Friday, January 30, 2009

पुण्यातल्या कलावंतांना हे कळणार तरी कधी?

दिवसभरात पुण्यात दोन-तीन सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात.कुठे अरंगेत्रम तर गाण्याची मैफल. आठवणीतली गाणी, ओठावरची गाणी नाही तर जुन्या संगीतकारांच्या गीतांचा बहारदार नजराणा.
खरे म्हणजे (आणि ते खरही आहे) इथ गल्ली-बोळात ( अणि आता तर पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातही) कलावंतांची खाण आहे. प्रत्येकालाच मोठे नाव मिळेल अशी शक्‍यताही नाही (ती त्याची अपेक्षाही नसते) तरीही त्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो.
आज सारे कलावंत कलेसाठी कला करत नाहीत. पोटासाठी नोकरी किंवा व्यवसाय असतोच. हौसेला ही आवड जोपासत असतो.
बहुधा संस्था कार्यक्रम करते. कधी कॅसेटच्या निमित्ताने तो होत असतो तर कधी स्वतःची कमाई टाकून तो स्वतःच सादर करीत असतो.
कार्यक्रम करण्यात गैर काहीच नाही. ते व्हायलाच हवे. नाहीतर त्याची तालीम आणि तीही रसिकांसमोर गायची- वाजवायची सवय कशी होणार?
होते इतकच त्यात जे सहजी शक्‍य आहे ते व्यावसायिक पध्दतीचे सादरीकरण मात्र होत नाही.
यासाठी पैसा जादा लागतो असे आजिबात नाही .इथे लागते ती सादरीकरणातील सफाई. निवेदक आरामात मांडी घालून आपले तेच ते विनोद वा किस्से लोकांवर आदळत असतो. वादकही रंगमंचावरच्या चौकोनी मंचावर बसून वाजवताहेत. त्यांच्या वादनात खोड काढत नाही पण त्यामुळे त्यातली जोश, उत्साह उणावतो आणि दिसतोही. गायक वही घेऊन गाण्यातले बोल आळवित असतो तेही बसून. (सगळेच जण असे करतात हा दावा मुळीच नाही)कार्यक्रम पाहताना स्वरांचा रवंथ केल्याचे फिलिंग येते.
ऐकणाऱ्याला आणि सादर करण्यालाही उभारी येईल अशी ती मैफल असावी. संख्या कमी असली तरी हरकत नाही. पण जे कराल ते पुन्हा-पुन्हा पहायला आवडेल असेच हवे.
रंगमंचावर कार्यक्रम करताना तो "सादर" होत असतो याची जाणिव ठेऊन जर केला तर तो अधिक मनपसंद होईल.
अशोक हांडेंचे कार्यक्रम त्यासाठी पहा. ती सफाई हवी. प्रकाशाची, ध्वनीची इवढी गरज नाही. पण प्रेक्षकांसमोर कार्यक्रम मांडावा कसा ते त्यातून समजेल.
एक नक्की. कलावंतात खोट काढण्यासाठी हे सांगत नाही. तर पुण्याचा तुरा मानाच्या पगडीतला शिरपेच म्हणून मिरवावा,हिच इच्छा!

सुभाष इनामदार, पुणे
subhshinamdar@gmil.com