कोकणची निसर्गरम्य पार्श्वभूमी या चित्रपटाला तर
लाभली आहेच पण त्याचबरोबर तांबड्या मातीतील एक -एक इरसाल नमुने
प्रेक्षकांसाठी खोचक हास्याची बरसात करणार आहेत. एका खट म्हाताऱ्या
शेतकऱ्याची आणि त्याच्या मग्रुर मालकाची हास्याफोटक जुगलबंदी म्हणजेच
वैकुंठाला जाता जाता.
कोकणातल्या सर्व
इरसालांचे गुरु दिलीप प्रभावळकरच प्रमुख भूमिकेत असल्यामुळे हास्याचे पिक
भरभरून आले तर नवल कसले? जोडीला मनोज जोशी, निखिल रत्नपारखी,
अतुल परचुरे, किशोरी शहाणे, विकास कदम, ज्योती मालशे, भाऊ कदम, कमलाकर
सातपुते हि एकापेक्षा एक वरचढ मंडळी असल्यावर हास्याची उधळ माधळ व्हायला
कोंकण अधुरेच पडणार ! शिवाय साथीला कोकणातील अदभूत रम्यता आणि रांगडेपणा
आहेच. या चित्रपटात दिग्दर्शनाची बहार उडवून दिली आहे ती आदित्य सरपोतदार
या तरुण आयडियाबाज तरुणाने.
तांबड्या मातीतल्या आणि हिरव्यागार डोंगरातल्या
सौंदर्या बरोबरच सर्व व्यक्तींचा माणूसपणा नेमका टिपलाय छायाचित्रकार
राहुल जाधव यांनी. मंगेश धाकडे यांच्या संगीताला आंब्याचा रसाळपणा आहे तर
आमोद दोषी यांनी झक्कास सोंग बाजी रंगवली आहे. कला दिग्दर्शनाची धुरा उचलली
आहे ती शीतल कानविंदे आणि महेश कुडाळकर यांनी .
या चित्रपटातील गुरूंचे गुरु आहेत, पटकथा संवादात दशावतारी रंगत असणारे गुरु ठाकूर. त्यांच्या रचनेत शिमग्याचा आनंद आहे.
विनोदाची लज्जतदार मेजवानी घेऊन येणारा `नारबाची वाडी ` हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना हास्याची लज्जत खात्रीने देईल.
कलर्स वाहिनीवर गेली साडेचार वर्ष यशस्वीरीत्या `उतरन`
या मालिकेची निर्मिती करणारे निर्माते कल्याण गुहा आणि रुपाली गुहा आणि
त्यांच्या फिल्म फार्म ह्या निर्मिती संस्थेची पहिली कलाकृती
प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पाडेल.
चाकोरी बाहेरचा वेगळेपणा हे बंगाली आणि मराठी कलाकृतीच खास वैशिष्ट्य
असतं, म्हणूनच शज्जानो बागान या मनोज मित्र लिखित गाजलेल्या कादंबरीवर
आधारित `नारबाची वाडी` हा मराठी चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शीत होईल.