Sunday, June 21, 2020

वडिलांचा कष्टप्रद प्रवास..

माझे वडील..कष्टप्रद आयुष्याचा प्रवास
विश्वनाथ बळवंत इनामदार..




हाफ खाकी चड्डी..अंगात फुल बाह्यांचा पांढरा शर्ट..भरदार केस..चेऱ्यावर समाधान.. कधी अंगात धोतर वर शर्ट आणि निळा कोट..असे वडील आज समोर उभे दिसताहेत..

माझे आजोबा कीर्तनकार.. वरूडकर बुवा..त्यांच्या कीर्तनाला पेटीची साथ वडील करीत..शिक्षण जेमतेम.
मुंबईत काही काळ आजोबांबरोबर..अहमदसेलरमध्ये निवास.. काकाही किर्तनकार.. मुंबई आकाशवाणीवर कीतर्न व्हायचे..
आईला मुंबईच्या दमट हवेचा त्रास.. म्हणून मुंबई सोडून सातारला स्थायिक.. आत्याचे मिस्टर वकील सातारचे एन जी जोशी.. त्यांच्या आर्थिक मदतीने  सोमेवापरात पिठाची गिरणी घातली.
घरची परिस्थिती बेताची..कमावते एकच..तेही पिठाच्या गिरणीतून..असे कितीसे मिळणार आणि साठणार तर किती..
पण सातारच्या सोमवार पेठेत आपली स्वतःची चक्की उभारून..वयाच्या ६५ पर्यंत ते पिठाच्या धुरात आयुष्य घालवले..सतत तोंड नाक पिठाच्या धुराने भरलेले असायचे..
घरी दुपारी जेवायला यायचे तेंव्हा कपडे झाडायला लागायचे..
 दुपारी थोडी डुलकी घेऊन परत गिरणीत जायचे ते साडेसातला भाजी घेऊन घरी दमून यायचे..
अगदीच दम्याचा त्रास आणि त्यातच मिळकत होईना..कमाई कमी आणि वीज बिल अधिक झाले..तेंव्हा गिरणी विकण्याचा निर्णय घेतला..
मग सुपारीच्या पुड्या भरण्याची मदत करून हातभार लावला..
कधी न रागावता खूप काम केले..आईही इतर बाहेरची कामे करून मदत करायची..
रोज कमाईतून पैसे बाजूला ठेवणे शक्य होत नव्हते..मुलांचा खर्च, बहिणीचे आजारपण..सारेच..पैसा नाही..कुणाची फारशी मदत नाही..म्हणून आईने भावे सुपरिवाले यांचेकडे सुपारी करण्याचे काम घेतले..इतरांच्या घरचे स्वयंपाकही ती करे..

सारे आठवले की मन पुन्हा त्या दिवसात जातं.. डोळ्यातून सारे ओघळायला होते..पण त्या दिवसात आईने वडिलांच्या साथीने कसा सारा संसार रेटला हे चित्र मनाला चीर पाडून जाते..

 आज आम्ही स्वतःच्या वास्तुत आहोत..समाधानी आहोत..पण ते सुख समाधान त्यांना कधीच लाभले नाही..याचे वाईट वाटते..

मात्र ते दिवस खरे मार्गदर्शक होते..त्या दिवसांनी खूप काशी शिकविले..नाते आणि मित्र यांच्यातला फरक ओळखून दाखविला..

आई-वडील दोघेही समर्थपणे उभे होते म्हणून आज आम्ही आमच्या पायावर खंबीर आहोत.. दोघेही अलग करता येणे अशक्य आहे..आईत वडील आणि वडीलांमध्ये आई..एकमेकांत मिसळलेली होती..दोघांच्या स्मृतीला नमन!



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail. com