Saturday, June 29, 2013

नाट्यसंगीताचा बहारदार नजराणा....

पुण्याच्या ऐतिहासिक अशा हिराबागेतल्या टाऊन हॉल कमिटीच्या पेशवाई दिवाणखान्यात शुक्रवारी संध्याकाळी पावसाळी वातावरणाचा साज बाहेर सजत असतानाच नाट्यसंगीताच्या सुरावटींचा बहर एकामागोमाग  रंगत होता...ज्या वास्तुने अतिशय वेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची व्याख्याने..ऐकली ..समाजातल्या धुरंदर मंडळींचे कौडकौतूक केले..त्या या वास्तुत रंगलेल्या मैफलीची आठवण आजही ताजी आहे..संगीत नाटकांच्या वैभवशाली पंरंपरेचा भरजरी नजराणा दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वतीने पूर्वी भावे यांच्या सुरेल निवेदनातून पुणेकरांच्या पसंतीस पडला...त्यांनी वन्समोअरच्या आणि टाळ्यांच्या निनादात नाट्यसंगीताच्या या पदांना दिलखुलास दाद दिली.

१८८० सालच्या `संगीत शाकुंतल` या संगीत रंगभूमीचा आरंभ समजल्या जाणा-या नाटकातल्या `पंचतुंड नर रुंड मालधर..`  या नांदीने कार्यक्रमाची सुरवात केली.. 


श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, गौतमी चिपळूणकर आणि ऋतूजा लाड या चार तरुण कलाकारांनी नाट्यसंगीताच्या सादरीकरणातून आजही समर्थपणे ही युवापिढी किती तयारीने नाट्यसंगीताची ही परंपरा सांभाळते आहे याचे उदाहरण मिळते.

`नांदी ते भेरवी`... असा सतरा गीतांचा हा प्रवास या कलावंतांनी आपल्या ओजस्वी आवाजातून रंगतदारपणे सादर केला...यातही अमोल पटवर्धन या मुळातल्या सांगलीच्या पण सद्या पुण्यात राहणा-या कलाकाराने सादर केलेले ययाती-देवयानी या नाटकातले `प्रेम वरदान हे पद...`   तसेच सावनी दातार-कुलकर्णी यांनी भावगीत आणि नाट्यसंगीत यांचे एकत्रित मिश्रण असलेले ज्योत्स्ना भोळे यांनी कुलवधूसाठी गायलेले पद `खेळेल का देव माझा माझीया अंतरी...`आणि गायत्री वैरागकर-जोशी यांनी आवाजातली ..... दमदार तयारीतून सादर केलेले `आज सुगंध आला लहरत `...यातून आपली नाट्यसंगीतातली पकड सिध्द केली. 

`मंदारमाला` नाटकातली `बसंत की बहार आयी... `या श्रीरंग भावे आणि धनंजय म्हसकर यांच्या बहारदार सादरीकरणाने  दोन्ही कलावंताने आपली छाप पाडली.

`हे सूरांनो चंद्र व्हा..`हे ऋजूता लाड हिने गायलेले पद तर फारच आकर्षक होते..त्यातला भाव आणि त्यातली आर्तता सारेच तिच्या सुरांमधून आतप्रोतपणे व्यकत झाले..यातून तिची तयारी आणि सादरीकरणातला दिमाखदारपणा साराच सूरांतून पाझरतो..




श्रीरंग भावे यांचे कट्यार मधले `घेई छंद...` 
















 आणि धनंजय म्हसकर यांचे `श्रीरंगा कमला कांता..`ही दोन्ही पदे रसिकांनी डोक्यावर घेतली...
म्हणजे त्यांच्या पसंतीची पावती वन्समोअरच्या निनिदात मिळाली...दोघांचीही स्वरांची हुकमत आणि नाटयसंगीत गाण्यासाटी पुरेशी तयारी ..सारेच उत्तम...

ऋजूता लाड हिने अखेरीस सादर केलेले `कट्यार`मधील `लागी कलेजवा कट्यार`....चा परफॉमन्स तर खरोखरीच लाजवाज होता...



