रार , तर टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भांड्यांचा आकार आवडल्याची दाद…
त्या दिवशी ते दीड-दोन तास मंत्रमुग्ध करणारे होते. मी, बाबा, मुक्ता आणि आशाताई, चौघं जणं टेबलावर निवांत गप्पा मारत,आशाताईंचे शब्द मनात साठवत होतो.कधी मधेच नीलशी बोलत, साराला नाच रे मोरा ची ओळ गुणगुणत आशाताईं जुन्या आठवणी सांगत होत्या.
जुन्या गायिकांच्या आवाजाचं वैशिष्ठ, त्यांना काय आवडल, ती एखादी जागा गुणगुणत होत्या.आम्हाला आमचा हेवा वाटावा इतके अप्रतिम क्षण होते ते.
मुक्ताला स्वयंपाकाविषयी सांगत, ब्राह्मणी गोड वरण भात वर साजूक तूप त्यांना विशेष आवडत असे सांगत होत्या.गोड वरण सगळयांचं चांगल जमत नाही , मला मात्र उत्तम जमतं, अस आवर्जून सांगत होत्या .
गप्पांच्या मध्येच घरातल्या आजीनी नातवाला सांगाव तसं नीलला “आता माझ्या आवडत्या Serial ची वेळ झाली आहे टीव्ही लाव”असं हक्काने सांगत. त्या हिंदी Channel वरची शंकराची मालिका तितक्याच तन्मयतेने बघत होत्या. त्यातली शंकराची भूमिका करणारा अभिनेता मला आवडतो. हे सांगायलाही विसरल्या नाहीत.
फक्त गाणंच नव्हे तर खाणं, फिरणं, उत्तम निटनेटक रहाण,खरेदी करणं, लोकांना भेटणं, प्रेमानं खिलवणं या सगळ्यात रस घेत, आयुष्य कसं जगावं, कधीही जुन्या आठवणींमध्ये न रमता, नवीन पिढीबरोबर जात विरघळणं असलेल्या आशाताई आम्हाला आणि आपल्याला सतत भेटत राहील्या.
माझ्या बाबांच्या शब्दांत सांगायचं तर, “आशाताईंच्या गाण्यांनी आपल्या सगळ्यांची दैनंदिनी आनंददायक केली आहे.”
पाळण्यातले चिमुकले डोळे त्यांचंच गाणं ऐकून झोपी जातात, तर प्रेयसीत्यांच्याच गीतातून प्रेमाची साद घालते,त्यांच्या नाट्य संगीताने मन प्रसन्न होते तर त्यांच्याच लावण्यांनी कार्यक्रमांची रंगत वाढते. त्यांच्या भक्तिगीतांनी देवळाच्या ओसऱ्यां दुमदुमतात तर तरुणाई त्यांच्या गाण्यावर “ ले गई ले गई म्हणत बेभान होऊन नाचते. त्यांच्या आर्त स्वरांनी डोळे पाणावतात. तर त्यांच्याच स्वरांनी नवीन उत्साह, आशा, उमेद जागवतात. असा हा चिरंतन स्वर आपल्याला सतत भेटत राहिला आणि आपलं आयुष्य समृद्ध करत गेला.
हा चिरतरुण आवाज आता आपल्याला दिसणार नाही पण त्यांचे ते सुर कायमच पुढे वर्षानुवर्ष आपल्याबरोबर राहतील.
- केतन गाडगीळ, पुणे
( हा लेख मी केतन गाडगीळ यांच्या सौजन्याने..त्यांना विचारून इथे घेतला आहे)










