Saturday, September 12, 2020

पिंपळपान...

जाळी झालेले एक पान सहज वहीत गवसले 
जणू जुन्या स्मृतींना देत त्या आठवणी साठवित पहुडले 

 किती दिवस झाले आता निटसे आठवत नाही 
किती स्वप्ने गळून गेली आता ती उगाळायची नाही 

 वाट पाहुन थकलेले पाय कधीचेच थांबलेले 
नव्या स्वप्नांच्या धुंदीत तेही विसावलेले 

उरी चेतल्या , जागल्या त्या आठवांच्या नोंदी 
किती आणा, शपथा ती होती एक धुंदी 

नाही साहवेना आता जुनी झाली गाठोडी
चेतावली त्यात आता अंधुकशी चिंधोटी 

सारी कधी स्वप्ने पुरी होत असतात का ? 
तरीही कुणी ती पाहायची सोडतात का ? 

 गेली वर्षे आणि महिने गेला तो काळ
 पिंपळाची जीर्ण पाने नको करू त्याचा पाचोळा

 नांदती सुखी आता दोन जीव दोही दिशी 
उरलेल्या आयुष्याच्या गाठी आली फक्त एकादशी....


 -     सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com 

Sunday, September 6, 2020

काळ बदलला..


आमच्या लहानपणी वडील सांगायचे ५ रुपये शेर गहू मिळायचा. आंबे तर असे ढिगाने खायचो. ब्रिटीशांच्या काळात ३५ रु. तोळा सोने होते..स्वस्ताईचा काळ होता..मुबलकता होती..
आज सारे ते काही स्वप्नासारखे भासते .
पण..मी जेव्हा पुण्यात आलो १९७४ मध्ये , तेव्हा अमृततुल्य चहा १५ पैसे होता. मी नारद मंदीरात रहात होतो..तेव्हा महीना २० रुपये भाडे होते..आणि जेवणाचे ५० रुपये महिना खानावळीचे देत होतो..पगार तरी काय होता..दरमहा १५० रुपये...पण तरीही माझा खर्च भागवून मी महिना ५० रूपये एम टी (मेल ट्रान्सफर) ने सातारला घरी पाठवू शकलो..
मी म्हणेन हा काही स्वस्ताई -महगाईचा झगडा नाही...ही आहे सारी वस्तुस्थिती.
तरूण भारतमध्ये नोकरीला लागल्यावर १८ मार्च १९७४  दोनच महिन्यात पुण्यात सायकल असावी या हेतूने विचारणा केली..तर तेव्हा हिरो कंपनीची सायकल २९० रूपायांना होती..व्यवस्थापकांना सायकलसाठी कर्ज मागितले..२५० रूपये..ते पुढे हप्त्याने फेडले..तेव्हा कुठे माझे स्वतःचे पहिले वाहन झाले..साय़कच्या हॅंडलवर आणि मधल्या बारमध्ये आपले नावही कोरून घेतले..तेव्हा त्या सायकलवर बसणा-या माझा रूबाबही वाढला. तेव्हा काही फारशी वाहने रस्त्यावर नसत.. साय़कलीच खूप असत..सातारला सायकल शिकल्याने त्याचा हा फायदा पुण्यात असा झाला..


आणि आज...सारे बदलले आपल्या देखत...किंमत पैशाला नाही..माणसाला नाही..भावनेला नाही..रस्त्याने जाताना एखादा अपघात झाला..तर बाजूचे फारसे कोणी थांबत नाहीत..ज्याला त्याला स्वतःचे पडले आहे...





-सुभाष इनामदार, पुणे.