`बालगंर्धव `चित्रपटातल्या ...`चिन्मया सकल ह्दया ..`या भेरवीने जेव्हा श्रीरंग भावे यांने मैफलीची सांगता केली  तेव्हा असा कार्यक्रम अजुन चालावा अशी चुटपूट लागून राहिली..
ही मैफल रंगण्यापाठीमागे आहेत आणखी दोन कलावंत..

खरे तर हे चारही गायक कलाकार मुंबईचे..पण त्यांना साथ करणारे आमचे पुण्याचे राजीव परांजपे यांचा ओर्गनवरचा बोलका हात जेव्हा स्वरांवर हळुवार फिरतो हे मान्यच करायला हवे..

एकूणच नाट्यसंगीताचा हा बहारदार नजराणा इथे रसिकांसमोर सामोरा आला...


त्यातली मैफलीची रंगत वाढविणारे पूर्वी भावे हिचे निवेदन होते..त्यात माहिती तर होतीच पण याविषयाची मांडणी आणि नाटकातल्या संगीत परंपरेचा असलेला अभ्यासही आर्वजून दिसत होता...सहजता आणि माधुर्यता याचीही यात तेवढीच ताकद होती...


एकूणच ज्यांनी या नाट्यसंगीत मैफलीचा आनंद घेतला ते रसिक भाग्यवान ठरले....असे कार्यक्रम करून दादार माटुंगा कल्चरल सेंटर आपल्या दिमाखदार परंपरेचा सार्थ अभिमान बाळगत ती जोपासत ठेवण्याचे व्रत अंगीकारत आहेत...याचा अभिमान आहे..

दादर माटुंगा कल्चरल सेंटरचे सेक्रंटरी अशोक केळकर यांचेही कौतुक करायला हवे..गेली पाच वर्ष टाऊन हॉलच्या या भव्य आणि एतिहासिक व्यासपीठावर आपल्या संस्थेच्या वतीने नवनवीन नजराणा पुणेकर संगीत रसिकांना बहाल करीत असतात...






- सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276





Thursday, June 27, 2013

दगडातल्या झ-यातून पाझरणा-या ज्ञानगंगा






"मी ७४ वर्षांनंतर आज या माझ्या विद्यार्थ्य़ांनी मला शाळेत खेचून आणले. खरच मी त्यांचा आभारी आहे. आपल्या शाळेला दगडी शाळा म्हणतात.या दगडातून ज्ञानाच्या कितीतरी गंगा स्वतंत्रपणे समाजात वाहताहेत. या ज्ञानमाउलीला तोड नाही. या माऊलीली जपा.  शाळेची परंपरा पुढे चालवा. या शाळेसारखी उत्तुंग उंची गाठा. माझे तुम्हाला भरभरुन आशीर्वाद आहेत.... "

शनिवारी, ८ फेब्रुवारी २०१३ ला सुमारे ४२ वर्षानंतर आम्ही १९७१च्या अकरावीची बॅच माजी शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आजच्या शाळेच्या पदाधिका-यांच्या परवानगीने शाळेतल्या ८ वी व ९ वीतल्या एकेका तुकडीतल्या ९० मुलां-मुलींसमोर हा समारंभ आखला. त्यात आमच्या शाळेतले त्यावेळी संस्कार आणि ज्ञान देणारे आमचे गुरुजनांना शाळेत पाचारण केले..त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतला. त्यापैकी सर्वात जेष्ठ असे पिंगळे गुरुजी यांनी या प्रसंगी व्यक्त केलेले आरंभी दिलेले मनोगत खूप कांही सांगुन जाते.
गेली १० वर्ष आमच्या वेळचे विद्यार्थी कुठे ना कुठे एकत्र जमतो..शाळेच्या घडणीतून विविध श्रेत्रात स्वतःचे योगदान देणारे सारे मुलं-मुली काही ठोस विचार करतो. एकमेकांची सुखे-दुःखे वाटून घेतो. संस्कार हा शब्दही विसरत चालला असताना..शिक्षण देणा-या संस्थांचे आजचे बाजारी आणि केवळ पैसा हेच धेय्य बाळगणा-या शिक्षण संचालकांच्या वाढत्या काळात कित्येक वर्षांनंतर १९७१च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत येऊन केलेला हा शिक्षकांचा सन्मान हे विरळे दृष्य काही निवडक मंडळी शनिवारी अनुभवित होती.
दोन दिवसानंतर ह्याचे वर्णन करताना आजही ते सारे डोळ्यासमोर चित्र आणि गुरुजनांचा आशीर्वादपर संदेश मनात कायमचा कोरला गेला आहे.  यापुढे शाळेला जेव्हा केव्हा काही मदत लागेल तेव्हा खंबीरपणे उभे राहण्याचे आम्ही सा-यांनी ठरविले आहे.
याप्रसंगी आम्ही न्यू इंग्लिश स्कूल, सातारा  या आमच्या शाळेत आम्ही १९७१ च्या अकरावीचे सुमारे ६०-७० विद्यार्थी एकत्र जमून त्या काळातल्या शिक्षकांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. शनिवारी शाळतल्या काही मुलांसमोर शालामाऊलीच्या साक्षिने हे सारे घडले. द्रवीड, कंग्राळकर,यांचेबरोबरच शाळेच्या शाळासमितीचे मुख्य अशोक वाळींबे आणि सध्याचे प्रिन्सीपॉल शिंदे सर यांनी आपले विचार व मत मांडून हा समारंभ म्हणजे संस्काराचा किती मोठा भाग आहे..तोही या मुलांच्या साक्षीने व्हावा याचा आनंद व्यक्त केला.

त्याप्रसंगी आदरणीय कंग्राळकर, द्रवीड, लांडगे, माटे, हलगीकर, केंजळे, भाऊ आपटे, पिंगळे, के. पी. कुलकर्णी, कालगावकर, दामले या शिक्षकांचा सन्मान  विद्यार्थ्य़ांकडून करुन एक आगळा आदर्श घालून दिला.
आमच्यापैकी कांचन दोशी, कमलाकर क्षिरसागर, सुधीर देवधर, राजेंद्र देशपांडे आणि सुभाष इनामदार यांनी मनोगतातून शाळेच्या परंपरेचा सार्थ अभिमान व्यक्त केला.

संध्याकाळी आमच्याच एका विद्यार्थ्याचे कनिष्क कार्यालयात स्नेहमेळावा झाला. त्यातही शाळेच्या आजच्या परीस्थितीविषयी चर्चा होऊन..शाळेसाठी काही ठोस आर्थाक मदतीचा हात देण्याचे ठरले..काही वर्षापूर्वींच शाळेतल्या विद्यार्थ्य़ांसाठी शुध्द पाण्यासाठीची यंत्रणा बसविली होती.त्याचा सारा भारही आम्हीच उचलला होता.

मनोरंजनाचा  भाग म्हणून  सातारच्या चार कलावंताचा गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. त्यात या ५८ वर्षे वयाच्या चार आमच्याच मित्रांनी आपापली झलक सादर केली.
रविवारी सकाळी दोन वाहनांनी ठोसेघर, सज्ज्नगड आणि नंतर उरमोडी धरणाच्या परिसरात भटकंती केली.
दोन दिवस सुमारे ८० जण शाळेच्या त्यावेळच्या आठवणीत रमून केलेला दंगा, खाल्लेला मार आणि  झालेल्या संस्काराचे गोडवे गात दंग होऊन गेले होते..
यंदाच्या या दहाव्या स्नेहाच्या मेळाव्यातून हा मैत्री पार्क अधिक आनंदाने बहरुन गेला होता. सातारचे संजय बोपर्डीकर, शाम बेगमपुरे आणि जयंत सरवटे यांच्यासह अविनाश कुलकर्णी, मोहनदास देवींसह अनेक आमचेच मित्र तो यशस्वी करण्यासाठी काही महिने झटत होते

