चिपळूणचं साहित्य संमेलन "वाजत'-गाजत (एकदाचं) पार पडलं. नंतर दोनच
दिवसांनी अपेक्षित बातमी वाचायला मिळाली. संमेलनात दीड कोटी रुपयांच्या
पुस्तकांची विक्री झाली आणि चंद्रपूरच्या संमेलनाच्या तुलनेत ती जवळपास
निम्मीच असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं. संमेलनानंतर अशी बातमी हल्ली
अपेक्षितच असते. बहुदा नगरच्या संमेलनानंतर या बातम्या ठळकपणे प्रसिद्ध
होण्यास सुरवात झाली. नगरमध्येच गेल्या महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या "बुक फेस्ट'मध्ये ५० ते ७५ लाख
रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याचा दावा (संयोजकांकडून) केला गेला.
पुस्तकांची
विक्री ही थेट वाचनसंस्कृतीशी संबंधित गोष्ट आहे. पुस्तकं मोठ्या संख्येनं
विकत घेतली जातात, त्या समाजात वाचन अधिक आहे, असा याचा ढोबळमानानं अर्थ
काढता येतो; पण वाचनसंस्कृती लयास जात असल्याची, मराठी पुस्तकं खपत
नसल्याची ओरड तर गेल्या कैक दशकांपासून सुरू आहे. ती करणाऱ्या व्यक्ती
बदलल्या असतील; पण खंत कायम आहे. व्यासंगी पत्रकार अरुण टिकेकर यांच्या
म्हणण्यानुसार तर अशी खंत व्यक्त करण्याची परंपरा शतकापासूनची आहे. ते असो!
वाचनसंस्कृतीशीच थेट संबंध असलेल्या "ललित' मासिकानं यंदा
पन्नाशीत पदार्पण केलं आणि या मासिकाचा ताजा अंक याच संस्कृतीवरचा विशेषांक
आहे. या विषयाशी संबंधित आणखी काही बातम्या अलीकडेच वाचायला मिळाल्या.
उदगीरच्या एका सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःच्या पासष्टाव्या
वाढदिवसानिमित्त मित्रांना 65 पुस्तकं भेट दिली. त्या कार्यक्रमाला उपस्थित
असलेले ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या म्हणण्यानुसार वाचनसंस्कृती
वाढवण्याचाच हा एक वेगळा प्रयत्न. उदगीरकडून थोडं आंतरराष्ट्रीय स्तराकडे
वळू. "युनेस्को'नं यंदाच्या "पुस्तक राजधानी'चा मान बॅंकॉकला दिला आहे.
यापूर्वी हा मान आपल्या दिल्लीला मिळाला; आर्थिक राजधानी मुंबईला किंवा
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी गणल्या गेलेल्या पुण्याला नव्हे!
गाण्यांच्या,
चित्रपटांच्या आणि अभ्यासाच्या ऑडिओ-व्हिडिओ कॉम्पॅक्ट डिस्क विकणाऱ्या
नगरमधल्या एका दुकानात पंधरवड्यापूर्वी चक्कर मारली, तेव्हा तिथं नवीनच
काही दिसलं. तिथं होती "ऑडिओ बुक्स!'
"कथा मोकाशी' (दि. बा.
मोकाशी), "सारे प्रवासी घडीचे' (जयवंत दळवी), "शितू' (गो. नी. दांडेकर),
"समुद्र' (मिलिंद बोकील) अशी चार "पुस्तकं' तिथं "सीडीं'च्या रूपात उपलब्ध
होती. या दुकानाच्या शेजारीच पूर्वी एक पुस्तकाचं दुकान होतं. "आता पुस्तकं
कुणी विकत घेत नाही' असं खंतावलेल्या सुरात सांगत त्या दुकानदारानं ती
विकायला ठेवणं नव्या सहस्रकाच्या सुरवातीलाच बंद करून टाकलं! आणि आता
त्याचा सख्खा शेजारी पुस्तकंच; पण वेगळ्या स्वरूपात विकू लागलाय.
यातली
"शितू', "समुद्र' आणि "सारे प्रवासी घडीचे' ही पुस्तकं कादंबरीस्वरूप
आहेत. "कथा मोकाशी'मध्ये "माजोरी', "परागंदा', "आता आमोद सुनासी आले' आणि
"वणवा' या चार कथा आहेत. प्रत्येक पुस्तकाच्या दोन दोन "सीडी' आहेत.
"शितू'चं मुखपृष्ठ पुस्तकाचंच आहे. मग मूळ पुस्तकाच्या आणि त्याच्या "ऑडिओ'
रूपांतराच्या किमतीची तुलना केली. "समुद्र' ८० रुपये (२२५ रुपये ऑडिओ
बुक), "शितू' ९५ (२०० रुपये) आणि "सारे प्रवासी घडीचे' १५० रुपये (२५०
रुपये) अशा किमती आहे. म्हणजे मुद्रित स्वरूपातल्या पुस्तकाहून "ऑडिओ बुक'
अधिक महाग. किमतीतला फरकही लक्षणीय.
किमतीत
असा फरक असणं स्वाभाविक. कारण "ऑडिओ बुक'मध्ये कुणीएक कथा वाचून सांगतो
आहे, असं नाही. तिथं कथा सांगणारे "कलाकार' आहेत, "पटकथाकार', "संगीतकार'
आणि "दिग्दर्शक'ही आहे. त्याचं आधुनिक, महागडं तंत्र आणि ध्वनिमुद्रण आहे.
