Saturday, November 2, 2019

गृहिणी-सखी-सचिव...सुनीताबाई देशपांडे



( पूर्वार्ध )

“ काऽऽय हो ? काय म्हणताय ?” असा परिचित आवाज मला माझ्या नव्या लॅंडलाईनच्या रिसीवर मधून ऐकू आला आणि मला एकदम हुश्श झाले. म्हणजे ते दोघेही पुण्यातल्या त्यांच्या घरीच होते. मी पुण्यातच, गावातून कोथरूडला राहायला आलो होतो. माझ्याकडे नुकताच दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दूरध्वनी आला होता. आणि चक्क सुरूही झाला होता. मोबाईलचा जमाना इथे सुरू व्हायचा होता अन लॅंडलाईनला अजून महत्व होते. पहिलाच कॉल कोणाला करायचा तर तो मी १, रूपाली ७७७, शिवाजीनगर, पुणे येथे केला होता. अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व असलेल्या पु लं च्या घरी. त्यांच्या ३३४६२८ या नंबरवर, दिवस होता १४ ऑगस्ट १९९६. पलीकडून सौ. सुनीताबाई देशपांडे बोलत होत्या. त्यांचा नेहमीच बोलताना येणारा “ काऽऽय हो ” चा आवाज मी झोपेतून उठवले तरी त्यावेळीही सहज ओळखू शकलो असतो. मी त्यांना नवीन फोनबद्दल सांगितल्यावर त्या क्षणी त्या म्हणाल्या – “ थांबा हं .... मी तुमचा नवीन नंबर डायरीत नोंद करून ठेवते.” त्यांनी लगेच तशी नोंदही केली आणि मगच रिसीवर भाईंच्याकडे सोपवला.


मी साधारण १० वीत असल्यापासून आठ नोव्हेंबरला न चुकता पु लं च्या घरी त्यांना शुभेच्छा द्यायला जात होतो. नंतर शिक्षण संपवून मी औद्योगिक प्रकाशचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. आवड म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंतांच्या भावमुद्राही टिपायला सुरुवात केली. माझी ती आवड त्या दोघांच्या नजरेतून सुटती तरच ते नवल. मग मला ते वेगवेगळ्या घरगुती मैफिलींची निमंत्रणे आमच्या वाड्यातील श्री. हर्डीकर यांच्या फोनवर देत असत. कधी त्यांचे फोटोचे काही काम असे. मी ते त्वरेने करीत असे. त्यामुळे वेळोवेळी मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळे. कधी माझ्याजवळ कॅमेराही असे. पण बऱ्याच दिवसांच्या परिचयानंतर मला हे उमगले होते की – पु लं ना फोटो काढून घेण्याचे वावडे नव्हते पण सुनीताबाई मात्र फोटो काढून घ्यायला विरोध करीत. त्यातून त्या दोघांचा फोटो काढलेला त्यांना अजिबात खपत नसे. याचं कारण त्या सर्वसाक्षीलाच माहित. पण मी मात्र मनाशी ठरवून टाकलं होतं की ते दोघे असताना, मग ते त्यांच्या घरी असोत की एखाद्या कार्यक्रमात, मी कॅमेरा बॅगमधून बाहेरच काढत नसे. अगदी पु लं च्या जन्मदिनाच्या निमित्तानेही मी तसा फोटो कधी काढला नाही. पण प्रत्त्येक जन्मदिनी येणाऱ्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे, त्यांच्या हातावर लगेचच पेढा ठेवणे, कोणी फुले आणली असतील तर तो गुच्छ सोडवून आधी आलेल्या व त्यांनीच सुंदरतेने खोलीत मांडून ठेवलेल्या त्या पुष्परचनांत ती नवी फुले अलगद खोवून ठेवणे, मधेच कोणा महत्वाच्या व्यक्तीचा फोन आला तर तो घेऊन उत्सवमूर्तीला आणून देणे, जमलेल्या गप्पांमध्ये एखाद्या घटनेचा संदर्भ तारीख-वार सांगणे व ही सर्व कामे उत्साही आणि हसतमुख चेहऱ्याने करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते सुनीता पुरुषोत्तम देशपांडे. 