यापूर्वी पुणे, बारामती, गारगोटी, अलिबाग, डोंबिवली, वाई, इचलकरंजी अशा विविध ठिकाणी आम्ही मंडळी स्नेहवाटत..त्याचा सुगंध घेत एकत्र जमतात..शाळेच्या दिवसांची आठवण साठवण एकमेकात स्नेह दरवळत ठेवतात  .आणि यंदा तर शिक्षकांच्या सन्माच्या निमित्ताने शाळेत येतात..हा सारा हुरहुर लावणारा आणि हुरुप आणणारा काळ..
यासा-यातून मैत्री घट्ट होत जाते..स्नेहाचे धागे अधुन घट्ट गुंफले जातात...आणि पुढच्या पिढीवर संस्कार होतात.



- सुभाष इनामदार ,पुणे
(सदस्य मैत्री पार्क)
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, June 23, 2013

बालगंधर्व नटले आणि काहीसे ते पर्वही अवतरले..

`कलाद्वयी` या संजय गोगटे आणि विद्याधिश देशपांडे यांच्या संस्थेने अस्मिता चिंचाळकर, प्रियदर्शनी जाधव आणि अश्वीनी गोखले या तीन गुणी नाट्यसंगीताच्या पुण्यातल्या गुणी कलावंताकरवी बालगंर्धव गायकीचा पुरेपुर स्पर्श संगीत नाट्य रसिकांना दिला.

शनिवारची संध्याकाळ ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या छोटेखानी रंगमंचावर यातिनही गायिकांनी बालगंधर्व यांनी लोकप्रिय केलेल्या अनेकविध नाटकातल्या कांही पदांना अपल्याला शोभेल अशा शालीन वेशभुषेत शकुंतला, द्रोपदी, भामिनी, देवयानी, कान्होपात्रा अशा नायीकांच्या त्यावेळच्या पदांची रंगतदार मांडणी करुन ती रसिकांच्या पसंतीस उतरतील अशी सादर करुन हाऊसफुल्ल आणि वन्समोअरचाही गजर करून दाद देण्यास प्रवृत्त केले.

ही संकल्पना विद्याधिश देशपांडे यांची..त्यांनीच ती प्रत्क्षात उतरवली..पण त्यांचे खरे सूत्रधार आणि शब्दांतून व्यक्त केले ते वर्षा जोगळेकर यांनी... आपली सून आणि राम देव आणि सो. मीना देव यांची कन्यका आणि कलाविशारद वैभवी जोगळेकर यांच्या मदतीने नाटकाची माहिती..बालगंधर्व नाटकांची रंगत..त्यांच्या नाटकातली परंपरा आणि वैशिष्ठ्ये थोडी हटक्या पध्दतीने रसिकांच्या पसंतीस उतरतील अशा शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केला..रसिकांना ही वेगळी पध्दतही तेवढीच खुश करुन गेली.

अतिशय संगीत रसिक प्रेक्षक या कार्यक्रमाला लाभला...पुन्हा पुन्हा याचे प्रयोग व्हावेत अशी इच्छा अनेक रसिकांची आहे..कारण हे सभागृह कमी पडल्याने अनेकांना परत फिरावे लागले..आणि हा देखणा ठेवा अनेकांना वारंवार पहाता येईल.

अर्थात संजय गोगटे आणि विद्याधिश देशपांडे यांच्या साथीलाही तेवढीच दाद द्यायला हवी...
सहज वाटणारी अशी ही बालगंधर्वांचे गुरु भास्करबुवा बखले यांनी गंधर्वांकडून तयार करुन घेतली..ती ऐकायला सोपी आणि साधी असली तरी प्रत्यक्षात आणि तेही वेशभुषेसह सादर करणे हे काम कठीण आणि धाडसाचे....
या दोन्ही तयारअसलेल्या या साथीदारांनी आपल्या समोर गात असलेल्या गायिकांना ठेका धरत पुढची सूरांची नजर त्यांना दिली...


एक आवडेल असला नजराणा त्यांनी संगीत रसिकांना दिला याबद्दल खरोखरीच ते कौतुकास पात्र आहेत.


-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276