Monday, January 9, 2023

मला भेटलेले विश्वास मेहेंदळे...!

नक्की साल नाही आठवत..पण सांस्कृतिक खात्याच्या मुंबईतल्या कार्यालयात साठे म्हणून एक उमदे व्यक्तिमत्व होते.. आमचे नाटक राज्य स्पर्धेत बक्षिसपात्र असल्याने नाट्य शिक्षण अभ्यासक्रमात सहभाग मिळावा म्हणून तिथे गेलो असताना.. त्यांनी मला तेंव्हा नवे संचालक म्हणून आलेले विश्वास मेहेंदळे यांची ओळख करून दिली.. बोलके आणि मनमोकळे असलेले मेहेंदळे मग एकदम आपलेसेच वाटायला लागले.. गप्पा आणि प्रचंड ओळखी असलेले हे बहुआयामी व्यकित्मत्व मनात रुजून बसले.. साधेपणा.. कुठलाही खोटा डौल नाही.. आणि तिथल्या तिथे निर्णय घेऊन तो अमलात आणण्याची हातोटी यामुळे ते कलाक्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या लोकात सहज जाऊन बसले.. त्यांना खोटेपणाचा तेंव्हापासून तिटकारा बोलण्यातून जाणवत होता. मीही नाटककार विद्याधर गोखले यांच्या संपर्कात होतो.. त्यांनाही त्यांच्यांबद्दल आदर होता. मी तरुण भारत या दैनिकातून राजीनामा देऊन बसलो होतो..पण कुठे काम नव्हते.. मला त्यांनी १९८१ ते १९८३ संस्कृतिक खात्यातर्फे होणाऱ्या नाट्य महोत्सवात प्रतिनिधी म्हणून नियुक्ती पत्र दिले.. त्यामुळे माझेवर त्याकाळीचे उपकारच त्यांनी केले होते. अशी व्यक्ती सरकारी कामात फार दिवस टिकणार नाही ..कारण त्यांचा स्पष्टवक्तेपणा .. तसेच झाले.. दामू केंकरे यांच्यानंतर ती संचालक पदाची खुर्ची विश्वासराव यांनी घेतली.. पण ते फार काळ राहिले नाहीत.. अशी चांगली माणसे सरकारी चाकोरीत टिकणे कठीण असते..तेच झाले सरकारी नोकरीतून मेहेंदळे बाहेर पुन्हा माध्यमांच्या दुनियेत गुरफटले.. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले.. सिंबायोसिस मध्ये वृत्तपत्र विद्या शिकविण्याचे नवे दालन त्यांनी उघडले.. पुढे.. काही काळ लालन सारंग यांच्यासोबत काही नाटकात कामे केली.. पण तिथे रमले नाहीत.. त्यांनी लेखनाचा ध्यास घेतला.. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचा अभ्यास करून पुणे विद्यापीठ मध्ये डॉक्टरेट मिळविली. नवी दिल्ली पासून दूरदर्शनवर बातम्या देण्याचे काम केल्याने त्यांना विविध मोठे लोक, राजकारणी यांना जवळून बघता आले..त्यातूनच त्यांना संवाद साधण्याची उत्तम कला अवगत होती.. मग त्यांनी मला भेटलेली माणसे.. सारखी व्याख्याने दिली..त्यातूनच त्यांच्या बोलण्याची ताकद उमगली.. त्याचेच पुस्तक केले.. पत्रकारिता.. समाज माध्यम आणि नाटक यातून त्यांचा पिंड उत्तम तयार झाला.. माणसे जोडली तशी तोंडावर गोड बोलण्याचा स्वभाव नसल्याने.. त्यांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले.. यातूनच ते फारसे दिसेनासे झाले.. अलिप्त होत गेले.. थोडे एकाकी बनले.. पण सतत मला हवे तसेच मी बोलणार..हा स्वभाव कायम ठेवला.. काहींनी जवळ केले..काहींनी झिडकारले.. पण ते ठाम राहिले.. सरकारी नोकरीत असल्याने.. आर्थिक बाबतीत ते कुणावर अवलंबून नव्हते.. ते स्वतंत्र होते.. अखेरपर्यंत स्वतंत्र राहिले.. वडील कीर्तनकार होते..त्यामुळे आख्यान रंगविण्याची त्यांची हातोटी व्याख्यानातून बाहेर डोकावत होती.. उत्तम वक्ते.. उत्तम निरीक्षणशक्ती आणि परखड विचार यातून विश्वास मेहेंदळे हे व्यक्तिमत्व मनात आणि समाजात कायम लक्षात राहील असेच होते.. एक इतिहास त्यांनी तयार केला.. घडविला.. त्यांच्या जाण्याने उत्तम व्यक्ती समाजमनातून हरपल्याची जाणीव होत आहे.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...! - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com