पुस्तकाच्या निर्मितीसाठीही लेखक, चित्रकार, मुद्रक, प्रकाशक असे घटक
आवश्यक असतात. तरीही वाचकापुढे असतो तो फक्त लेखक. त्याचा आणि लेखकाचा हा
अप्रत्यक्ष; तरीही थेट संवाद असतो. "ऑडिओ बुक'मध्ये मात्र लेखक आणि श्रोता
यांच्यात संवाद घडवून आणणारे मध्यस्थ म्हणून कलाकार, पटकथाकार, संगीतकार
काम करीत आहेत. कथेतल्या पात्रांनुसार कलाकार वेगळे. पार्श्वसंगीतही आहे.
त्यासाठी नाव असलेली माणसं निवडली आहेत. त्यांना त्यांच्या नावाप्रमाणे
पैसेही मोजले असणार.
पुस्तकं महाग असतात, हीही ओरड जुनीच; पण आता
आलेल्या "ऑडिओ बुक्स'च्या किमतीच्या तुलनेत ती स्वस्तच ठरतील. असं असताना
ही "महाग' पुस्तकं अधिक महाग करण्यानं वाचनसंस्कृतीचं हित कसं साधलं जाणार
आहे?
आणि महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तकांचं नाट्यरूपांतर आहे का? हा उघड
उघड माध्यमबदल आहे. ही "ऑडिओ बुक्स' "प्रकाशित' करणाऱ्या "स्नॉवेल'च्या
संकेतस्थळावर म्हटलं आहे . "हे पुस्तकाचं निव्वळ अभिवाचन नाही...तरुण पिढी
हाताळत असलेली माध्यमं आणि उपलब्ध लेखनाचं असलेलं स्वरूप यांतली तफावत कमी
करण्यासाठी सकस लेखन निवडून ते श्राव्य स्वरूपात रसिकांसमोर मांडणं, असा हा
उपक्रम आहे...'
नाटक "पाहण्या'साठी असतं. मग त्याच्या संहितेचं
पुस्तक काढणं किंवा चित्रपटाची पटकथा पुस्तकरूपानं सादर करणं हाही
माध्यमबदल नाही का? पण नाटकात काय किंवा चित्रपटात काय "कथा'च महत्त्वाची
असते ना?
प्रश्न असा पडतो, की वाचणं आणि ऐकणं यातलं अधिक सोपं किंवा
माणसाला आवडणारं काय आहे? कारण कमीत कमी कष्टात अधिकाधिक सुख मिळवणं, ही
माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. वरवर पाहिलं, तर वाचण्यापेक्षा ऐकणं सोपं
आहे. दुसरं एखादं काम करत करत ऐकणं आपल्याला सोपं वाटतं. विशेषतः गाणी
ऐकतानाचा हा आपला अनुभव असतो. वाचताना मात्र तुम्हाला त्यावरच लक्ष
केंद्रित करावं लागतं. रेडिओ ऐकता ऐकता वाचणारेही आहेतच; पण नीट पाहिलं, तर
एकाच वेळी दोन्ही कृती करणं - वाचणं आणि ऐकणं - शक्य नसतं, असंच लक्षात
येतं. नेहमीची गाणी (सहज) ऐकणं आणि पुस्तक (लक्षपूर्वक, तोच हेतू ठेवून)
"ऐकणं' यातही फरक आहे. फार तर भाजी किंवा तांदूळ निवडता निवडता पुस्तक ऐकणं
शक्य आहे!इंग्लिशमध्ये "वेलरेड' असं विशेषण आहे. मराठीत त्याला
"वाचनसमृद्ध' असं म्हणता येईल का? पण तो आपला शब्द वाटत नाही.
प्रसिद्ध
कवयित्री शान्ता ज. शेळके यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं ः "मराठीत
आपण "बहुश्रुत' म्हणतो.' व्यासंग किंवा व्युत्पन्नता याचं वर्णन करण्यासाठी
हे दोन्ही शब्द वापरले जातात. "बहुश्रुत'मधील "श्रुती' महत्त्वाची आहे.
आपलं जुनं वाङ्मय असं ऐकून, पाठ करूनच पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवलं गेलं
आहे.
"टीव्ही' वाहिन्यांचा चोवीस तासांचा रतीब सुरू झाल्यावर "वाचन
कमी होत असल्याचं' खापर प्रामुख्यानं "टीव्ही'वर फोडलं गेलं. एकविसाव्या
शतकाच्या पहिल्या दशकात "इंटरनेट' आणि "सेल फोन' ही नवी सुटसुटीत माध्यमं
अपेक्षेहून अधिक वेगानं किती तरी लोकांपर्यंत सहजतेनं पोचली. नव्या पिढीला
ती अधिक आपलीशी वाटली. एका इंजिनीअर मित्रानं मला मोबाईलमध्ये साडेतीनशे
पानांचं पुस्तक "भरून' दिलं होतं. तेही "ऑडिओ बुक'च ना!
वाचण्याची
संस्कृती आणि ऐकण्या-पाहण्याची संस्कृती यांमध्ये हे द्वंद्व तर सुरू होत
नाही ना? नवी जागतिक संस्कृती "माणसांच्या गरजा निर्माण करा, त्या वाढवा
आणि त्याला त्यासाठी पैसे खर्च करायला लावा,' या धोरणाची आहे. त्यानुसार तर
"वाचनीय' पुस्तकांची "श्रवणीय' पुस्तकं होत नाहीत ना? नव्या कोऱ्या
पुस्तकाचा बेधुंद करणारा वास या "सीडी'ला खचितच नसेल.
-सतीश स. कुलकर्णी
sakul05@gmail.com
(सकाळच्या सौजन्याने)
http://online3.esakal.com/esakal/20130203/5249533858247756522.htm