माझं भाग्य असं की मी पु. ल. आणि सुनिताबाईंच्या स्नेहशील परिवारातलाच झालो होतो. सुनिताबाई जितक्या स्पष्टवक्त्या, व्यवहारी तेवढ्याच सहृदय, आतिथ्यशील होत्या. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे हे दोन्ही पैलू मी अनुभवले. साधेपणा हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय ठरेल. त्याचा एक अनुभव मला आला. दिनांक ८ नोव्हेंबर १९९८. पु ल ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार होते. लेखकाचा वाढदिवस कसा साजरा व्हावा?  त्याच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाने? हे तर उत्तमच. आणि त्या दिवशी तर पु लं च्या पुस्तकाच्या बरोबरच सुनिताबाईंच्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार होते. पु लं चे ‘आपुलकी’ हे पुस्तक तर सुनिताबाईंचे ‘सोयरे सकळ’. त्यांच्या मालती-माधव या भांडारकर रोडवरील घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये हा छोटेखानी समारंभ होता. त्यावेळी पु. ल. व्हीलरचेअरवर होते.  दुसऱ्या कोणी व्यक्ती असत्या तर अशा कार्यक्रमाला उंची असे कपडे आणि झगमगाट नक्कीच दिसला असता. पण इथे तर उत्सवमूर्तींनी अतिशय साधे कपडे घातले होते. पु ल साध्या खादीच्या बंडीत आणि पायांवर शाल पांघरलेले. तर सुनीताबाई जांभळ्या रंगांची फुले असलेली सुती साडी नेसलेल्या. डामडौल नसलेला पण दोन महनीय व्यक्तींचा असा कार्यक्रम.


सुनिताबाईंचे दोघे बंधू व इतर कुटुंबीय, साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत, मधुभाऊ गानू, शांताबाई शेळके, ज्योत्स्नाबाई भोळे, राम गबाले, भक्ती बर्वे अशा काही मंडळींची आवर्जून उपस्थिती आणि या सगळ्यांचे स्वागत करीत होते रामभाऊ कोल्हटकर. सगळेच एकमेकांना परिचित. त्यामुळे गप्पांचा फड जमणे हे आलेच. काही वेळाने सुनिताबाईंनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी दोन्ही पुस्तकांची पार्श्वभूमी कथन केली. पुस्तकांचे प्रकाशन अर्थातच ज्येष्ठ प्रकाशक श्री. पु. भागवत यांच्या हस्ते होणार होते. ‘आपुलकी’ चे प्रकाशन त्यांनी केले. ते पुस्तक  पु लं नी ज्येष्ठ लेखक श्री. ना. पेंडसे यांना अर्पण केलेले. मग प्रकाशन झालं ‘सोयरे –सकळ’ चे. श्री पुं नी पुस्तकाचे मुखपृष्ठ जमलेल्या सर्वांना दाखवले. सुनिताबाईंच्या गाजलेल्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकानंतरचे हे दुसरे पुस्तक. त्यांनी ‘सोयरे –सकळ’ ची ती प्रत सुनिताबाईंच्या हातात दिली. याची अर्पणपत्रिका काय असणार? पु लं सकट सर्वांनाच उत्सुकता. त्या उत्सुकतेनी ते सुनिताबाईंकडे पाहत होते. सुनिताबाईंनी पहिले पान उघडले आणि पु लं समोर धरले. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘सोयरे-सकळ’ हे पुस्तक सुनिताबाईंनी साक्षात पु लं नाच अर्पण केले होते. पु लं च्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. सगळं वातावरणाच भावूक होऊन गेलं. त्या वातावरणात बदल घडवला तो ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके यांनी वाचून दाखवलेल्या एका काव्याने. त्यानंतर परत सगळे एकमेकांशी बोलण्यात रंगले. त्या गप्पांच्या आवाजाने पार्किंग भरून गेले.


सुनिताबाईंनी टाळ्या वाजवत परत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता त्या काय सांगतात याकडे सगळ्यांचे कान व लक्ष. त्या म्हणाल्या- “ जी गोष्ट आजपर्यंत कधीही घडलेली नाही अशी एक कृती मी आज आत्ता करणार आहे. तुम्ही सर्वजण त्याचे साक्षी असणार आहात. मी भाईला नमस्कार करते.” असे म्हणत त्यांनी पुढच्याच क्षणी पु लं ना वाकून नमस्कार केला. आयुष्यभर पु लं शी बरोबरीच्या नात्यानं वागणाऱ्या सुनिताबाईंच्या या कृतीनं सगळेच अचंबित झाले. वातावरणात एकदम शांतता पसरली. या शांततेचा भंग करीत पुढच्याच क्षणी पु लं नी मला हाक मारली व म्हणाले- “ सतीश, या घटनेचं प्रूफ मला हवयं. हा फोटो मला हवायं.” त्यांच्या या वाक्याने वातावरणातला तो ताण कुठल्याकुठे नाहीसा झाला. मग सुनिताबाईंनी परत एकदा वाकून पु लं ना नमस्कार केला अन तो क्षण मी कॅमेराबद्ध केला. आज त्या आठवणींनीही माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इतकी मोठी ही माणसं अन किती साधेपणा.



जून १२, २००० ला पु. ल. अनंताच्या प्रवासाला निघून गेले. काही न काही कामानिमित्त माझं मालती-माधव मध्ये जाणं सुरूच राहिलं. भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेल्या माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला पु लं नी माझ्या त्या प्रकाशचित्रांवर लिहिलेला अभिप्राय छापायचा होता. अभिप्राय होता – “या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.” मी सुनिताबाईंना भेटलो. अभिप्राय मराठीत होता. कॅलेंडर इंग्लिश मध्ये. मी मित्राकडून त्याचं भाषांतर करून घेतलेलं. ते वाचल्यावर सुनिताबाई म्हणाल्या – “ हे भाषांतर फारच गद्य वाटतयं. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला याचं रूपांतर करून देते.” त्यांचा कवितांचा अभ्यास व प्रेम दोन्ही प्रचंड. संध्याकाळी चार वाजता मला त्यांचा फोन आला. म्हणाल्या- “ हं. घ्या लिहून. These excellent photographs create musical melodies in the minds.”  ते समर्पक आणि काव्यात्मक रूपांतर ऐकून मी आनंदून गेलो. माझ्या त्या ‘म्युझिकॅलेंडर’ वर अवतरलेला पु लं चा तो अभिप्राय आणि त्याबरोबरच त्यांची स्वाक्षरी यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.


सुनिताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास. ‘सोयरे-सकळ’ या पुस्तकानंतर त्यांचे प्रकाशित झालेले पुढचे पुस्तक म्हणजे ‘मण्यांचीमाळ’. ते प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी मी ते डेक्कन जिमखान्यावरून विकत घेतले. वेळ संध्याकाळची. तेथूनच मी त्यांना फोन केला. परत एकदा “ काऽऽय हो ? अशी त्यांची विचारणा. मी नुकतेच घेतलेल्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी हवी आहे असे सांगितले. त्यांनी किती वेळात येऊ शकाल? असे विचारले. मी त्यांना म्हणालो- “ पाचच मिनिटात पोहोचेन. आत्ता डेक्कनवरच आहे.” आणि अक्षरशः पाच मिनिटात मी तेथे पोहोचलो. त्यांनी पुस्तकाचे पहिले पान उघडून सही केली “ सुनीता देशपांडे १५.१०.२००३.” मग इतर काही बोलणे झाले व मी लगेचच निघालो.


पुढच्याच दिवशी त्या छोटेखानी पुस्तकात मी पूर्ण गढून गेलो. एकतर मला त्यांची लेखनशैली अतिशय आवडे. व त्यांनी त्या पुस्तकात निवडलेले बारा लेखही अतिशय सुंदर. त्यातही ‘डोडी’ या  त्यांच्या नातवाने पाळलेल्या आणि बराच वेळ त्यांच्याच घरात वास्तव्यास असलेल्या कुत्र्याविषयी लिहिलेला लेख फारच सुंदर. मी ते पुस्तक वाचत असतानाच मला सुनिताबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या – “ काल  तुम्ही मण्यांचीमाळ या माझ्या पुस्तकावर सही घेऊन गेलात ना?” माझे उत्तर अर्थातच हो असे होते. त्या पुढे म्हणाल्या – “ उद्या तुम्ही ते सही असलेले पुस्तक परत घेऊन या.” मला काही उलगडाच होईना. पण काय बोलणार? मी त्यांच्या त्या म्हणण्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी पुस्तक घेऊन त्यांच्या घरी हजर. त्यांच्या हातात मी ते पुस्तक दिले. काहीही न बोलता त्यांनी ते पुस्तक पूर्णपणे पान –अन – पान निरखून पाहिले. आणि मग माझ्या हातात परत दिले. आताही मला काही उलगडा होईना. मग त्यांनी कारण सांगितले- “ अहो, आज अजून एक गृहस्थ आले होते सही घ्यायला. त्या पुस्तकातील कागद खराब होता. त्यावर बरचसे काळे ठिपके होते. संपूर्ण पुस्तकभर ते ठिपके होते. आणि मग काही ठिकाणी अक्षरांवर एखादा ठिपका आला तर तो अनुस्वरासारखा दिसत असल्याने मजकुराचा अर्थच बदलत होता. मग मला तुमच्या पुस्तकावर केलेली सही आठवली. म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी काही कॉपीही मागवून ठेवल्या आहेत.” पण सुदैवाने माझ्याकडची कॉपी स्वच्छ कागदाची होती आणि त्यामुळे सुनिताबाईंचे समाधान झाले होते.


अशी जागरुकता असलेले लेखक-लेखिका किती असतील? कोणी घेईल अशी तसदी? पण अशा व्यक्ती थोड्याच असतात आणि त्यांचा तो स्वभावच त्यांच्याबद्दल चुकीचे समज पसरवण्यास कारण ठरत असेल का?




*(उर्वरित लेख उत्तरार्धात )*

- सतीश पाकणीकर , पुणे.
  प्रसिद्ध प्रकाशचित्रकार

Friday, November 1, 2019

भूतान - नैसर्गिक सुंदरतेने नटलेला देश




 

 

सात दिवस भूतानमध्ये फिरून आल्यानंतर तिथल्या अनुभवलेल्या गोष्टी आजही डोक्यातून बाहेर जात नाहीत. जयगांव (पश्चिम बंगालचे शेवटचे गाव) मधून फुतशोलिंग (भूतानची हद्द येथून सुरू होते) शहरात केवळ एका भिंतीमधून पलीकडे भूतान मध्ये शिरलो गाडीचा हॉर्न पूर्ण बंद झाला. धुम्रपान बंदी आणि खूप काळ चालतील असे पक्के रस्ते.. आणि सर्वात महत्वाचे मोठमोठ्या वृक्षराजीने बहरलेला आणि डोंगरद-यांनी सजलेला निसर्ग.


ओडीसी हॉलिडेज या पुणेस्थित कंपनीच्या प्रतिक घैसास या तरूण संचालकाबरोबर आम्ही आठजण भूतानची मजा अनुभवली. पुणे ते कोलकत्ता..तिथून बागडोगरा.. विमानाने.आणि तिथून आरामदायी गाडीने फुंतशोलिंग..येताना फुंतशोलिग ते बागडोगरा पुन्हा गाडीने. मग बागडोगरा ते नवी दिल्ली..आणि नवी दिल्ली ते पुणे..विमानाने.. त्यातली हा काही निरीक्षणे.







संपूर्ण प्रवासात महिलांची व्यवसायात असलेली महत्वाची भागीदारी दिसते..दुकाने त्याच चालवितात.. लहान काय किंवा थ्री स्टार काय हॉटेलात त्यांचा सहभाग नजरेत भरतो.. तुमच्या मोठमोठ्या बॅगा देखील त्या उचलतात..तेव्हा त्यांची कीव येते..पण त्या ते काम हसत हसत करीत असतात. एका हॉटेलात तर लहानग्याला झोळीत बांधून त्याची आई अगत्याने सेवा करीत होती...तेंव्हा त्यांच्याविषयी आदर दुणावतो..




आम्ही फुतशोलिंग, थिंपू, पुनाखा आणि पारो एवढयाच भागात फिरलो..पण त्यातूनच एकूण भूतानच्या परिस्थितीविषयीचे आकलन होते. भूतानचे खरे सौंदर्य..त्या शेकडो मैल विखुरलेल्या डोंगर द-यातच आहे..तिथला भूभाग अणि स्वच्छ मोकळी हवा..





दाटलेले धुके..आणि त्यावर मधुनच टपकणारी..सोनेरी सूर्याची किरणे मन आणि शरिराला प्रसन्न करते..असंख्य रंगांची उधळण करणारा एक वेगळाच निसर्ग तुम्हाला खुणावतो. एका बाजुला रौद्र आणि दुसरीकडे शांतपणे पसरलेली आणि उंचच उंच बहरलेली वृक्षराजी पुन्हा पुन्हा हविहविशी वाटते.



















कुणीही वाहनांचा हॉर्न वाजवित नाही. रस्ता ओलांडताना जिथे पांढरे पट्टे आहेत तिथेच पलिकडे जायचे. वाटेत कुठेही उतरून कुठलाही विधी करणे दंडनिय अपराध होतो. त्यासाठी १०० रूपयांचा दंड आहे. त्यासाठी अगदी डोगर माथ्यावरही स्वच्छतागृहे सशुल्क आणि स्वच्छही आहेत. सारा प्रदेश चढाणीचा असल्याने वर जाणा-यांना प्राधान्य दिले जाते..अगदी तिथेही कुठलिही घाई दिसत नाही. कुशल आणि सुरक्षित वाहन चालविणारे वाहनचालक तुमची आणि वाहनाची सुरक्षा सतत घेत असतात. कुठेही टोल नाका नाही.












रस्त्यांवर टपरी दिसत नाहीत की भिकारी. बाजारपेठांसाठी वेगळी मुबलक जागा दिला आहे..तिथेच व्यापार चालतो.. एकच दाम. त्यात घासाघीस नाही. मात्र काही ठिकाणी तुम्ही भारतीय म्हणून किमतीत मात्र दुप्पट दाम वसूल केला जातो. सफरचंद गोड आणि भरपूर मिळतात. १०० ते १२० रुपये किलोने., आक्रोड मिळतात. पण सुकामेवा फारच कमी. गाजर, मोठमोठे मुळे. काकडी, तमालपत्र, पांढरा लसून, हिरवा घेवडा, लांबलजक वांगी, टोमॅटो..तुम्हाला भाजीच्या दुकानात सहजी दिसून येतील.


बाजारात काही दुकानात तांबड्या मिरच्यांची माळ लटकलेली दिसते. त्या वाळविण्यासाठी अडकविलेल्या असतात. हिरव्या, हिरव्या -तांबड्या, आणि लाल भडक पण मोठ्या मिरच्या सर्वत्र आढळतात. थंडी भरपूर असल्याने ते सारे लोक मिरचीची भाजी करतात. भात पण तोही पाणी काढलेला फडफडीत असतो. चवही वेगळीच असते. थोडा पित्तकारच. बटाटा रस्सा. जि-याची फोडणी घातलेली बटाटा भाजी फार रूचकर करतात. त्या बटाट्याला एक स्वाद आहे. काही ठिकाणी..फुलके मिळोले..पण तेही ३५ रूपयाला एक याप्रमाणे. बटाटे घातलेला परोठा सर्वत्र मिळतो. शाकाहारी मेडळींचे फारसे आडत नाही.. आम्ही एका रस्तावर कणीसहि भाजून खाल्ली.

रस्त्यातून अगदी डोंगरावरही महिला, मुली बिनदीक्कत फिरताना दिसतील, एकूणच नागरिक सुरक्षीत आणि काळजी घेणारे आहेत. गुन्हेगारी फारशी आढळत नाही.. बाजारूपणा कमी आणि खुशाली अधिक दिसते. हॉटेलमध्येही पैशाची कुणीही मागणी करत नाही..त्यांची ती अपेक्षाही दिसत नाही. चेह-यावर सतत हास्य आणि सेवेत प्रसन्नता असणारी ही मंडळी तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी झटत असतात.. एखादी गोष्ट पटली नसेल तरी ते नाराजी दाखवत नाहीत.







धार्मिकता एकीकडे आणि राजा राणीविषयीची आत्मियता दुसरीकडे.. प्रत्येक ठिकाणी राजा राणी आणि त्यांचा लहानगा मुलगा यांची छायाचित्रे अग्रभागी लावलेली असतात.. अगदी मंदिर, मॉनेस्ट्री, दुकाने, हॉटेलातही.




भूतानचे चवथे राजे जिगमे सिंग्ये वांगचुक  हे पर्यावरण प्रेमी आहेत. भुतानचा ६० टक्के भाग वनांनी युक्त हवा असे बंधन आहे.. म्हणून राजांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त  जागतिक पर्यावरणाचे दिवशी एका तासात १०० लोकांनी  एकत्र येऊन ४०८८५ झाडे लावली..याचा भूतानच्या सर्वसाधारण नागरिकाला अभिमान आहे..

राजाही आपल्या वाढदिवसादिवशी नागरिकांना भेट देतो.. मागील वर्षी त्याने त्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर ५० रुपये करून वेगळीच भेट दिली..

राजा- राणीला इथे आगळाच मान आहे.. घराघरात त्यांच्या तसबिरी पूजल्या जातात..

राजाचा जनतेवर अंकुश असल्याचे इथे दिसते..

बुध्दीझमवर विश्वास आणि भारताविषयी अपार प्रेम सतत वागण्यातुन पाझरत असते. पारंपारिक भव्य किल्ल्यांना ते झॉंंग म्हणतात.. पावित्र्य जपणे आणि ते कटाक्षाने इतरांनी पाळावे असा त्यांचा व्यवहार असतो.




डोंगराच्या भूभागावरची बर्फाच्या प्रदेशातली घरेही..उतरती तिन छपरांसारखी रेखीव असतात. त्यांची रचनाही एकसारखी..बाहेरून ती एकसारखी दिसावी असा दंडकच आहे..आत काहीही सुधारणा करा..पण ती एकसारखी असतात. सुबक आणि कलाकुसरीने युक्त. डोंगराच्या उतरणीवर वसलेली शहरे पाहताना आपण हारखून जातो.

शांतता. थंड हवा. प्रदुषण मुक्त फिरणे आणि मनमुराद आनंद देणारा भूतान आम्ही अनुभवला.. मनाला आनंद देणारा आणि कमालीचा स्वच्छ. पारो आणि पुनाखा नदीचे भव्य. पात्र आणि त्यातून वाहणारे नितळ पाणी.. भव्यता आणि सुंदरता यांचा संगम असलेला हा भूतान तुम्हालाही नक्की पहावासा वाटेल




- सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com