Monday, October 23, 2023

एकदा अनुभवल्याच पाहिजेत..

अनवट शांताबाई..
व्हायोलीनचे ते हळवे सूर सायंकाळचे हुरहूर लावणारे स्वर मंचावर वाजत रहातात..आणि त्यातच सुरू होते ..ही वाट दूर जाते.. ह्या सुरावटिकडे आणि शांता जनार्दन शेळके यांच्या जन्म गावपासूनचा प्रवास अभिवाचनातून उलगडला जातो..बालपण..तिथले वातावरण..मनावरचे आईचे ...आज्जीचे संस्कार ..आणि एका ज्येष्ठ कवियत्रीच्या जीवनाचा तो काहीसा उदास वाटणारा अनवट प्रवास वंदना बोकील.. कुलकर्णी यांच्या शब्दात सांगायचे तर त्यांच्याच पुस्तकातून शांताबाई ज्या व्यक्त झाल्या आहेत..त्या हळूहळू आपली कहाणी सांगु लागतात.. अनुराधा जोशी..दिपाली दातार..आणि वंदना बोकील या त्या शब्दातून तर कधी कवितेच्या बोलितून व्यक्त होऊ लागतात.. आणि या साऱ्या प्रवासाला व्हायोलीनच्या पार्श्वसंगीतात आणि साजेशा गाण्याच्या स्वरात अनुप कुलथे त्या वातावरणात घेऊन जातात.. एकूणच रसिक शांताबाई शेळके यांच्या आयुष्यातील एकेक घटना एकाग्रतेने ऐकतात आणि त्या गोष्टीचा मागोवा घेत..त्यांच्या जीवनात एकरूप होऊन जातात..
शांता शेळके यांची गीते मना मनात..घराघरात पोचली पण त्यांच्या कविता तेव्हढ्या पोचल्या नाहीत.. ही खंत त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दूर करून त्यांच्याच पुस्तकातून त्यांनीच लिहलेल्या शब्दांना एकत्र करून वंदना बोकील यांनी आपली अनवट शांताबाई सादर केली..आपल्या आम्ही सुदर्शन रंगमच इथे हा अनुभव घेतला..या कार्यक्रमात सहभागी होऊन रसिकांना त्यात सामील करून वंदना बोकील. कुलकर्णी आम्हाला त्या दिवसात घेऊन गेल्या. शांता शेळके यांच्या मनातील व्यथा आणि त्यांचे ते एकाकी जगणे आणि त्यांच्या मनोव्यथा दर्शविणाऱ्या कविता निवडून लहानपण..घरगुती वातावरण..त्यांची जात.. त्यांचे शिक्षण .. त्यांनी मुंबईत जपलेले नाते आणि कवितेशी त्यांची जमलेली गट्टी सारेच इथे व्यक्त होते.. परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडली आहे त्याची ही कहाणी.. ओठांवरती थोडे हासू डोळा थोडे पाणी ठेऊन शब्दांच्या जोडीला इथे कविताही बोलक्या होतात..या अभिवाचानात बोलून न बोललेल्या भावनाही मनाला भिडतात त्याचे कारण प्रभावी व्यक्त होणे या सादर करणाऱ्या कलाकारांच्या भूमिकेतून..
त्याची परिणाकारकता इथे ऐकताना तुम्हालाही जाणवेल आणि तुम्ही सहजी त्या वातावरणात सामील होता. शब्दातून व्यक्त झालेल्या ओळीतून त्यांचे जगणे अंगावर येते..आणि आपण ज्या आनंदी आणि मनमोकळ्या भासलेल्या शांताबाई खरोखरीच कोणत्या उदासवाण्या आयुष्यात जगल्या त्याची ओळख होते.. कारुण्याचा स्पर्श या अनवट शांताबाई कार्यक्रमात सतत तुमची पाठ सोडत नाही.. आणि मग शेवटी जेंव्हा असेन मी नसेन मी..ची ओळ येते तेंव्हा पर्यंत हाच आशावाद कायम राहतो..
खरे तर अशा कार्यक्रमावर थोडक्यात व्यक्त होणे ही परीक्षा असते..यासाठी त्यांच्या काही कविता यांचा संदर्भ घ्यायचा मोह टाळून सुदर्शनच्या मंचावर..उत्तम रसजी, वाचकांच्या साक्षीने अनुभवलेल्या शांताबाई..यावर व्यक्त होणे खूप कठीण आहे..तो अनुभव प्रत्यक्ष घेणे हेच उचित होईल. अश्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि ती अनुभूती मनात कायम ठेऊन त्यांचे स्मरण सतत ठेवावे असाच हा कार्यक्रम आहे.. चंद्र.. चांदण्या..फुले वेचून..त्यामागची कळ्यांची वेदना तुम्हाला जगायला अधिक शिकवेल हे नक्की..
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com