शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या "फुलवंती" या कादंबरीवर आधारित हा चित्रपट हा पेशवेकाळात असलेले कलेचे महत्व आणि बुद्धिमान व्यक्तींचा असलेला मान दाखविणारा एक उत्तम आविष्कार.... म्हणजे फुलवंती..!
हा चित्रपट काढणे आणि तोही इतक्या देखण्या पद्धतीने सादर करणे हे खरोखरच शिवधनुष्य..ते पेलण्याचे साहस या चित्रपटातून यशस्वी झाल्याची नक्कीच नोंद घ्यावीशी वाटली.
प्रत्येक घटना..त्यातल्या व्यक्तिरेखा तुम्हाला खिळवून ठेवतात.. नृत्याची भक्कम बाजू तुमचे मन प्रसन्न तर करतेच पण त्यासाठी घेतलेले प्रयत्न बेफाट आहेत..
हा चित्रपट कलाप्रेम ..आणि दिलेल्या शब्दांचे महत्व पेशवे काळात किती असामान्य होते ..आणि न्याय देणारे पेशवे कलेचा आणि बुद्धिमत्तेचा किती आदर करीत होते..त्याचेच दर्शन फुलवंती मध्ये घडते..
चित्रपटात अनुभवताना व्यक्तिरेखांचे संवाद तुम्हाला त्यातून नेमका परिणाम देतात..प्रवीण विठ्ठल तरडे..यांनी ही बाजू समर्थपणे पेलली आहे.
कुठेही अवस्तवता नाही..नेमके काय साध्य करायचे आहे ते लेखक जाणून आहे..प्रसंगांचा परिणाम साधणारे आणि व्यक्तिरेखांचे महत्व ओळखून चित्रपट घडत राहतो..
नर्तकीचे आणि नृत्य कलेचे महत्व ओळखून फुलवंतील दिलेली भरपूर स्पेस..यातून सौदर्य अधिकाधिक बाहेर येते..
पुण्यातील वातावरण दाखविताना थोडक्या व्यक्तिरेखांच्या रूपाने सहज उलगडत जाते..
पेशवाई..दरबार.. त्यांची पात्रनिवड..आजूबाजूचे वाडे..वाड्यांची सुंदरता..प्रसन्नता..दरबाराचे भव्यपण..
नृत्य कलेतील बारकावे.. घुंगरूचे महत्व..पखावाजातील नादमयता..त्यासाठी शास्त्रीबुवा यांनी घेतलेले परिश्रम..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नृत्याला महत्व देऊन नटविलेली अतिशय उत्तम गाणी..
नाजूक आणि कलानिपुण फुलवंती..प्राजक्ता माळी यांच्या उत्तम ..देखण्या सादरीकरणातून चित्रपटभर भारून राहते..
देखणा..रुबाबदार..आणि बुद्धिमान असलेल्या
व्यंकट शास्त्री यांना गाष्मिर महाजनी यांनी भारदस्त ..आणि नेमक्या भावनिक प्रसंग साकारून उभा केला आहे..
लक्ष्मी या व्यक्तिरेखेत सोज्वळ रुपात देखण्या दिसत होत्या स्नेहल तरडे.. पण भुमिकेपेक्षा दिग्दर्शक म्हणून त्या अधिक प्रभाव पाडतात..
प्रसाद ओक, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, मंगेश देसाई, वनिता खरस्त, जयवंत वाडकर...साऱ्याच कलाकारांनी चित्रपट अधिक परिणामकारक केला आहे..
अविनाश - विश्वजित या संगीतकार जोडीने गाणी ऐकत..नव्हे तर पहात रहावीत अशी छान घडविली आहेत.
आर्या आंबेकर, वैशाली म्हाडे, राहुल देशपांडे, बेला शेंडे यांनी गायलेली गाणी मनावर अधिराज्य गाजवतात.. यातली गीते स्नेहल तरडे , वैभव जोशी आणि विश्वजित जोशी ,डॉ. प्रसाद बिवरे, मंदार चोळकर याची आहेत..त्यांना दिव्य मराठीचा गंध आहे.. आहेत..त्याला अर्थ आहे.
घुंगरू आणि पखवाज यांचे नाते उलगडत
जाणारा हा चित्रपट..
चित्रपट पहातो त्या महेश लिमये यांच्या उत्कृष्ट सिनेफोटोग्रफीच्या माध्यमातून..
रंगसंगती आणि परिणामकारकता सारेच यात उठून दिसते..
खरे तर बरेच काही लिहिण्यासारखे आहे..पण शब्द संपतात..तिथे चित्रे दिसू लागतात..
तसा हा नेहमीच्या कौटुंबिक पठडीत नसलेला कलात्मक दर्शन घडविणारा इतिहास..सौदर्य आणि कला..शास्त्र याकडे लक्ष वेधणारा चित्रपट बनविल्यांद्दल ..एक मराठी प्रेमी म्हणून प्राजक्ता आणि स्नेहल आणि सर्व त्यासाठी कलाकारांचे आभार मानले पाहिजेत.
तुम्ही आम्हाला अधिक समृध्द केलेत..
चित्रपट गृहात जाऊनच या फुलवांती.. चा अनुभव घेणे अधिक उत्तम राहील..
प्राजक्ता माळी यांच्या उत्तम आणि धाडसी निर्मितीमुळे हा चित्रपट एक सुंदर कलाकृती पाहिल्याचे समाधान मिळते..
या गोष्टी खटकतात....
एक म्हणजे फुलवंती.. यांची भाषा..मध्येच त्या ग्रामीण बोलीत बोलतात..तर बरेच वेळा..शुद्ध मराठीत..आणि कशी दोन्हींची सरमिसळ होते..
दुसरे म्हणजे.. फुलवंती.. यांना पुण्यात नृत्य सादर करण्यासाठी बोलाविले जाते..तेंव्हा त्या तलावात नहात असतात.. ह्याची काय आवश्यकता होती..
यमुनाजळी..किंवा.. देरे कान्हा..डोक्यात होते की काय..नकळे..!
उच्च बुद्धिमत्ता असलेला माणूस..सहज बाहेरच्या न जाणाणाऱ्या स्त्रीला चुकून वेश्या..म्हणणे..
आणि पखवाज वादक होण्यासाठी असा आटापिटा करणे..
एक नोंद..म्हणजे चित्रपट संपल्यावर जेंव्हा सहभागी कलाकारांची नामावली दाखविली जाते ...त्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृह सोडत नाहीत..शेवटचे नृत्य अनुभवत असतात..हा परिणाम चित्रपटाचा..
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
#Prajakttamaali #snehaltarde
#फुलवंती #Fulwanti
No comments:
Post a Comment