
थेंबा थेंबानं धरणी आज न्हावून निघाली
तिच्या कोमजल्या मनी चैतन्याची जाग आली ।।
कसे कळायचे तुला त्याचे मनीचे ग गाणे
रोमारोमात भिनली त्याच्या देहाचे गे वारे ।।
तापलेल्या मातीलाही आज वाटे शांतशांत
धारा निघताना वाटे देह झाला ग निवांत ।।
नाती गोती तिथे वाटतात दूरदूर
आला पाऊस ग तेव्हा थेंबाथेंबाचे ग सर ।।
धारा पडल्या ग येथे न्हाली धरणी देवता
नको थांबूच नये ग त्याच्या मुखीची आर्तता ।।
आली जाग तेव्हा माय म्हणाली ग मला
उठ लेक उठ आता धरणी दुभंगली तेला ।।
वाटे पडावा पडावा तोच माझ्या मनातून
नको होवावी पहाट झाले चिंब माझे मन ।।
- सुभाष इनामदार
५, दत्तश्री, ६३४-६ बिबवेवाडी
पुणे - ४११ ०३७.
(9881099056)