Thursday, June 27, 2013

दगडातल्या झ-यातून पाझरणा-या ज्ञानगंगा






"मी ७४ वर्षांनंतर आज या माझ्या विद्यार्थ्य़ांनी मला शाळेत खेचून आणले. खरच मी त्यांचा आभारी आहे. आपल्या शाळेला दगडी शाळा म्हणतात.या दगडातून ज्ञानाच्या कितीतरी गंगा स्वतंत्रपणे समाजात वाहताहेत. या ज्ञानमाउलीला तोड नाही. या माऊलीली जपा.  शाळेची परंपरा पुढे चालवा. या शाळेसारखी उत्तुंग उंची गाठा. माझे तुम्हाला भरभरुन आशीर्वाद आहेत.... "

शनिवारी, ८ फेब्रुवारी २०१३ ला सुमारे ४२ वर्षानंतर आम्ही १९७१च्या अकरावीची बॅच माजी शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आजच्या शाळेच्या पदाधिका-यांच्या परवानगीने शाळेतल्या ८ वी व ९ वीतल्या एकेका तुकडीतल्या ९० मुलां-मुलींसमोर हा समारंभ आखला. त्यात आमच्या शाळेतले त्यावेळी संस्कार आणि ज्ञान देणारे आमचे गुरुजनांना शाळेत पाचारण केले..त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतला. त्यापैकी सर्वात जेष्ठ असे पिंगळे गुरुजी यांनी या प्रसंगी व्यक्त केलेले आरंभी दिलेले मनोगत खूप कांही सांगुन जाते.
गेली १० वर्ष आमच्या वेळचे विद्यार्थी कुठे ना कुठे एकत्र जमतो..शाळेच्या घडणीतून विविध श्रेत्रात स्वतःचे योगदान देणारे सारे मुलं-मुली काही ठोस विचार करतो. एकमेकांची सुखे-दुःखे वाटून घेतो. संस्कार हा शब्दही विसरत चालला असताना..शिक्षण देणा-या संस्थांचे आजचे बाजारी आणि केवळ पैसा हेच धेय्य बाळगणा-या शिक्षण संचालकांच्या वाढत्या काळात कित्येक वर्षांनंतर १९७१च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत येऊन केलेला हा शिक्षकांचा सन्मान हे विरळे दृष्य काही निवडक मंडळी शनिवारी अनुभवित होती.
दोन दिवसानंतर ह्याचे वर्णन करताना आजही ते सारे डोळ्यासमोर चित्र आणि गुरुजनांचा आशीर्वादपर संदेश मनात कायमचा कोरला गेला आहे.  यापुढे शाळेला जेव्हा केव्हा काही मदत लागेल तेव्हा खंबीरपणे उभे राहण्याचे आम्ही सा-यांनी ठरविले आहे.
याप्रसंगी आम्ही न्यू इंग्लिश स्कूल, सातारा  या आमच्या शाळेत आम्ही १९७१ च्या अकरावीचे सुमारे ६०-७० विद्यार्थी एकत्र जमून त्या काळातल्या शिक्षकांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. शनिवारी शाळतल्या काही मुलांसमोर शालामाऊलीच्या साक्षिने हे सारे घडले. द्रवीड, कंग्राळकर,यांचेबरोबरच शाळेच्या शाळासमितीचे मुख्य अशोक वाळींबे आणि सध्याचे प्रिन्सीपॉल शिंदे सर यांनी आपले विचार व मत मांडून हा समारंभ म्हणजे संस्काराचा किती मोठा भाग आहे..तोही या मुलांच्या साक्षीने व्हावा याचा आनंद व्यक्त केला.

त्याप्रसंगी आदरणीय कंग्राळकर, द्रवीड, लांडगे, माटे, हलगीकर, केंजळे, भाऊ आपटे, पिंगळे, के. पी. कुलकर्णी, कालगावकर, दामले या शिक्षकांचा सन्मान  विद्यार्थ्य़ांकडून करुन एक आगळा आदर्श घालून दिला.
आमच्यापैकी कांचन दोशी, कमलाकर क्षिरसागर, सुधीर देवधर, राजेंद्र देशपांडे आणि सुभाष इनामदार यांनी मनोगतातून शाळेच्या परंपरेचा सार्थ अभिमान व्यक्त केला.

संध्याकाळी आमच्याच एका विद्यार्थ्याचे कनिष्क कार्यालयात स्नेहमेळावा झाला. त्यातही शाळेच्या आजच्या परीस्थितीविषयी चर्चा होऊन..शाळेसाठी काही ठोस आर्थाक मदतीचा हात देण्याचे ठरले..काही वर्षापूर्वींच शाळेतल्या विद्यार्थ्य़ांसाठी शुध्द पाण्यासाठीची यंत्रणा बसविली होती.त्याचा सारा भारही आम्हीच उचलला होता.

मनोरंजनाचा  भाग म्हणून  सातारच्या चार कलावंताचा गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. त्यात या ५८ वर्षे वयाच्या चार आमच्याच मित्रांनी आपापली झलक सादर केली.
रविवारी सकाळी दोन वाहनांनी ठोसेघर, सज्ज्नगड आणि नंतर उरमोडी धरणाच्या परिसरात भटकंती केली.
दोन दिवस सुमारे ८० जण शाळेच्या त्यावेळच्या आठवणीत रमून केलेला दंगा, खाल्लेला मार आणि  झालेल्या संस्काराचे गोडवे गात दंग होऊन गेले होते..
यंदाच्या या दहाव्या स्नेहाच्या मेळाव्यातून हा मैत्री पार्क अधिक आनंदाने बहरुन गेला होता. सातारचे संजय बोपर्डीकर, शाम बेगमपुरे आणि जयंत सरवटे यांच्यासह अविनाश कुलकर्णी, मोहनदास देवींसह अनेक आमचेच मित्र तो यशस्वी करण्यासाठी काही महिने झटत होते

यापूर्वी पुणे, बारामती, गारगोटी, अलिबाग, डोंबिवली, वाई, इचलकरंजी अशा विविध ठिकाणी आम्ही मंडळी स्नेहवाटत..त्याचा सुगंध घेत एकत्र जमतात..शाळेच्या दिवसांची आठवण साठवण एकमेकात स्नेह दरवळत ठेवतात  .आणि यंदा तर शिक्षकांच्या सन्माच्या निमित्ताने शाळेत येतात..हा सारा हुरहुर लावणारा आणि हुरुप आणणारा काळ..
यासा-यातून मैत्री घट्ट होत जाते..स्नेहाचे धागे अधुन घट्ट गुंफले जातात...आणि पुढच्या पिढीवर संस्कार होतात.



- सुभाष इनामदार ,पुणे
(सदस्य मैत्री पार्क)
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: