Thursday, September 26, 2013

'संहिता - The Script' - येत्या ११ ऑक्टोबरला




दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २० पुरस्कारांवर नाव कोरलेला आणि सहा विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झालेला चाकोरी बाहेरचे विषय हाताळणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. 'अशोक मूव्हीज प्रा. लि.' यांच्या सहकार्याने निर्माण झालेल्या या चित्रपटाची निर्मिती सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्टस लि.' ने केली असून, प्रस्तूती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या 'विचित्र निर्मिती' या संस्थेची आहे.

साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चित्रपटाच्या सर्वोत्तम संगीतासाठी असलेला पुरस्कार शैलेंद्र बर्वे यांना तर सर्वोत्तम पार्श्वगायनासाठी असलेला पुरस्कार आरती अंकलीकर यांनी गायिलेल्या 'पलके ना मोडो… ' या गीतासाठी मिळाला असून हे दोनही पुरस्कार सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' या चित्रपटासाठी मिळाले आहेत. 

ही कथा आहे एका चित्रपट दिग्दर्शिकेची. ब्रिटीश राजवटीच्या काळातल्या म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या आधी एका शाही संस्थानाच्या काळात या चित्रपटातल्या घटना घडतात, अशी कल्पना ती करते. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे एक राजा, एक राणी आणि एक राजगायक यांची गोष्ट होऊन बसते. त्याचबरोबर त्यात प्रेम, दुरावा, अगतिकता आणि ध्यास याही ओघानेच येतात. गंमत म्हणजे अश्या या सगळ्या कथानकाची कल्पना करता-करता त्या चित्रपट दिग्दर्शिकेच्या खाजगी आयुष्यातल्या घटनांचेही बेमालूम मिश्रण त्यात होऊन जाते. चित्रपटाचा निर्माता, लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शिकेसमवेत इतर तिघीजणी असे सगळेजण मिळून त्या चित्रपटाचा आणि व्याक्तिगत जीवनाचा शेवट देखील समाधानाचा आणि गोड कसा होईल याचा शोध घेतात. थोडक्यात सांगायचे झाले तर संहिताची गोष्ट ही स्वतः त्या चित्रपट दिग्दर्शिकेचीच आहे. 

 'संहिता - The Script' चे दिग्दर्शन करणारे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी आजवर बारा चित्रपट, चाळीसांहून अधिक लघुपट, पाच टेलिफिल्म्स आणि एक मालिका यांची निर्मिती केली असून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील असंख्य पुरस्कार मिळवले आहेत. 

 'संहिता - The Script' या मराठी चित्रपटाची निर्मितीसाठी तीन मान्यवर संस्था एकत्र आल्या असून सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्ट्स लि.' ने तसेच अशोक मूव्हीज प्रा. लि.' यांच्या सहयोगाने सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या 'विचित्र निर्मिती' या संस्थेने हा चित्रपट प्रस्तुत केला आहे.

 'संहिता - The Script' चे कथा, पटकथा आणि संवाद लेखन सुमित्रा भावे यांचे आहे तर गीतलेखन सुनील सुकथनकर यांनी केले आहे. संगीत शैलेंद्र बर्वे यांचे असून पार्श्वगायन आरती अंकलीकर यांचे आहे.

 सिनेमेटोग्राफी संजय मेमाणे यांची असून संकलक आहेत मोहित टाकळकर. कला दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि संतोष संखद यांचे आहे तर वेशभूषा गीता गोडबोले आणि सुमित्रा भावे यांनी केली आहे.  'संहिता - The Script' मध्ये देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, डॉ. शरद भुताडिया, डॉ. शेखर कुलकर्णी, सारंग साठये, नेहा महाजन असे प्रमुख कलाकार आहेत.                        
                              

Monday, September 23, 2013

प्रत्येकाच्या मनात ...

शोध घेत आहे..कुठे स्वतःला रमवावं..काय नव करावं ज्यामुळे मनही मानेल आणि काही काम केल्याचा अनुभव येईल..एके काळी काम इतकं असायचं की पडल्यापडल्या कधी डोळा लागला ते कळायचंही नाही..आज मात्र उलटं आहे..आज काय काम काय याचा विचार करावा लागतो. खरं विचार करायचा झाला तर अनुभव असा आहे...कुठलेही काम कमी नाही हे मनात ठरवून काय केलं तर..त्याचा आनंद अधिक घेता येतो.. घरातलीही खूप कामे असतात..ती सहजपणे आपण करुन घरातल्या वातावरणात स्वतःला रमवून घेऊ शकता..


प्रत्येकाचा एक दिवस असतो
तेव्हा कुणी कुणाचा नसतो
उरतो तो स्वतः असतो
विचार न करताही तो दिसतो
मनताही त्याचा विचार पक्का असतो
तिथे कुठलाही अविचार नसतो
फक्त निग्रह कायम असतो

माणसावरचे प्रेम आतप्रोत असते
सारे काही त्या शब्दात सांधते
कितीही झाले तरी त्याचा एक काळ असतो
त्याचा आग्रह मग निग्रह असतो
कुणाचे राज्य त्याच्यावर नसते
तो स्वतंत्रपणे भासत असतो

प्रत्येकाच्या मनात असा दिवस येतो
काहीना काही सांगून जातो
नकळत सारे घडत असते
त्याचेसाठी सारे काही असते
त्याला विचारत सारे काही सुरु असते
त्याचे मत मग महत्वाचे असते


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276